लेकीबरोबरच्या नात्याचे समृद्ध जग

रमा हर्डीकर-सखदेव
सोमवार, 5 ऑक्टोबर 2020

बुकशेल्फ

‘मूल कसे वाढवायचे’ किंवा ‘पालक म्हणून आपण काय केले पाहिजे आणि काय नाही,’ असे प्रश्न सगळ्याच आईबापांना वेगवेगळ्या टप्प्यांवर कमी-अधिक प्रमाणात पडत असतात. अशा वेळी आपल्या आजूबाजूच्या, आपल्याच पिढीतल्या लोकांचे पालकत्वाचे अनुभव वाचायला मिळाले, तर ते नक्कीच दिशासूचक ठरू शकतात.

मराठीतल्या इतर पुस्तकांत दिसतो, तसा ‘संस्कारां’चा भाग ‘मायलेकी-बापलेकी’ या पुस्तकात बघायला मिळत नाही. उलट आजचे पालक आणि अपत्य यांच्यात दिसणारा नात्यातला मोकळेपणा, चांगला संवाद याची उदाहरणे प्रत्येकच लेखात आपल्याला वाचायला मिळतात. आधुनिक, मध्यमवर्गीय, मात्र भारतीय कुटुंबपरंपरेत मोठ्या झालेल्या आजच्या पिढीतले पालक आपापल्या मुलींना वाढवताना कोणत्या वेगळ्या गोष्टी करत आहेत, कोणते वेगळे प्रयोग करत आहेत, हे आपल्याला वाचायला मिळते. पूर्वीप्रमाणे आजच्या बापाविषयी मुलांना धाक, दरारा वाटत नाही, तर त्यांच्यात मित्रत्वाचे नाते दिसून येते. त्यांच्यातला विसंवाद, अवघडलेपणा गळून पडून हे नातेही मायलेकींसारखेच संवादी व्हायला लागले आहे. थोडक्यात काय, तर या पुस्तकात लेकीबरोबरच्या नात्याचे हे असे उत्कट, संवेदनशील आणि समृद्ध जग पाहायला मिळेल. 

‘मायलेकी-बापलेकी’ या जगताप यांनी केलेल्या विशेषांकाचे हे पुस्तक रूपांतर आहे. मात्र ते करताना लेख जसेच्या तसे छापलेले नाहीत. शिवाय काही वेगळ्या लेखांची भरही घातलेली आहे. पुस्तकात एकूण नऊ लेख मायलेकींवरचे आहेत, तर आठ लेख बापलेकींवरचे आहेत. यामध्ये सोनाली कुलकर्णी, भक्ती चपळगावकर, ममता क्षेमकल्याणी, कीर्ती परचुरे, अमिता दरेकर, प्रिया सुशील, सीमा शेख-देसाई, नयना जाधव आणि अश्विनी काळे अशा नऊ आयांचे लेख आहेत आणि हृषीकेश गुप्ते, दासू वैद्य, किशोर रक्ताटे, राम जगताप, किरण केंद्रे, योगेश गायकवाड, सरफराज अहमद आणि आसिफ बागवान असे आठ लेख वडिलांचे आहेत. शिवाय विशेषांकासाठी डॉ. आशुतोष जावडेकर यांनी लिहिलेला बीजलेख या पुस्तकातही ‘अनुषंग’ म्हणून घेतलेला आहे. पहिल्या पानावर घेतलेले जावडेकरांचे एक वाक्य खूप बोलके आहे - ‘चांगल्या घरात बाप ‘अर्धा आई’ असतो आणि आई ‘अर्धी बाप’ असते!’

आपले मूल कसे असेल, त्याला आपण कसे वाढवू वगैरे विचार काही पालकांनी मूल होण्याच्याही आधीच अति जास्त प्रमाणात केलेला असतो. पण अभिनेत्री सोनाली कुलकर्णी त्यांच्या लेखात अगदी समर्पकपणे म्हणतात तसे, ‘आपण आधी कितीही विचार केलेला असला, तरी प्रत्यक्षातली परिस्थिती वेगळीच असते. मूल झाल्यानंतर आपले अनेक विचार पुस्तकी ठरतात!’ इतकेच काय, एकाच आई-बाबांची दोन मुले किती विरुद्ध स्वभावाची असू शकतात आणि त्यातून कशा गमतीजमती घडतात आणि पालकही कसे खूप काही शिकत जातात, हे आपल्याला भक्ती चपळगावकर आणि ममता क्षेमकल्याणी या दोघींच्याही लेखात वाचायला मिळते.

