खानदेशी ग्रामसंस्कृतीची झलक

प्रा. डॉ. लतिका भानुशाली
सोमवार, 14 जून 2021

पुस्तक परिचय

‘पायखुटी’ म्हणजे नाठाळ बैलांना ताब्यात ठेवण्यासाठी बांधलेली जाड काठी आणि त्याला बांधलेला दोर.  हे शीर्षक आशयाला अगदी समर्पक आहे. नायकाच्या पायाला खलनायकाने बांधलेली खुटी नायक अक्कलहुशारीने खलनायकाच्या पायाला कशी बांधतो याची ही रसभरीत कहाणी!

‘पायखुटी’ कादंबरी खानदेशातील ग्रामीण वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर विविध पात्रांचा एकसंध पट आपल्यासमोर मांडते.

धमाणे, कुरुकवाडी, चिलाणे अशा गावांच्या त्रिकोणी चाकोरीत घडणाऱ्‍या घटना व त्यानिमित्ताने उभी राहणारी अस्सल गावरान, रांगडी माणसे या कादंबरीत आपल्यासमोर एकापाठोपाठ एक साकारत राहतात. कादंबरीचा नायक आहे नाना पाटील ऊर्फ शालंधर तुकाराम पाटील. या मध्यवर्ती पात्राबरोबर गायकवाड गुरुजी, खैरनार गुरुजी, पाटील गुरुजी, इडीआय बोरसेसाहेब, राजारामबापू, झिरो पोलिसाचे काम करणारा शाळा मास्तर रघुवीर राजाराम सोनावणे, मोटर दुरुस्त करणारा युसूफ भाई, सुभाष ठाकरे, दयाराम तात्या, बैसाने हवालदार अशा विविध पात्रांच्या एकमेकांबरोबर होणाऱ्या संवादातून घटना पुढे सरकत जातात आणि काळाचा एक छोटा पट आपल्यापुढे साकारला जातो.

निवेदनाच्या माध्यमातून वातावरण निर्मिती करताना लेखक शब्दचित्र डोळ्यासमोर उभे करतो. त्यासाठी कधी प्रमाणभाषेचा, तर कधी अस्सल खानदेशी बोलीचा वापर करतो आणि आशय अधिकच जिवंतपणे गडद होत जातो. या कादंबरीतील नाना पाटील हे एक भन्नाट व्यक्तिमत्त्व आहे. तुफान बुद्धिमत्ता, योग्य ठिकाणी त्याचा वापर, गावरान शहाणपण, चौफेर निरीक्षण करून त्यातील नेमके टिपण्याची प्रवृत्ती त्याच्या अंगी ठासून भरली आहे. खरेतर हा माणूस पदवी न घेतलेला इंजिनीयरच आहे. वेगवेगळ्या यंत्रांना, मोटारींना केवळ पाहून, निरीक्षणातून समजून घेऊन त्या यंत्रांचा वापर शेतीसाठी कसा करायचा हे तो स्वानुभवातून शिकला आहे. त्याच्या अक्कलहुशारीवर संपूर्ण गावाचा भरोसा आहे. तो एक प्रकारे वकीलसुद्धा आहे. कारण वकिलालासुद्धा पाठ नसतील एवढे कायदे त्याला पाठ आहेत. याच ज्ञानाच्या आधारे तो आपले अधिकार खेचून घेतो, अन्यायाच्या विरोधात उभा राहतो. संपूर्ण कादंबरीभर एका नाट्यात्मक घटनेचा आनंद आपण घेतो. यात ग्रामीण भागातील माणसांमध्ये असणारा भोळेपणा- बेरकीपणा, ग्रामव्यवस्था, शहरीकरणाचे गावात शिरलेले वारे, जागतिकीकरणाच्या रेट्यात बदललेली ग्रामीण मूल्यव्यवस्था, पात्रांमधील संघर्ष या सगळ्यांचे वर्णन येते. 

