संग्राह्य फुलपाखरू कोश

प्रा. डॉ. विमुक्ता राजे
सोमवार, 23 मे 2022

पुस्तक परिचय

फ  - फणसाचा, फ - फुलाचा, तसाच हा फ - फुलपाखराचाही असतो. या फुलपाखरांच्या जगाविषयी संपूर्ण शास्त्रीय, तरीही मनोरंजक अशी सचित्र माहिती सांगणारे पुस्तक म्हणजे ‘‘फ’ - फुलपाखराचा’! लेखक दिवाकर ठोंबरे यांचा फोटो टिपण्याच्या धडपडीतून सुरू झालेला प्रवास या पुस्तक रूपाने सुफळ संपूर्ण झाला असे म्हणावेसे वाटते. 

फुलपाखरांना काही दिवसांचे, काही आठवड्यांचे आयुष्य लाभलेले असते. पण तरीही आपल्या अस्तित्वाने आजूबाजूच्या सर्वांना माणसे, पक्षी, फुले, अगदी निसर्गालाही वेडे करून टाकणारा हा छोटा जीव. आपल्या जीवनातील फुलपाखरांचे महत्त्व सांगणारे हे पुस्तक फक्त अभ्यासकांसाठी आणि निसर्गप्रेमींसाठी नाही, तर सर्वसामान्यांसाठीही महत्त्वाचा दस्तऐवज आहे. वास्तविक पाहता फुलपाखरांची प्रजातीनिहाय अशी इंग्रजी भाषेत अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. परंतु, फुलपाखराच्या जीवनातील टप्पे, सवयी सांगतानाच त्याचे आपल्या संस्कृतीशी असलेले नाते; कला, तसेच साहित्यात उमटणारे प्रतिबिंब, फुलपाखरांचे सामाजिक संदर्भ, फॅशन जगतातील महत्त्वाचे स्थान, फुलपाखरू पर्यटन, घर सजावटीतील फुलपाखरू डिझाईन अशी सर्वस्वी नवीन असलेली आणि आतापावेतो कुठल्याही पुस्तकात नसलेली अशी माहिती, अतिशय सहज सोप्या भाषेत लेखकाने सांगितली आहे. 

या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे फुलपाखरांच्या विषयीचे काव्यात्मक वर्णन! फुलपाखरांचे प्रणयाराधन, स्थलांतर, चिखलपान याच समवेत फुलपाखरांचा जन्म, त्यांचे शत्रू, जगण्याची रणनीती या साऱ्याचे काव्यात्मक वर्णन लेखाकाने या पुस्तकात केले आहे. या कवितांमधून लेखक दिवाकर ठोंबरे यांचे ‘पुलं’ प्रेम विशेषत्वाने जाणवते. ‘सुंदर मी होणार’ ही कविता फुलपाखरू जन्मावर, तर ‘निघाली वाऱ्यावरची वरात’ ही कविता फुलपाखरांच्या स्थलांतरावर भाष्य करून जाते. फुलपाखरू या सुंदर कीटकावरील काव्यात्मक अनुभव या पुस्तकाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातो.   

फुलपाखरे आणि आरोग्य यांची लेखकाने घातलेली सांगड वाचकाला नक्कीच अंतर्मुख करून जाईल. फुलपाखरू पर्यटन, फुलपाखरे आणि देश विदेशातील संस्कृती यांचा घेतलेला परामर्श सुखावह आहे. ‘फुलपाखरू उद्यान’ या प्रकरणातील माहिती अत्यंत महत्त्वाची असून ‘डूज् आणि डोन्ट’ फारच लक्षवेधी आहेत. तरुण पिढीला समोर ठेवून लिहिलेली काही प्रकरणे, उदाहरणार्थ, ‘फुलपाखरांशी निगडित प्रकल्प’ किंवा ‘फुलपाखरू छायाचित्रण’ हे या पुस्तकाचे आणखी एक वेगळेपण म्हणता येईल. या प्रकरणात लेखकाचा प्रत्यक्ष जंगलातील ‘अभ्यासानुभव’ लक्षात आल्याशिवाय राहत नाही. ‘फुलपाखरू संरक्षण आणि संवर्धन’ यामागील तळमळ शास्त्रशुद्ध, परंतु रंजकमार्गाने मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न या पुस्तकातून दिसतो.   

सुमारे तीन हजारहून अधिक खाद्य व नेक्टर वनस्पतींची माहिती, तीदेखील फुलपाखरांच्या प्रजातीनुसार या पुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहे. या साऱ्या वनसंपदेची ओळख मराठीतून करून देण्याची धडपड वाखाणण्याजोगी आहे. महाराष्ट्रात आढळणाऱ्या फुलपाखरांच्या विविध २७५ प्रजाती यांची कुळनिहाय सुरेख छायाचित्रे, तसेच सौंदर्यपूर्ण माहिती देणारे हे मराठीतील पहिले पुस्तक आहे. अतिशय स्वच्छ फाँट, नीटनेटकी मांडणी, आर्ट पेपर, उच्च प्रतीची छपाई या ‘फ-फुलपाखराचा’ पुस्तकाच्या जमेच्या बाजू आहेत. फुलपाखरू संशोधक डॉ. कृष्णमेघ कुंटे आणि आयुर्वेदाचार्य वैद्य संतोष सूर्यवंशी यांच्या अत्यंत आगळ्यावेगळ्या प्रस्तावना या पुस्तकास लाभल्या आहेत.   

निसर्गप्रेमी व फुलपाखरू संशोधक दिवाकर ठोंबरे लिखित आणि मनकर्णिका पब्लिकेशन प्रकाशित ‘फ-फुलपाखराचा’ हे पुस्तक म्हणजे फुलपाखरू कोश होय, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. थोडक्यात, मानवी जीवनातील फुलपाखरांचे अढळस्थान आणि महत्त्व पुस्तकातून अधोरेखित होते. फुलपाखराचे जीवन चक्र हे एखाद्या खजिन्यासारखे अद्‍भुत आहे. असे हे पुस्तक एका वाचनापुरते मर्यादित नसून संग्रही ठेवण्यासारखे आहे.

 

  • ‘फ’-फुलपाखराचा
  • लेखक :  दिवाकर ठोंबरे
  • प्रकाशन : मनकर्णिका प्रकाशन, चिंचवड
  • किंमत : ₹    ६५०
  • पाने :  २०३

संबंधित बातम्या