पौष्टिक ‘खाऊचा डबा’

सुजाता नेरुरकर
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

पुस्तक परिचय
 

‘खाऊचा डबा’ हे  विष्णू मनोहर यांचे पाककृतीचे पुस्तक मे २०१८ मध्ये प्रकाशित झाले आहे. विष्णू मनोहर याचे अनेक टीव्ही शो, तसेच विविध पाककृतींच्या परिषदेत त्यांनी आत्तापर्यंत सहभाग घेतला आहे. अनेक वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखन केले आहे. मला त्यांच्याविषयी एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, ती म्हणजे त्यांनी लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये विक्रम नोंदवला आहे. नागपूरमध्ये त्यांनी सलग ५३ तास जवळपास १००० वेगवेगळे पदार्थ बनवून विक्रम नोंदवला आहे. त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन करते. विष्णू मनोहर यांनी आता परत पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यापैकी ‘खाऊचा डब्बा’ हे पाककृती पुस्तक एक प्रसिद्ध पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये त्यांनी दोन भाग केले आहेत ते म्हणजे छोट्या सुटीचा डबा व दुसरा भाग म्हणजे मोठ्या सुटीचा डबा.

यामधील पदार्थ हे लहान मुलांच्या डब्याबरोबर मोठ्या माणसांच्या डब्यासाठीसुद्धा उपयुक्त आहेत.

विष्णू मनोहर यांनी पुस्तकामधील मनोगतामध्ये त्यांच्या लहानपणीची आठवण लिहिली आहे, तसेच लहान मुलांचा स्वभाव कसा असतो ते पण थोडक्‍यात सांगितले आहे. आजकाल आपली जीवनशैली बदललेली आहे. थोडक्‍यात आता पिझ्झा, बर्गर, नूडल्स असे फास्टफूड मुलांना जास्त आवडते. ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हानिकारकसुद्धा आहेत. असेच जर झटपट बनणारे पदार्थ तयार करताना त्या पदार्थांना पौष्टिक घटक पदार्थ घालून तयार केले, तर मुलेसुद्धा आवडीने खातील. हाच प्रश्न नेहमी आई वर्गाला सतत सतावणारा आहे त्याचा विचार करून विष्णू मनोहर यांनी छान-छान पदार्थाच्या पाककृती दिल्या आहेत. प्रत्येक पदार्थामध्ये त्या त्या पदार्थाचे पोषण मूल्य हा घटक विचारात घेतलेला आहे. पुस्तकाच्या ‘छोटी सुटी’ या भागामध्ये जवळपास ३० पाककृती आहेत त्यामध्ये चिवडा, पकोडे, ढोकळा, रोल्स, इडली, कटलेट असे नानाविध प्रकार आहेत. असे पदार्थ बनवताना विविध डाळी, मक्‍याचे दाणे, टोफू, पनीर, ड्रायफ्रूट, ढोकळा पीठ, पालक, चपाती, भाज्या वापरून पदार्थ
दिले आहेत, जेणे करून छोट्या सुट्टीमध्ये मुले त्यांचा डब्बा लवकर संपवून खेळू शकतील.

‘मोठी सुटी’ या भागात जवळपास ७० पाककृती आहेत. या पाककृती लहान मुले व मोठ्यांच्या डब्यासाठीसुद्धा उत्तम पर्याय आहेत. यामध्ये वडा, ठेपला, विविध प्रकारचे उत्तपम, डोसे, पिझ्झा, पराठे, कटलेट  असे पदार्थ दिले आहेत. आपण हे पदार्थ डब्यासाठी किंवा इतर वेळी नाश्‍त्याला किंवा जेवणात साइड डिश म्हणूनसुद्धा तयार करू शकतो. मला यामध्ये विविध प्रकारचे उत्तपम खूप आवडले, कारण यामध्ये मोड आलेले मूग, ओट्‌स, मश्रूम, पालक, कांदा,चीज, चाट मसाला वापरून वेगवेगळे पौष्टिक उत्तपम बनवण्याची पद्धत दिली आहे. तसेच व्हेजी टोफू रोल, चीज लॉलीपॉप, नवरत्न पराठा व पनीर खिमा पफ मला हे खूप वेगळे पदार्थ वाटले.

विष्णू मनोहर यांचे ‘खाऊचा डबा’ पुस्तकाची मांडणी खूप छान आहे. मुखपृष्ठ छान आहे. पाककृतीच्या पुस्तकात प्रत्येक पानावर लहान मुलांचे कार्टून छान दिसते. फक्त एकच जरा कमी वाटते ते म्हणजे पाककृतीबरोबर काही पदार्थांचे फोटो हवे होते. कारण विष्णू मनोहर यांच्या पाककृतीची सजावट खूप आकर्षक असते. एकंदरीत पाककृती पुस्तक मला खूप आवडले व प्रत्येक गृहिणीच्या संग्रही हे पुस्तक असावे असे वाटते.

संबंधित बातम्या