विस्मरणातील अद्‍भुतरम्य दुनिया

संतोष शिंत्रे
गुरुवार, 25 मार्च 2021

पुस्तक परिचय

‘जादूवालाज, जगलर्स अँड जिन्न्स – ए मॅजिकल हिस्टरी ऑफ इंडिया’ या पुस्तकामध्ये भारतीय जादू आणि जादूगारांचा अद्‍भुत इतिहास वाचायला मिळतो.

‘जादू’ हा शब्द उच्चारताक्षणीच आपल्यातल्या प्रत्येकाच्या मनासमोर अनेकविध वेगवेगळी, रंगीबेरंगी स्मरणचित्रे उभी राहतात. आपली अद्‍भुताची आस अगदी लहानपणापासून या कलेने कुठे ना कुठे पूर्ण केलेली असते. जादूगार रघुवीर आणि त्यांच्या जादू व्यवसायातील पुढील पिढ्या बहुतेकांना माहिती असतातच.

वात्सायनाने केलेल्या कलांच्या वर्गीकरणात ‘ऐन्द्रजाल’ असा उल्लेख असणारी, भारतात मानाचे स्थान असणारी ही कला. भारतीय जादू पार हडाप्पा संस्कृतीपासून अस्तित्वात असल्याचे इतिहासात पुरावे आहेत. तिथपासून ते आजमितीच्या पी. सी. सरकार या जगद्विख्यात नावापर्यंत इतिहास असणारी ही कला. हा सर्व इतिहास कथन करायचा, हे मोठे शिवधनुष्य. जॉन झुब्रिझ्यकी या अचाट मनुष्याने ते पेलले आणि ‘जादूवालाज, जगलर्स अँड जिन्न्स – ए मॅजिकल हिस्टरी ऑफ इंडिया’ हे अद्‍भुत पुस्तक आपल्या भेटीला आले. मूळ ऑस्ट्रेलियावासी असलेले हे लेखक महाशय स्वतःची ओळख या पुस्तकात ‘परदेशस्थ वार्ताहर, राजकीय मुत्सद्दी आणि सहल मार्गदर्शक’ अशी करून देताना दिसतात. या अतिशय विस्तृत ग्रंथात जादू या विषयाची भारतीय जादूचा समग्र प्रवास उलगडणारी पंधरा प्रकरणे आहेत. उपोद्घात आणि उपसंहारही आहे. पहिल्या काही प्रकरणांमध्ये लेखक चेटूक, धार्मिक मंत्र-तंत्र आणि कर्मकांड आणि जादू यासाठी ‘जादू’ हा एकच शब्द आलटून पालटून वापरताना दिसतो. पण वाचकाला पहिल्या काही प्रकरणांतच हे लक्षात येते, की लेखकाला खरा रस आहे, तो रंगमंचीय जादूत. जिन, चमत्कार घडवणारे आणि आत्मपीडन करून घेत काही अशक्य कृत्ये करणारे फकीर अथवा योगी यांची वर्णने आहेत. पण तो पुस्तकाचा गाभा नाही. 

अगदी पहिले प्रकरण प्राचीन ग्रीक, चिनी आणि अरब लोकांनी केलेली (हिंदूस्तानी) जादूची वर्णने तपासते. याने पुस्तकाची पार्श्वभूमी तयार झाली, की पुढील तीन प्रकरणात हिंदू, जैन, बौद्ध आणि मुस्लिम ग्रंथांमधून आढळणाऱ्‍या विविध प्रकारच्या मजकुराच्या आधारे भारतीय जादूचा इतिहास लेखक उलगडतो. पाचव्या प्रकरणात लेखकाला खरे स्वारस्य असलेल्या विषयाकडे तो वळतो, तो म्हणजे अस्सल भारतीय जादूकडे पाहण्याचा पाश्चात्त्यांचा दृष्टिकोन. ब्रिटिशांच्या दृष्टीने कल्पनातीत, अवाक करणाऱ्‍या अनेक चमत्कृतीपूर्ण गोष्टी पाहून साहेब लोकांनी लिहून ठेवलेल्या अनेक वृत्तांत, पुस्तके,संशोधन-पत्रिकांमधील आढाव्यांचा, महाप्रचंड अभ्यास करून, त्यावर संशोधन करून लेखक आपल्यासमोर जणू एक चमचमता खजिनाच पेश करतो. 

