झापडबंदपणातून मुक्त होताना...

पराग पोतदार
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

पुस्तक परिचय

आपल्यावर सर्वाधिक प्रभाव असतो तो घरातील संस्कारांचा आणि ज्या समाजात वावरतो त्या समाजाचा. त्या चौकटी भेदून जगाकडे पाहण्याचे धाडस अनेकदा अंगी येत नाही आणि मग एका ठाशीव साचेबद्धपणानेच आपले जीवनव्यवहार होऊ लागतात. त्याच चौकोनी जगातून आपण आजूबाजूच्या घटनांकडे पाहतो, त्याचे अन्वयार्थ लावतो आणि ठराविक पद्धतीचे शिक्केही मारतो. 

या झापडबंदपणातून बाहेर पडून जगाकडे मोकळेपणाने पाहण्याचा आणि जे वाटते, भावते, भिडते ते व्यक्त करण्याचा दृष्टिकोन म्हणजे सचिन कुंडलकर लिखित ‘नाइन्टीन नाइन्टी’ हा ललितलेखसंग्रह. 

एकोणीसशे नव्वदचे दशक म्हणजे विविध प्रकारच्या संमिश्र गोष्टींचा, अवस्थांतरांचा काळ. हे दशक अनेकार्थांनी वैशिष्ट्यपूर्ण होते. जागतिकीकरणाची कवाडे नुकती कुठे उघडू लागलेली होती. त्यामुळे आपल्यातच खूश होण्याचे दिवस संपून जगाकडे मान उंचावून पाहता येऊ लागले होते. त्यामुळे या आणि अशा अनेक बदलांच्या लाटेवर स्वार होणारी जी नवी पिढी होती त्यांचा प्रतिनिधी म्हणजे लेखक. सांस्कृतिक संचिताचे न झेपणारे ओझे आणि नव्या स्वप्नांची नवी आव्हाने या कात्रीत सापडलेल्या पिढीच्या मनोवस्थेचे अतिशय प्रभावी चित्रण करतानाच या काळातील मनोवस्थांचेही वास्तव आणि परखड चित्रण या निमित्ताने झालेले आहे. जे आवडले तेही मोकळेपणाने सांगितले आणि जे नाही त्याला थेट नाही म्हणून नाकारले. त्यामुळेच आयुष्यात काही झाले तरी जब्बार पटेल व्हायचे नाही किंवा श्रीराम लागू आणि सदाशिव अमरापूरकर मला अभिनेते म्हणून ग्रेट वाटत नाहीत हे बिनधास्त मांडण्याचे धाडस लेखकात आहे. 

विविध दिवाळी अंकात प्रसंगानुरूप लिहिलेले हे लेख एकत्र केलेले असले तरीही त्याची एकत्रित गुंफण झाल्यावर ते सुटे सुटे न वाटता एकसंधतेची अनुभूती देतात हे विशेष. कारण त्यातील काळाचा धागा समान आहे. 

जगाकडे नव्याने पाहत स्वतःला उलगडणारा लेखक तर भेटतोच, पण एकाच गोष्टीकडे विविधांगाने पाहणारा दिग्दर्शकही पानापानांतून भेटतो. याशिवाय, एक सच्चा संगीतप्रेमी भेटतो. प्रस्थापित चौकटी मोडून मुक्त होऊ पाहणारा माणूस भेटतो. कलेवर उत्कटतेने प्रेम करणारा रसिक भेटतो. जगण्यातील साध्या साध्या गोष्टींकडे सौंदर्यपूर्ण दृष्टीने कसे पाहता येते हे शिकवणारा कलावंतही भेटतो. त्यामुळे जगाकडे पाहावे कसे याचे अनेक ‘अँगल’ यातील अनेक अनुभवांतून उलगडतात. 

या पुस्तकात लेखांमध्ये आणि अन्यत्र वापरलेली ब्लॅक अँड व्हाइट छायाचित्रे अतिशय समर्पक आणि काळाचे ठाशीव संदर्भ उलगडणारी आहेत. गोल्डस्पॉटची बाटली, वॉकमन, टाइपरायटर या केवळ वस्तू न राहता त्या १९९० च्या दशकावरचा त्यांचा ठसा दाखवून देतात. छायाचित्रांच्या कलात्मक मांडणीला त्यामुळेच दाद द्यावीशी वाटते. 

पुस्तकातील पहिलाच लेख ‘नाइन्टीन नाइन्टी’ या शीर्षकाचा असून १९९० च्या दशकात तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या तरुणाचे त्याच्या आधीच्या पिढीशी पडलेले अंतर प्रतित होत जाते. या पिढीला जुने ओझे पाठीवर वागवायचे नाही. त्यांची मते स्वतंत्र आहेत. त्यांच्यात अभिव्यक्तीचे धाडस आहे. त्यामुळे त्या जातकुळीशी जवळ जाणारे त्यांना आपलेसे वाटतात. इतर जे आवडत नाहीत त्यांना तुम्ही मला आवडत नाही हे सांगण्याचे धाडसही त्यांच्यापाशी आहे. त्यामुळे लोकांना आवडते म्हणून मलाही आवडायला हवे अशा ओझ्यातून ही पिढी मुक्त होऊ पाहणारी आहे. त्या पिढीचा प्रतिनिधी म्हणून कुंडलकरांचे मनोगत म्हणूनच भावते. रूढ कल्पनांना आणि विचारांना धक्के देते.  

