जगणं - त्याच्यासह, त्याच्याशिवाय...

शिल्पा दातार-जोशी
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

पुस्तक परिचय
 

भारतीय संस्कृतीमध्ये विविध क्षेत्रांत आपल्या बुद्धिमत्तेची छाप पाडणाऱ्या, कुशल, कर्तबगार मुलींचं पुढचं आयुष्य कसं जाणार हे आपली विवाहसंस्था ठरवते, त्या नाही; असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. 
त्याच्यासह तिचं अस्तित्व आणि त्याच्याशिवाय तिचं अस्तित्व... दोन परस्पर टोकाच्या बाबी. आयुष्यभर कधी गोड तर कधी कटू अनुभव देणारा साथीदार जेव्हा अचानक सोडून जातो, तेव्हा...? तिचं पुढचं आयुष्य कसं असतं?

भारतातल्या असामान्य कर्तबगार स्त्रियांच्या असामान्य कौटुंबिक आयुष्याचं विस्तृत चित्रण म्हणजे वसंत कन्नाबिरन यांचं ‘तो असताना, तो नसताना’ हे पुस्तक. या पुस्तकाचा मराठी भाषेत अनुवाद सुजाता देशमुख यांनी केला आहे. या पुस्तकाच्या उत्कृष्ट अनुवादासाठीचा २०१७ चा साहित्य अकादमी पुरस्कार सुजाता देशमुख यांना मिळाला आहे.

या पुस्तकात के. शारदामणी, नीरा देसाई, रामेश्‍वरी वर्मा, कॅथी श्रीधर, कोयली रॉय, इला भट, सुतपा चक्रवर्ती, शांता रामेश्‍वर राव, मीनाक्षी मुखर्जी, अब्बुरी छाया देवी, रुक्मिणी पार्थसारथी, जयलक्ष्मी नारायण या प्रसिद्ध कर्तबगार स्त्रियांशी लेखकाने साधलेला प्रदीर्घ संवाद आहे. या संवादातून आपल्याला त्यांचं चाकोरीबाहेरचं जगणं समजतं. बंडखोरी समजते. त्यांच्या मनाचे प्रसंगी कठोर आणि प्रसंगी हळवे कोपरे समजतात. खऱ्या अर्थानं सहजीवन म्हणजे काय, हेही समजतं. ‘तो असताना’ त्याच्या बरोबरीनं आणि ‘तो नसताना’ त्याच्याशिवाय केलेला आयुष्याचा प्रवास, स्वअस्तित्वाचा प्रवास जाणवतो. 

नवऱ्याच्या मृत्यूनं सहजीवनाचा शेवट झाल्यानंतर तिच्यावर झालेल्या भावनिक, बौद्धिक आघातांचाही विचार या पुस्तकात केला आहे. विवाहानंतर त्याच्याशिवाय तिचं अस्तित्व काहीच नसतं का? तो गेल्यावर तिच्या आयुष्यात निर्माण झालेल्या पोकळीला ती एक स्वतंत्र माणूस म्हणून कशी तोंड देते? नवऱ्याच्या मृत्यूचं सावट आणि प्रत्यक्ष मृत्यू या कालावधीत त्यांच्या मनात काय आंदोलनं होत होती? मृत्यू म्हणजे शेवट, आपला जोडीदार परत कधीही दिसणार नाही, बोलणार नाही, भांडणार नाही आणि आधारही देणार नाही, या विचारांवर त्यांनी मात कशी केली? भीती कशी घालवली? विधवा हा शिक्का रूढिप्रिय समाजात किती भयावह असतो, पण या शिक्क्याला आपणच दूर सारायचं नसतं का, असा विचार करून आपापल्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कलेच्या क्षेत्रात आनंदानं आपलं असामान्य कर्तृत्व दाखवणाऱ्या या स्त्रिया खऱ्या अर्थानं रोल मॉडेल वाटतात. एकाच वेळी मुलं, नवरा, कुटुंबीय व आपल्या घरट्याकडं घारीप्रमाणं लक्ष ठेवून असणाऱ्या या स्त्रिया कामानिमित्तानं घरटं सोडल्यावर आपल्या कार्यक्षेत्रातली कर्तबगारी उत्तम वठवतात. ही दोन रूपं कुठून येत असतील एका स्त्रीमध्ये? 

प्रस्तावनेत वसंत कन्नाबिरन म्हणतात, ‘लग्नसंस्था आणि तिचा स्त्रियांच्या व्यक्तिमत्त्वाला, बुद्धीला कुंठीत करणारा, विकृत परिणाम घडवणारा पगडा यांची स्त्रीवादी म्हणून टीकात्मक मीमांसा करणं हे स्वातंत्र्याच्या दिशेनं पहिलं पाऊल होतं. या अनुषंगानंच विवाहित महिलांसाठी ‘बोनसाय’ हे रूपक चपखलपणे वापरलं जातं.’ 

