नवीन विचार देणारे आत्मकथन

प्रतिमा दुरुगकर
सोमवार, 2 मार्च 2020

पुस्तक परिचय
 

फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे नाव मराठी वाचकाला नवीन नाही. त्यांच्या लेखनाला मराठी वाचकांची पसंती, प्रेम आणि आदर लाभला आहे. ‘नाही मी एकला’ या निर्मळ, प्रवाही, प्रासादिक आत्मकथनात फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे जीवन आपल्यासमोर उलगडते. 

हे आत्मकथन वेगळे आहे. ‘वेगळे’ अशा अर्थाने, की एकतर ते एका कॅथलिक धर्मगुरूंचे आत्मकथन आहे, ज्यांचे बालपण हिंदू - ख्रिस्ती - मुसलमान अशा मिश्र वस्तीत गेले, ज्यांची मातृभाषा मराठी आहे व ज्यांनी मराठी व इंग्लिश दोन्ही साहित्याचा अभ्यास व मनन केले आहे, ज्यांनी फादर होतानाच्या अभ्यासक्रमात सेमिनरीत ११ वी नंतर १० वर्षे पुढील विषयांचा अभ्यास केला आहे - मानव्यशास्त्र (इंग्रजी, लॅटीन, संस्कृत भाषा, जगाचा इतिहास व भूगोल), तत्त्वज्ञान (पाश्चात्त्य व भारतीय म्हणजे हिंदू - जैन - बौद्ध - इस्लाम इत्यादी मते), ख्रिस्ती धर्मशास्त्र - नीतिशास्त्र, बायबल इ. शिवाय मराठी साहित्य परिषदेची ‘आचार्य’ पदवी त्यांनी घेतली आहे. त्यामुळेच हे आत्मकथन मराठी वाचकाला एका वेगळ्या विश्‍वाचे दर्शन घडविते. नवीन विचार देते. 

या निर्मळ आत्मकथनाला इतरही अनेक पैलू व आयाम आहेत. ‘धर्मगुरू’ म्हणून कर्तव्य निभावताना आलेले अनुभव, सामाजिक भान असलेला नागरिक म्हणून विचारपूर्वक पार पाडलेली कर्तव्ये, लेखक, कवी, संपादक म्हणून मराठी साहित्यात त्यांनी उमटविलेला ठसा, संतसाहित्याचा त्यांचा अभ्यास व मनन अशा अनेक कारणांमुळे या आत्मकथनातील विचारधन, हे वाचकांसाठी वेगळा अनुभव आहे. धर्माच्या भिंती ओलांडून फादर या आत्मकथनातून आपल्याशी संपाद साधतात. 

हा संवाद सुरू होतो कळ्याफुलांच्या गावात. वसई तालुक्‍यातील ‘वटार’ या निसर्गरम्य ठिकाणी. फादर हात धरून वाचकाला त्यांच्या बालपणात घेऊन जातात. तिथे आपल्याला हिरवागार निसर्ग भेटतो, मिश्रधर्मीय बांधव भेटतात. सश्रद्ध गरिबी भेटते. लोकगीतांची साधी, सोपी, मोहक दुनिया भेटते. (‘लोकगीते म्हणजे संस्कृतीचे उमाळे’ अशी चपखल शब्दयोजना फादर वापरतात.) येथेच आपल्याला फादर यांचे कुटुंब भेटते. त्यांची शब्दचित्रे जिवंत वाटतात. हे सर्व सांगताना फादर यांच्यातील तत्त्वचिंतक सतत जागा असतो, हे अधूनमधून समजते. उदा. ‘रहाट हा गावच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक. रहाटावरची चक्रे विश्‍वचक्राची आठवण करून देत संथपणे फिरत.’ केळीचे प्रकार सांगून त्यांच्या प्रकारानुसार मुलेही मुलींना केळीची नावे कशी देत असत, हे सांगताना खोडकर मुलांचे जग उलगडते. ‘खेड्यात घरे कशी बांधत’ हा तपशील मजेशीर वाटतो. 

