धगधगत्या वास्तवाचा आरसा

पराग पोतदार
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

पुस्तक परिचय

भारतीय समाज हा विविधतेच्या अनेकानेक धाग्यांनी गुंफलेला आहे. त्याचवेळी हाच भारतीय समाज अशाच विविधतेच्या असंख्य मुद्द्यांतील ताण्याबाण्यांनी ओढला जातो आहे. त्यामुळे विविधतेत एकता जशी आहे, तसा अंतर्विरोधसुद्धा आहे. एक चित्र उदात्त आणि आदर्श आहे, तर दुसरे अगदी धगधगीत वास्तव. 

हिंदू-मुस्लिम धर्मीयांतील परस्परसंबंध आणि दोन्ही धर्मांमध्ये आढळून येणारा कट्टर धार्मिकतेचे आग्रह, परस्परांविषयीचे समज-गैरसमज या सगळ्याचा एक गुंता झालेला आहे. त्यातून प्रत्येकजण आपापल्या सोयीने त्याचा अर्थ लावतो आणि आपले ईप्सित साध्य करीत पुढे जात राहतो. परंतु सामाजिक वास्तव लक्षात घेऊन त्यावर प्रकाश टाकून या बदलांसाठी ठोस पावले मात्र पडताना फारशी दिसत नाहीत. समाजातील हेच विविध स्तरांवर असणारे एक धगधगीत सामाजिक वास्तव आरसा बनवून आपल्याच समोर उभे करण्याचे धाडस अभिराम भडकमकर लिखित ‘इन्शाअल्लाह’ ही कादंबरी करते.

जुनैद नावाचा एक मुलगा अचानक घरातून गायब झालेला असतो. वस्तीतल्या काही पोरांची धरपकड होते, परंतु त्यांना जुनैद हवा असतो. तो त्या दिवसापासून घरी परतत नाही. तो दहशतवादी असल्याचा संशय पोलिसांच्या स्तरावर बळावत जातो. हा या कादंबरीचा केंद्रबिंदू आहे आणि तेच कथासूत्रही. जुनैदच्या शोधापासून सुरू झालेली कथा आपल्याला अनेक वळणवाटांनी घेऊन जाते आणि समाजात आपल्याच आजूबाजूला दिसत असलेल्या वास्तवाचे एक अस्सल रूप बदललेल्या नावांच्या रूपाने समोर आणून दाखवते. 

त्यामध्ये कट्टर धार्मिक विचारांचे मौलवी येतात, जुन्या प्रथा परंपरांना चिकटून बसलेले लोक येतात; त्याचवेळी आपल्याच धर्माकडे स्वच्छ नजरेतून पाहणारे आणि काही बदल घडवण्यासाठी, मुक्त अवकाशात झेपावण्यासाठी आसुसलेले झुल्फीसारखे तरुण मुस्लिमही दिसतात. त्यात स्वार्थी वकीलही दिसतात आणि सगळ्याचाच इव्हेंट करण्यासाठी आसुसलेले पत्रकारही दिसतात. व्होटबँक जपण्यासाठी समाजमनाशी खेळणारे राजकारणीही भेटत जातात. धर्माचा आग्रह धरताना अन्य धर्माविषयी विनाकारण राग धरणारे तरुणही दिसतात, तर त्याचवेळी याच समाजात थोडे संयतपणाने सगळ्या गोष्टींकडे पाहत आश्वासक बदलांसाठी प्रयत्न करणारेही दिसतात. या सगळ्यांची एक बेमालूम आणि सुरेख गुंफण करीत अभिराम भडकमकर यांनी संपूर्ण कादंबरीचा पट विणलेला आहे. या कादंबरीतील भाषा पात्रांनुरूप बदलत जाते. त्यामुळे ती कधी आपल्याला मुस्लिम मोहल्ल्यात घेऊन जाते, तर कधी उच्चभ्रू वातावरणातही. त्यावरून त्यांनी एकूण जीवनशैलीचा, समाजाचा आणि त्यातील बारकाव्यांचा किती बारकाईने अभ्यास केलेला आहे हे लक्षात येते. समाजातील वास्तवाकडे अत्यंत डोळसपणाने बघणारा आणि स्वतःच्या विचारांमध्ये स्पष्टता असणारा माणूसच इतक्या व्यापक, गुंतागुंतीच्या, नाजूक व तितक्याच प्रखर अशा विषयाला न्याय देऊ शकतो. अभिराम भडकमकर यांनी ते आव्हान समर्थपणाने पेलले आहे असे लक्षात येते.

कादंबरीची भाषा अतिशय ओघवती, प्रवाही आहे. त्यातील पात्रे आपल्या मनात रुजून जातात. ती सहज संवाद साधणारी आहेत. त्यामुळेच या कादंबरीचा पट मोठा असला तरीही ती कंटाळवाणी होत नाही. आजच्या जगण्याशी त्याचे संबंध जुळत असल्याने ही कादंबरी म्हणजे, आपल्याच आजूबाजूला घडत असलेले कुणीतरी काहीतरी सांगतो आहे असे वाटत राहते आणि त्यातून विवेकपूर्ण, तर्कशुद्ध आणि समंजस जगण्याची दृष्टी नकळतपणाने मिळत जाते, हेच या कादंबरीचे खरे वेगळेपण आणि सामर्थ्य आहे.

संबंधित बातम्या