स्वरसम्राज्ञीनीची स्वरसाधना

सतीश पाकणीकर
सोमवार, 15 नोव्हेंबर 2021

पुस्तक परिचय

भारताच्या संगीत रसिकांच्या चार पिढ्यांवर अधिराज्य गाजवणारा एक स्वर. वयाच्या तेराव्या वर्षापासून स्वर्गीय सुरांनी करोडो रसिकांचे कान लाडावून ठेवणारा एक मधाळ स्वर. त्या एका अद्वितीय स्वराची मालकी असलेली अद्वितीय कलावंत म्हणजे अर्थात भारतरत्न लता मंगेशकर. त्यांचा ९२वा जन्मदिन २८ सप्टेंबर २०२१ रोजी साजरा व्हावा आणि त्याच्या काही काळ आधी त्यांच्यावरील ‘स्वरसाधना’ हे पुस्तक माझ्या हातात पडावे हा केवळ योगायोग नसावा तर तो मला पोहोचलेला त्यांचा आशीर्वादच असावा.

‘गेट वे ऑफ इंडिया’ या चित्रपटात लतादीदींनी गायलेले एक गीत आहे... ‘सपने में सजन से दो बातें, एक याद रही, एक भूल गये!’ पण रसिकांची काय अवस्था असते? ते त्यांचे कुठलेही गाणे कधी विसरू शकतील का? तर नाही. ‘लता’ ऐकणे, वाचणे, त्यांना पाहणे, आपल्या मनात, डोळ्यांत व हृदयात त्यांना सामावून ठेवणे हा रसिकांचा आनंदोत्सवच राहिला आहे आणि राहणार आहे. या आनंदोत्सवाचे एक देखणे, सुंदर रूप म्हणजे ‘स्वरसाधना’ हा परचुरे प्रकाशनाचा अप्पा परचुरे आणि रेखा चवरे संपादित ग्रंथ. 

लता मंगेशकर यांच्या प्रदीर्घ कारकीर्दीतील त्यांना आलेल्या अनुभवाचे कथन, त्यात भेटलेल्या सह-प्रवाशांचे केलेले व्यक्तिचित्रण, स्वरानुभवाची अभिव्यक्ती, विविध मुलाखतींतून उलगडलेले त्यांचे अंतरंग हे त्यांच्याच शब्दांत एकाच ग्रंथात वाचायला मिळणे हा रसिकांसाठी आनंदठेवाच. ‘स्वरसाधना’ या ग्रंथात आपल्याला प्रामुख्याने दोन भाग वाचायला मिळतात. पहिला भाग आहे  लतादीदींच्या शब्द सौंदर्याचा व शब्द सामर्थ्याचा. तर दुसरा भाग आहे मान्यवर साहित्यिक व कलावंतांनी शब्दांकित केलेला लतादीदींच्या स्वर-सन्मानाचा!

अनेक लेखांतून लतादीदींनी आपले पूर्वायुष्य उलगडलेले आहे. त्यांनी अनुभवलेले प्रसंग, घटना, संदर्भ आपल्या समोर सांगताना त्यांची भाषा इतकी चित्रमय होते की आपल्याला तो प्रसंग आपणही त्यांच्या बरोबरीने अनुभवला आहे, असे वाटत राहावे. भूतकाळाचे अंतर मिटवून टाकणारी त्यांची शब्दकळा आपण अशी अनुभवतो की दीदींचा अनुभव आपला होऊन जातो. त्यांचा आनंद आपला आनंद होतो अन त्यांचे दुःख आपले! त्यांचे सच्चेपणाने भरलेले प्रांजळ कथन आपल्याला हेलावून सोडते. गाण्यांमध्ये जीव ओतून ते जिवंत करणे, ते जगणे, हे त्या करीत आल्या आहेतच. पण त्यांची सखोल अनुभूती हे लेख सहजसुंदर शब्दात आपल्यापर्यंत पोहोचवतात. गाणे हे ध्यास आणि श्वास असलेल्या एका प्रतिभावंताचे गाण्याबद्दलचे चिंतन आपल्याला अंतर्मुख करते. दीदी सहजपणाने लिहून जातात, “काही गाणी अशी असतात, तुमच्या भावना व मनाचा कब्जा घेणारी. आणि तीच खरी गाणी असतात.” “भावगीतांची हीच तर खासियत असते. एकाच वेळी भावगीत हे गीतकार, संगीतकार, गायक आणि रसिकाचंही असतं.”

