मुलांसाठी आणि भाषा शिक्षकांसाठीही...

प्रा.डॉ. नरेंद्र पाठक
सोमवार, 13 सप्टेंबर 2021

पुस्तक परिचय

एकनाथ आव्हाड यांचा ‘शब्दांची नवलाई’ हा खास छोट्या दोस्तांसाठी लिहिलेला कविता संग्रह प्रकाशित झाला आहे. सर्व कविता वाचून झाल्यावर असे लक्षात येते, की या सर्व कविता लहान मुलांसाठी लिहिल्या असल्या, तरी त्यातून एकनाथ आव्हाड यांनी भाषा विषयाच्या तमाम शिक्षकांनी आणि पालकांनीही, काय करावे यावर मर्मभेदी भाष्य केले आहे. 

मराठी वाचवा, मराठी सक्तीची करा म्हणून केवळ कंठशोष करत बसण्यापेक्षा मी माझ्या मातृभाषेची आवड कशी निर्माण करू शकतो, हे एकनाथ आव्हाड यांनी ‘शब्दांची नवलाई’ या पुस्तकातून सप्रमाण दाखवून दिले आहे. त्यांनी या कृतीतून एक सकारात्मक विचारही दिला आहे. आपल्या सर्जनशीलतेचा उपयोग अगदी शांतपणे त्यांनी करून बालकवितेत खूप छान प्रयोग केले आहेत. 

मुळातच एकनाथ आव्हाड हे एक प्रयोगशील शिक्षक आहेत. एक शिक्षक म्हणून भाषेविषयी असलेला त्यांचा अभ्यास आणि कठीण, अप्रिय विषय हसत खेळत कसा सोपा केला जातो हे कवितासंग्रहाच्या पानोपानी डोकावते आहे. वर्गातल्या मुलांना मराठी विषयाची गोडी निर्माण करण्यासाठी त्यांना भाषा सौंदर्य, भाषेची नजाकत, भाषा समृद्धीचे दर्शन घडवावे लागते. तेही सरळ, साध्या, सोप्या शब्दांत.

आव्हाड यांचे वैशिष्ट्य म्हणजे वाढत्या वयाबरोबर त्यांनी त्यांच्यातील शैशव जपून ठेवले आहे. ते लहान मुलांच्या मानसिकतेतून विविध विषयाकडे सतत पाहतात आणि तो अनुभव ते सर्जनशीलतेने मांडतात. त्यांची बालकविता पारंपरिकही नाही, आणि ती फॅन्टसीकडे झुकणारीही नाही. बदलत्या काळानुसार त्यांची बालकविता प्रौढ होत गेलेली आहे. ‘शब्दांची नवलाई’ या बालकवितासंग्रहात आघात, ध्वनी निर्माण करणारे शब्द, समानार्थी शब्द, शब्दांचे विविध मजेशीर खेळ, व्याकरण, म्हणी, वाक्प्रचार, पत्र लेखन, विरामचिन्हे, उद्‍गारचिन्हे, अर्धविराम, भाषेचे अलंकार, या सर्व गोष्टी कवितेच्या माध्यमातून लहान मुलांसाठी सोप्या करून सांगितलेल्या आहेत.

आई म्हणते संकटांना

नेहमीच तोंड द्यावे,

लहानथोर साऱ्याशीच 

तोंड भरून बोलावे.

मोठ्यांच्या बोलण्यात 

कधी तोंड न घालावे

चुकूनही कुणावर 

कधी तोंडसुख ना घ्यावे.

वाक्प्रचार शिकवण्याची इतकी सुंदर अध्यापन पद्धती आव्हाड यांनी स्वतःच्या चिंतनातून तयार केली आहे. असेच एका कवितेत आव्हाड समानार्थी शब्द हसत खेळत समजावून सांगतात. एका कवितेत शरीराच्या अवयवांचे वाक्प्रचार मोठ्या खुबीने कवितेत पेरले आहे. डोळ्यात धूळ फेकणे, हातावर तुरी देणे, जिभेचा पट्टा चालवणे, नाकाने कांदे सोलणे, पोटात कावळे ओरडणे, तोंडची वाफ दवडणे, कान फुंकणे, खांद्याला खांदा लावून काम करणे, बोटावर नाचवणे, हे सगळे आत्ताच्या मुलांना अपरिचित वाक्प्रचार त्यांनी गंमत जंमत करत छोट्यांसाठी लिहिले आहेत. आणखी एका कवितेत समूहदर्शक शब्दांचा अभ्यास करून घेतात.

