इतिहास रेल्वेचा, प्रवास राष्ट्राचा

स्वप्निल जोशी
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

पुस्तक परिचय

रेल्वेबद्दल कुतूहल बऱ्याच लोकांना असते, पण या कुतूहलातून जगातल्या वेगवेगळ्या देशातील रेल्वेने प्रवास करणारी माणसे विरळाच. अशाच विरळांपैकी एक ख्रिश्चन वोल्मर. वोल्मर ज्या देशात रेल्वेने फिरले त्या रेल्वे प्रवासाच्या अनुभवाबद्दल व त्या देशातील रेल्वेच्या इतिहासावर त्यांनी बरीच पुस्तके लिहिली. २०१६ साली वोल्मर यांनी भारतात रेल्वेने प्रवास केला. या प्रवासातील बराचसा वेळ त्यांनी रेल्वे डब्याच्या दारात बसून एका हातात चहाचा ग्लास घेऊन व दृष्टिपटलासमोरून हलणारा भारताचा कॅनव्हास बघत घालवला. वोल्मर यांची भारताबद्दलची उत्सुकता व भारतीय रेल्वेच्या इतिहासाचा अभ्यास याचे फलित म्हणजे त्यांचे ‘Railways & The Raj’ हे पुस्तक.

पुस्तकाच्या शीर्षकावरून कल्पना येते की यात ब्रिटिश काळातील रेल्वेचे वर्णन असणार, पण या पुस्तकाचा आवाका साधारण १८४० ते २०१६ एवढ्या कालखंडाचा आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच असलेल्या ‘The British never really conquered India, but the railways did’ या एका वाक्यातून रेल्वेचे महत्त्व समजते. खंडप्राय भारतावरती राज्य करायचे असेल व भारतात मुबलक प्रमाणात असलेले खनिज व इतर संपत्तीची लूट करायची असेल, तर रेल्वेला पर्याय नाही हे ब्रिटिशांना कळून चुकले होते. तेव्हा भारतात सत्तेत असलेल्या ईस्ट इंडिया कंपनीचा रेल्वेला असलेला विरोध मोडण्यासाठी व भारतात रेल्वेचे जाळे पसरवण्यासाठी ब्रिटिश सरकारने लॉर्ड डलहौसीची भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक केली. डलहौसीने बोरीबंदर ते ठाणे व हावडा ते बर्दवान हे दोन मार्ग experimental lines म्हणून निवडले. खरेतर भारतात पहिली रेल्वे हावडा ते बर्दवान दरम्यान धावली असती पण तसे होऊ शकले नाही व असे न होण्याची काही गमतीशीर कारणे या पुस्तकात दिली आहेत. बोरीबंदर ते ठाणे या पहिल्या रेल्वे प्रवासाबद्दलच्या भारतीयांच्या व ब्रिटिशांच्या भावनांचे वर्णन वोल्मर यांनी या पुस्तकात केले आहे. 

भारतात रेल्वे मार्ग बांधण्यामुळे व रेल्वे चालवण्यामुळे इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेत कशी तेजी होती याचे वोल्मर यांनी या पुस्तकात आकडेवारीसह दाखले दिले आहेत. तसेच खंडाळा घाट कसा उभा राहिला याचे रोमांचकारी वर्णन या पुस्तकात आहे. एलिस ट्रेडवेल या ब्रिटिश महिलेने आपल्या पतीच्या पश्चात खंडाळा घाटाचे कंत्राटी काम पूर्ण केले. सतत पडणारा पाऊस व त्यामुळे कोसळणाऱ्या दरडी व साथीचे आजार यामुळे दहा ते बारा हजार मजुरांचा बळी घेऊन घाटात रेल्वे मार्ग सुरू झाला. रेल्वेच्या इतिहासातील बरेच अपरिचित पैलू समोर आणताना हे पुस्तक वाचकाला आणखीन एक आश्चर्याचा धक्का देते. सुरुवातीला एक शिकारी व नंतर वन्यजीव रक्षक व लेखक म्हणून आपल्याला माहिती असलेल्या जिम कॉर्बेटने भारतात रेल्वेमध्ये वीस वर्षे रेल्वे चालवणे, स्टेशन मास्टर व लेबर कॉन्ट्रॅक्टर इत्यादी वेगवेगळ्या प्रकारची कामे केली.  

