अस्वस्थ मनाचा माग

पराग पोतदार
सोमवार, 25 मार्च 2019

पुस्तक परिचय
 

सगळे काही सुरळीत आनंदी सुरू असताना, जीवनातल्या वाटेवर असे अनेकानेक अनुभव येत जातात, जे सगळे बिघडवून टाकतात. एखादे सुंदर चित्र आकाराला येत असते आणि अचानक ध्यानीमनी नसतानाही नको असणारे काही रंग बेमालूमपणे त्यामध्ये मिसळत जातात आणि निकराने प्रयत्न करूनही त्यांना रोखता येत नाही. त्यातून मूळ चित्रापेक्षा वेगळेच काहीतरी साकारायला लागते. कधीकधी तर त्या रंगाचे सपकारे ओढले जातात की काय, अशी भावनिक स्थिती निर्माण होत जाते. जे जीवनानुभव ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर आपले शांत वाटणारे अंतरंग ढवळून काढतात, अशा अनुभवांचा शब्दमागोवा घेण्याचे काम ‘काळेकरडे स्ट्रोक्‍स’ ही कादंबरी करताना दिसते. 

प्रणव सखदेव हा आजच्या तरुण पिढीतील नव्या दमाचा लेखक आहे. तो आजच्या युगाचीच भाषा बोलतो. त्याची ही नवी कादंबरीसुद्धा आजच्या जगण्याचे संदर्भ घेत तरुणाईचे एक वेगळे भावविश्व, त्यातील आवर्तने व आंदोलने उभी करत जाते. महाविद्यालयात शिक्षण घेणारा, क्रिएटिव्ह स्पार्क असणारा समीर नावाचा तरुण. त्याच्या आयुष्यात मित्र म्हणून आलेल्यांमध्ये अंध मित्र चैतन्य आणि मैत्रीण सानिका. सानिका आणि चैतन्य यांची अगोदरपासूनची मैत्री आणि प्रेमसुद्धा. त्यात नव्याने समीर येतो. चैतन्यशी छान मैत्री जुळत असतानाच एका क्षणाला एका अपघातात अंध असलेला चैतन्य जातो आणि तिथपासून प्रत्येकाच्याच आयुष्यात एक काळोख दाटतो. आठवणींच्या रूपाने तो सतत अस्वस्थ करीत राहतो. आनंदाच्या असो वा दु:खाच्या प्रसंगी, तो काळोख सतत सोबत राहतो. मैत्रीच्या त्रिकुटापासून सुरू झालेला प्रवास आनंददायी होईल, असे वाटत असताना आकस्मिक धक्‍क्‍यानंतर सानिका दूर निघून जाते आणि समीरच्या जीवनाची तर दिशाच हरवते. त्यानंतर त्याच्या आयुष्यात आलेल्या प्रवाहांबरोबर तो स्वत:ला जाऊ देत राहतो, दिशा देण्याच्या फंदात पडत नाही आणि आयुष्यातील अनुभवांना सामोरा जात राहतो. हा भावनिक आंदोलनांचा प्रवास वाचक म्हणून आपल्यालाही त्याच्यासोबत नेत राहतो. चैतन्यचा आकस्मिक मृत्यू, सानिकाचे आयुष्यातून दूर निघून जाणे या दोन धक्‍क्‍यांनी ढवळून गेलेल्या समीरच्या आयुष्याला आलेले एक बेफिकीरपण आपल्यालाही अस्वस्थ करीत राहते. अशातच अरुण नावाचा बिनधास्त जीवन जगणारा आयुष्यात आलेला मित्र आणि त्याच्या संगतीने बेफिकिरीने आयुष्याची केलेली उधळण त्याला आणखी खाली खाली घेऊन जात असते. आई-वडिलांपासून तुटलेल्या समीरला कुणाचाच आधार राहत नाही. सुरुवातीला दारू, मग गांजा आणि मग सेक्‍स अशा सर्वच बाबतीत तो वाहवत जाऊ लागतो. मग, अशाच एका टप्प्यावर त्याच्या आयुष्यात येते सलोनी. तिच्या सहवासात फुललेला प्रेमाचा अंकुर त्याला सुधारेल आणि योग्य वाटेवर घेऊन जाईल, असे वाटत असतानाच पुन्हा नवे वादळ उभे राहते आणि चित्र पुन्हा विस्कटते. 

काहीतरी चांगले साकारायला जावे आणि सतत फटकाऱ्यांनी चित्राचे सौंदर्य बिघडावे, तसे काहीसे आयुष्याचे होऊन जाते. समीरच्या या विस्कटलेल्या भावविश्वात नेण्यात लेखक यशस्वी ठरल्याचे जाणवते. व्यावहारिक जगण्याला छेद देणारे काळेकरडे फटकारे आणि त्यातील उदास पोकळी कादंबरीभर जाणवत राहते. आयुष्यात एखादी बोच, खंत, सल अशी असते, जी आयुष्यभर या ना त्या प्रकारे छळत राहते आणि ती काही केल्या आपला पाठलाग सोडत नाही. याचे स्वाभाविक दर्शन समीर, सानिका यांच्या व्यक्तिरेखांतून होत राहते. 

सहज, साधी, संवादी शैली, व्यक्तिरेखा उभी करण्याची उत्तम हातोटी, ओघवता लेखन प्रवाह या लेखनवैशिष्ट्यांमुळे ही कादंबरी कुठेही कंटाळवाणी होत नाही. ही कादंबरी वास्तव जगण्यातील अनुभवांच्या आधाराने मनाच्या डोहात उठवणाऱ्या भावनिक आंदोलनांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करताना दिसते. हेच या कादंबरीचे खरे बलस्थान म्हणावे लागेल. पाल्हाळीकता नसल्याने आणि प्रसंग विनाकारण ताणून लांबवलेले नसल्याने, जीवनदर्शनाचे निष्कारण उपदेश नसल्याने यातील सहजता जपली गेली आहे. भाषा आजच्या तरुणाईची आहे. आजच्या काळातील विशेषतः तरुणांच्या जगण्यावर ही कादंबरी प्रकाश टाकते. 

कादंबरीमध्ये व्यक्तिरेखा प्रथमतः प्रभावीपणे उभे राहणे महत्त्वाचे असते. समीर, सलोनी, चैतन्य अशा सर्वच व्यक्तिरेखा या कादंबरीत प्रभावीपणाने उभ्या राहिलेल्या दिसून येतात. 

काही प्रसंग मात्र अवास्तव वाटतात. काहीवेळा प्रसंगांची ओढून ताणून केलेली जुळवाजुळवच वाटते. त्यामुळे एका वास्तव पटलावर उभी राहणारी कादंबरी कल्पनेच्या पातळीवर रम्य कल्पना करते आहे, असे वाटू लागते. या पुस्तकाचे मुखपृष्ठ अन्वर हुसेन यांनी साकारले असून ते पुस्तकाच्या शीर्षकाला विलक्षण उठाव देणारे ठरले आहे. एकुणात एक उत्तम वाचनानुभव देण्यात ही कादंबरी बऱ्याच अंशी यशस्वी ठरते, असे म्हणता येईल.

संबंधित बातम्या