महाराष्ट्र इतिहासाचा अन्वयार्थ

रणधीर शिंदे
सोमवार, 9 डिसेंबर 2019

पुस्तक परिचय
 

महाराष्ट्रीय लोकव्यवहाराचे आणि संतसाहित्याचे साक्षेपी अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांचा ‘थोरांचे अज्ञात पैलू’ हा ग्रंथ प्रसिद्ध होणे ही आजच्या काळातील महत्त्वाची घटना आहे. दै. ‘सकाळ’च्या रविवार आवृत्तीतून प्रसिद्ध झालेल्या सदरलेखनाचे हे ग्रंथरूप आहे. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास हा सदानंद मोरे यांच्या लेखनध्यासाचा मुख्य विषय आहे. विसाव्या शतकातील अनेकविध घडामोडींमधून महाराष्ट्र घडणीचे बृहतचित्र त्यांनी या ग्रंथाद्वारे शोधले आहे. या काळातील विचारप्रवाह, त्यांची वाटचाल, त्यातल्या संगती-विसंगती आणि अंतर्विरोधांचा अन्वयार्थ मांडला आहे. या महाराष्ट्र इतिहासाचा पाहणी बिंदू मात्र व्यक्ती आणि त्यांचे जीवनकार्य आहे. समाजकारण, धर्मकारण व राजकारणातील अज्ञात कर्तृत्ववान व्यक्‍तींच्या कार्यमीमांसेतून त्यांनी हा महाराष्ट्र पाहिला आहे.

हिंदुत्ववाद, मार्क्‍सवाद, ब्राह्मणेतर चळवळ या विचारप्रवाहांबरोबरच लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, महात्मा फुले, महर्षी शिंदे व इतरही व्यक्‍तींच्या कार्यस्वभावावर नवा प्रकाश टाकला आले. मातृभूमी आणि पितृभूमी, नित्यानित्यविवेक, भगवंताचे अधिष्ठान या दृष्टीने रा. स्व. संघ वाटचालीचा परामर्श घेतला आहे. महाराष्ट्रातील मार्क्‍सवादी, साम्यवादी पक्षांचे राजकारण-व्यवहारासंबंधी नवे विश्‍लेषण केले आहे. एकार्थाने वाढ, विस्तार आणि अंतर्विरोधाच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्राचे समाज मन कसे आकारात आले त्याची चिकित्सा डॉ. सदानंद मोरे यांनी केली आहे. लोकमान्य टिळकांचे भारतीय समाजाला असलेले आकर्षण आणि प्रभावपट त्यांच्या टिळकांवरील लेखांत आहे. तसेच सदाशिव बापट, ग. वि. केतकर ते वासूकाका या टिळकांच्या अलक्षित सहकाऱ्यांवरील लेखही तितकेच महत्त्वाचे आहेत.

या बरोबरच महात्मा फुले व ब्राह्मणेतर चळवळीसंबंधी केलेले लेखन मौलिक स्वरूपाचे आहे. फुले विचार परंपरेला फुटलेल्या नव्या धुमाऱ्यांची चिकित्सा आहे. भालेकर, मुकुंदराव पाटील, दा. सा. यंदे ते जागृतिकार पाळेकरांच्या अज्ञात कार्याचे दिग्दर्शन आहे. ब्राह्मणेतर पत्रकारितेचे प्रगल्भ स्वरूपही त्यांनी सांगितले आहे. गौतम बुद्धानंतर हजार वर्षांनी फुले यांनी भारतीय इतिहासात ‘पॅरेडाइम शिफ्ट’ घडवून आणला, असे सांगून फुले कार्यातील तुकाराम परंपरेचे प्रभावधागे शोधले आहेत. अभंग आणि अखंड याच्यातील संहितावाचनाची सूक्ष्मदृष्टी त्यामध्ये आहे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कार्याविषयी मोरे यांच्या मनात खोलवरची आस्था आहे. त्यामुळेच महर्षी शिंदे यांच्या राजकारण, समाजकारणातील अलक्षित बाबींकडे जाणीवपूर्वक लक्ष वेधून महर्षींच्या कार्याची थोरवी विशद केली आहे. इतिहास संशोधक वि. का. राजवाडे यांच्या मांडणीतील थोरवी आणि मर्यादा सांगून राजवाडे यांच्या विचारमांडणीतील परिवर्तन-बदलाची नोंद त्यांनी घेतली आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी व विचारवंत कॉ. शरद पाटील यांच्या सामाजिक आणि वैचारिक कार्याची दखल ‘दुर्लक्षित महानायक’च्या परिप्रेक्ष्यात घेतली आहे.  

