यशस्वी उद्योजकतेसाठी...

एस. आर. जोशी
गुरुवार, 21 जून 2018

पुस्तक परिचय
कल्पकतेचे दिवस
लेखक : श्रीरंग गोखले
प्रकाशक : बिझनेस मंत्रा, होरायझन स्पेस मीडिया सर्व्हिसेस, पुणे. 
किंमत : २१० रुपये 
पाने : २०६

श्रीरंग गोखले लिखित ‘कल्पकतेचे दिवस’ हे पुस्तक केवळ उद्योजकांसाठी आहे, असं त्याच्या बाह्यरुपावरुन वाटत असलं तरी प्रत्यक्षात ते प्रत्येक मराठी वाचकांसाठी आहे. जे वाचक-उद्योजक आहेत त्यांना त्यांच्या उद्योगासाठी या पुस्तकातून बहुमोल टिप्स मिळतीलच, पण जे उद्योजक नसलेले वाचक असतील त्यांना याचा दुहेरी फायदा होईल. 

उद्योगक्षेत्रातील मंडळी कसा विचार करतात हे वाचकांना समजेल आणि स्वतःचं व्यक्तिगत आयुष्य घडवण्यासाठीही पुस्तकांची मदत होईल. त्या विषयांवर गोखले यांनी पुस्तक लिहिलं आहे. अशा विषयांवर इंग्रजीत अनेक पुस्तक येत असतात. त्यातल्या काहींचे मराठी अनुवादही होतात. पण स्वानुभवावर आधारित अशी फार कमी पुस्तकं मराठीत प्रसिद्ध होतात. गोखले यांचं पुस्तक हे त्यापैकी एक आहे. डिझाईन डिपार्टमेंटमध्ये कारकीर्द सुरू करून त्याच्या प्रमुख पदापर्यंत मजल मारलेले, सत्तरी ओलांडून पुढे मार्गक्रमण करणारे, निवृत्तीनंतर अनेक उद्योजकांना मार्गदर्शन करणारे गोखले हे उद्योगातील गरजांचा अत्यंत कळकळीने विचार करणारे आहेत. प्रत्येक उद्योगात, मग तो छोटा का मोठा असो, उत्पादनाचा असो की सेवेचा असो, त्यामध्ये ग्राहक हा सर्वांत महत्त्वाचा भाग असतो. या ग्राहकांच्या गरजा, इच्छा, आकांक्षा जाणून घेणे, त्याच्या भविष्यातील गरजांचासुद्धा अंदाज करणे आणि त्या गरजा आपल्या उत्पादनामध्ये मूर्त स्वरूपात आणणे हे आवश्‍यक असते. पारंपरिक पद्धतीने विचार करावाच, पण बऱ्याचदा पठडीबाहेरचाही विचार (आउट ऑफ बॉक्‍स) करायचा. सामूहिक विचार करण्याच्या पद्धतीमधून सर्वोत्तम अशा उत्पादनाची योजना करायची, याविषयी त्यांनी लिहिलेले पुस्तक कोणालाही सहज समजू शकेल असे आहे. 

प्रत्येक कर्मचारी हा उद्योगामध्ये अत्यंत महत्त्वाचे योगदान देत असतो. उद्योगामध्ये अशा अनेक घडामोडी असतात, की त्यात समूहाने काम करायचे असते. जवळजवळ प्रत्येक गोष्ट ही सांघिक पद्धतीने केल्यास त्याचे परिणाम त्वरित मिळू शकतात. जागतिक स्पर्धेच्या युगात उद्योगामध्ये सतत सुधारणा करणे, त्याची किंमत कमी करणे किंवा त्याचे ‘मूल्य’ वाढवणे (उपयुक्तता), त्याचा दर्जा अन्‌ त्यातील सातत्य राखणे, यामध्ये नावीन्य आणणे, या गोष्टी यशस्वीरीत्या करणे कसे शक्‍य होते याविषयी सविस्तर माहिती पुस्तकात आहे. या माहितीच्याद्वारे प्रत्येक कर्मचारी, मग त्यात कामगार असो वा इंजिनिअर, मॅनेजर असो की जनरल मॅनेजर, आपापले काम जास्त चांगल्या प्रकारे व समजून उमजून करेल यात शंका नाही. जेव्हा उद्योगातील बहुतांश मंडळी अशा गोष्टी करतील, तेव्हा उद्योग कायम प्रगतिपथावर राहील.

लेखकाला वाचनाची आवड असल्यामुळे ज्ञानामध्ये सतत वाढ होण्यासाठीची धडपड, पुढे कामांच्या जबाबदाऱ्या पेलताना मानवी संबंधाचा व नेतृत्वगुणांचा अभ्यास, निवृत्तीनंतरचे उद्योजकांचे प्रशिक्षण व मेंटॉरशिपचा अनुभव या सगळ्यामुळे लेखकाचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी झाले. त्यात मन संवेदनशील असल्यामुळे आपल्या अनुभवाचा फायदा इतरांना कसा होईल हाच विचार सतत लेखकाच्या मनात होता. 

