गांधी विचारांचा वेध

आ. श्री. केतकर
गुरुवार, 11 जानेवारी 2018

पुस्तक परिचय

गांधीजींच्या बिगर राजकीय विचारांचा भावार्थ सांगताना त्यांच्या ‘नयी तालीम’च्या विचारसृष्टीची राजकीय बाजू अधोरेखित झालीच नाही, त्यामुळे व्यवस्था परिवर्तनाचे एक राजकीय हत्यार हातातून निसटून गेले, त्यामुळेच त्यांच्या तथाकथित बिगरराजकीय विचारातील पैलूंचे राजकीय आकलन करून घेणे जरुरीचे आहे

प्रा. यशवंत सुमंत यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झालेले, गांधीजींच्या विचारसृष्टीतील अलक्षित पैलूंचा वेध घेण्याच्या संदर्भातील त्यांच्या विविध लेखांचे हे संकलन आहे. या लेखांमध्ये त्यांनी, समकालीन संदर्भ असो किंवा भिन्न ऐतिहासिकता, तिच्या सच्च्या आकलनाविषयीचा गंड बाळगत आणि केवळ अभ्यासकाच्या काळातील मागणी घेत विचारांचे अर्थनिर्णयन करण्याची रीत स्वीकारली नाही, असे या पुस्तकाचे संपादन करणाऱ्या चैत्रा रेडकर यांनी म्हटले आहे. सुमंत यांच्या या धोरणामुळेच हा संग्रह अधिकच समृद्ध झाला आहे. संग्रहामध्ये १९९५ ते २०१० या कालावधीतील सात लेख असून ते महात्मा गांधी यांची शिक्षणविषयक दृष्टी, गांधी विचारातील समता आणि संकल्पना एक पुनर्विचार, गांधीविचारांतील बिगर राजकीयतेचा भावार्थ, गांधीविचारांचा विकास काही दिशा, गांधी-आंबेडकर कृतकसंघर्ष संपविण्याच्या दिशा, बहुजनवादी गांधी आणि ... म्हणजे गांधींना नव्या संदर्भात प्रस्तुत करणे होय, असे आहेत. चैत्रा रेडकर यांच्या प्रस्तावनेत या लेखनाबाबत विवेचन केले असून तो एक लेखच म्हणावा लागेल.

शिक्षणाबाबत भारतीयांचा अहंकार चेतविणाऱ्या टिळक-घोष प्रणीत शिक्षणाचा आशयच गांधींनी राष्ट्रीय चळवळीच्या माध्यमातून बदलला. राष्ट्रीय शिक्षण हे शोषित वर्गाच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे कसे होईल, याची चिंता गांधींनी वाहिली. म्हणूनच गांधींचा शिक्षणविचार हा मुक्तिदायी राजकारणाचे हत्यार बनले आहे. हे हत्यार संकल्पपूर्वक वापरायचे, की खुशाल गंजू द्यायचे हा विचार परिवर्तनवादी लोकांपुढे आहे, असे लेखक म्हणतो. गांधीजींच्या विचाराचे वैशिष्ट्य म्हणजे ते जी परिभाषा वापरतात तिच्या रूढ अर्थापेक्षा अत्यंत क्रांतिकारी संदेश ते सामान्यांपर्यंत परिणामकारकरीत्या पोचवतात. उदा. देव-धर्मादिकांची परिभाषा वापरत ते धर्मनिरपेक्षता शिकवतात, कर्तव्याची भाषा वापरत हक्काची जाणीव निर्माण करतात तर वर्ण जातीची परिभाषा वापरत जातिव्यवस्था व जातिभेद निर्मूलनाचा संदेश देतात असे सांगून लेखकाने नंतर समाजवादी, मार्क्‍सवादी, फुले-आंबेडकरवादी यांच्याप्रमाणेच गांधी हेही समतासंघर्षातील एक सेनानी होते, हे स्वीकारावे लागेल असे म्हटले आहे. ते समताधिष्ठित समाजाचे शिल्पकार होते हे सांगण्याची आज परिवर्तनाच्या चळवळींना गरज आहे, असे लेखक म्हणतो. 

गांधीजींच्या बिगर राजकीय विचारांचा भावार्थ सांगताना त्यांच्या ‘नयी तालीम’च्या विचारसृष्टीची राजकीय बाजू अधोरेखित झालीच नाही, त्यामुळे व्यवस्था परिवर्तनाचे एक राजकीय हत्यार हातातून निसटून गेले, त्यामुळेच त्यांच्या तथाकथित बिगरराजकीय विचारातील पैलूंचे राजकीय आकलन करून घेणे जरुरीचे आहे, असे म्हटले आहे. गांधी विचारांच्या विकासासंदर्भात विनोबांचे भाष्य उदधृत केले आहे. ‘१९०७ ते १९४७’ हा बापूंचा मानसिक इतिहास आहे ... म्हणून बापूंना त्यांच्या जागी राहू देऊन आपण विचार केला पाहिजे. लेखक म्हणतो, ’यातून बोध घ्यायचा तो असा, की कोणत्याही विचारप्रवाहाचा विकास या आत्मनिग्रहाशिवाय होणार नाही. जो हा आत्मनिग्रह प्रकट करेल तो गांधीविचार पुढे घेऊन जाईल. गांधी आंबेडकर  या विचारधारांतील मित्रभाव ओळखणे, ही त्यांच्या समन्वयाची पूर्वअट असेल आणि त्यांच्या 

कृतकसंघर्षाचा अंत असेल असेही तो म्हणतो. आज पोथीनिष्ठ, अभिनिवेशी आणि कृतक बहुजनवाद व फुले-आंबेडकरप्रणीत अस्सल, प्रवाही, न्यायलक्षी बहुजनवाद यांत फरक करण्याची वेळ आली आहे. तसा तो केल्यास फुले-आंबेडकर बहुजनवादाचे शिल्पकार म्हणून गांधींची दखल घ्यावी लागेल.

शब्दमर्यादेमुळे ही थोडक्यात ओळख आहे, प्रत्यक्ष पुस्तक वाचायलाच हवे या वर्गातील आहे.

महात्मा गांधींची विचारसृष्टी ः 
काही अलक्षित पैलू

 लेखक  ः यशवंत सुमंत 
 प्रकाशक  ः साधना प्रकाशन, पुणे
 किंमत  ः १२५ रुपये
 पाने  ः १३६
 

संबंधित बातम्या