त्यामुळे ही कादंबरी कोण्या एका नायकापुरती मर्यादित राहत नाही, तर त्याच्या पलीकडे जाऊन जागतिकीकरणाच्या भोवऱ्‍याच्या झंझावातात सापडलेली ग्रामसंस्कृती प्रातिनिधिक स्वरूपात आपल्यापुढे दृग्गोचर होते. ही गोष्ट कुणा एका नाना पाटील याची न राहता वाचकही तिच्यात आपोआप सहभागी होत राहतो. उत्कंठा वाढवणारा, भाषेचा ओघवता प्रवाह वाचकालाही गुंगवून टाकतो. लेखकाची शैली प्रचंड चित्रमय आहे. यातून शब्दचित्रांचे फुलोरे आपल्या पुढे फिरत राहतात आणि एखादा चलचित्रपट पाहत आहोत अशी भावना वाचकांमध्ये निर्माण होते. मुंबईतील चोर बाजाराचे वर्णन करताना तिथल्या वस्तूची अचूक पारख कशी करावी, ग्राहकाला फसवले जाण्याच्या पद्धती यांचे इत्थंभूत वर्णन येते. ‘बम्बई’ वातावरणाला साजेशी ‘बंबईया हिंदी’ तेथील विक्रेत्याच्या तोंडी येते आणि अवघा चोर बाजार जिवंत होतो. मोटारी दुरुस्त करणाऱ्या युसूफच्या तोंडी उर्दू मिश्रित हिंदी येते. ग्रामीण बोली भाषेतील शब्द, वाक्प्रचार, म्हणी यांचा सर्रास वापर लेखक करतो. त्यामुळे ही पात्र मातीतील पात्र वाटतात. कथानकाशी ती एकजीव होतात. कुठेही उपरेपणा या पात्रांमध्ये जाणवत नाही. उदाहरणार्थ मद्यप्राशनाची सवय असणाऱ्या डीआय बोरसेसाहेब यांचे वर्णन करताना लेखक लिहितो, “संध्याकाळी त्याच्या पंखा फास्ट होतो” किंवा जेवणासाठी चूल पेटवली जाते यासाठी लेखक बोलीभाषेतील शब्द वापरतो ‘चुल्हा चेटाडला’. पोलीस स्टेशनमध्ये हवलदार बैसाने यांनी उन्हात ताटकळत उभ्या केलेल्या राजारामबापू यांच्या अगतिकतेचे वर्णन करताना लेखक लिहितो, “सावलीने जागा बदलली, बापूने भी जागा बदलली” ही शब्दयोजना जाणीवपूर्वक आहे. पोलिसांच्या केबिनच्या दरवाजाचे वर्णन करताना लेखक समर्पक शब्द योजतो, ‘दारावर लटकलेल्या अर्ध्या दोन फळ्या.’

महाराष्ट्रातील ग्रामीण संस्कृतीचे नेमके चित्र यात उमटलेले आहे. सरकारी योजना यशस्वी करण्यासाठी, ती योजना राबविणाऱ्या लोकांमध्ये कामाविषयी निष्ठा हवी, बांधीलकी हवी. बहुधा तिचाच सर्वत्र अभाव असतो. त्यामुळे चांगल्या सरकारी योजनाचा कसा बोजवारा उडतो याचे चित्रण लेखक रेखाटतो.  सरकारी शाळा, सरकारी दवाखाने यामध्ये संबंधित अधिकारी वर्गाची अनास्था लेखक व्यक्तिचित्रे आणि घटना प्रसंगांच्या माध्यमातून स्पष्ट करतो. 

ग्रामीण भागातील स्त्रियांचे असलेले स्थान लेखक अप्रत्यक्षपणे अधोरेखित करतो. दारू पिऊन गटारात लोळत पडलेल्या नवऱ्याचे कपडे धुणे, तो ‘साहेब’ असला तरीही बोरसे साहेबाच्या बायकोला तिरस्करणीय वाटते. पण ते कपडे धुवायला नकार देण्याचे सामर्थ्य तिच्यात नाही. नाना पाटील यांच्या घरातील स्त्रियांचे आल्यागेल्या पाहुण्यांना चहा करणे, चूल सांभाळणे आणि संकटसमयी उपासतापास करणे यापलीकडे अस्तित्व नाही. समस्त ग्रामीण स्त्रियांचे सामाजिक वास्तव या निमित्ताने अधोरेखित होते. ‘झिरो पोलीस’ ही भन्नाट संकल्पना लेखक रघूच्या माध्यमातून मांडतो. पोलिसांसाठी अनधिकृतपणे काम करणारी ही मंडळी कशी उभी केली जातात, याचे चित्रण येते. त्यान्वये भ्रष्टाचार करण्यासाठी पोलिसांना मिळणारे आयते कुरण, त्या कुरणात मनसोक्त चरणारी धेंडे असे चित्र लेखक उभे करतो.

‘धमाणे – कुरुकवाडी  हे अंतर सव्वा ते दीड किलोमीटर! पण या अंतराचं कोणालाच काही वाटत नाही,’ असे लेखक लिहितो तेव्हा हक्काच्या सोयीसुविधांसाठीसुद्धा ग्रामीण जनता किती अनभिज्ञ आहे, हे लक्षात येते. चालू झालेली बससेवा बंद का पडली हे सांगताना लेखक त्यामागची आर्थिक, शारीरिक, वेळेच्या दृष्टिकोनातून असलेली गैरसोय अशी कारणे स्पष्ट करतो आणि विषण्णपणे लिहितो, “तिचा तो खडखडाट कायमचा बंद झाला.” 

पायखुटी ही कादंबरी याच अशयविश्वाच्या सूक्ष्म पैलूंना अधिक ठळक करते.

पायखुटी

  • लेखक : संजीव गिरासे 
  • प्रकाशन ः विजय प्रकाशन 
  • किंमत : ₹  २००
  • पाने ः १५६

संबंधित बातम्या