एकंदरीत सदानंद मोरे यांचा ‘थोरांचे अज्ञात पैलू’ हा ग्रंथ मराठी विचारविश्‍वात मोलाची भर घालणारा विचारग्रंथ आहे. महाराष्ट्राच्या लोकव्यवहाराच्या विविध अंगांचा साक्षेपी वेध या ग्रंथात आहे. विसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारणाचा विश्‍लेषणात्मक आलेख या ग्रंथचर्चेत आहे. छोट्या-मोठ्या घटना, प्रसंग, घडामोडी, व्यक्‍तिस्वभाव, त्यातल्या अंतर्गत संगती-विसंगती संबंध शोधातून त्यांनी महाराष्ट्र घडणीचा अन्वयार्थ शोधला आहे. मराठीत विपुल प्रमाणात लिहिले जाणारे व्यक्तिविषयक लेखन हे केवळ व्यक्‍तिगुणवर्णनपर स्वरूपाचे असते. त्यामुळे त्याच्या विस्ताराला स्वाभाविकच मर्यादा पडतात. मोरे यांच्या या लेखनाचा केंद्रवर्ती विषय हा व्यक्तिदर्शन असला तरी त्याचा हेतू महाराष्ट्राचा समाज इतिहास मांडणे असा आहे. व्यक्‍ती कार्याचा महाराष्ट्राच्या समाज जीवनावर उमटलेला ठसा सांगणे, या धारणेतून हे लेखन घडले आहे. तसेच हा समाज इतिहास त्यांनी तुलनात्मक दृष्टीने न्याहळला आहे, त्यामुळे त्यांच्या अर्थवाटांना अनेक नव्या मिती प्राप्त झाल्या आहेत. अनेक ज्ञानशाखीय संदर्भसाधनांचा अतिशय कल्पक असा वापर त्यांनी केला आहे. तत्कालीन समाज जीवनातील अनेक दडलेल्या विपुल माहितीचा दस्तऐवज त्यातून निष्पन्न झाला आहे. सामाजिक शास्त्रांपासून, वाङ्‌मयादि ग्रंथापासून ते लोकव्यवहारातील अनेक गोष्टींचा अंतर्भाव त्यांनी या ग्रंथचर्चेत केला आहे. समाज जीवनातील ‘बहुआवाजा’च्या सादरीकरणातून काही एका निश्‍चित प्रमेयापर्यंत ते येतात. त्यांच्या या लेखनावर ‘सांगण्या’च्या कथनाचा प्रभाव आहे. हरदासी कीर्तनकाराप्रमाणे त्यांची ही लेखननिरूपण शैली आहे. लेख शीर्षकांच्या निवडीमागेही या कथनआवाहनाचा प्रत्यय आहे. विसाव्या शतकातील विस्मृतीतील महाराष्ट्र समाज इतिहासाच्या अनेक अज्ञातवाटा या महाग्रंथात त्यांनी पसरून ठेवल्या आहेत. महाराष्ट्र इतिहासाच्या अभ्यासाला नवी चालना आणि दृष्टी देणारा हा ग्रंथ आहे.    

संबंधित बातम्या