नाट्यशास्त्राचा सर्वांगीण विचार

सुरेशचंद्र पाध्ये
मंगळवार, 17 जुलै 2018

पुस्तक परिचय

‘भरतरंग’
 लेखिका : डॉ. कल्याणी हर्डीकर
 प्रकाशक : इंद्रायणी साहित्य, पुणे
 किंमत ः २५० रुपये
 पाने : २०८
 

भरतमुनींनी नाट्यशास्त्रात मांडलेल्या ‘रंग’ या संकल्पनेचा सर्वांगीण विचार करणारे ‘भरतरंग’ हे पुस्तक लिहून डॉ. कल्याणी हर्डीकर यांनी रंगभूमीच्या अभ्यासकांसाठी आणि नाट्यरसिकांसाठी भरताच्या रंगसंकल्पनेचे दालन फार छान शब्दांत उघडे केले आहे. मुळात रंग म्हणजेच रंगभूमी; हे स्पष्ट करून त्या आपले मनोगत आणि रंगसंकल्पनेबाबतचे भरताचे विचार या पुस्तकात अतिशय नेमकेपणाने मांडतात. रस म्हणजे आस्वाद या पलीकडे जाऊन ‘रस’ म्हणजे प्रयोगशील नाटकाचे तंत्रशास्त्र हे त्या आवर्जून सांगतात. भरतमुनींनी वर्णन केलेल्या नाटकाचे अंश आजही अनेक लोकनाटकातून पाहायला, अनुभवायला मिळतात. तसेच स्टॅनिस्लाव्हसी, ग्रोटोव्हस्की, आर्तो आंतानो आणि पीटर ब्रुक यांच्यासारख्या रंगकर्मीच्या विचारांमधूनही भरतमुनींची रंगसंकल्पना भेटते. 

‘अभिनयदर्पण’ या ग्रंथात आचार्य नंदिकेश्‍वरांनी रंगकर्मी भरतमुनींचे गुरू हे साक्षात शिवशंकर असल्याचे सांगताना म्हटले आहे, की सारे त्रिभुवन हे शिवशंकराचा आंगिक अभिनय तर सर्व वाङ्‌मय हे त्याचा वाचिक अभिनय आहे. चंद्रतारादि नभांगण हा आहार्य अभिनय मानता येईल. शिवशंकर हा सृष्टीकर्ता, निर्माता, रंगकर्मी आहे. तो नट आहे. सूत्रधार आहे. दिग्दर्शक आहे. आणि संहिता लेखकही तोच आहे. आणि अशा शिवशंकराला गुरुस्थानी ठेवून भरतमुनी रंगसंकल्पनेची मांडणी करतात. रती, हास्य, शोक, क्रोध, उत्साह, भय जुगुप्सा आणि विस्मय अशा आठ स्थायीभावांचे वर्णन भरतमुनींनी श्रीशिवशंकराच्या आदेशाने नाट्यशास्त्रात केले आहे. आधुनिक मानसशास्त्रानुसार मानवी वर्तनाच्या मुळाशी या आठ मूळ प्रवृत्ती असतात. भारतीय नाटकातही या आठ भावांचा सुमेळ आहे.

‘अभिनयदर्पण’ या ग्रंथात आचार्य नंदिकेश्‍वरांनी म्हटले आहे, की ब्रह्मदेवाने जो पाचवा नाट्यवेद निर्माण करण्याची प्रेरणा भरतमुनींना दिली तो शोकार्त, दुखाःर्त लोकांची पीडा दूर करण्यासाठी दिली आणि त्यामुळे नाट्यशास्त्र हे दुःख, पीडा, शोक, नैराश्‍य, खेद यांचा विनाश करणारे आहे. 