या पुस्तकातले लेख वाचले, की एक गोष्ट नक्की जाणवते - या पिढीतले आई-बाबा नक्कीच जास्त सजग झाले आहेत; किमान त्यांचे पालकत्वाविषयी स्पष्ट विचार तरी आहेत, एकमेकांशी आणि मुलांशीही संवाद आहे. हे पालक केवळ आधीच्या पिढीचं अनुकरण न करता स्वतःचे मार्ग शोधत जातात. पालक म्हणून आपण काय प्रयोग केले, कशा प्रकारे विविध प्रसंग हाताळले, मुलीची जडणघडण कशी होत गेली हे कीर्ती परचुरे आणि अमिता दरेकर यांनी आपल्या लेखातून फारच चांगले मांडले आहे. तसेच आधीच्या पिढीच्या न पटणाऱ्या गोष्टींना ठामपणे विरोध करून स्वतःच्या विचारांनुसार योगेश गायकवाड आपल्या मुलीला कसे वाढवत आहेत, हे पाहण्यासाठी त्यांचा लेख वाचायलाच हवा.

हल्ली आई आणि बाबा दोघेही मूल वाढवण्याच्या सर्व प्रक्रियेत आणि घरातल्या सगळ्या कामांमध्ये सारखा वाटा उचलताना दिसू लागले आहेत. राम जगताप म्हणतात, ‘माझ्या बायकोने मला ‘माणसाळवलंय’! आणि लेकीमुळे माझ्या स्वभावाची, ‘पुरुषीपणा’ची टोके बरीच बोथट झाली आहेत.’

‘मायलेकी-बापलेकी’मधले लेख अनुभवप्रधान असले, तरी प्रत्येक लेखात पालकत्वाचा कोणतातरी एखादा वेगळा पैलू नक्की वाचायला मिळतो. उदाहरणार्थ, सरफराज अहमद यांचे स्वतःचे बालपण फारच दुर्दैवी परिस्थितीत व्यतीत झाले. त्यामुळे त्यांच्या सगळ्याच  

आयुष्यावर त्याचा काहीतरी प्रभाव पडणार, हे साहजिकच होते. त्यांच्या एका वाक्यातून आपल्याला ते अगदी नीट कळून येते. ते म्हणतात, ‘काहीही झाले तरी माझ्या ललाटी आलेले जगणे तिच्या पदरी टाकायचे नाही, असा ठाम निश्चय मी केला आहे.’ तसेच एक हिंदू आणि एक मुस्लीम पालक असताना, मुलांना वाढवताना धर्म आणि भाषा यांचे कसे आव्हान असते आणि मूल आपल्या निरागस वागण्यातून कसे सहजी काही गुंते सोडवून टाकते, हे आपल्याला आसिफ बागवान यांच्या लेखात वाचायला मिळते.

याचबरोबर, वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणाऱ्या पालकांचे लेख आवर्जून घेण्याचा प्रयत्न दिसून येतो. त्यामुळे काही लेखांमधून आपल्याला जरा वेगळ्या प्रकारच्या आयुष्यांबद्दल, वेगळ्या आव्हानांबद्दल वाचायला मिळते. 

थोडक्यात काय, तर माय-लेक असो किंवा बाप-लेक, हे नाते जितके प्रेमाचे, प्रत्येकासाठी अगदी आपले खास असे असते, तितकेच ते वैश्विक असते. 

हे पुस्तक वाचताना कधी वाटते, ‘अरेच्चा! हा तर आपलाच अनुभव आहे की!’ किंवा ‘अरे बापरे, अजून काही वर्षांनी आपली मुलगीसुद्धा या वयाची होईल आणि बहुतेक असेच संवाद आपल्याही घरात ऐकू येऊ लागतील!’ असे हे ‘मायलेकी बापलेकी’ पुस्तक वाचनीय तर आहेच, शिवाय आपल्याला आपल्या अपत्याबरोबरच्या नात्याकडे किंवा खरे तर आपल्या पालकांबरोबर असलेल्या आपल्या नात्याकडेसुद्धा पुन्हा एकदा पाहायला लावेल असे वाटते.

मायलेकी-बापलेकी 
संपादक - राम जगताप, भाग्यश्री भागवत
प्रकाशन - डायमंड पब्लिकेशन्स, पुणे
किंमत - २९५ रुपये
पाने - २४०

संबंधित बातम्या