डाव्या चळवळींचा दस्तऐवज 

सुरेंद्र पाटसकर
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

पुस्तक परिचय
 

भारतात डाव्या चळवळीची सुरुवात झाली ती १९२० मध्ये. परंतु, या चळवळीचा संसदीय पातळीवर प्रथम प्रभाव पडला तो १९५७ मधील निवडणुकीत. केरळ राज्यात तिला यश मिळाले. तेव्हापासून भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा हळूहळू देशभर पसरत गेला. टक्केवारी कमी असली तरी विरोधी पक्ष म्हणून सतत चर्चेत राहिला. डाव्या विचारसरणीशी सुसंगत अशा अनेक छोट्याछोट्या पक्षांचा, संघटनांचा उदय राजकारणात आणि सामाजिक क्षेत्रात झाला. डाव्या पक्षांच्या गर्दीत असंसदीय राजकारण करणारा एक डावा प्रवाह आहे. त्याला म्हणतात माओवादी किंवा नक्षलवादी. या सर्व डाव्या विचारधारेवर, त्यांच्या कार्यावर साक्षेपीपणे प्रफुल्ल बिडवई यांनी आपल्या ‘द फिनिक्‍स मोमेंट - द चॅलेंजेस फेसिंग द इंडियन लेफ्ट’ या पुस्तकात प्रकाश टाकला आहे. त्याच पुस्तकाचा तितकाच चांगला मराठी अनुवाद मिलिंद चंपानेरकर यांनी ‘भारतातील डाव्या चळवळींचा मागोवा - इतिहास, आव्हानं आणि नवसंजीवनीच्या शक्‍यता’ या पुस्तकाद्वारे केला आहे. 

या पुस्तकात भारतातील गेल्या १०० वर्षांतील डाव्या चळवळींचा आढावा घेण्यात आला आहे. हे पुस्तक त्याविषयी केवळ समग्र माहिती देणारे नाही, तर त्याबद्दलचे वाचकांना सर्वांगीण आकलन व्हावे, यादृष्टीने लिहिलेले आहे. 

या पुस्तकात प्रफुल्ल बिडवई यांनी केवळ डाव्या संसदीय पक्षांचा निवडणुकीतील (लोकसभा, विधानसभा) कामगिरीचा आढावा घेतलेला नाही; तर त्या त्या वेळी विविध पुरोगामी जनसंघटनांच्या चळवळींनी केलेली कामगिरी, अशा निवडणुकींमध्ये कोणते मुद्दे महत्त्वाचे होते, विविध राजकीय शक्तींचे आणि समाजातील घटकांचे संघटन कसे केले गेले (डावे, मध्यममार्गी आणि प्रस्थापित उजवे पक्ष), तेव्हा आंतरराष्ट्रीय परिस्थिती कशी होती, कोणत्या आंतरराष्ट्रीय, साम्राज्यवादी शक्ती सशक्त होत्या वा देशातील कोणते वर्ग जोरावर होते याचे तपशील दिलेले आहेत आणि त्यामुळेच देशातील वेळोवेळीच्या राजकारणाचे खरे स्वरूप समजून घेण्यास मदत होते. तत्कालीन परिस्थितीचा संदर्भ स्पष्ट होऊन चळवळीच्या वाटचालीचे, चढ-उताराचे केवळ समग्र नाही, तर सर्वांगीण आकलन होते. 

आयआयटी मुंबईतील प्रफुल्ल बिडवई एक अतिशय बुद्धिमान तरुण. ते डाव्या चळवळीकडे आकर्षित झाले आणि त्याच वेळी आपले शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी दिल्ली गाठली आणि आपल्या मृत्यूपर्यंत पत्रकारिता केली. आपली मूल्ये त्यांनी कधीच सोडली नाहीत. निर्भीड, परखड आणि स्पष्टपणे लिहिणारा पत्रकार, राजकीय विश्‍लेषक, लेखक, सामाजिक कार्यकर्ता आणि अर्थातच कॉम्रेड अशा विविध रूपांतून बिडवई जगासमोर आले. इतकेच नव्हे तर साहित्य, संगीत आणि कला यातही त्यांना रस होता. कुठलीही मते मांडण्यापूर्वी त्यांचा त्या विषयावरचा सखोल अभ्यास झालेला असे. हिंदुस्थान टाइम्स, फायनान्शिअल एक्‍सप्रेस, बिझनेस इंडिया, टाइम्स ऑफ इंडिया, हिंदुस्थान टाइम्स, फ्रंटलाईन, रीडिफ डॉट कॉम, द गार्डियन, द न्यू स्टेट्‌समेन अँड सोसायटी, द नेशन, ल मोंद डिप्लोमॅटिक, अल मॅनिफेस्टो अशा अनेक राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमधून त्यांनी सातत्याने लिखाण केले. ॲमस्टरडॅम येथे परिषदेसाठी गेले असतानाच २३ जून २०१५ रोजी प्रफुल्ल बिडवई या झंझावाती व्यक्तिमत्त्वाची अखेर झाली. 

