एक नया सूरज चमका है!

प्रसाद नामजोशी
सोमवार, 12 जुलै 2021

पुस्तक परिचय

कविता आणि शायरी यांच्यावर मनोमन प्रेम करणाऱ्या कुठल्याही रसिकाला साहिर लुधियानवी या नावाविषयी एक अपार आत्मीयता असते. साहिरविषयी बोलायला त्याला आवडते, ऐकायला आवडते, वाचायला आवडते. या वाचकाच्या हातात साहिरविषयीचे एक सर्वसमावेशक चरित्र आलेले आहे. ‘हर एक पल का शायर साहिर लुधियानवी जीवन आणि शायरी’ हे ते पुस्तक. 

साहिर लुधियानवी हे गेल्या पिढीचे श्रेष्ठ कवी. शायरी, गझल आणि नज्म यांसोबतच चित्रपट गीतेही त्यांनी लिहिलेली आहेत. त्यांच्या गीतांच्या अनेक ओळी अक्षरशः असंख्य पुस्तकांच्या आणि लेखांच्या शीर्षक रूपाने आपल्यासमोर येत असतात. अनेक ओळींना वाक्प्रचाराचे मोल लाभलेले आहे. ‘वो सुबह कभी तो आएगी’, ‘मैं हर एक पल का शायर हूँ’, ‘जिन्हें नाज है हिंद पर वो कहां है’, ‘हर फिक्र को धुएँ में उडाता चला गया’, ‘जाए तो जाए कहाँ’ यांसारख्या असंख्य ओळी तुम्ही आम्ही वाचत आणि ऐकत असतो. अनेकदा या ओळी साहिरच्या आहेत हेसुद्धा माहिती नसते. अनेकदा एखाद्या मोठ्या व्यक्तीविषयीची झटपट माहिती वृत्तवाहिन्यांवर द्यावी लागते, तेव्हा साहिरच्या ओळींचा हमखास आधार घेतला जातो. ‘हर फिक्र को धुएँ में उडाता चला गया’ या ओळी नायक देवानंद, गायक महमंद रफी, दिग्दर्शक विजय आनंद, संगीतकार जयदेव या सगळ्यांसाठीच वापरल्या जातात, पण त्या असतात साहिरच्या! एकीकडे साहिरच्या ओळी आहेत हे माहिती नसून वाक्प्रचारासारख्या त्या वापरणारे आहेत तर दुसरीकडे साहिरवर प्रेम करणाऱ्या रसिकांना ‘परछाईयां’ पाठ असते! साहिरच्या लेखणीची ही जादू आहे.

‘साहिर’ या उर्दू शब्दाचा अर्थ आहे जादूगार! साहिरच्या काव्याची जादू जगभरातल्या रसिकांवर पसरलेली आहे. हा एक अतिशय विलक्षण असा शायर होता. आपले विचार ठामपणे व्यक्त करणारा दार्शनिक कवी होता. ‘इक शहंशाह ने बनवा के हंसी ताजमहल, सारी दुनिया को मोहब्बत की निशानी दी है’ हे समकालीन कवी शकील बदायुनी म्हणत असताना, साहिरने मात्र ‘इक शहंशाह ने बनवा के हंसी ताजमहल हम गरिबों की मोहब्बत का उडाया है मजाक, मेरी मेहबूब कहीं और मिला कर मुझको’ असे म्हणण्याचे धाडस केले आणि आपले पाणी रसिकांना दाखवून दिले. अशा या साहिरविषयीचे ‘हर एक पल का शायर साहिर लुधियानवी जीवन आणि शायरी’ हे पुस्तक लक्ष्मीकांत देशमुख यांनी लिहिले आहे आणि लोकवाङ्‍मय गृहतर्फे प्रकाशित झालेले आहे. वसंत आबाजी डहाके या ज्येष्ठ कवींनी लिहिलेली दीर्घ प्रस्तावना त्याला लाभलेली आहे. 

साहिरची कविता आणि त्याचे जीवन अशा दोन्ही गोष्टींचा धांडोळा या पुस्तकात आहे. त्याचे बालपण, अतिशय जुलमी आणि अय्याश असलेले त्याचे वडील, त्यांना सोडून आईबरोबर वेगळा राहिलेला साहिर, त्याचे आईवरचे प्रेम, पुढे मुंबईला गीतकार म्हणून स्थिरावल्यावरच्या घटना, त्याच्या आयुष्यात आलेल्या स्त्रिया आणि तरीही त्याचे एकाकी असलेले जीवन या सगळ्यांमधून त्याची कविता कशी फुलत गेली असा साहिरच्या जीवनाचा कवी म्हणून आणि माणूस म्हणून रेखाटलेला हा ग्राफ आहे. एकूण तीस प्रकरणे या पुस्तकात आहेत. त्यामध्ये साहिरच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचे त्याचे वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्य आणि सगळ्यात शेवटच्या प्रकरणात त्याच्या शायरीची समीक्षा असे हे दीर्घ चरित्र आहे. 

