आपलेसे वाटणारे  आत्मचरित्र

प्रीती कांबळे, मुंबई
सोमवार, 10 जानेवारी 2022

पुस्तक परिचय

संघर्ष माणसाला कधीही चुकत नाही. संघर्षातून यशाचा मार्ग शोधावा लागतो. जीवनातील सुखदुःखाच्या वाटेवरचा संघर्ष माणसाला खऱ्या अर्थाने जगायला शिकवतो. खाचखळगे असणाऱ्‍या आयुष्यात आपल्याला जे हवे ते मिळविण्यासाठी धडपड करणे हेच प्रयत्नवादी तरुणाचे लक्ष्य असते, हा विचार संदीप काळे लिखित ‘ऑल इज वेल’ पुस्तकाच्या प्रत्येक पानावर दिसतो. 

नवा विचार, नवा दृष्टिकोन अंगी बाळगून जीवनाचे सार्थक करणे म्हणजे जगणे होय. ग्रामीण भागातील छोट्याशा खेड्यातून संघर्षमय प्रवास करून, समाजातील लोकांचे कल्याण आपल्या पत्रकारितेतून करणाऱ्‍या पत्रकाराचे आत्मचरित्र असलेल्या या पुस्तकाचे ‘ऑल इज वेल : मनातला सक्सेस पासवर्ड’ हे शीर्षक अगदी योग्य आहे. एकदा पुस्तक वाचायला घेतले, की पूर्ण झाल्याशिवाय खाली ठेववत नाही. 

संपादक, लेखक, निवेदक, संघटक संदीप काळे यांनी आपल्या संघर्षात्मक जीवनाची पायाभरणी ते यशाचे शिखर गाठण्यापर्यंतचा प्रवास अतिशय जिद्दीने आणि चिकाटीने पार केला. संदीप काळे यांनी पत्रकारितेला सुरुवात करेपर्यंतचा आपला प्रवास ‘ऑल इज वेल’ या पुस्तकात मांडला आहे. 

‘ऑल इज वेल’ या पुस्तकात आत्मचरित्र साकारताना एक धडपड्या तरुण स्वतःला जगासमोर अभिव्यक्त करतोय. संघर्षात्मक काळाचा एक मोठा तुकडा या पुस्तकात साकारला आहे. पुस्तकाची सुरुवातच होते ती लेखकाच्या आईच्या व्यक्तिचित्रातून. कुठलीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना, लेखकाचे आई आणि वडील मुलाच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देतात. पारंपरिक पद्धतीने काम करू न देता वेगळ्या क्षेत्रात जाण्यासाठी पाठबळ देणारे आई-वडील त्या काळात दुर्मीळच. शेतात काम करणारी आई आणि साखर कारखान्यावर काम करणारे वडील आत्ताच्या पालकांसमोर नक्कीच रोल मॉडेल ठरतील. 

तरुण वयातील सळसळते रक्त लेखकाला कुठेही स्वस्थ बसू देत नाही. सतत काहीतरी नवीन निर्माण करण्याचा ध्यास लेखकाने मांडलेल्या प्रत्येक पानावरील भावभावनेतून दिसून येते. गावातील, पंचक्रोशीतील वातावरण कुठलेही मोठे स्वप्न बघण्याचे नव्हते. परंतु, लेखकाने आपल्या मेहनतीच्या आणि आत्मविश्वासाच्या बळावर मोठे स्वप्न पाहिले आणि ते यशस्वीसुद्धा करून दाखवले. जवळपास पस्तीस वर्षांपूर्वीचा तो काळ होतकरू विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळण्याची खात्री देणारा नव्हता. तेव्हाच्या काळातील लेखकाची आर्थिक परिस्थिती, दिवा लावून अभ्यास करावा इतकी हलाखीची होती. या परिस्थितीची लेखकाच्या मनावर झालेली जखम आपल्याला शब्दाशब्दांतून जाणवते. त्यातूनच बालमनावर झालेले विविध संस्कार, शालेय जीवनातील शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे लेखकाचे विचार प्रगल्भ झाले. संदीप काळे यांची सर्वोत्तम विचारांची प्रगल्भता आपल्या मनाला स्पर्शून जाते. लेखक आणि वाचकांचे नाते जुळणे हे त्यांच्या ललित लिखाणाचे यशस्वी गमक आहे. छोट्याशा खेड्यातून सुरू झालेल्या प्रवासात लेखकाने घेतलेले धाडसी निर्णय अनेक टप्प्यांतून आपल्यासमोर येतात. कुमार वयातील मित्रांच्या म्हणण्यावरून बिडी ओढणारे लेखक, दारू कशी तयार करतात हे पाहायला दारू भट्टीवर जाणारे लेखक, अशा अनेक प्रसंगावरून लेखकातील धाडसी पत्रकार आपल्याला बालवयापासूनच जाणवतो. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर आपले गाव सोडून गेल्यावर मनात उडालेला गोंधळ, कुणीही ओळखीचे नसताना केवळ स्वतःच्या हिमतीवर शहरात ओळख निर्माण करणे, विद्यार्थी जीवनातील बाबी अशा अनेक मुद्द्यांना लेखकाने स्पर्श केला आहे. धडपड्या तरुण असल्यामुळे लेखकाला खूप कमी कालावधीत विविध लोकांचा सहवास लाभला. महाविद्यालयात असताना विविध संघटनांशी लेखकाचा संबंध आल्यामुळे त्यांचा कुठल्याही गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यापक झाला. सर्वोदय, राष्ट्र सेवादल, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, छात्र भारती, नई तालीम या संघटनांनी त्यांच्यातील व्युत्पन्न व्यक्तिमत्त्व घडविले. 

