चित्रपट संगीतावरील रसपूर्ण लेखन

सुनील देशपांडे
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

पुस्तक परिचय
 

हिंदी चित्रपटांचा सुवर्णकाळ आणि अर्थातच त्या काळातलं संगीत हा असंख्यांच्या दृष्टीनं आवडीचा, जिव्हाळ्याचा विषय आहे. आजही ‘चित्रपट संगीत’ या शब्दांच्या उच्चारानिशी बहुसंख्यांच्या मनात ‘त्या’ विशिष्ट कालखंडातली गाणी रुंजी घालू लागतात. त्या कालखंडाच्या आधीच्या वा नंतरच्याही काळात संगीत हे चित्रपटांचं अविभाज्य अंग राहिलं असलं, तरी एकूण जनमानस १९५० ते १९७० या कालखंडातल्या हिंदी गाण्यांवर लुब्ध असते, यात शंका नाही. 

अशा कालखंडातल्या संगीतावर आजवर उदंड स्वरूपात लेखन झालेलं आहे. कधी फुटकळ लेखांच्या, कधी सदरांच्या तर कधी पुस्तकांच्या माध्यमातून. गेल्या काही वर्षांत समाजमाध्यमानं सर्वांनाच व्यक्त होण्याची पुरेपूर मोकळीक दिल्यानं साहजिकच चित्रपट संगीतावरही विपुल लेखन होऊ लागलं आहे. अर्थात या साऱ्या पसाऱ्यात तात्कालिक स्वरूपाचं लेखन किती आणि अभ्यासपूर्ण व पुरेशा गांभीर्यानं केलेलं लेखन किती, याची चिकित्सा करायला गेल्यास काही अपवाद वगळता निराशाच पदरी येते. या पार्श्‍वभूमीवर ‘रहें ना रहें हम’ हे मृदुला दाढे-जोशी यांचं पुस्तक म्हणजे संगीत रसिकांसाठी ताज्या हवेची शीतल झुळूकच म्हणावी लागेल. चित्रपट संगीतासारख्या सर्वपरिचित विषयावर आस्वादक समीक्षेच्या शैलीत किती अभ्यासपूर्ण, तरीही रसीलं लेखन होऊ शकतं, याचा जणू वस्तुपाठच या पुस्तकानं घालून दिला आहे.

‘चित्रपटसृष्टीला सुवर्णकाळ बहाल करणाऱ्या संगीतकारांची वैशिष्ट्यं आणि त्यांच्या अजरामर गाण्यांतील सौंदर्यस्थळं’ उलगडून दाखवण्याच्या हेतूनं मृदुला दाढे-जोशी यांनी हा लेखनप्रपंच मांडला आहे. लेखिकेनं चित्रपट संगीताशी संबंधित विषयात डॉक्टरेट मिळवली आहे. शास्त्रीय संगीताच्या शिक्षणाबरोबरच उर्दू उच्चार व गझल गायकीचं शिक्षणही त्यांनी घेतलेलं आहे. साहजिकच चित्रपट संगीतावर आस्वादक पद्धतीनं लेखन करताना त्यांना या अभ्यासाचा फायदा झाल्याचं पानोपानी जाणवतं. किंबहुना, चित्रपट संगीतावरचा प्रबंध पूर्ण केल्यानंतरच आपल्याला या विषयावर आस्वादक लेखन करण्याची प्रेरणा मिळाल्याचं लेखिकेनं म्हटलं आहे.

या स्वरयात्रेत लेखिकेनं हिंदी चित्रपट संगीतातल्या बारा मान्यवर संगीतकारांच्या कारकिर्दीचा विस्तृत आढावा घेतला आहे. सी. रामचंद्र, सलील चौधरी, शंकर जयकिशन, मदनमोहन, रोशन, सचिन देव बर्मन, वसंत देसाई, ओ. पी. नय्यर, हेमंत कुमार, जयदेव, खय्याम आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल हे ते बारा संगीतकार होत. यांपैकी प्यारेलाल हे एकच संगीतकार आता आपल्यात आहेत. अर्थात त्यांची कारकीर्द संपुष्टात येऊन बराच मोठा काळ लोटलेला आहे. वरवर पाहता हे सर्व संगीतकार एकाच कालखंडातले असले, तरी त्यातल्या प्रत्येकाची प्रकृती आणि संगीतशैली भिन्न भिन्न आहे. त्यामुळंच या संगीतकारांच्या कारकिर्दीवर कटाक्ष टाकताना लेखिकेनं त्यांची वैशिष्ट्यं उलगडून दाखवण्यावर भर दिला आहे.