हा सगळा प्रवास लतादीदींचा

एकटीचा असला तरी शब्दरूपाने हा सुंदर दुर्मीळ खजिना त्यांनी आपल्यासाठी खुला करून दिला आहे. त्यातून गाण्यापलीकडच्या कथा समजतात. सर्जनच्या उर्मीचा स्पर्श आपल्याला होतो व आपल्यात चैतन्य सळसळते. मातृभाषेतून बहरलेल्या या लिखाणातून अभिजात साहित्याचा ठेवा आपल्या मनात घर करतो. म्हणूनच मराठी भाषा, साहित्य व संस्कृती या तीनही अंगाने या लेखनाचे मोल अनन्य ठरते.

अनेक मोठ्या कलावंतांच्या मांदियाळीतून काही निवडक व्यक्तींनी दीदींबद्दल दुसऱ्या भागात लिहीले आहे. प्रा. राम शेवाळकर, संगीतकार यशवंत देव, संगीत संयोजक अनिल मोहिले, कविवर्य ग्रेस, कवयित्री प्रभा गणोरकर यांच्यासारख्या मातब्बरांनी दीदींच्या बहुआयामी व्यक्तीमत्वाचे विलोभनीय दर्शन घडवले आहे. त्याचप्रमाणे विविध वर्तमानपत्राच्या संपादकांनी वेळोवेळी दीदींबद्दल लिहिलेले संपादकीय लेखही आपल्याला वाचायला मिळतात. 

लता मंगेशकर हे नाव धारण केलेल्या एका दिव्य स्वराची महती, त्या स्वरांनी आपल्याला दिलेला स्वर्गीय आनंद, आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात निर्माण केलेले सुखाचे क्षण अधोरेखित करीत अभिमान व कृतज्ञतेच्या ओथंबलेल्या भावनांनी त्यांचा केलेला गुणगौरव वाचताना आपल्याला आपण या काळात जन्मलो व याची देही याची डोळा त्या स्वराची अनुभूती घेतली याचा आनंद झाल्यावाचून राहवत नाही.

एका कार्यक्रमात महानायक अमिताभ बच्चन यांनी लता मंगेशकर यांच्या विषयी बोलताना त्यांचे वर्णन केले होते!  “लताजी के सुर में, लताजी के गायन में, लताजी के आवाज में इतनी प्रबलता है, इतनी शुद्धी है की वो मनुष्य की आत्मा की तारों को झंकरित कर देती है। मेरा और एक अनुमान है की, संगीत के सुरों और परमात्मा के बीच एक बहुत ही अद्भुत और विचित्र बंधन है, और यदी कोई ऐसी डोर है, या कोई ऐसा तार है, जो मनुष्य की आत्मा को परमात्मा के साथ बांधता है, जोडता है तो उस डोर, उस तार का नाम है लता मंगेशकर।”  या अमृतमयी सुरांना वय, भाषा, जात, धर्म, पंथ, देश व प्रदेश यांची कोणतीही बंधने नाहीत, हे तर खरेच. पण आपल्या विविध परंपरांनी नटलेल्या देशातील समस्त रसिकांना एका सूत्रात बांधण्याचं अत्यंत मोलाचे काम दीदींच्या स्वरांनी सहजतेने केले हे या वर्णनावरून सहज लक्षात यावे.

लतादीदींच्या लेखणीच्या व वाणीच्या विचारधनाचे हे संचित ग्रंथाच्या रूपात पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवावे या उदात्त भावनेनी उचललेले हे शिवधनुष्य दोन्ही संपादकांनी यांनी उत्तमरीत्या पेलले आहे असे म्हणावेसे वाटते. 

स्वरसाधना

  • संपादन : अप्पा परचुरे, रेखा चवरे
  • प्रकाशन : परचुरे प्रकाशन मंदिर
  • किंमत : ₹   ३००
  • पाने : १७४

संबंधित बातम्या