तौलनिक अभ्यास

प्रतिमा प्रदीप दुरुगकर
गुरुवार, 5 एप्रिल 2018

पुस्तक परिचय

चाणक्याविषयी नवीन काही...
लेखिका ः डॉ. नलिनी जोशी 
प्रकाशक ः सन्मति-तीर्थ प्रकाशन, पुणे 
किंमत : ४०० रुपये.  
पाने : ३०४

‘चाणक्‍याविषयी नवीन काही...’ हे पुस्तक डॉ. नलिनी जोशी यांनी लिहिले आहे. भांडारकर प्राच्य-विद्या संस्थेत सुरू असलेल्या प्राकृत-इंग्रजी महाशब्द कोशाच्या मुख्य संपादकत्वाचा कार्यभार त्या सांभाळतात. हे काम करीत असताना त्यांना चाणक्‍यविषयीचे अनेक संदर्भ ग्रंथामध्ये विखुरलेले दिसले. विद्यार्थ्यांना अनेक अंगांनी विचारप्रवृत्त करून ‘सर्वधर्म सहिष्णू’ बनविणे हे त्यांच्या अध्यापनाचे उद्दिष्ट असल्याने त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. 

प्राकृत भाषेतील पाच लाख शब्दपट्टिका अर्थासहीत पूर्ण करण्याचे काम चालू असताना ‘कोडल्ल’, ‘कोडल्लय’, ‘चाणक्‍य’ अशा शब्दपट्टिका लक्षणीय प्रमाणात आढळल्या. त्या प्रायः जैन प्राकृत ग्रंथातील होत्या. ‘जैन साहित्यात चाणक्‍याचा शोध घेतला पाहिजे,’ ही खूणगाठ डॉ. नलिनी जोशींनी तेव्हाच बांधली.

केवळ जैनांनी चित्रित केलेला चाणक्‍य मांडून हे पुस्तक थांबत नाही, तर ब्राह्मण (हिंदू) साहित्यात प्रतिबिंबित असलेल्या चाणक्‍याची चिकित्सा करते. इ.स. ३ऱ्या, ४ थ्या शतकापासून १५ व्या, १९ व्या शतकापर्यंत लिहिलेले साहित्य या ग्रंथासाठी अभ्यासले आहे. महाभारत, स्कंदपुराण आणि मत्स्यपुराण, कथासरित्सागर, बृहत्कथामज्जरी, मुद्राराक्षस इ. मधील चाणक्‍य यात भेटतो. जैन संदर्भाच्या आधारे ‘चाणक्‍याची समग्र जीवनकथा’ या पुस्तकात येते. तो भाग सामान्य वाचकांसाठी खूपच रोचक आहे. 

ही जीवनकथा सुरू होते नंद घराण्यातील नववा शेवटचा धनानंद यांच्या पाटलीपुत्र या राजधानी जवळील ‘गोल्ल’ या प्रदेशातील चमकपूर या टुमदार गावातून. बालक विष्णूगुप्त आणि भविष्यकथन, विष्णुगुप्ताचे शिक्षण आणि विवाह, चाणक्‍याचे पाटलीपुत्रास गमन, मंत्री, कवी यांचे उपाख्यान, कवी आणि चाणक्‍य यांची भेट, चाणक्‍यचा अपमान आणि प्रतिज्ञा, भावी राजाचा शोध, पाटलीपुत्रावरील अयशस्वी स्वारी, चाणक्‍य आणि चंद्रगुप्ताचा पाठलाग, दहीभाताचे भोजन, म्हातारीचे चातुर्य, पर्वतकाचा शोध, भेट आणि साहाय्य, पर्वतकासह मगधावर स्वारी, पर्वतकाचा वध आणि चंद्रगुप्ताचा राज्याभिषेक, नलदामांकडून नंदपुरुषांचा बंदोबस्त, कोशवृद्धीचे उपाय, द्वादशवर्षीय दुष्काळ, साधूंची परीक्षा, कौटिल्याचा ग्रंथरचनेस प्रारंभ, बिंदुसाराची जन्मकथा, सुबंधुचे आगमन आणि चाणक्‍याचे प्रायोपगमन (सल्लेखना, अन्न पाणी वर्ज्य करणे) ‘समाधिमरण’ या क्रमाने ही उत्कंठावर्धक कथा उलगडत जाते. हा कथाभाग मुळातून वाचायलाच हवा असा आहे. अभ्यासकांनाही येथे नवे काही सापडेल असे वाटते. 

याशिवाय जे कथाबाह्य संदर्भ प्राकृतात सापडले त्यावर एक वेगळा विभाग पुस्तकात आहे. उदा. तिसऱ्या, चौथ्या शतकातील भद्रबाहुकृत आवश्‍यक निर्युक्तिमध्ये क्षपक, अमात्यपुत्र, चाणक्‍य, स्थुलभद्र यांची नावे पारिणामिकी बुद्धीचे उदा. म्हणून नोंदली आहेत. असे एकूण ४४ संदर्भ येथे नोंदले आहेत. त्यातूनही चाणक्‍याविषयी अनेक नव्या गोष्टी कळतात. त्यावेळच्या सामाजिक जीवनावर प्रकाश टाकला जातो. राजकीय, सांस्कृतिक, धर्मविषयक अनेक गोष्टी समजतात.

‘अर्थशास्त्राच्या गवाक्षातून’ या भागात या साहित्यातील अर्थशास्त्रीय धागा सांगितला आहे. परंतु त्या आख्यायिका असल्याने त्यांची ऐतिहासिकता स्वीकारणे कठीण आहे, हे ही नमूद केले आहे. ब्राह्मण परंपरेतील ‘कौटिलीय अर्थशास्त्र’ ही अजरामर कृती आहे. ती नजरेसमोर ठेवून डॉ. नलिनी जोशी प्राकृतातील (जैन साहित्यातील) चाणक्‍याचा धांडोळा घेतला आहे. जैनांनी चाणक्याला ‘श्रावक’, ‘साधू’ म्हटले तरीही चाणक्‍याचे ब्राह्मणत्व आणि वेदाभिमान लपून राहात नाही. अर्थशास्त्रातून तो उघड होतो, हे डॉ. जोशी यांनी सप्रमाण दाखवून दिले आहे.

शेवटी डॉ. नलिनी जोशी म्हणतात, ‘एकाच भारतीय मातीत रुजलेल्या ब्राह्मण आणि श्रमण परंपरांचा अभ्यास तुटकपणे न करता हातात हात घालून केला, तर भारतीय संस्कृतीचे अधिकाधिक यथार्थ चित्र समोर येण्यास नक्कीच मदत होईल.’ 

संबंधित बातम्या