आयुष्य समृद्ध करणारे ‘प्रश्‍न’

पूनम छत्रे
गुरुवार, 10 जानेवारी 2019

पुस्तक परिचय
 

‘सूर्य पिवळ्या रंगाचा असतो, मग चंद्र निळ्या रंगाचा का असतो?’, ‘चिमणीला हात का नसतात?’ मुलं अक्षरशः कोणतेही प्रश्न विचारू शकतात. मोठमोठे डोळे करून, अवलोकनात येणारी आजूबाजूची प्रत्येक हालचाल आणि शब्द शोषून घेणाऱ्या मुलांच्या चिमुकल्या मेंदूत कोणत्याही कॉम्प्युटरपेक्षाही अधिक वेगानं माहितीच पृथ:करण होत असतं. आणि त्यातून निर्माण होतात प्रश्न!  

मृणालिनी वनारसेच्या पुस्तकाचं तर नावच आहे मुळी ‘प्रश्नांचा दिवस’. पृष्ठावर दिसतो एक शाळकरी मुलगा, ज्याच्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह आहे ! इतक्‍या लहान मुलाला कोणते बरे गहन प्रश्न पडले असतील? याचं कुतूहल वाटून आपण पुस्तक वाचायला लागतो. त्या शाळकरी मुलाचे नाव आहे संकेत. तो आठवीत आहे. त्याची आधीची सातवीपर्यंतची शाळा, सोडून तो मामाकडे रहायला आला आहे, पण खरं तर त्याला ही शाळा मुळीच आवडत नाहीये. त्या दिवशी रांगेत मित्राशी बोलताना मुख्याध्यापकांनी नेमकं त्याला पाहिलं आणि त्याला एक चांगला धपाटा दिला. संकेत दुखावला गेला.

रागाच्या भरात तो शाळेतून बाहेर पडला. ‘नको ते शाळा आणि नको ती शिस्त!’ डोंगरावर, मोकळ्या हवेत संकेतला बरं वाटायला लागलं... आणि मग सुरू झाला संकेतचा प्रश्नांचा दिवस ! मोकळ्या हवेत, शाळेच्या बाहेर पडल्यानंतर संकेतपुढे एक वेगळंच जग आलं. त्यात एक शेतकरीभाऊ आले, गुराखीही त्याला भेटला. या सगळ्यांशी बोलता बोलता संकेतला आणखी काही प्रश्न पडले. असा एक दिवस, कोणालाही न सांगता शाळेच्या बाहेर घालवल्यावर त्याला खूप छानही वाटलं. शाळेबद्दल जो राग आलेला आहे त्याचा आता मागमूसही नाहीये. त्याचं दप्तर शाळेतच राहिलेलं आहे, ते घ्यायला तो शाळेत परत आला. संकेत मधूनच पळून गेलेला आहे मुख्याध्यापकांच्याही लक्षात आलेलं आहे. त्यांनी त्याला भेटायला बोलावलेलं आहे.

बाप रे! मुख्याध्यापकांनी दुपारी धपाटा दिला म्हणूनच तर संकेत पळून गेला होता. आता परत त्यांच्यापुढेच उभं राहायचं? म्हणजे शिक्षा नक्की! पण या वेळी ते खूपच प्रेमाने बोलले, संकेतलाही खूप आनंद झाला, कारण सरांनी त्याला एक शिक्षा केलेली आहे, पण खरं तर ती शिक्षा नाही. त्याला आणि त्याच्या मित्रांनाही बोलते करेल, विचार करायला लावेल असं काहीतरी आहे ते. ती शिक्षा ऐकून संकेतच्या मनातली शाळेबद्दलची अढी गेली. 

लहान मुलांबरोबर काम करणं हा मृणालिनीचा आवडीचा प्रांत आहे, त्यामुळे संकेतची ही गोष्ट तिने सहज, सोप्या, ओघवत्या शैलीत लिहिली आहे. या गोष्टीत एक मोठा आशय दडलेला आहे. कदाचित तो लहान मुलांना समजेल, कदाचित समजणार नाही. पण आशय समजला नाही, तरी त्यांना ही गोष्ट नक्की समजेल आणि आवडेलही. संकेतला जे प्रश्न पडलेले आहेत, त्यांना कोणतंही एकच तयार, बांधेसूद उत्तर नाही. प्रत्येकाने आपापली उत्तरं शोधायची आहेत. ती बरोबर आहेत का चूक आहेत हे ठरवणाराही ज्याचा तोच. मृणालिनीने मोठ्या खुबीने हेही गोष्टीत पेरलं आहे. हे पुस्तक ‘चित्र-पुस्तक’ आहे असं म्हणता येईल. मधुरा पेंडसेने संकेतचं जगच तिच्या कुंचल्यातून जिवंत केलं आहे, त्यामुळे संकेत अगदी आपलासा वाटतो. इंटरनॅशनल असोसिएशन फॉर परफॉर्मिंग आर्टस ॲण्ड रिसर्च (IAPAR) ने हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. त्यामुळे त्यांच्या ‘आनंदरंग’ या खास मुलांसाठीच्या उपक्रमाद्वारे हे पुस्तक खूप खूप मुलांपर्यंत पोचणार आहे

याचा अधिकचा आनंदही आहे. हे छोटसं पुस्तक वाचताना वाटलं, की मनुष्य प्राण्याला समजायला लागल्यापासून सतत किती प्रश्न पडतात, नाही? सुरूवातीचे प्रश्न असतात सोपे, निरागस. मग समज येत जाते, तसे प्रश्नही अवघड होत जातात. काही प्रश्नांना उत्तर असतं, काही आपल्यालाच निरुत्तर करतात. पण हे प्रश्न आहेत म्हणून आपलं अस्तित्व आहे हेही खरंच. प्रश्नांना उत्तरं शोधणं, त्या करता प्रयत्न करणं,धडपड करणं, आपल्यासारख्याच आणखी काही माणसांबरोबर विचारांचं आदान-प्रदान करणं यांमुळे आपणच समृद्ध होत असतो. आपल्या मूळ प्रश्नाचं उत्तर त्यातून मिळेल असं नाही, पण अनेक प्रश्नांना तोंड देण्याचा अनुभव तरी त्यातून नक्की मिळतो. ‘झील से बेहतर है सफर’ असं म्हणतात ना, अगदी तसंच. त्यामुळे प्रत्येकाला प्रश्न पडायलाच हवेत आणि मुलांना तर नक्कीच प्रश्न पडायला हवेत. समज आल्यानंतर पडलेला पहिला प्रश्न, ‘मी कोण आहे?’ आणि सगळं काही समजल्यानंतर आयुष्य संपताना पडलेला प्रश्न, ‘कोऽहम?’; या दोन प्रश्नांच्या दरम्यान आपण जगतो. ते जगणं सर्वार्थाने श्रीमंत करतात तेही प्रश्नच असा ‘संकेत’ या पुस्तकातून मिळतो. 

संबंधित बातम्या