व्हिक्टोरियन काळात भारतीय जादूगार इंग्लंडला आपली कला दाखवण्यासाठी जाऊ लागले. अशांपैकी पहिला प्रसिद्ध जादूगार रामो सामी याची करुण हकीकत लेखक आपल्यासमोर मांडतो. नशीब पायाशी लोळण घेत असल्यापासून ते इंग्लंडमध्ये त्याला घडलेला तुरुंगवास, झालेली उपेक्षा आणि तितकाच करुण मृत्यू हे सर्व वाचताना आपणही हेलावून जातो. पुस्तकात यानंतर मात्र पाश्चात्य आणि भारतीय जादूगारांचा एकमेकांवर पडलेला प्रभाव आणि एकंदरीतच भारतीय जादूवर त्याचा झालेला परिणाम याचे रंजक आणि सविस्तर वर्णन येते. आज विस्मृतीच्या पडद्याआड गेलेले संख्येने मुबलक भारतीय जादूगार यामध्ये आपल्याला भेटतात. प्रोफेसर अहमद, प्रोफेसर आळवरो, नाथू मनच्छंद, गणपति चक्रवर्ती (मूळ सरकारांचे गुरू), अमरनाथ दत्त ऊर्फ लिंगासिंह, खुदा बक्ष आणि इतर काही नावे आपल्याला समजतात. त्यांनी केलेले प्रचंड काम आणि कष्टही सामोरे येतात. प्रतिस्पर्ध्याबाबत असणारी असूया आणि वसाहतवादी तुच्छता यामुळे इंग्लंडमधील अनेक जादूगारांनी या सर्व लोकांबाबत प्रचंड अपप्रचार केलेला दिसतो. ग्रेट इंडियन रोप ट्रिक ही आजवरील भारतीय जादूंमधली सर्वात आकर्षक आणि चर्चिली गेलेली जादू. खोटी आहे, अशी काही जादूच अस्तित्वात नाही, इथपासून सुरुवात करून ह्यूज सिमन्स-लीन, हॅरी केलर, हॉवर्ड थर्स्टन अशा अनेक मोठ्या ब्रिटिश जादूगारांनी भारतीय जादूची मनमुराद टिंगल, हेटाळणी केली. त्याला आपल्या लोकांनी आणि काही इंग्रजांनीच समर्पक उत्तरेही दिली. हा भाग पुस्तकात फार मनोरंजक पद्धतीने सामोरा येतो.       

सामरिक अंगाने अभ्यासलेला इतिहास सोडून बाकी इतिहास बहुतेक वेळा राजे-रजवाडे किंवा तळगाळातील लोकांच्या (subaltern) अभ्यासाने युक्त असतो. पण भारतीय जादू, तिचा परमोत्कर्ष आणि लय हा दुर्लक्षित ऐतिहासिक विषय असा आहे, की ज्यात ही दोनही टोके एकत्र येतात. एका बाजूला प्राचीन भारतातील जादू ही तथाकथित परिघावरील लोकांमध्ये खूप जोराने फोफावली. तर दुसरीकडे तिला मिळालेला राजाश्रयही तिला जिवंत ठेवण्यासाठी कामी आला. बारा पाल नामक एका अशाच निम्न-वर्गीय कलावंतांच्या अनौपचारिक पथकांचे वर्णन आपण या पुस्तकात वाचतो, तेव्हा तो पददलितांचाच इतिहास असतो. बारा कलानिपुण भटक्या विमुक्त लोकांचा हा समूह गावोगावी फिरताना त्यांच्यातली घट्ट सामाजिक वीण, त्यांचे तीन दगडावरील एकाच चुलीत शिजवलेले अन्नग्रहण, अंतर्गत समता वाचताना त्यांची कौशल्ये आणि त्यातील विविधता आपल्या थक्क करून जाते. एकाच बारा पाल पथकात जगलर्स, गारुडी, प्राणी हाताळणारे, कठपुतळी कलाकार, शब्द-भ्रमकार, कथा सांगणारे, नकलाकार आणि कसरत करणारे, अशासारख्या बारा कुशल कलावंतांचा समावेश असे. सध्याचे पी. सी.सरकार यांच्यावरील प्रकरणही अत्यंत वाचनीय आहे.

जादू कशा करतात ही रहस्ये आपण पुस्तकात का उलगडली नाहीत, ते सांगताना लेखक म्हणतात, ‘अपेक्षाभंग आणि भ्रमनिरास मुबलक असणाऱ्‍या या जगात 

थोडे तरी अद्‍भुत काही, जादूच्या रूपाने शिल्लक आहे. त्याला नख लावण्याची माझी बिलकूल इच्छा नाही!’ भारतातील एका बावनकशी रसरशीत कलेशी परिचित होण्यासाठी सजग वाचकांनी हे पुस्तक वाचणे गरजेचे वाटते.   

संबंधित बातम्या