उत्पादनाच्या वस्तूंमध्ये किती तरी पद्धतीने बदल करता येतो. शोध, अनुकरण, बदल, एकत्रीकरण, पुनर्रचना, परिवर्तन अशा अनेक गोष्टींची उदाहरणे एकदम चपखल आहेत. एखाद्या वस्तूच्या निर्मितीचे विविध टप्पे, त्या प्रत्येक टप्प्यामध्ये विविध चाचण्यांमार्फत उत्पादनाच्या गुणवत्तेची खात्री करून घेणे, त्यामध्ये प्रत्येकाला सहभागी करून घेणे, नवे तंत्रज्ञान आत्मसात करणे या गोष्टी पुस्तकात तपशीलवार अन्‌ उदाहरणासहित दिलेल्या असल्यामुळे समजायला सोपे होते. कपड्यांच्या, औषधांच्या व इतर उद्योगातही याचा कसा उपयोग करता येईल याचाही उल्लेख पुस्तकात आहे. 

‘कल्पकतेचा पुजारी’ असे स्वतःला समजून लेखकाने कल्पकतेवर, त्यातील गैरसमजावर, कल्पकतेच्या क्षमतांच्या विकासासाठी आवश्‍यक असलेली माहिती, त्याचे ज्ञानात करावे लागणारे रूपांतर, त्यात चिकित्सकवृत्तीची भर घालून मिळवलेली प्रतिभा यांचा ऊहापोह केला आहे. कल्पकतेच्या विकासासाठी आवश्‍यक असे विचारमंथन अन्‌ त्याच्या परिणामकारकतेसाठीची तंत्रे ही प्रत्येकाला अत्यंत उपयुक्त आहेत. 

ग्राहकाभिमुख उद्योग, ग्राहकाची मानसिकता, किंमत आणि दर्जाबाबतचे धोरण, ग्राहकांचे वेगवेगळे गट, याविषयीची उदाहरणे रेडिओ व्यतिरिक्त असलेल्या उद्योगातील लोकांनाही मार्गदर्शक आहेत. वस्तुनिर्मितीचा खर्च, त्याचे गिऱ्हाईकाच्या दृष्टीने वाटणारे मोल अन्‌ वस्तूंची किंमत यांचे नाते कसे असते, वस्तूंची किंमत कमी करण्यासाठी काय केले जाऊ शकते. (उदा. व्हॅल्यू ॲनॅलिसिस, स्टॅंडर्डायझेशन) या सगळ्यांची खुलासेवार माहिती पुस्तकात आहे. त्याचा रोजच्या जीवनात वापर केल्यास उद्योगाची स्थिती मजबूत व्हायला नक्की मदत होईल. 

मानवी नातेसंबंध, समूहाचे मानसशास्त्र, स्वयंविकास साधणाऱ्या अनेक योजना (सूचना पेटी, टास्क फोर्स, क्वालिटी सर्कल, नेतृत्वगुण, सर्वांना बरोबर घेऊन काम करणे) आदी गोष्टींचे महत्त्व तंत्राइतकेच आहे, हे अनुभवाचे बोल विस्ताराने आले आहेत. उद्योजकतेमध्ये औपचारिक शिक्षणापेक्षा अनुभवाचे महत्त्व जास्त आहे. उद्योग आणि व्यवसाय यातील अंतर, उद्योजकता कशी विकसित झाली, उद्योजकाकडे असलेले गुण, नोकरी अन्‌ उद्योग यातील फायदे-तोटे यावरचे विवेचन सर्व उद्योगत्सुक मंडळींना मार्गदर्शक ठरतील. संधी कशी शोधावी, या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्‍नाचे उत्तरही त्यात मिळेल. उद्योजकाची प्राथमिक तयारी, उद्योग सुरू करण्यासाठीचे टप्पे, निर्णयप्रक्रियेसाठी आवश्‍यक तंत्रे, या गोष्टी वाचून त्याप्रमाणे कृती करत गेल्यास उद्योग सुरू करणे शक्‍य होईल अशा पद्धतीचे मार्गदर्शन पुस्तकात केलेले आहे. उद्योजकतेच्या मार्गदर्शनाचा १० वर्षांचा अनुभव या विवेचनात पूर्णत्वाने आला आहे. उद्योगात अचूकता आणण्यासाठीची तंत्रे, वेगवेगळ्या प्रक्रिया बिनचूक करण्याविषयीचे मार्ग, एफएमईए, डीओई, ६ सिग्मा व एफडी असे अत्यंत उपयुक्त प्रकार, निर्णयक्षमतेसाठीची तंत्रे आदी गोष्टी वेगवेगळ्या चार्टस, टेबल्सच्या साहाय्याने सोप्या करून सांगितल्या आहेत. विशेष म्हणजे सर्वसामान्य वाचकांचा या संकल्पनांशी कधी संबंध आलेला नसतो. या पुस्तकामुळे त्यांना त्या संदर्भासहित लक्षात येऊ शकतात. 

पुस्तकाच्या अखेरच्या लेखामध्ये विक्रीविषयीचे तंत्र समजावले आहे. आपल्या बहुतांश उद्योजकांची अत्यंत महत्त्वाची अशी समस्या सोडवण्यासाठीचे हे तंत्र आहे. काही गोष्टीमधून उद्योजकतेचे तत्त्वज्ञानही मांडलेले आहे. त्यात कासव सशाची गोष्ट उल्लेखनीय. जुन्या गोष्टीमध्ये भर घालून स्वॉट ॲनॅलिसिस समजावून सांगितले आहे. इफेक्‍टिव्हनेस हे इफिशिअन्सीपेक्षाही जास्त महत्त्वाचे, हेही बिंबवले आहे. एका संवेदनशील, सृजनशील आणि कमावलेल्या अनुभवाचा ‘कल्पकतेचे दिवस’ हा प्रसाद आहे. जो जो त्याचा लाभ घेईल त्याला अन्‌ त्याच्या उद्योगाला फायदा होईल यात शंका नाही.

संबंधित बातम्या