रेल्वेचे जाळे भारतभर पसरत होते, तरी भारतीयांचा रेल्वे प्रवासातला अनुभव फारसा सुखकारक नव्हता. एकतर फक्त तिसऱ्या वर्गाच्या डब्यातून प्रवास करायची परवानगी भारतीयांना असायची. या तिसऱ्या वर्गाच्या डब्यात साधी टॉयलेटची सुविधा नसायची. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी या डब्यातून प्रवास करायचे. हे असे सर्व जाती-धर्माच्या स्त्री-पुरुषांनी एकत्र प्रवास करणे हे तेव्हाच्या जाती धर्माच्या पगड्यात अडकलेल्या भारतीय समाजाला मान्य नव्हते. तसेच रेल्वेत काम करणाऱ्या भारतीयांचासुद्धा अनुभव फारसा चांगला नव्हता. कमी प्रतीची व हलक्या दर्जाची कामे भारतीयांना करावी लागत तर रेल्वे चालवणे, व्यवस्थापन इत्यादी उच्च दर्जाची व प्रतिष्ठेची कामे ब्रिटिशांनी स्वतःजवळ ठेवली होती. भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास व रेल्वेचा इतिहास हा किती समांतर आहे ते हे पुस्तक वाचताना लक्षात येते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधींसारख्या नेत्यांनी भारताच्या कानाकोपऱ्यातील सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत पोहोचण्यासाठी रेल्वेचा माध्यम म्हणून वापर केला, तर दुसरीकडे सशस्त्र क्रांतिकारकांनी रेल्वे व रेल्वे स्टेशन्सवर हल्ले करून रेल्वेलाच लक्ष्य केले. रेल्वे स्टेशनवरचे हल्ले रोखण्यासाठी ब्रिटिशांनी स्टेशनच्या इमारती किल्ल्यांसारख्या बांधल्या. भारतात आजही किल्ल्यासारख्या दिसणाऱ्या स्टेशनची छायाचित्रे या पुस्तकात आहेत.

फाळणी हा देशासाठी व रेल्वेसाठीसुद्धा कठीण काळ होता. भारत-पाकिस्तान या दोन देशांमधील सीमा निश्चित करण्यासाठी ब्रिटिश वकील सर सिरील रॅडक्लीफला लॉर्ड माऊंटबॅटनने भारतात आणले. भारतीय उपखंडाचा किंवा इथल्या संस्कृतीचा कुठलाच अनुभव नसलेल्या रॅडक्लीफने नकाशावर रेषा आखून भारत-पाकिस्तानच्या सीमा निश्चित केल्या. फाळणीमुळे तेव्हाच्या भारतातल्या रेल्वेच्या एकूण मार्गांपैकी ४० टक्के रेल्वेमार्ग व त्यातून येणारे उत्पन्न पाकिस्तानात व पूर्व पाकिस्तानात (आत्ताच्या बांगलादेशमध्ये) गेले. शिवाय ईशान्य पूर्व भारताचा उर्वरित भारताशी संपर्क तुटला. वोल्मर यांनी या सर्व घटना व परिस्थिती तसेच फाळणीतून भारतात आलेल्या लोकांचे अनुभवसुद्धा या पुस्तकात लिहिले आहेत. 

स्वातंत्र्यपूर्व काळातील रेल्वेचा इतिहास जेवढा रंजक आहे, तेवढाच स्वातंत्र्योत्तर काळात तो स्तिमित करणारा आहे. १९४७ सालापर्यंत रेल्वे चालवण्याचा अनुभव नसलेल्या भारतीयांनी १९५० मध्ये बंगालमधील चित्तरंजन येथे रेल्वे इंजिन बांधणीचा कारखाना उभारला. त्यानंतरच्या दशकात भारतात वेगवेगळ्या ठिकाणी रेल्वेचे डबे तयार करण्याचे कारखाने उभे राहिले. १९५१ साली रेल्वेचे राष्ट्रीयीकरण होऊन ‘भारतीय रेल्वे’ अस्तित्वात आली. फाळणीनंतर मुख्य भारतापासून तुटलेल्या ईशान्य भारताला रेल्वे मार्गाने परत मुख्य भारताशी जोडण्याचे महत्त्वाकांक्षी काम भारतीय रेल्वेने पूर्ण केले. रेल्वेचा असा प्रवास चालू असताना राजकीय शक्तींनी रेल्वेमध्ये कसा प्रवेश केला व त्यातून कामगार युनियन कशा अस्तित्वात आल्या व या युनियन्सनी वेळोवेळी केलेली आंदोलने याबद्दल वोल्मर या पुस्तकात लिहितात. ब्रिटिशांसाठीही अशक्य असलेले कोकण रेल्वेचे काम भारतीय रेल्वेने केले, काश्मीरमध्ये रेल्वेमार्ग बांधणे असो किंवा बुलेट ट्रेनचा प्रस्ताविक प्रकल्प असो भारतीय रेल्वेच्या क्षमतांबद्दल, कामगिरीबद्दल स्वतः ब्रिटिश असूनही ख्रिश्चन वोल्मर यांनी कुठलाही पूर्वग्रह दूषित न ठेवता हे पुस्तक लिहिले आहे याचा एक भारतीय म्हणून व रेल्वे चाहता म्हणून प्रत्येक वाचकाला अभिमानच वाटेल.

संबंधित बातम्या