मुळातच नाट्यवेदाची निर्मिती झाली. तीच मुळी चार वेदांपासून ज्यांना कायमच वंचित ठेवण्यात आले होते, अशा लोकांसाठी. त्या काळात धर्माचे ज्ञान मूठभर ज्ञानी पंडितांच्या हाती होते. सामान्य माणसे मनोविकारांनी वश होऊन मदोन्मत्त वागत होती. देव, दानव, गंधर्व, राक्षस, यक्ष या सगळ्यांनीच धुमाकूळ मांडलेला होता. अशा अंदाधुंद परिस्थितीत सर्व सामान्यांना मन शांत करणारे मनोरंजनाचे साधन हवे होते. सारेजण त्या स्थितीत ब्रह्माकडे गेले आणि त्याने भरताला जबाबदारी देऊन, नाट्यशास्त्र अस्तित्वात आणले.

या भरतमुनींचे जीवन अनेक प्रकारच्या लढायांनी रक्तपाताने संघर्षाने भरलेले होते. राजसत्तेची व धर्मसत्तेशी भरतमुनींना आणि त्यांच्या शिष्यांना सतत झगडावे लागले. लोकांचे मनोरंजन करण्याचे ध्येय उरापोटी बाळगून आयुष्य कंठावे लागले.

‘महेंद्र विजयोत्सव’ नाटकात भरतमुनींनी देवांचा विजय आणि दानवांचा पराभव दाखवला होता. या गोष्टींचा दानवांना विलक्षण राग आला. त्यांनी त्या प्रयोगानंतर नटांवर हल्ले चढवले. मंडपाची नासधूस केली. रंगभवनच उध्वस्त केले, पण स्वर्गात नाटक केल्यानंतरचाही भरतमुनींना अनुभव काही चांगला नव्हता. भरतजनांना तप ऋषींच्या शापाचे शिकार व्हावे लागले. म्हणजेच लेखक आणि कलाकारांच्या स्वातंत्र्यावर घाला घालण्याचे प्रकार अगदी तेव्हापासूनच आजतागायत मागील पानावरून पुढे चालू आहेत. एका बाजूला दानवांचा पराभव म्हणून ते असंतुष्ट आणि दुसरीकडे ऋषींच्या वर्तनाचे अनुकरण नाटकात आल्याने ते असंतुष्ट. यामुळे दोघांच्याही संतापाला भरतजन बळी पडले. 

हे सर्व सांगतानाच डॉ. हर्डीकर यांनी म्हटले आहे, की नाट्यशास्त्राच्या रचनेपूर्वी नाट्यवेद रचना वृद्ध भरताने केली होती. नाट्यशास्त्रात केवळ नाट्यमीमांसा नाही. काव्यशास्त्र, नृत्यशास्त्र, संगीत शास्त्र, रसमीमांसाही आहे. इतिहासानुसार भरताचा उल्लेख जातिस्वरुपात आलेला आहे. भरतमुनी हे नाट्यशास्त्राची रचना करणारे मुनी आहेत. तसेच भरतमुनींच्या शिष्यांसाठी, पुत्रांसाठीही भरत हाच शब्द वापरला आहे. अनुमान असे, की नाट्यशास्त्राची रचना ही अनेक भरतांची आहे. ही ग्रंथ भरतजातीची सामूहिक निर्मिती आहे. परंतु, नाट्यशास्त्रातच भरतमुनींचा उल्लेख एकवचनी एक व्यक्ती याअर्थी येतो. आणि त्यामुळेच ती सामूहिक रचना नाही, तर भरतमुनींनीच केलेली आहे, असे स्पष्ट होते.

भरतपुत्र हे अभिनयनिपुण होते. परंतु, भरतमुनी हे अभिनयशास्त्र जाणणारे मूळ पुरुष होते. आता नटपरंपरेचे पाईक म्हणजे भरत. हे सारे संगीत, नाट्य या कलांचे उपासक. या कला हे त्यांचे वंश परंपरागत धन होते. असे अभिनव गुप्तांनी म्हटले आहे. कोहल, वत्स, शांडिल्य, धूर्तील यांनी नाट्यशास्त्र समृद्ध केले. आणि मूळ ग्रंथाचे कालानुरूप संस्करण करून बारा हजार श्‍लोकांचे नाट्यशास्त्र संपादित केले. हे कोहलकृत संपादन दुर्दैवाने सध्या अस्तित्वात नाही.

