विचारप्रवृत्त करणारे पुस्तक

प्रतिमा दुरुगकर
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018
  • आरशात डोकावण्यापूर्वी
  •  लेखक ः मंगला गोडबोले
  •  प्रकाशक : सकाळ पेपर्स प्रा. लि., पुणे 
  •  किंमत ः १६० रुपये.
  •  पाने : १३६ 

  • आरशात डोकावण्यापूर्वी
  •  लेखक ः मंगला गोडबोले
  •  प्रकाशक : सकाळ पेपर्स प्रा. लि., पुणे 
  •  किंमत ः १६० रुपये.
  •  पाने : १३६ 

‘सकाळ साप्ताहिक’ मध्ये ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांचे ‘धोक्‍यात हरविणारी वाट’ हे सदर जवळजवळ दीड वर्षे प्रसिद्ध होत होते. त्याची सकाळ प्रकाशनाने दोन पुस्तके केली आहेत. १) धोक्‍यात हरवणारी वाट २) आरशात डोकावण्यापूर्वी. एकूण ५४ लेखांपैकी २७ लेख ‘आरशात डोकावण्यापूर्वी’ या पुस्तकामध्ये संकलित केले आहेत. या लेखांमधील समान धागा म्हणजे; एक व्यक्ती म्हणून किंवा कुटुंब म्हणून आपण निवडलेल्या जीवनपद्धतीचा मागोवा घेणे. मंगला गोडबोले यांच्या लेखनातून नेहमीच समकालीन समाज प्रतिबिंबित होतो. या लेखांमधून आपल्याला चुकीच्या वाटेने जाणाऱ्या समाजाला आरसा दाखवून विचारप्रवृत्त करणाऱ्या मंगला गोडबोले भेटतात. त्यामागे सामाजिक नीतिमत्ता आणि मूल्ये जपण्याची तळमळ जाणवते. वरवर साध्या वाटणाऱ्या गोष्टी, घटना, निर्णय, वर्तणूक, विचार हे पुढे जाऊन कोणते परिणाम घडवितात याची सुस्पष्ट कल्पना योग्य शब्दात लेखिका मांडतात आणि मग आपणही त्यावर विचार करू लागतो. आपल्या विचारात आणि पर्यायाने कृतीत बदल करण्याचा लेखिकेचा प्रयत्न आहे. तो व्यक्तीसाठी कुटुंबासाठी आणि समाजासाठी नक्कीच उपयुक्त आहे.

‘पाण्यात पडले की’ या लेखात इतर समस्येवर उपाय म्हणून मुलाचे/ मुलीचे लग्न लावून देणे या मानसिकतेतील धोके लेखिका सांगतात. करिअरिस्ट मुलीने स्वयंपाक करण्यात कमीपणा मानणे, याकडे लेखिका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात आणि व्यावहारिक मते मांडतात. नवीन पिढीची मानसिकता, आईपणाचे ओझे वाटणे हे समाजाला कुठल्या दिशेला घेऊन जाईल, याबाबत शक्‍यता बोलून दाखवतात. आपल्या पाल्याला अनेक क्षेत्रात/ अनेक कलेत पारंगत करण्याचा हव्यास धरणाऱ्या पालकांसमोर लेखिका जे प्रश्‍न ठेवतात, ते विचार करायला लावणारे आहेत. कलाकारांनी कलेच्या क्षेत्रात कम्फर्ट झोनमध्ये राहून रुळलेली वाट तुडविण्यात तो कलाकार व समाजही कोणत्या गोष्टींना मुकतो हे वाचून इतर कलाकारांना योग्य वयात नवी वाट पकडून नवे काही करण्याची ऊर्मी व उमेद आली, तर ते या लेखाचे फलित असेल. विभक्त कुटुंब, घरगुती नोकर, ज्येष्ठांचे प्रश्‍न, आरोग्य, अशा अनेक विषयांना हे लेख स्पर्श करतात, त्यावर विचारमंथन करायला लावतात. या लेखांमधून लेखिका आपल्यासमोर आरसा धरते. प्रत्येकाने आपले प्रतिबिंब त्यात कसे दिसते ते पहावे व ते नितळ (डागविरहीत) करण्याचा प्रयत्न करावा. व्यक्ती, कुटुंब आणि पर्यायाने समाजासाठी हे किती गरजेचे आहे. हेच या लेखांमधून मनात ठसते. 

‘देहात पित्त, परमार्थात चित्त आणि प्रपंचात वित्त, असावे नेमस्त, नाहीतर काळ करेल फस्त’, अशा समर्पक वाक्‍यामुळे लेखिका आपले म्हणणे कमी शब्दात वाचकांपर्यंत पोचवतात. आजूबाजूला किंवा कुटुंबात अचानक खूप पैसा येऊ लागला तर गृहिणीने जागल्याची भूमिका निभवावी, चौकशी करावी (भले कुणी चांभार चौकशा म्हणोत), प्रसंगी कटुता स्वीकारावी हे लेखिकेचे म्हणणे समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने किती आवश्‍यक आहे, हे विचारांती पटते. अशा अनेक गोष्टीत हे लेख आपल्याला वेगळा दृष्टिकोन देतात, समाजाचा, पुढच्या काळाचा विचार करायला लावतात. ठोस भूमिका घ्यायला प्रवृत्त करतात. मूल्य व नीतिमत्ता जागवितात. आपली कर्तव्ये आपल्यासमोर मांडतात. या पुस्तकाला संदीप देशपांडेंचे मुखपृष्ठ समर्पक आहे. सकाळ प्रकाशनाच्या परंपरेला साजेशा उत्तम छपाईमुळे वाचनाचा पुरेपूर आनंद मिळतो.
 

संबंधित बातम्या