शिक्षण आणि शिक्षण सुधारणा

सौरभ गायकवाड, वारणानगर
सोमवार, 22 नोव्हेंबर 2021

पुस्तक परिचय

‘महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती’तर्फे प्रसिद्ध करण्यात येणारे महाराजा सयाजीराव यांच्यासंदर्भातील पुढील तेरा खंड नुकतेच उपलब्ध झाले आहेत. नव्याने उपलब्ध झालेल्या खंडातील सतरावा खंड ‘शिक्षण आणि शिक्षण सुधारणा’ हा आहे. या खंडात एकूण तीन भाग आहेत. 

पुरोगामी महाराष्ट्राचा कणा असणारे आणि आजवर मुख्य प्रवाहापासून दुर्लक्षित राहिलेले राजे म्हणजे महाराजा सयाजीराव गायकवाड होय. या महाराष्ट्राच्या भूमिपुत्राचा इतिहास पुढे आणण्याचे काम बाबा भांड गेल्या दशकभरापासून करत आहेत. त्यांच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्र शासनाने ‘महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती’ ही स्वतंत्र समिती स्थापन केली. या समितीच्यावतीने २०१८मध्ये महाराजा सयाजीराव यांच्यासंदर्भात बारा खंड प्रकाशित केले होते, आता त्यापुढचे तेरा खंड नुकतेच उपलब्ध झाले आहेत. आजवर प्रकाशित झालेल्या या एकूण पंचवीस खंडांच्या महाप्रकल्पात बासष्ट संशोधनपर ग्रंथांचा समावेश आहे. नव्याने उपलब्ध झालेल्या खंडातील सतरावा खंड ‘शिक्षण आणि शिक्षण सुधारणा’ हा आहे. या खंडात एकूण तीन भाग आहेत. 

पहिला भाग हा विलास गिते यांनी मराठीत अनुवाद केलेला गो. स. सरदेसाई लिखित ‘सयाजीरावांच्या शिक्षणाचा अहवाल’ आहे. हा भाग म्हणजे ‘गोपाळराव’ ते ‘महाराजा सयाजीराव गायकवाड तिसरे’ या प्रवासाचा अवघ्या सहा वर्षांतील महाराजांच्या जडणघडणीचा वस्तुपाठ आहे. एका शेतकऱ्याचा मुलगा राजा होतो आणि अखंड अठावन्न वर्षे राजा होऊन अलौकिक कर्तृत्व गाजवतो, या देदीप्यमान इतिहासाचा अचूक वेध घेण्यासाठी हा अहवाल अभ्यासणे क्रमप्राप्त आहे. महाराजा सयाजीरावांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा ७ जून १८७५ रोजी झाला. वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत महाराजांनी कोणतेही औपचारिक शिक्षण घेतले नसल्याने मराठी अक्षरओळखीपासून महाराजांच्या शिक्षणाची सुरुवात झाली. महाराजांसाठी राजवाड्यापासून दूर स्वतंत्र शाळा बांधून १० डिसेंबर १८७५ रोजी प्राचार्यपदी मि.एफ.ए.एच. इलियट यांची नेमणूक केली गेली. शाळेमध्ये सर्वच बाबतीत महाराजा सयाजीराव व इतर विद्यार्थ्यांना समान वागणूक दिली जात असे. 

सन १८७६च्या सुरुवातीस मि. इलियट यांनी इंग्लिश शिकवायला सुरुवात केली. काही काळ महाराजांना शिकवल्यानंतर इलियट यांनी सर टी. माधवराव व गव्हर्नर जनरलचे एजंट यांच्याशी सल्लामसलत करून महाराजांसाठी पाच वर्षांचा एक अभ्यासक्रम तयार केला. त्यानुसार महाराजांचा १८७६पर्यंतचा कालखंड हा प्राथमिक शिक्षण घेण्यात गेला आणि पुढची चार वर्षे (१८७७ ते १८८०) माध्यमिक शाळेचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यात गेली. या कालखंडातील १८८१ हे साल प्रशासनाचे प्रशिक्षण देण्यामध्ये व्यतीत झाले. महाराजांसाठी आयोजित केलेली टी. माधवराव यांची सर्व भाषणे पुढे ‘मायनर हिंट्स’ या नावाने प्रकाशित केली. त्याचप्रमाणे इतर तज्ज्ञ मान्यवरांनी दिलेली ८४ भाषणे ‘लेक्चर्स ऑन ॲडमिनिस्ट्रेशन : नोट्स ऑफ लेक्चर्स डिलिव्हर्ड टू हिज हायनेस महाराजा गायकवाड’ या नावाने प्रकाशित केली. अशा प्रकारे सुमारे १५०हून अधिक व्याख्यानांद्वारे महाराजांची सर्वांगीण जडणघडण करण्यात आली.

