महाराष्ट्राचे अंतरंग उलडण्याचा प्रयास 

पराग पोतदार
सोमवार, 12 ऑक्टोबर 2020

पुस्तक परिचय

महाराष्ट्र हे एक बहुरंगी, बहुढंगी आणि विविधतेने नटलेले असे राज्य. युरोपातील एखादा लहान देश सामावून घेता येईल इतके मोठे. त्याच्या अंतरंगात डोकावून पाहताना असे लक्षात येते, की विविध प्रकारच्या संस्कृती, वैशिष्ट्ये, भाषा, सामाजिक आचारविचार आणि कितीतरी विभिन्न गोष्टी इथे स्वतःचे म्हणून अस्तित्व राखून एकत्र नांदताहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक विश्वाचा एकत्रितपणे धांडोळा घेण्याच्या दृष्टीने साकारलेला ‘महाराष्ट्र दर्शन’ हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरतो. यातील अभ्यासपूर्ण मांडणीतून महाराष्ट्राचे विविधांगी आणि वैशिष्ट्यपूर्ण असे दर्शन घडते. 

आपण महाराष्ट्रात राहत असलो तरीही अवघ्या महाराष्ट्रभर नांदणाऱ्या संस्कृती, जीवनक्रम, इतिहास, भूगोल यांची सांगोपांग माहिती असतेच, असे ठामपणाने सांगता येत नाही. गेल्या ६०-७० वर्षांत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत झालेल्या स्थित्यंतराचेही एकत्रित चित्रण फारसे कुठे आलेले नाही. महाराष्ट्रातील वर्तमान परिस्थितीचीही एकत्रित पुरेशी ओळख आहे असे म्हणता येत नाही. त्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्राची जिल्हानिहाय माहिती देत त्याचे अंतरंग उलगडणारा हा प्रस्तुत ग्रंथ प्रकल्प महत्त्वाचा ठरतो.  

राज्यामधील सांस्कृतिक विविधतेची झालेली सरमिसळ समजून घेणे वाटते तितके सोपे नाही. त्यामुळे जिल्ह्याजिल्ह्यांतील जाणकारांच्या मदतीने उचललेले हे शिवधनुष्य म्हणजे कौतुकास्पद अशी धडपड आहे. याचे वाचन करणाऱ्या व्यक्तीची महाराष्ट्राविषयीची समज निश्चितपणे वाढू शकणार आहे आणि येथील बहुरंगी जीवनाचा पट यातून निश्चितपणाने उलगडू शकणार आहे. 

या प्रकल्पाच्या उभारणीसाठी दहा वर्षांचा कालावधी लागला असल्याचे नमूद केलेले आहे. त्यामुळे चांगली कामे घाईघाईत उरकता येत नाहीत हे या पुस्तकाच्या मांडणीवरून लक्षात येत जाते. 

महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक अंतरंगांचे जिल्हावार, परंतु एकत्रित दर्शन घडवण्याचा हा प्रयत्न निश्चितच स्तुत्य मानायला हवा. इतकी विविधता एका धाग्यात, एका सूत्रात बांधून ती यथायोग्य संपादनाद्वारे जगासमोर आणणे ही खचितच सोपे काम नाही. युनिक फिचर्सच्या पुढाकाराने हा संकल्प पूर्ण झाला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत जिल्ह्या-जिल्ह्यांमधील अभ्यासू आणि स्थानिक संदर्भ-इतिहासाची जाण असणाऱ्या माणसांना लिहिते करून हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यात यश आलेले आहे. पत्रकार, लेखक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते यांच्या लेखनसहभागाने या पुस्तकाला एक वेगळी उंची प्राप्त झालेली आहे. 

उपलब्ध माहितीची नेहमीच्या साचेबद्ध आणि रटाळ पद्धतीने मांडणी न करता प्रत्येक जिल्ह्याची माहिती वाचनीय ठरेल असा प्रयत्न जाणीवपूर्वक केलेला जाणवतो. त्यासाठी भाषेच्या सोपेपणापासून ते अचूक तपशिलापर्यंत सर्वच स्तरांवर पुरेशी मेहनत घेतली आहे. संशोधनाची किमान शिस्त जपत, त्याच्या मांडणीतील एकसूत्रता जपत प्रत्येक जिल्ह्याची वैविध्यपूर्ण माहिती पानापानांतून उलगडत जाते. त्यामुळे केवळ इतिहास, संदर्भ यांची सनावळीनुसार होत जाणारी नोंद अथवा माहितीची जंत्री, असा कोरडेपणा न राहता वाचनीयतेचा आनंद प्रस्तुत ग्रंथातून मिळत जातो हे त्याचे ठळक वेगळेपण. 

महाराष्ट्राचे ढोबळमानाने पाच भाग होतात. त्यातील सर्व प्रमुख जिल्ह्यांची माहिती तपशीलवार देण्यात आली आहे. ही मांडणी करताना विदर्भाला पहिले स्थान दिले असून त्या पाठोपाठ मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र या क्रमाने त्यातील जिल्ह्यांची माहिती दिलेली आहे. ‘झलक’ या शीर्षकाखाली प्रथमतः प्रत्येक जिल्ह्याची माहिती ठळक प्रमुख मुद्द्यांच्या आधाराने दिलेली आहे. त्याचा नंतर विस्तार करून सविस्तरपणाने मांडणी केलेली आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवतानाच सामाजिक, आर्थिक जीवन, लोकजीवनाची वैशिष्ट्ये हे सारे तपशील त्यामध्ये येत जातात. जिल्ह्याजिल्ह्यातील संस्कृती, परंपरा, लोकजीवन यांचाही धावता आढावा घेण्यात आलेला आहे. जिल्ह्याची वेगळी ओळख कशामुळे, सांस्कृतिक वेगळेपण काय आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी कोणती याचेही पूरक संदर्भ प्रत्येक जिल्ह्यातील माहितीत उद्धृत केलेले आहेत. या सर्व मांडणीत एकसंधता असल्याने अनेक लेखकांनी लेखन केलेले असले तरीही त्यात कुठेही विस्कळीतपणा जाणवत नाही. संपादक सुहास कुलकर्णी, सहसंपादक गौरी कानेटकर, महेंद्र मुंजाळ आणि मनोहर सोनवणे यांचे कष्ट पुस्तक वाचताना जाणवतात. याखेरीज, मनोज जोशी, देवेंद्र गावंडे, नरेंद्र लांजेवार, विजय दिवाण, इंद्रजीत भालेराव, प्रतीक पुरी, भारत गजेंद्रगडकर, अनंत येवलेकर, अवधूत परळकर, जयप्रकाश प्रधान, प्रसाद केरकर, सतीश कामत, अरुण खोरे, अविनाश सप्रे आदी जाणकारांनी यात लेखनस्वरूपात योगदान दिलेले आहे.  

एकूणच महाराष्ट्राचे एक समग्र आणि व्यापक चित्र जिल्हानिहाय पद्धतीने सुटसुटीतपणाने मांडण्याचा हा प्रयास एका मर्यादेपर्यंत निश्चितच यशस्वी झालेला आहे. येथील सांस्कृतिक वैविध्यतेचे, सामाजिक वैशिष्ट्यांचे अंतरंग समजून घेण्यासाठी ‘महाराष्ट्र दर्शन’ नक्कीच अभ्यासायला हवे.   

संबंधित बातम्या