अनेक ठिकाणी उद्धटपणाकडे झुकणारा परखडपणा असला तरीही त्याच्या सीमारेषा ठरवून त्यावर शिक्के मारावेसे वाटत नाहीत. कारण शहरी मध्यमवर्गीय पुणेकर मुलाच्या मनोविश्वाचा नेमकेपणाने वेध घेताना आपले जगण्याचे अवकाश कसे आणि कशाने विस्तारले याचा उलगडा कुंडलकरांच्या लेखनातून होत जातो. 

मध्यमवर्गीय जीवन, भाषिक न्यूनगंड, मर्यादित पर्यायांतूनच निवड करायची सक्ती यातून सुरू झालेल्या जगण्याचा छेद कसा देता आला याचे दर्शनही होते. त्यामुळे हे लेख म्हणजे बदलत्या काळाची नुसती साक्षेपी नोंद न राहता त्याला त्या पलीकडचे काही व्यापक संदर्भ येतात आणि त्याचा पैस विस्तारत जातो. याच अनुषंगाने इतर लेखनातूनही प्रत्येक गोष्टीकडे वेगवेगळ्या आणि अधिक मोकळ्या, पूर्वग्रहदूषित दृष्टीने कसे पाहता येऊ शकते याचेच मनोज्ञ दर्शन घडते. 

नेहमीच्या साचेबद्ध प्रवासवर्णनाच्या धाटणीचा मोह टाळून ‘इस्तंबूल डायरी’ या ललित लेखामध्ये लेखक तिथले जगणे उलगडतो आणि आपल्याला तिथल्या वातावरणात घेऊन जातो. आपणही नकळत त्या अनुभवविश्वाचा भाग होतो. ‘पॅरीस नावाची प्रयोगशाळा’ या लेखामध्ये पॅरीसमधील कलात्मक कौतुकाच्या पलीकडचे जे पॅरीस आहे ते उलगडते. सुरक्षित जगण्याच्या पलीकडे जाऊन जगायला शिकवणारे असे काहीतरी तिथे गवसलेले असते. स्थिर, साचेबद्ध आणि नवे काही न घडणाऱ्या समाजातून आणि कुटुंबातून आलेल्या मुलासाठी फ्रान्समधील हे साडेतीन महिने आयुष्याला किती वेगळा आयाम देतात याचा उलगडा त्यातून होत जातो.

कुमार गंधर्वांच्या पंचविसाव्या पुण्यतिथीच्या निमित्ताने देवासला आयोजित सोहळ्याचा अनुभव ‘डाळिंबाचे दाणे’ या लेखात येतो. या सोहळ्याचे वर्णन म्हणजे एक रिपोर्ताजच ठरावा इतका सुंदर आहे. ‘एकट्या माणसाला घर हवे’ आणि ‘एकट्या माणसाचे स्वयंपाकघर’ या लेखांतून व्यक्तिगत जीवनातील आवडीनिवडी सांगतानाच एकट्याने आयुष्य जगण्यातील रंगतही उलगडते. १९९० च्या दशकात हाती आलेला ‘वॉकमन’, त्याने व्यापलेले भावविश्व, मनाच्या पोकळीतले संगीत, पुस्तकांचे वेड या सगळ्या लेखांतून त्या दशकातील अनेक बाबी सुरेखपणाने उलगडत जातात. ‘शरीर’ हा लेख तर अगदी जमून आलेला लेख आहे. चारचौघात स्वतः नग्न होण्याच्या आणि त्या नग्नतेकडे पाहण्याच्या संकोचापासून ते शरीराकडेच पाहण्याची एक नवी दृष्टी मिळण्याच्या प्रवासातील स्थित्यंतर अतिशय मार्मिकपणाने उलगडलेले आहे. ‘प्राइम टाइम स्टार’ या लेखातून चेतन दातार या व्यक्तीचे उलगडणारे व्यक्तिमत्त्व हा तर व्यक्तिचित्रणाचा एक उत्तम आलेख आहे. 

लेखक, नाटककार, पटकथाकार आणि चित्रपट दिग्दर्शक म्हणून नावाजलेल्या सचिन कुंडलकरांमधील दमदार सर्जनशील लेखक या पुस्तकातून नाट्य, कथा आणि विविध अँगल्स घेऊन अगदी ठळकपणाने समोर येतो. हा ललितलेखसंग्रह केवळ एका दशकाच्या काळाची नोंदवही न ठरता त्या पलीकडचे काही सांगू पाहतो. हे अधिक महत्त्वाचे. थोडक्यात काय, तर रोज नव्या अनुभवांसह अधिक शहाणे होत जगणे अर्थपूर्ण करण्याच्या प्रयत्नांचा आलेख म्हणजे नाइन्टीन नाइन्टी! 

नाइन्टीन नाइन्टी 
लेखक : सचिन कुंडलकर 
प्रकाशन : रोहन प्रकाशन, पुणे 
किंमत : ३०० रुपये 
पाने : २२८

संबंधित बातम्या