मॅट्रिकनंतर १० वर्षे सेमिनरीतील विविध विषयांचा अभ्यास व धर्मगुरू झाल्यानंतरचे अनुभव त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंचे दर्शन घडवितात. धर्माच्या चौकटी पार करून त्यांनी केलेले प्रयोग लक्षणीय आहेत. 

त्यांनी १९८३ ते २००५ अशा प्रदीर्घ काळात वसईतील ‘सुवार्ता’चे केलेले संपादन व त्यात आलेले अनुभव ही एक विचारांची पालखी आहे, ती आपल्याला पुढील विषयांच्या थांब्यावरून ‘वारी’ घडवते - शिक्षणाचे माध्यम, चर्चचे ‘भारतीयकरण, संस्कृतीकरण व हिंदूकरण,’ व्याख्यानमालेतून प्रबोधन, धर्मचर्चा, वसुंधरेचे भवितव्य, श्रद्धेचा शोध, कवी कुसुमाग्रज, ग्रेस व इंदिरा संत यांच्या प्रभू येशूवरील कविता इ. 

‘माझी शब्द-संवाद यात्रा’मधून फादर त्यांच्या लिखाणाचा प्रवास उलगडतात. मराठी व इंग्रजी दोन्ही भाषांवरील प्रभुत्व व ख्रिश्‍चन व हिंदू धर्मांचा अभ्यास व विचारमंथन यातून आलेले सुवर्णकण आपल्याला या आत्मकथनात गवसतात. ‘सुबोध बायबल’ हा राजहंसने प्रकाशित केलेला ग्रंथ लिहितानाचे फादर यांचे अनुभव हा या पुस्तकातील महत्त्वाचा ऐवज आहे. या लेखनाबद्दल फादर त्यांच्या भावना पुढील काव्यपंक्तीत व्यक्त करतात. 

‘फोडिले भांडार, धन्याचा हा माल। 
मी तो हमाल भारवाही।।’ 

लेखातील ‘कवी’ असा जागोजाग भेटतो. विशेषतः निसर्गाचे वर्णन करताना फादर यांची लेखणी त्यांचे हळवे, निर्मळ, सश्रद्ध मन फार छान व्यक्त करते. अपार करुणा, विनय, श्रद्धा, भक्तिभाव, सर्वधर्मसमभाव, निसर्गप्रेम हे फादर यांच्या व्यक्तिमत्त्वातील स्थायिभाव आहेत, ते आत्मकथनात दृग्गोचर होतात. 

धर्मगुरूंचे एकाकी जीवन, ब्रह्मचर्य, कुटुंबापासून दूर राहणे इत्यादीबद्दल सामान्य लोकांना अनेक प्रश्‍न मनात येतात. त्याबद्दल फादर शेवटच्या प्रकरणात लिहितात. खरे तर तो ‘स्व’शी साधलेला ‘शब्देविण संवादु’ आहे. त्यात काही आध्यात्मिक अनुभवाच्या पातळीवरचे पदर उलगडतात. ‘नाही मी एकला’चा संदर्भ लागतो. 

संग्रही ठेवावे असे हे पुस्तक आहे. राजहंस प्रकाशनाने देखण्या स्वरूपात हे पुस्तक काढले आहे. राहुल देशपांडे यांनी मुखपृष्ठ व आतील मांडणी कलापूर्ण व अर्थपूर्ण पद्धतीने केली आहे. हे आत्मकथन ख्रिस्ती धर्मगुरूंच्या माध्यमातून त्या धर्मात डोकावण्याची संधी देते, हे चर्चच्या खिडकीतून सूचकपणे छान व्यक्त होते. मुखपृष्ठावरील झावळ्या कोकणात घेऊन जातात. आत्मकथनाच्या दालनात मोलाची भर घालणारे, असे हे पुस्तक राजहंसने प्रकाशित केले आहे. 

संबंधित बातम्या