अनेक मैत्रिणींना पुढचं शिक्षण घ्यायचं होतं, वेगळ्या क्षेत्रात काम करायचं होतं, लहान वयात लग्नबंधनात अडकायचं नव्हतं, त्यांच्या जोडीदाराबद्दलच्या कल्पना वेगळ्या होत्या, त्यांना त्यांच्या इच्छेनुसार माणूस म्हणून जगायचं होतं; पण त्यांना कुटुंबाच्या विरोधात जाऊन तसं जगता आलं? या पुस्तकातील अनेक जणींची लग्नं तर त्यांच्या इच्छेविरुद्ध झाली. पूर्णपणे विसंगत व्यक्तिमत्त्व असलेल्या पुरुषाशी. त्यानंतरचा त्यांचा तडजोडींचा प्रवास... काहींचा तडजोडी झुगारून सूर जुळलेल्या व्यक्तीशी नव्यानं सुरू झालेला सहप्रवास... जोडीदाराच्या मृत्यूनंतर या प्रवासात पडलेला कायमचा खंड... असे अनेक प्रश्‍न विचारत या प्रसिद्ध, चाकोरी सोडून जगणाऱ्या स्त्रियांना बोलतं करायचं लेखकानं ठरवलं. वेळ मिळेल तसा, वेळ मिळेल तिथं... संवाद होत राहिला. संवादादरम्यान कॅथीचं वाक्य आठवलं, ‘त्याच्या जाण्यानं तुमच्यातला एक अंश मरून जातो.’ तर इलाचं वाक्य, ‘कोणतीच गोष्ट नंतर करण्यावर टाकू नका, नंतर असं काही नसतंच.’

पुरोगामी, सुशिक्षित घरातून आलेल्या रामेश्‍वरी वर्मा आपल्याशी विसंगत असलेल्या मुलाशी लग्न झाल्यावर कालांतरानं ते बंधन झुगारून देऊन आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर विवाह करतात आणि त्यांचं आयुष्य संगीत-नाट्य-काव्य-राजकारण या आवडीच्या क्षेत्रांनी भरून जातं. त्याला खो बसते ती त्याच्या जाण्यानं. 

जन्मानं ज्यू असलेल्या कॅथी दक्षिण भारतीय ब्राह्मण घरातल्या श्रीधरच्या प्रेमात पडतात. सहाच महिने संसार झाल्यानंतर असाध्य आजारातून आपला जोडीदार वाचणार नाही, हे समजल्यावर प्रसंगाला खंबीरपणे तोंड देणाऱ्या कॅथी श्रीधर आपल्याला भेटतात. सत्य स्वीकारून त्याच्यासह जेवढे दिवस उरले आहेत, ते शेवटच्या क्षणापर्यंत आनंदानं घालवण्याचा त्यांचा आटापिटा दिसतो. श्रीधरच्या जाण्यानंतर वंचितांना न्याय मिळवून देण्याच्या कार्यात स्वतःला झोकून देतात. शांता रामेश्‍वर यांची प्रेमकहाणी एखाद्या परीकथेप्रमाणं. घरच्यांनी आयुष्याची गाठ बांधलेल्या हिंसक नवऱ्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी त्या रामेश्‍वर यांना पत्र लिहितात व कालांतरानं त्यांच्याशी विवाहबंधनात अडकतात. संगीत-नाटक-ग्रंथालय-देशपरदेशातल्या संस्कृती समजून घेत मनमुराद जगतात, रामेश्‍वरच्या जाण्यानंतर आपल्याच ऐसपैस घरातल्या शाळेत शिक्षकी पेशाला वाहून घेतात. उच्चशिक्षित असलेल्या, श्रीमंत घरातल्या रुक्मिणी आपल्या इच्छा, सामाजिक कामाची आवड या गोष्टी घरच्यांच्या गरजेचा विचार करून मनातच ठेवतात; पण त्याची त्यांना खंत वाटत नाही. बहुधा बंडखोर स्त्रियांच्या या मांदियाळीत म्हणूनच त्या वेगळ्या ठरत असाव्यात. 

शारदामणी, इला भट, नीरा देसाई या साधी राहणी व उच्च विचारसरणी तंतोतंत जगणाऱ्या स्त्रिया. सामाजिक, राजकीय कामाची कौटुंबिक पार्श्‍वभूमी असणाऱ्या या तिघीजणी आपल्या आवडत्या क्षेत्रात झोकून देऊन काम करू शकतात. सुतपा, रुक्मिणी, कोयली यांना ‘त्याच्या’शिवाय रिकामं घर खायला उठतं. पण तरीही ‘आशावादा’नं त्या वेगळ्या ठरतात. या सर्वजणी स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेल्या असल्यानं त्यांच्या खंबीरपणाची कल्पना येते. जोडीदार गमावलेल्या बाईची एकाकी कहाणी या पुस्तकात वाचायला मिळत असली, तरी त्यांचा धीरोदात्त स्वभावही खूप काही शिकवून जातो.

सुजाता देशमुख यांनी हे पुस्तक अतिशय ओघवत्या भाषेत लिहिलं आहे. पुस्तकाचं स्वरूप संवादात्मक असलं, तरी यातली प्रत्येक स्त्री आपल्याला जवळच्या मैत्रिणीसारखी अनौपचारिक गप्पांमधून भेटते. प्रत्येक स्त्रीनं व पुरुषानंही वाचावंच असं पुस्तक. पुरुषानं यासाठी की ‘स्त्रियांचं जगणं नेमकं काय असतं’ हे त्यांना यातून समजेल.

संबंधित बातम्या