महाविद्यालयीन जीवनात बाबा आमटेंच्या सोमनाथ छावणीत गेल्यावर प्रेमात पडलेले लेखक आपले प्रेम सोडून गेल्यावर कसे सावरतात, आणि त्यांचे शिक्षक त्यांना यात कशी मदत करतात, हे वाचून आपलेही मन हळवे होते.  लेखकाला विविध ठिकाणी भेटलेली माणसे, अनेकप्रकारे त्यांच्या जीवनातील प्रसंगाशी एकरूप झाली. बाबा आमटे, डॉ. नरेंद्र दाभोलकर, सूगन बरंठ, अण्णा हजारे आदींच्या संस्कारात त्यांच्या तरुण वयाला आचारविचारांची एक वेगळी ऊर्जा मिळाली आहे. चळवळीत काम केल्यामुळे एक धडपडी वृत्ती त्यांच्या प्रत्येक कामात दिसून येते. या पुस्तकात विचार, प्रयोग आणि प्रक्रिया उलगडून दाखवण्याचे काम लेखकाने केलेले आहे. पुस्तकात पत्रकारितेच्या क्षेत्रातील अनेक मोठी-मोठी माणसे आपल्याला भेटतात. लेखकाची मित्रमंडळी आपल्याला आपलीशी वाटतात. लेखकाचे आई-वडील आपले आई-वडील वाटतात. लेखकाचे शिक्षक आपले शिक्षक वाटतात. एकंदर, उत्साहाची अखंड मैफल असणारे संदीप काळे हे आपलेसे वाटतात. आपलेसे वाटणारे हे लिखाण आपल्याला त्यांच्याशी जोडणारे आहे. कारण संदीप काळे यांचा प्रवास चैतन्याची भ्रमंती करणारा आहे. 

ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांनी पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटले आहे, ‘वास्तवदर्शी साहित्य हे एकाचवेळी साहित्यही असतं आणि माणसाच्या जगण्याचा इतिहासही असतो.’ पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि मांडणी चित्रकार डॉ. नरेंद्र बोरलेपवार यांनी केले आहे. बोरलेपवार यांच्या कलाकृतीला सलाम करावे अशी निर्मिती बोरलेपवार यांनी केली आहे. बोरलेपवार यांच्या कलाकृतीमुळे ‘ऑल इज वेल’ पुस्तकाच्या आशयाला परिपूर्णता प्राप्त झाली आहे. 

मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये हे पुस्तक एकाचवेळी प्रकाशित करण्याचा वेगळा विक्रम संदीप काळे यांनी केला आहे. हे मराठी साहित्यामध्ये कधी घडले नाही. या वेगळ्या लिखाणाचा आनंद घेणे हा एक निखळ अनुभव म्हणता येईल. ‘ऑल इज वेल’ हे पुस्तक मराठी साहित्याला घातलेला एक वैचारिक सोनेरी मुकुट आहे. पुस्तकाच्या प्रत्येक पानापानावर आपल्याला आपला इतिहास दिसेल. अरे हे तर माझ्याविषयीच लिहले आहे, असे अनेक वेळा वाटावे असे अनेक दाखले आहेत. बालपण, शालेय शिक्षण, कर्तव्याचे खाचखळगे, अपुऱ्या इच्छा-आकांक्षा, मित्र, परिस्थिती, महाविद्यालयीन शिक्षण आणि विशेषतः आपल्यावर संस्कार करणारे आईवडील, गुरुजनवर्ग या सगळ्यांचा मिलाप ‘ऑल इज वेल’मध्ये 

अतिशय उत्कृष्टपणे मांडण्यात संदीप काळे यशस्वी झाले आहेत. 

ऑल इज वेल : मनातला सक्सेस पासवर्ड

  • लेखक : संदीप रामराव काळे
  • प्रकाशन : सकाळ प्रकाशन, पुणे
  • किंमत : ₹    १९०
  • पाने : २७२

संबंधित बातम्या