या बालमनाच्या कवीने प्रत्येक कवितेत बालकवितेच्या माध्यमातून खूप छान आश्वासक प्रयोग केले आहेत. सर्वच कवितांचा उल्लेख करणे शक्य नाही, रसिकांनी, वाचकांनी त्याचा अनुभवच घ्यायला हवा. याची सुरुवात पालकांनी करायला हवी. या कविता मुलांना तालासुरात म्हणून दाखवल्या पाहिजेत आणि म्हणून घेतल्या पाहिजे. मुले अगदी इंग्रजी माध्यमात शिकणारी असली तरी अशा लालित्यपूर्ण संवादातून मराठीची गोडी निर्माण होईल. 

मला आवडलेली आणखी एक कविता म्हणजे, ‘आईस पत्र’. इलेक्ट्रॉनिक माध्यमामुळे एकीकडे पत्र लेखन हा संस्कारच पुसला जात असताना, मूळ पत्र लेखनाचा खजिना दस्तावेज स्वरूपात मात्र अगदी छोटेखानी पद्‌धतीने त्यांनी या कवितेतून संग्रहित करून ठेवला आहे. पत्र लेखन आरंभ कसा करावा, मायना काय असावा, घरातील सगळ्यांची आस्थेने कशी विचारपूस करावी, शेती, बैल, कुत्रा, मांजर कपिला गाय यांची विचारपूस कशी करावी, स्वाक्षरीनंतर ता. क. म्हणजे काय, अशा सर्वांगाने कवीने लहान मुलांसाठी ही कविता मोठ्या चतुराईने हसत खेळत लिहिली आहे.  

लहान मुलांना नादमय शब्द खूप आवडतात. पाण्याचा खळखळाट, पानांचा सळसळाट, चिमण्यांचा चिवचिवाट, ढगांचा गडगडाट, टाळ्यांचा कडकडाट, बांगड्यांचा किणकिणाट असे विविध नादमय शब्द असलेली ‘नादमयता’ ही कविता नादमय शब्दांच्या वापराचे उत्तम उदाहरण आहे. शब्दांच्या ध्वनी आणि गतीने ही नादमयता वाढत जाते. साहजिकच लहान मुलांची भाषा रुची वाढत जाते. आव्हाडसरांच्या प्रतिभेची आणखी एक चुणूक त्यांच्या ‘उत्स्फूर्त उद्‍गार’ या लहानशा कवितेतून दिसून येते. वाहवा, शाब्बास, अहाहा, अरेरे, छी छी, थू थू अशा शब्दांनी एक मजेशीर कविता त्यांनी केली आहे. एकनाथ आव्हाड हे स्वतः मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षकाचे काम व्रतस्थ होऊन करीत आहेत. हा कवितासंग्रह म्हणजे त्यांच्या वीस-पंचवीस वर्षांच्या अध्ययनाचा आणि चिंतनशीलतेचाच एक आविष्कार आहे. पालक, बालक आणि शिक्षकांनी या पुस्तकाचा अभ्यास केला आणि त्याला पूरक आपले अध्यापन कौशल्य वापरल्यास मराठी घराघरात आनंदाने नांदेल यात शंका नाही.

बालकवितांचे पुस्तक प्रकाशित करणे खूप खर्चिक आणि कठीण असते. मुलांना आकर्षित करता येईल असा चकचकीत कागद, रंगीत आकर्षक अशी चित्रे, त्यानुसार मुखपृष्ठ, आतील मांडणी, या सगळ्यात हे पुस्तक कमी पडलेले नाहीत. दमदार, सकस कवितेसाठी छपाईचा आधारही तितकाच दमदार असावा लागतो. बदलत्या काळात मार्केटिंग आणि सादरीकरणही बदलत गेले आहे. हे सगळे भान ठेवूनच ‘शब्दांची नवलाई’ या पुस्तकाचे प्रकाशन दिलीपराज प्रकाशनाने केले आहे. डॉ. सुरेश सावंत यांनी बालसाहित्य प्रकाराला आवश्यक आणि या संग्रहातील कवितांविषयी समर्पक प्रस्तावना लिहिली आहे. 

शब्दांची नवलाई

  • लेखक : एकनाथ आव्हाड
  • प्रकाशन : दिलीपराज प्रकाशन, पुणे
  • किंमत : ₹   १५०
  • पाने : ६६

संबंधित बातम्या