या चरित्राला वसंत आबाजी डहाके यांची चौदा पानी प्रस्तावना विशेष उल्लेखनीय आहे. अतिशय नेमक्या भाषेत साहिरवरच्या या पुस्तकाचा ऊहापोह त्यांनी केलेला आहे. ही एकप्रकारची पुस्तकाची छोटेखानी समीक्षाच आहे. पुस्तकाची वाचनीयता वाढवण्याचे अतिशय महत्त्वाचे काम ती करते.

साहिर हा ‘तरक्कीपसंद’ म्हणजे प्रगतिशील शायर होता. ‘प्यासा’ चित्रपट ज्यांनी बघितला आहे त्यांना त्यातले जुने पठडीबाज ‘गुलो-बुलबुल’मध्ये रमलेले शायर आणि नव्या दमाचे शायर यांच्यातले दृश्य आठवत असेल. आणि त्यानंतरचे ‘जाने वो कैसे हे’ अजरामर गाणेही! त्या दृश्यावर साहिरची निश्चित अशी छाप आहे. साहिरची कविता, त्याच्या प्रेरणा, त्याचा भवताल अशा सगळ्या गोष्टींचा परिचय लेखक आपल्याला या पुस्तकातून करून देतो. कवीची कविता बघा, त्याच्या बाकी गोष्टींकडे बघू नका असा ठाम समज असणाऱ्यांसाठी हे पुस्तक नाही. परंतु साहिरची कविता ‘साहिर’ची कशी झाली, त्याच्यामागे कोणत्या अशा घटना घडल्या, साहिर एक माणूस म्हणून कसा होता, आपल्या काव्यात प्रेमाचे असंख्य रंग उधळणाऱ्या साहिरच्या वैयक्तिक आयुष्यात ते कोणत्या छटा घेऊन आले होते अशा अनेक गोष्टींची रसिक वाचकांना उत्सुकता असणार, त्यांचे अनेक अंशी समाधान हे पुस्तक करेल.

साहिरची शायरी दर्जेदार आहे, जीवनाचे विविध रंग ती दाखवते. तिचा सढळ उपयोग लेखकाने हे चरित्र रंगवताना केलेला आहे. पानापानांवर ती आपल्याला भेटते. त्याची गीते हिंदी चित्रपटांच्या कृपेने आपल्याला प्रातःस्मरणीय असतात. त्याचे संदर्भ या पुस्तकात आले की आपण त्या ओळी चालीसकट गुणगुणू लागतो. क्वचित राहावले नाही तर पुस्तक बाजूला ठेऊन आधी ते गाणे पूर्ण ऐकून घेतो. हा मोह टाळण्यासारखा नाही. तो टाळूही नये. जुन्या कामाच्या धकाधकीत विस्मृतीत गेलेली काही गाणी पुन्हा एकदा आठवणींच्या तळ हलवून वर येतात. तसे झाले तर प्रस्तुत पुस्तकाला त्याचे श्रेय द्यायला हरकत नाही.  

या चरित्रात आलेल्या उपोद्‌घात आणि उपसंहार या दोन छोट्या पण तरीही महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख करावा लागेल. लेखकाने दोन्ही गोष्टी साहिरला उद्देशून लिहिलेल्या आहेत. उपोद्‌घातात तुझ्यावर मला पुस्तक का लिहावेसे वाटले? आणि उपसंहारात आज तू असतास तर काय केले असते? हे लिहून तुझ्या आश्वासक शब्दांनी ‘वो सुबह हमीं से आयेगी’ असा काव्यात्म आशावादही लेखकाने व्यक्त केलेला आहे.

पुस्तकातल्या प्रत्येक प्रकरणाला साहिरच्याच ओळींचा समर्पक वापर करून शीर्षक दिलेले आहे. यामध्ये लेखकाची रसिकता तर दिसतेच, परंतु आयुष्याच्या विविध अंगांना शोभून दिसतील अशा ओळी एकाच कवीच्या काव्यामध्ये सापडाव्यात यातच साहिरच्या शायरीचा मोठेपणाही कळून यावा! साहिरच्या जन्मशताब्दीच्या वर्षात साहिरच्या चाहत्यांनी आणि कवितेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने संग्रही ठेवावे असे हे पुस्तक आहे.

हर एक पल का शायर साहिर लुधियानवी-जीवन आणि शायरी 

  • लेखक : लक्ष्मीकांत देशमुख 
  • प्रकाशक :  लोकवाङ्‍मय गृह, मुंबई
  • किंमत : ₹   ६००
  • पाने : ४५६

संबंधित बातम्या