प्राचीन कलात्मक ठेव्याचे सौंदर्यदर्शन

पराग पोतदार
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

पुस्तक परिचय

आयुष्यात एकेका विषयाला वाहून घेतलेली माणसे असतात. तो त्यांचा जीवनानंद असतो. त्यातच ती रमतात आणि अधिकाधिक सखोल जात राहतात. ‘अजिंठा’ हे पुस्तक वाचताना त्याचा प्रत्यय येत जातो. पूर्वानुभवाची शिदोरी कमरेला बांधून त्याच विषयात पीएच. डी. पदवी संपादन करण्याचे स्वप्न राधिका टिपरे यांनी पाहिले आणि त्या प्रबंधाला दिलेले पुस्तकरूप म्हणजे ‘अजिंठा’ हे पुस्तक आहे.

औरंगाबादेतील अजिंठा येथील अद्‍भुत लेणी पाहण्यासाठी देशातून आणि जगभरातून असंख्य पर्यटक येत असतात. अशा पर्यटकांना त्या लेण्यांचे सौंदर्य आणि इतिहास उलगडून दाखवण्याचे, पर्यटकांना योग्य वस्तुनिष्ठ असे मार्गदर्शन करण्याचे काम राधिका टिपरे या गेली अनेक वर्षे करीत आहेत. त्यामुळे त्यानिमित्ताने या विषयाचा त्यांचा सखोल अभ्यास यापूर्वीच होत आलेला होता. त्यामुळेच त्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रेरणा घेऊन पीएच.डी. संशोधन पूर्ण करण्याचे ठरवले आणि ‘अजिंठा लेण्यातील भित्तीचित्रांतून साधला जाणारा कलात्मक संवाद, सामाजिक आणि सांस्कृतिक विश्लेषण’ असे व्यापक अवकाश कवेत घेणारा विषय संशोधन प्रबंधासाठी निवडला. विशेष म्हणजे वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांनी संशोधन पूर्ण करून पीएच. डी. पदवी संपादन करीत डॉक्टरेट मिळवलेली आहे.

अजिंठामधील भित्तीचित्रे ही अतिशय प्राचीन आहेत. ही भित्तीचित्रे केवळ हौसेमौजेसाठी काढलेली नसून ती तत्कालीन समाजजीवनाचा आरसा आहेत. त्यामुळे तत्कालीन समाजजीवनाचे एक सुस्पष्ट आणि देखणे चित्रण त्यातून होते. धर्मसंकल्पनांचा कथाविस्तार त्यामध्ये आहे. त्यामुळे एका अर्थाने पौराणिक आणि सांस्कृतिक परंपरेचे एक समृद्ध दालन म्हणून या लेण्यांमधील भित्तीचित्रे आणि शिल्पांकडे पाहिले जाते. विशेष म्हणजे या सर्व अद्‍भुत कलाकृती साकारणाऱ्या कलाकारांची नावे अज्ञात आहेत. त्यामुळे टिपरे यांनी हे पुस्तकही त्या अनाम कलाकारांनाच अर्पण केलेले आहे.

अजिंठामध्ये सुंदर शिल्पकामाने नटलेल्या ३० गुफा आहेत. त्यातील दीड-दोन हजार वर्षांपूर्वी काढलेली अजंठा म्यूरल्स हा तर एक मोठा ठेवा आहे. अजिंठा हे कलासाधना करण्याचे केंद्र होते आणि शिल्पकलेइतकेच त्या काळीदेखील चित्रकलेला महत्त्व होते, या बाबी तेथील उपलब्ध संचितातून ध्यानात येतात. त्याचे महत्त्व व सौंदर्य अतिशय रसाळ व ओघवत्या शैलीत उलगडण्याचा प्रयत्न राधिका टिपरे यांनी केलेला आहे. अजिंठ्यातील शिल्पे ही दगडात एकसंध असल्याने तिथे चूक करण्याची परवानगी नव्हती. कारण चूक झाली तर दगड बदलता येणार नव्हता, त्यामुळे तत्कालिन शिल्पकार हे किती तयारीचे असतील याचा अंदाज आपल्याला टिपरे यांच्या विश्लेषणातून व त्यांनी दिलेल्या माहितीतून येत जातो. त्याचबरोबर दोन हजार वर्षांपूर्वीचे समाजजीवन कसे असेल याचीही ओळख या पुस्तकातून होत जाते. जातक कथांवर आधारलेल्या प्रसंगांची वर्णनेही प्रवाही पद्धतीने यात रेखाटलेली आहेत. लेखिकेची रसग्रहण क्षमता कौतुकास्पद आहे.  

व्यासंग, प्रत्यक्ष अनुभूती आणि पूरक संदर्भ ग्रंथांची मदत अशा तीनही गोष्टींच्या साह्याने हे लेखन केलेले असल्याने ते अधिक वस्तुनिष्ठ आणि अभ्यासपूर्ण झालेले आहे. एकूण ३२० पानांचा हा ग्रंथ असून त्याला ज्येष्ठ पुरातत्त्वशास्त्रज्ञ डॉ. गो. बं. देगलुरकर यांची प्रस्तावना लाभली आहे. त्यात उच्चार व लेखनातील काही त्रुटींचा त्यांनी उल्लेख केला असून तो जसाच्या तसा देण्याचे औदार्य लेखिकेने दाखवले आहे.

या पुस्तकाची मांडणी चार भागांत करण्यात आली आहे. भारतीय कला, भारतीय चित्रकला यांचा अभ्यासपूर्ण मागोवा घेण्यात दोन मोठी प्रकरणे खर्ची घातलेली आहेत. अजिंठा : धर्माधिष्ठीत कलेचा ठेवा या विषयावर तिसरे प्रकरण असून अंजिठा लेण्यातील कलाविष्कार उलगडण्यासाठी गुफा क्रमांक १ ते २७ मधील समग्र माहिती देण्यात आली आहे.

वाघूर नदीमध्ये असलेल्या अजिंठ्यातील लेण्यांचे दर्शन घडवणारे विहंगम दृश्य सुरुवातीच्या पहिल्या पानावर अतिशय सुंदररीत्या वापरलेले आहे. अविनाश कढे यांनी त्याची सजावट केलेली आहे. कलात्मक मांडणीमध्ये खुद्द लेखिकेचाही हातभार आहे. एकुणात हे पुस्तक अभ्यासपूर्ण तर आहेच, पण ते वाचनीय आणि प्रेक्षणीयही झाले आहे. त्यानिमित्ताने अजिंठ्यामधील सर्व लेण्यांचा इतिहास व त्यातील कलात्मकता सुंदररीतीने शब्दबद्ध झालेली आहे. त्यामुळे संग्राह्य ठेवावे असे हे पुस्तक झाले आहे.

अंजिठा
लेखिका : डॉ. राधिका टिपरे
प्रकाशक : कृष्णा प्रकाशन, 
किंमत : ९०० रुपये 
पाने ः 314

संबंधित बातम्या