‘अज्ञ आणि तज्ज्ञ या दोघांनाही रमवणारा अवलिया संगीतकार’ असं सी. रामचंद्र यांचं सार्थ वर्णन करून लेखिकेनं म्हटलं, ‘प्रचंड विरोधाभास वाटावा अशी कॉँबिनेशन्स घेऊन जो जन्माला येतो त्याला ‘अवलिया जादूगार’च म्हणावं लागेल. एखाद्या मस्तीखोर मुलाला दरडावून गंभीर व्हायला सांगितल्यावर त्यानं तेवढ्याच गंभीरपणे चक्क विश्‍वाच्या निर्मितीचं रहस्य उलगडणारा वगैरे सिद्धांत मांडावा, अगदी तसंच ‘आना मेरी जान मेरी जान’ किंवा ‘हम तो जानी प्यार करेगा’चा दंगा करून झाल्यावर ‘तुम क्या जानो तुम्हारी याद में हम कितना रोए’ किंवा ‘कटते हैं दुख में ये दिन’, ‘महफिल में जल उठी शमा’, ‘ये जिंदगी उसी की है’ यासारखी अप्रतिम पॅथॉसची गाणीही तेवढ्याच ताकदीनं काळाच्या विशाल पडद्यावर कोरली...’ सी. रामचंद्र यांच्या या व अशा काही वैशिष्ट्यांचा धांडोळा या लेखात घेतला आहे. 

बंडखोर संगीतकार असं ज्यांचं वर्णन केलं जातं त्या सलील चौधरींविषयी लेखिका म्हणते, ‘स्वरांची मोडतोड किंवा तालाशी धडपड म्हणजे ‘बंडखोरी’ नव्हे. तसंच उगीचच पट्ट्या बदलणं म्हणजेही बंडखोरी नव्हे. सलीलदांचं वेगळेपण नेमकं कशात आहे, हे या ठिकाणी अतिशय हळुवारपणे उलगडून दाखवलं आहे. सलीलदा कधीच कुठल्या साच्यात अडकून पडले नाहीत, हे लेखिकेचं निरीक्षण पटण्याजोगंच आहे.

ज्यांना लोकप्रियतेचा मानदंड म्हणता येईल अशा शंकर-जयकिशन या जोडीच्या संगीतावर तर किती बोलू आणि किती नाही, अशी अनेकांची अवस्था होत असते. हे आव्हान अनेकांना पेलता येत नाही. या सदाबहार जोडीच्या कारकिर्दीचा तेवढाच रसाळ वेध त्यांच्यावरच्या लेखात घेतला आहे. या जोडीच्या कारकिर्दीत मोलाचा सहभाग असलेल्या शैलेंद्र आणि हसरत जयपुरी या गीतकारांच्या रचनांबरोबरच या संगीतकारद्वयीनं नितांत प्रेम केलेल्या भैरवी व अन्य रागांवर आधारित गीतांचा आस्वाद घेतल्यानं हा लेख वाचनीय झाला आहे.

मदनमोहन हा तर चित्रपटप्रेमींचा अत्यंत आवडता संगीतकार. शास्त्रीय संगीतावर, गझल प्रकारावर हुकमत असलेल्या या प्रतिभावान माणसाला लौकिक यशानं कायम हुलकावणी दिली. त्यांच्यावर बसलेला ‘गझल किंग’ हा शिक्का काही प्रमाणात अन्यायकारक होता. खरं तर अन्य गीतप्रकारही त्यांनी तेवढ्याच समर्थपणे हाताळलेत, हे लेखिकेनं सोदाहरण पटवून दिलं आहे. ते करताना या संगीतकाराच्या विविध शैलीतल्या गाण्यांचं रसग्रहण इथं समर्थपणे केलं गेलंय.

