‘परिपूर्ण’ चरित्र!

स्वाती कर्वे
सोमवार, 13 डिसेंबर 2021

पुस्तक परिचय

‘अलक्ष्यरूप’ हे परशुराम हरी थत्ते यांनी लिहिलेले त्यांचे आणि त्यांच्या पत्नीचे एकत्रित चरित्र. स्वतःचा उल्लेख त्यांनी तृतीयपुरुषी एकवचनात केला आहे. पत्नीचे चरित्र नवऱ्याने लिहून काढण्याचा १९व्या शतकातील हा एकमेव प्रयत्न होता, आणि अलीकडच्या काळातही हा प्रयोग तसाच अनोखा आहे! 

आपल्या पत्नीविषयी अनेक कर्तृत्ववान पुरुषांच्या चरित्रात उल्लेख आढळतात; ते संदर्भाने, कामापुरते, घटनाक्रमात आलेले! ‘अलक्ष्यरूप’मध्ये मात्र लेखकाने पत्नी लक्ष्मीबाईंची पूर्वाश्रमीची माहिती, त्यांचा जन्म, आई-वडील, नातेवाईक, गाव, त्यांचे कुटुंब, वैवाहिक जीवन आणि त्यात बाई म्हणून असलेल्या, झालेल्या आणि सोसलेल्या अडचणी या सर्वाचा परामर्श घेतला असल्याने हे चरित्र परिपूर्ण झाले आहे.

‘ज्याकडे आजवर कुणाचे लक्षच गेले नाही, असे’ अशा अर्थाने ‘अलक्ष्यरूप’! किती समर्पक शीर्षक!

पुस्तकाच्या मुखपृष्ठावर दोघांचेही स्वतंत्र फोटो आहेत. याशिवाय परशुरामपंतांचे हस्तलेखन मुखपृष्ठावर आणि मलपृष्ठावर छापलेले दिसते. त्यांच्या टापटीप-नीटनेटकेपणाची त्यावरूनच कल्पना येते. रंगही त्या छपाईला - काळाला साजेसा; मिलिंद जोशी यांचे हे मुखपृष्ठ कल्पक म्हणावे लागेल. आतील स्वच्छ, देखणी मांडणी आणि फाँट वाचनसुलभ आहे. छायाचित्रांची उणीव कुठेही भासत नाही, हे विशेष!

डॉ. प्रदीप कर्णिक यांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे. या पुस्तकाचे हस्तलिखित परशुरामपंतांच्या माघारी बऱ्याच काळानंतर त्यांच्या नातलगांना मिळाले. त्यावेळी त्याची पाने जीर्ण झाली होती. त्याचे स्कॅनिंग करून, ते रूपास आणून, उलटपालट झालेला मजकूर साधारण लावून घेतल्यानंतर त्यातील त्रुटी लक्षात आल्या. पाने गहाळ झाली असावीत असेही लक्षात आले. चेतन क्षीरसागर, अनिल दाभाडे, डॉ. शुभा थत्ते यांच्या मदतीने डॉ. प्रदीप कर्णिक यांनी ते वाचून त्यातला वेगळेपणा ओळखला आणि त्याच्या छपाईमध्ये रस घेतला. बऱ्याच कष्टांनंतर मराठी संशोधन मंडळ, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय यांच्यातर्फे ‘अलक्ष्मरूप’ प्रसिद्ध झाले. 

केवळ गृहिणी असणाऱ्या स्त्रीचे तिच्या नवऱ्याने लिहिलेले १९व्या शतकातील हे एकमेव चरित्र!

