गीतमय जीवनाची वाचनीय सफर 

श्रीकांत कुलकर्णी
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

पुस्तक परिचय
 

हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्ण काळ म्हणजे १९५० ते १९७० ही दोन दशके, असे मानले जाते. या काळात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचा ‘गाणी’ हा आत्मा होता. त्या काळातील चित्रपटांतील गाण्यांनी रसिक प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते. चित्रपटाच्या कथेला अनुरूप ठरलेली अनेक गाणी अतिशय अर्थपूर्ण असायची आणि त्या गाण्यांना श्रवणीय चाल देऊन अनेक संगीतकारांनी त्या गीतांना अजरामर केले होते. त्या काळातील संगीतकार आणि गायक-गायिका जसे प्रतिभावान होते, तसेच गीतकारदेखील प्रतिभावान होते. गीतकार शैलेंद्र हे त्यापैकीच एक होत. आजही त्यांची शेकडो लोकप्रिय गाणी असंख्य रसिकांच्या ओठांवरती रेंगाळतात आणि ते या गाण्यांचा आनंद लुटतात. अशा या प्रतिभासंपन्न कवी शैलेंद्र यांचा गीतमय जीवन प्रवास प्रसिद्ध लेखक विजय पाडळकर यांनी ‘सुहाना सफर और...’ या ग्रंथात शब्दबद्ध केला आहे. शैलेंद्र प्रेमी रसिकांच्या दृष्टीने तो एक सुहाना दस्तऐवजच ठरला आहे. 

चित्रपट अभ्यासक असलेले विजय पाडळकर हे चांगले ललित लेखकही आहेत. कवी शैलेंद्र यांच्या प्रत्येक गाजलेल्या गीतावर लालित्यपूर्ण भाष्य करताना त्यांनी त्या गीताचा, संगीताचा आणि चित्रपटाचा माहितीपूर्ण आढावा घेतला आहे. तसेच शैलेंद्र यांच्या अनेक पैलूंवर त्यांनी प्रकाश टाकला आहे. त्यामुळे शैलेंद्र यांचा हा गीतमय जीवनप्रवास वाचनीय झाला आहे. 

कवी शैलेंद्र यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळातला. अतिशय सामान्य कुळातील कुटुंबात जन्मलेले शैलेंद्र हे लहानपणापासूनच कविमनाचे होते. तसेच लय-सूर-ताल यांची त्यांना जन्मजात देणगी होती. लहानपणापासूनच ते डफली छान वाजवायचे आणि त्या डफलीच्या तालावरच त्यांना अनेक समर्पक शब्दरचना सुचायच्या. त्यातूनच ते कविता करायला लागले. पुढे शिकत असताना त्यांच्यावर मार्क्सवादाचा प्रभाव पडला. अतिशय संवेदनशील असलेले शैलेंद्र यांना सामाजिक अन्याय सहन होत नसे, त्याचे प्रतिबिंब त्यांच्या अनेक कवितांमधून दिसू लागले. आपल्या कविता लोकांना ऐकवणे त्यांना अतिशय आवडायचे, त्यामुळे कविसंमेलनात त्यांचा सहभाग दिसू लागला. महात्मा गांधी यांच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेताना त्यांनी तुरुंगवासही भोगला. मात्र, नंतर घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना सामान्य नोकरी करावी लागली. नोकरीनिमित्त ते मुंबईत आले आणि एका कविसंमेलनात निर्माता-दिग्दर्शक राज कपूर आणि त्यांची ओळख झाली. शैलेंद्र यांची काव्यप्रतिभा पाहून राज कपूर यांनी त्यांना त्यांच्या चित्रपटासाठी गीतलेखन करण्याची ऑफर दिली. मात्र, केवळ पैशासाठी चित्रपटासाठी गीतलेखन करणे मनस्वी कवी असलेल्या शैलेंद्र यांना पटले नाही. त्यामुळे राज कपूर यांना त्यांनी सुरुवातीलाच स्पष्ट शब्दांत नकार दिला. परंतु, विवाहानंतर संसारी झालेल्या शैलेंद्र यांना खूप आर्थिक ओढाताण सहन करावी लागली, त्यामुळे नंतर त्यांनी राज कपूर यांची ऑफर स्वीकारली. तेथून शैलेंद्र यांच्या गीतांची चित्रपटसृष्टीवर जी ‘बरसात’ झाली त्यामध्ये असंख्य रसिक भिजून चिंब झाले. शैलेंद्र यांच्या समग्र जीवनाचा आढावा घेताना, केवळ आर्थिक परिस्थितीमुळे कवी शैलेंद्र गीतकार शैलेंद्र झाले आणि त्यांच्या आयुष्याला वेगळे वळण मिळाले आणि त्या ‘इष्टापत्ती’मुळे दुसऱ्या अर्थाने हिंदी चित्रपटसंगीतालाही चांगले वळण मिळाले, हे लेखकाने केलेले भाष्य मनोमन पटते. 

राज कपूर यांचे आवडते गीतकार होते शैलेंद्र, तर आवडते संगीतकार होते शंकर-जयकिशन. या ‘त्रयी’ने एक इतिहास निर्माण केल्यामुळे राज कपूर यांचे सर्वच चित्रपट एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्यात त्यांना यश मिळाले. सुरुवातीच्या ‘बरसात’पासून ‘मेरा नाम जोकर’पर्यंत राज कपूर यांच्या सर्वच चित्रपटांचे गीतलेखन शैलेंद्र यांनी केले. त्यातील गाजलेल्या अनेक अर्थपूर्ण गाण्यांचे पाडळकर यांनी या पुस्तकात सुंदर विवेचन केले आहे. शैलेंद्र यांनी राज कपूरखेरीज बिमल रॉय (मधुमती, परख इ.), हृषीकेश मुखर्जी (अनुराधा, अनाडी इ.), विजय आनंद (गाइड) या अन्य दिग्दर्शकांच्या चित्रपटांसाठीही गीत लेखन केले. (‘गाइड’साठी तर विजय आनंद यांना शेलेंद्रच हवे होते.) या चित्रपटातील गाजलेल्या सर्व गाण्यांचा तपशीलवार आढावाही या पुस्तकात घेण्यात आला आहे. त्यातून शैलेंद्र यांच्या गीतलेखनातील खुमारी अधिक स्पष्ट होते. 

‘तीसरी कसम’ हा शैलेंद्र यांची निर्मिती असलेला एकमेव चित्रपट. मात्र, त्याच्या निर्मितीपासून शैलेंद्र यांच्या आयुष्याला जी उतरती कळा लागली ती कायमचीच. त्यातून त्यांची सुटका केली ती मृत्यूनेच. एका अर्थाने ‘तीसरी कसम’ हा चित्रपट शैलेंद्र यांची शोकांतिकाच ठरला. त्यासंदर्भात पडद्यावरील आणि पडद्याबाहेरील घटनांचेही विश्‍लेषण या पुस्तकात करण्यात आले आहे. त्यातून ‘तीसरी कसम’ची काव्यात्मकता आणि शोकात्मता शैलेंद्र यांच्याच वाट्याला कशी आली हे अधोरेखित होते. 

याशिवाय गीतकार शैलेंद्र यांनी ‘बरसात’ (१९४९) पासून ‘ममता की छाव मे’ (१९८९) पर्यंत लिहिलेल्या असंख्य चित्रपटातील गीतांची (संगीतकार आणि गायक-गायिकांच्या नावासह) देण्यात आलेली सूची हीदेखील या पुस्तकाचे एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

संबंधित बातम्या