सतराव्या खंडातील दुसरा भाग ‘An Account of the Education of Sayajirao Gaekwad’ हा गो. स. सरदेसाई यांचा इंग्रजीतील सयाजीरावांच्या शिक्षणाचा अहवाल आहे. ज्याचा मराठी अनुवाद वर उल्लेख केल्याप्रमाणे याच खंडातील पहिला भाग आहे. सरदेसाई यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने केलेला हा अहवाल प्रथम १९२३मध्ये प्रकाशित झाला. हा अहवाल आजही जबाबदार शिक्षणाचे महत्त्व आणि प्रशासनातील शिस्त म्हणून महत्त्वाचा आहे. 

‘शिक्षण आणि शिक्षण सुधारणा’ या खंडातील भाग तीन मंदा हिंगुराव यांचा ‘Women Empowerment in the Era of Maharaja Sayajirao Gaekwad’ हा ग्रंथ आहे. या ग्रंथात लेखिकेने महाराजांनी बडोदा संस्थानात स्त्रियांना शिक्षणात संधी देऊन नव्या युगाचे स्वागत करण्यासाठी कशाप्रकारे सक्षम केले होते, याचे वास्तवदर्शी कथन केले आहे. एकूण अकरा प्रकरणांत या ग्रंथाची मांडणी केली आहे. ग्रंथाच्या सुरुवातीला सयाजीरावांपूर्वीच्या बडोद्यातील स्थितीचे थोडक्यात वर्णन केले आहे. त्यानंतर बडोद्याची ‘ज्ञाननगरी’ म्हणून ओळख करताना शिक्षणविषयक संस्थांच्या स्थापनेसाठी महाराजांनी पारखी नजरेने  विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची देशविदेशातून केलेल्या निवडीबाबत माहिती दिली आहे. 

‘शेतकऱ्याचा मुलगा ते राजा : उत्तुंग प्रवास’ कसा घडला याची चर्चा पुढील प्रकरणामध्ये अत्यंत  ओघवत्या शैलीत केली आहे. महाराजांचा राज्याभिषेक, त्यांचे शैक्षणिक जीवन आणि त्यांचे खासगी जीवन कसे होते याची माहिती मिळते. विवाह पद्धती, विधवाविवाह, बहुपत्नीत्व, पडदा पद्धत, घटस्फोट, हिंदू स्त्रियांच्या मिळकतीविषयक अधिकाराचा कायदा इ.संबंधी महाराजांनी केलेल्या बहुमोल कार्याचा परिचयदेखील येथे होतो. महाराजा सयाजीरावांचे शैक्षणिक कार्य विषद करताना १८८१ ते १९३९ या ५८ वर्षांच्या कारकिर्दीत महाराजांनी प्रजेला साक्षर करण्याबरोबर ज्ञानार्थी कसे केले हे समजते. 

सक्तीच्या मोफत शिक्षणाचा उपक्रम समर्थनीय ठरल्यानंतर १९०६मध्ये सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. भारतात असा कायदा करणारे महाराजा सयाजीराव पहिले प्रशासक आहेत. महाराजांनी स्त्रीशिक्षणाचा स्वीकार करताना पाश्चात्यांचे अंधानुकरण न करता भारतीय जीवनशैलीच्या संदर्भात ते कौशल्याने परावर्तितदेखील केले.  

सन १८७५मध्ये महाराजांचे दत्तकविधान होऊन राजपदी निवड झाली, त्यावेळी संपूर्ण संस्थानात मुलींच्या फक्त दोन शाळा होत्या. १९३९मध्ये मात्र मुलींसाठी २८१ सरकारी शाळा होत्या व तेथे १,०९,१४४ मुली शिकत होत्या. यावरून महाराजांच्या कामाची भव्यता लक्षात येते. या ग्रंथातून महाराजांनी स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्थांची ओळख आणि ‘स्त्रीशिक्षण व स्त्रियांची उन्नती’ या संदर्भातील महाराणी चिमणाबाई दुसऱ्या यांचे मौलिक कार्यसुद्धा आपणास समजते. यामध्ये महाराणी चिमणाबाई लेडीज् क्लब, श्री. चिमणाबाई स्त्री उद्योगालय यासारख्या संस्थांनी स्त्रियांच्या सर्वांगीण प्रगतीत पायाभूत योगदान दिले. या ग्रंथाच्या शेवटच्या प्रकरणात ‘उर्जामय बडोदे’ संस्थान साररूपाने वाचकांसमोर ठेवले आहे. 

एकंदर या सतरा खंडातील समाविष्ट ग्रंथांद्वारे महाराजांचे शिक्षण तर स्पष्ट होते. त्याचबरोबर महाराजांनी स्त्रीशिक्षणासाठी केलेल्या कार्याची ओळख यातून होते.

संबंधित बातम्या