डाव्या चळवळींची मागोवा घेणारे पुस्तक लिहिण्यापूर्वी त्यांनी सुमारे दहा वर्षे संशोधन केले होते. इंग्रजी पुस्तक लिहिताना त्यांनी लिहिलेली संदर्भ सूचीच ३७ पानांची आहे, तसेच सुमारे ९०० टिपांनी १२० पाने व्यापली आहेत. यावरून त्यांनी केलेल्या अभ्यासाची पुसटशी कल्पना येऊ शकेल. भारतातील कम्युनिस्ट चळवळीबद्दल किंवा पक्षांबद्दल आजपर्यंत जी पुस्तके आली आहेत, त्यांमध्ये- समग्रपणे, सिद्धांतांपासून ते कृती कार्यक्रमांपर्यंत, ऐतिहासिक आढाव्यापासून ते राजकीय विश्‍लेषणापर्यंत, संसदीय हस्तक्षेपापासून ते तळागाळातल्या कामगिरीपर्यंत आणि तात्कालिक यशापासून ते ऐतिहासिक योगदानापर्यंत- अशी सर्व प्रकारची वैशिष्ट्ये एकत्रपणे हाताळणारे दुसरे कुठलेही पुस्तक या पुस्तकाच्या जवळपासदेखील येत नाही, असे मत बिडवई यांच्या सहकाऱ्यांनी आणि या विषयातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 

पुस्तकात एकूण ११ प्रकरणांमधून डाव्यांच्या कामगिरीचा आलेख मांडला आहे. याची सुरुवात होते ती ‘डावी चळवळ ः उदय आणि घसरण’ या प्रकरणापासून. राष्ट्रीय राजकारणातील आगेकूच, पश्‍चिम बंगाल, केरळ, त्रिपुरामधील आगेकूच, सामाजिक धोरणे आणि आव्हाने, गमावलेल्या संधी आणि न्यू लेफ्टच्या दिशेने असा प्रवास मांडला आहे. गमावलेल्या संधी हे प्रकरण मुळातून वाचण्यासारखे आहे. बिगर काँग्रेस-बिगर भाजप सरकार स्थापण्याची संधी १९९६ मध्ये आली तेव्हा ज्योती बसू यांच्यासमोर पंतप्रधानपदाची संधी चालून आली होती. मात्र तो प्रस्ताव नाकारण्यात आला, अणुऊर्जा सहकार्य कराराचा मुद्दा, नंदिग्राममधील संघर्ष, तिसऱ्या पर्यायाचा प्रस्ताव आणि २०१४ मधील धुळधाण या मुद्द्यांवर यात चर्चा केली आहे. 

स्वातंत्र्यापूर्वीपासूनच्या डाव्या पक्षांच्या वाटचालीबाबत पुस्तकात भाष्य केले आहे. भारताच्या दृष्टीने कम्युनिस्ट पक्षाचे काम आणि इतिहास, कम्युनिस्टांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पश्‍चिम बंगाल, केरळ आणि त्रिपुरा राज्यातल्या डाव्यांच्या कामगिरीविषयी आणि उणिवा, झालेल्या चुका सांगत त्यावरच काय उपाय असू शकतात याविषयीची मांडणीही पुस्तकात आहे. डाव्या पक्षांवर त्यांनी परखडपणे टीकाही केली आहे. उपाय सुचवताना त्यांनी एक पंचसूत्री किंवा त्यांच्याच भाषेत सांगायचे झाले तर पाच अक्ष सांगितले आहेत. व्यवस्थेमधल्या वर्चस्वाला आव्हान देणारे आणि प्रतिवर्चस्व निर्माण करणारे असे पहिले सूत्र. दुसऱ्या सूत्रात ते अर्थकारणाविषयी सांगतात, ज्यात कामाचा हक्क, अन्नसुरक्षा, शिक्षणाचा हक्क, वनाधिकार, वेतन, सामूहिक शेती, असंघटित कामगारांचे प्रश्‍न अशा गोष्टी सामील आहेत. तिसऱ्या सूत्रात स्थानिक गोष्टी, जात ग्रामपंचायत, नगरपालिका आणि सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यातले महत्त्वाचे प्रश्‍न उदाहरणार्थ, वायू आणि जल प्रदूषण, कचऱ्याचा प्रश्‍न आणि त्याचे व्यवस्थापन, शिक्षण आणि आरोग्य सुविधा यांची स्थिती आणि त्यावरचे पर्याय यावर प्रकाश टाकला आहे. चौथ्या सूत्रात लोक व लोकप्रतिनिधी आणि विविध पक्ष, त्यांच्यातले परस्परसंबंध याबद्दलचे लिखाण आहे. पाचव्या सूत्रात त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापक भाष्य केले आहे. 