मदनमोहनप्रमाणेच रोशन हेही लौकिकार्थानं अपयशी संगीतकार ठरले. त्यांच्या चालींमधला मधाळ गोडवा आरंभापासून अखेरच्या चित्रपटापर्यंत होता. शास्त्रीय संगीतातल्या वेगवेगळ्या रागांचा त्यांनी किती कल्पकतेनं वापर केला, हे इथं वाचायला मिळतं. 

सचिन देव बर्मन यांची वेगळी ओळख करून देण्याची खरं तर गरजच पडू नये, एवढं रसिकांनी त्यांच्या गाण्यांना आपलंसं केलं. त्यांच्या गुणवैशिष्ट्यांचा लेखिकेनं घेतलेला धांडोळा पुनःप्रत्ययाचा आनंद देऊन जातो. काही वेळा स्वतःच्या किंवा दुसऱ्या संगीतकाराच्या विशिष्ट स्वरावली (फ्रेजेस) पुन्हा दुसऱ्या एका गाण्यात कळत-नकळत डोकावताना दिसतात. यात ‘चौर्या’चा भाग नसतो, तर एकच स्वरावली दोन प्रतिभावंतांना तेवढीच मोहात पाडू शकते, हा महत्त्वाचा मुद्दा लेखिकेनं बर्मनदा व शंकर-जयकिशन यांच्या गाण्यांतलं साम्य अधोरेखित करताना मांडला आहे. 

तत्त्वांसाठी तडजोड न करण्याच्या स्वभावाची किंमत ज्यांना चुकवावी लागली, अशा जयदेव आणि खय्याम या दोन संगीतकारांवर लेखिकेनं भरभरून लिहिलं आहे. 

याबरोबरच ओ. पी. नय्यर, हेमंत कुमार आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल या संगीतकारांवरचे लेखही वाचनीय झाले आहेत.

या पुस्तकाचं सर्वाधिक भावणारं वैशिष्ट्य हे, की लेखिका स्वतः शास्त्रीय आणि सुगम संगीताची अभ्यासक असूनही या लेखनात कुठंही ‘पांडित्यप्रदर्शना’चा सोस दिसत नाही. उलट जे आपल्याला भावलं ते इतरांबरोबर वाटून घेण्याची असोशी या लेखनात जाणवत राहते. संपूर्ण विवेचनाला असलेला एक विनयशीलतेचा स्पर्श वाचकाला आपलंसं करत जातो, यासाठी लेखिकेचं अभिनंदन करायला हवं. प्रत्येक लेखामध्ये अंतर्भूत असलेल्या गीतांचे तपशील त्या त्या लेखाच्या शेवटी दिल्यानं (आणि हे तपशील अचूक असल्यानं!) पुस्तकाची संग्राह्यता वाढली आहे. संगीताचं रसग्रहण करताना काही पारिभाषिक शब्द वाचकांना बुचकळ्यात पाडू शकतात, हे ध्यानात घेऊन पुस्तकाच्या अखेरीस काही संगीतविषयक तांत्रिक संकल्पना व संज्ञांचे अर्थ नमूद करण्याची कल्पकताही दाद देण्याजोगी. पुस्तकाची मांडणी, सुंदर छपाई, मोजकीच वेधक छायाचित्रं या गुणवैशिष्ट्यांनी हे पुस्तक संग्राह्य झालं आहे. ज्यांचा या स्वरयात्रेत समावेश होऊ शकला नाही अशा अन्य काही महत्त्वाच्या संगीतकारांवर पुढल्या भागात लेखन व्हावं, अशी अपेक्षा नक्कीच जागी होते. जुन्या चित्रपट संगीतावर प्रेम करणाऱ्या रसिकांनी आवर्जून वाचावं, अशा गुणवत्तेचं हे पुस्तक आहे. 

संबंधित बातम्या