महामहोपाध्याय पां. वा. काणे यांच्या मते ध्यानधारणा करणारे, आत्मक्‍लेष सहन करून दरिद्री जीवन कंठणारे, समाजात प्रतिष्ठितांमध्ये आदराचे स्थान मिळवणारे जे लोक असत, त्यांना मुनी म्हणत असत. उपनिषद कालात मुनींना वैदिक ऋषींपेक्षा वरच्या श्रेणीचे मानले जाई. पुढे शैव संप्रदायाची सांख्य तत्त्वज्ञानी तपस्वी साधकांना मुनी संबोधले जाई असे के. बेडेकर यांनीही नमूद केल्याचे डॉ. हर्डीकरांनी नमूद केले आहे.

भरतमुनींच्या आयुष्याबाबत ‘नाट्यशास्त्रात’च जे संदर्भ उपलब्ध होतात; त्यावरून भरतमुनी हे वैदिकपूर्व संस्कृतीतील असावेत. अवैदिक काळातले असावेत. आणि अशा वृत्तीच्या मुनींची एक स्वतंत्र जमात असावी. तिचा संबंध नृत्य, नाट्य संगीताशी असावा, असे सांगून डॉ. हर्डीकर म्हणतात,  ‘‘आज आपले विचार, आचार, कला, संस्कृती आदि सारेच पाश्‍चात्त्यांच्या प्रभावाखाली आहे. आपल्या साध्याच परंपरा पुरातन या शिक्‍क्‍याखाली गाडल्या गेल्या आहेत. तो पुसला तर अस्सल देशी परंपरांचा झळझळीत बावनकशी खजिनाच आपल्या हाती लागेल.’’

शारीरिक, मानसिक आणि कलात्मक अशा पातळ्यांवरून भरतमुनींनी नाटकाचा विचार केला. वृत्ती, प्रवृत्ती, रस, भाव, अभिनय, संगीतस्वर विशेष यांचा समुच्चय म्हणजे रंग, प्रयोग, नाटक होय. रस आणि भाव हे प्रयोगनिष्ठ आहेत, असे सांगून भरताने भावानुरूप नाट्य प्रकारांचा विचार केला आहे. त्यांनी सप्तद्विपानुकरण, लोकवृत्तानुकरण, भावावस्थानुकरण म्हणजे नाटक असा तिहेरी गोफ विणला. या भावानुकीर्तनात केवळ व्यक्तीची अनुकृती नाही तर मानवी अवस्था आणि भाव प्रतीत होत असतात. आणि तरीही ही प्रतीती व्यक्तिनिरपेक्ष असते.

‘एल्मर राइस’ यांच्या मते ‘काहीतरी’ विशेष व्यक्त करणे. निव्वळ आत्माविष्काराच्या प्रेरणेतून नव्हे तर दुसऱ्याला सांगण्याच्या इच्छेतून, भावनिक संपर्क साधण्याच्या इच्छेतून घडते. म्हणजेच हा भाव कलाकृतीच्या निर्मितीच्या मुळाशी असतो. भरतमुनींच्या नाटकाच्या व्याख्येतला भाव हा शब्द नेमके असेच सांगतो. भरतमुनींनी एकोणपन्नास भाव नाट्यशास्त्रातून मांडले. तेहतीस व्यभिचारी, आठ सात्त्विक आणि आठ स्थायीभाव. प्राचीन कला पूर्णपणाने धार्मिक होती. याउलट आजची कला ही निधर्मी व्यक्तिप्रधान आहे. ती सामाजिक आहे, पण तरीही व्यक्तिप्रधान आणि निधर्मी आहे. त्यांनी असे म्हटले आहे, ‘‘भारतीय तत्त्वज्ञानात ज्योर्तिविद्या, भूमितीशास्त्र, काव्याचे छंद, नृत्य, दैवतविचार, मूर्ती विज्ञान उत्सव, व्रते, जातकर्मापासून अंत्यविधींपर्यतचे संस्कार इतकेच नाही, तर राजसत्ता, वर्गव्यवस्था, वारसा हक्काचे नियमही यज्ञसंस्थेतून निघाले आहेत, ही गोष्ट केवळ भारतीय संस्कृतीपुरतीच मर्यादित नाही तर भारताबाहेरच्या प्राचीन संस्कृतीच्या बाबतीतही खरी आहे.’ डॉ. हर्डीकरांचा अभ्यास हे स्पष्ट करत असला तरी पुस्तकात त्यांनी याची अधिक उदाहरणे दिली असती तर ते वाचकाला मनापासून पटण्यास अधिक उपयुक्त ठरले असते.