डाव्यांच्या चुका, अपयश या सगळ्यांवर टीका केलेली असली, तरी बिडवई यांनी चांगले काहीतरी घडू शकेल असा आपला आशावादही व्यक्त केला आहे. 

स्वातंत्र्याच्या पूर्वीची बंगालमधील ‘तेभागा चळवळ’ व त्यानंतरचे डाव्यांचे ‘जमीन बळकाव’ आंदोलन यांचा एकीकडे नक्षलबारीशी आणि दुसरीकडे, बंगालमधील जमीनसुधारणांच्या यशाशी व स्वरूपाशी कसा संबंध आहे, हे त्यांनी मांडले आहे. केरळमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात डावे हे समाजजीवनात किती खोलवर रुजलेले होते, तेलंगणच्या लढ्याला एका बाजूला लृजाम आणि दुसऱ्या बाजूला स्वतंत्र भारताच्या फौजांना कसे तोंड द्यावे लागले याबाबत त्यांनी माहिती दिली आहे. सुंदरबन भागातील ‘मारीचझाँपी’ आणि तिथे झालेला नरसंहार, केरळमध्ये ‘पीपल्स प्लॅन’ मोहिमेमार्फत तळागाळातून गावपातळीवर नियोजन करायचा जो व्यापक प्रयत्न झाला, तो किती यशस्वी झाला व ई.एम.एस. नम्बुद्रीपाद यांच्यासारख्या नेत्याचा पाठिंबा असूनही तो का सोडून देण्यात आला, कानन देवन आणि कमानी हे बुडीत गेलेले उद्योग कामगारांनी ताब्यात घेऊन अनेक वर्षे यशस्वीपणे कसे चालवले याचीही माहिती बिडवई यांनी प्रभावीपणे दिली आहे. एकुणातच भारतातील डाव्यांच्या वाटचालीबद्दल, पक्ष-कारकिर्दीबद्दल तपशीलवार माहिती व संदर्भ पुस्तकात दिले आहेत. 

पुस्तकाचा आवाका खूप मोठा आहे. असंसदीय कम्युनिस्ट चळवळींचा पुस्तकात आवश्‍यक तिथे उल्लेख असला, तरी पुस्तक बिडवई यांनी पूर्णतः डाव्या पक्षांच्या स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील वाटचालीवरच केंद्रित केलेले आहे. 

पुस्तकाच्या पहिल्या तीन प्रकरणात ढोबळमानाने देशाच्या पातळीवरील संसदीय कम्युनिस्ट पक्षाच्या कामगिरीचा आणि इतिहासाचा मागोवा आहे. पश्‍चिम बंगाल, केरळ व त्रिपुरा या डाव्यांच्या बालेकिल्ल्यांतील घडामोडींचा आढावा पुढच्या पाच प्रकरणांत घेतला आहे. शेवटच्या तीन प्रकरणांत राष्ट्रीय पातळीवरील घडामोडींबाबत चर्चा आहे. मात्र ही चर्चा भविष्यवेधी आहे. इतिहासातून शिकत जाऊन पुढे काय करता येईल यावर त्यात भर आहे. डाव्या चळवळीला जर ‘फिनिक्‍स पक्ष्या’प्रमाणे पुन्हा उभे राहायचे असेल तर तो मार्ग कसा असेल, याबद्दल बिडवई यांनी अखेरच्या ‘न्यू लेफ्टच्या दिशेने’ या प्रकरणात मांडणी केली आहे. 

बिडवई यांना ‘न्यू लेफ्ट’ या नावाने एखादा नवा-डावा पक्ष अभिप्रेत नाही. त्यांना नव्या विचारांवर व नव्या आचारांवर आधारलेला डावा समूह अपेक्षित आहे. लोकांच्या मागण्यांची सनद निर्माण करणे, ती सुधारणे, अमलात आणणे यासाठी संसदीय-असंसदीय डाव्यांमध्ये चालणारी एक संवादप्रक्रिया त्यांना अभिप्रेत आहे. 

डाव्यांची सगळी वाटचाल मांडताना बिडवई यांनी आशावादही मांडला आहे. डाव्यांची शक्ती, त्यांचे बालेकिल्ले विखुरले गेले आहेत. पण हीच वेळही आहे. डाव्यांना एकत्र येण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. पूर्वीच्या पद्धती सोडून देऊन नव्या पद्धतीने एकत्र येण्याला, संवाद करण्याला अनुकूल काळ आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. 

हे पुस्तक सर्वसामान्य वाचकांना समजावे याची काळजी मिलिंद चंपानेरकर यांनी अनुवाद करताना घेतल्याचे जाणवते. अनुवाद करताना कोणतीही क्‍लिष्टता येणार नाही याकडे त्यांनी लक्ष दिले आहे. या पुस्तकाला सुहास परांजपे यांची अनुरूप प्रस्तावना आहे. 

भारतीय राजकारणात रस असणाऱ्यांनी आणि याचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचलेच पाहिजे असे आहे. 

संबंधित बातम्या