भरतमुनींनी सांगितल्याप्रमाणे अभिनय हा रंगाचा प्राण आहे. आणि जिथे हा अभिनय अवतीर्ण होतो, तो रंग  हा रंगमंचावरील प्रयोगाचे द्वार होते. म्हणूनच रंगमंचाला रंगद्वार असेही ते म्हणतात. ते ‘रंग’ या एका तरल शब्दामध्ये सक्षमता, काव्यात्मकता, भावात्मकता, अभिनय, नाट्य आणि अवकाश अत्यंत समर्थपणाने व्यक्त करतात. भरतमुनींच्या नाट्य शास्त्राची ‘रंग’ ही परवलीची खूण आहे.

रंगभूमी हा शब्द खरा भारतीय आहे. भरतमुनींनी जनरंजनासाठी निर्माण केलेला ‘रंग’ आकर्षक, कलात्मक दृष्टीसुखद आहे. असे सांगून डॉ. हर्डीकर या विचाराचे विश्‍लेषणही खूप छान करतात.
नाटक हा पाचवा वेद म्हणजे मानवी भावांचे आणि अवस्थांचे अनुकीर्तन असले तरी ते इतर वेदांप्रमाणे केवळ ज्ञानाचे साधन नाही; तर मनोरंजन आनंद उल्हास देऊन जीवनाला नवचैतन्य देण्याचे प्रभावी साधन आहे. तो लोकवेद आहे. याचे भान भरतमुनींना समाजात रुजवायचे होते.

‘रंग’ प्रकट करण्यासाठी रंगमंचाचे प्रकार आणि आकार अभिरुचीनुरूप घडवले गेले. अभिरुची बदलली, की आविष्कार बदलतो, असे सांगून डॉ. हर्डीकर म्हणतात, ‘‘ हे रंगाविष्कारातले, भावाविष्कारातले वैविध्य लक्षात घेताना उपयोगी पडणारे सूत्र आहे. या सूत्राच्या आधारे भरतमुनींच्या रंगसंकल्पनांचा विचार करता येईल.’’

देशोदेशींचे नाटक हे परिस्थितीनुरूप आणि तेथील प्रचलित चालीरीती, विधींमुळे घडतो. अभिव्यक्ती आविष्काराच्या विधीमुळे रंगमंचाचा संदर्भ बदलतो असे सांगून त्या देशोदेशीच्या रंगमंच परंपरेचेही विवेचन करतात. 

रंगमंचावरची कला ही केवळ दृश्‍य किंवा श्राव्य कला नाही, तर ती दृक आणि श्राव्य कला आहे. तरी रंगकला आहे. असे सांगून त्या अलीकडच्या काळातील नाटकांबाबतही भाष्य करतात. त्यांच्या या भाष्यामुळे हे पुस्तक अधिक रोचक झाले आहे. हे पुस्तक नाट्यशास्त्रात आणि त्यातील रंगसंकल्पनेवर वेगळा प्रकाशझोत टाकणारे असल्याने प्रत्येक रंगकर्मीने वाचावयास हवे. तसेच नाट्यकला शिक्षण अभ्यासक्रमांमध्येही समाविष्ट करण्यात यावे इतक्‍या उंचीचे आहे.

संबंधित बातम्या