मूळचे चिपळूणचे परशुरामपंत उत्तम शिक्षक होते. त्यांचे वाचन अफाट होते, ते व्यासंगी होते. या चरित्रग्रंथामध्ये जी काही छोटी छोटी सदतीस प्रकरणे त्यांनी केली आहेत, त्या प्रत्येकाच्या सुरुवातीला त्या विषयाशी संबंधित संस्कृत श्लोक, गुजराती, हिंदी, इंग्रजी किंवा मराठी वाङ्‍मयातील वाक्ये, उतारे त्यांनी उद्धृत केलेले आढळतात. परशुरामपंत उत्तम लेखकही होते. त्यांचे वैविध्यपूर्ण लेखन विपुल प्रमाणात उपलब्ध असल्याचे दिसते. त्यांची हस्तलिखिते जशी उपलब्ध झाली, तशी वारसदारांनी ती पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर येथे विद्यार्थ्यांना संशोधनासाठी उपलब्ध असावीत म्हणून दिली. 
पुस्तकामध्ये त्यांनी आपला दिनक्रम, पत्नीचा दिनक्रम, घरातल्या बायकांचे आपापसातले संबंध, त्यांना घरात होणारा त्रास, बाळंतपणातले कष्ट आणि अडचणी यासंबंधी लिहिले आहे. बायकांचे घरातले राबणे, पैसा वाचवण्यासाठीच्या तडजोडी, काटकसर याची त्यांना पूर्ण कल्पना होती, जाणीव होती, हे आश्चर्याचेच! या चरित्रात परशुरामपंतांनी त्या काळातील कौटुंबिक, सामाजिक, त्या त्या वेळेची परिस्थिती आणि त्यातून निर्माण होणारी नातेसंबंधातील गुंतागुंत, वाद-विवाद, द्वेष, मत्सर, प्रेम यासंबंधी; त्याबरोबर कचेरीतील वातावरण, राजकारण, बदलीच्या निमित्ताने आलेले गावोगावीचे अनुभव लिहिले आहेत. भुसावळ, सोलापूर, अहमदाबाद अशा ज्या ज्या गावी त्यांना वास्तव्य करण्याची संधी मिळाली, त्या गावांचे वर्णन, क्वचित वैशिष्ट्ये, इतिहास हे अत्यंत प्रभावीपणे आणि त्रयस्थपणे लिहिलेले आढळते. ते ज्या ज्या गावी जातील, तिथे अशी माहिती घेऊन ठेवण्याची सवयच त्यांना असावी. मुंबईचा इतिहास, बाबुलनाथ, चौपाटी, महालक्ष्मी अशा काही ठिकाणांची उद्‍बोधक माहिती, तसेच मुंबईचे जनजीवन सर्वांचाच उत्तम अहवाल यात आहे. प्लेग, हेल्थ कॅम्प, आगगाडी, आगबोटी... कुठलाच विषय त्यांना वर्ज्य नव्हता. आग्रा रोडने महूला जातानाचा विलक्षण प्रवास, बलुची लोकांमधून धीराने पुढे जाणे, फुटाणे आणि गुळावर दिवस काढणे या अनुभवाविषयी सविस्तर लिहिलेल्या भागात त्या प्रवासातील भीषणता लक्षात येते.  ‘अविभक्तपणा’ या तेराव्या प्रकरणात त्यांनी म्हटले आहे, ‘घरातल्या माणसांनी आपल्याच घरात चोरी करणे, ते सामान बाहेर विकणे, घरच्यांशी उद्धट बोलणे... या सर्वांमुळे घरातल्या मिळकतीला गळती तर लागतेच, पण त्यात बदल करण्याचा विचार केला तर घरातलेच ज्येष्ठ ज्या आडमुठेपणाने वागतात, त्यामुळे सारेच उपाय खुंटतात आणि शेवटी मोठ्या कुटुंबाची धूळधाण होते.’ सुरुवातीच्या इंग्रजी परिच्छेदात म्हटले आहे, ‘तारुण्याची सर्व गुर्मी हिरावून टाकण्यास अविभक्तपणा हे आमच्या राष्ट्राचे विशेष साधन आहे ... अशा रोगरूपवृक्षाच्या मुळावर कुऱ्हाड घालून अविभक्त कुटुंबाचे उच्चाटन केले नाही, तोपर्यंत सुधारणेची गोष्ट हवी कशाला?’ अनुभवाने आलेला कडवटपणा त्यांना वेगळा विचार करू देत नसावा. मात्र हे सर्व लिहीत असताना भावनेच्या भरात की काय, पण प्रथमच सतराव्या भागात आपला उल्लेख ते प्रथमपुरुषी एकवचनी करताना दिसतात. अर्थात, हस्तलिखित अपुऱ्या अवस्थेत होते, हे विसरता येणार नाही. 

अत्यंत सचोटीचा, प्रामाणिक, तरीही प्रसंगी परिणामांचा यथोचित विचार करणारा असा हा माणूस असूनही कुटुंब सांभाळताना पत्नीसह बेताच्या परिस्थिती काबाडकष्ट करीत जगतो. आपले चुकलेले कौटुंबिक निर्णय सांगतानाही ते डगमगत नाहीत. महत्त्वाच्या गोष्टींवर नवराबायको त्या काळातही चर्चा करून निर्णय घेत, ही बाब अत्यंत उल्लेखनीय आहे. पुस्तकातल्या अशा अनेक गोष्टी वाचकाला अचंबित करतात.

या लेखनातून माणसाच्या अंगी असणारी सचोटी, शिस्त, प्रामाणिकपणा, कर्तव्यदक्षता, कधी आवश्यक तेथे निर्भीडपणा, प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाण्याची अभ्यासू वृत्ती मनावर ठसते. लक्ष्मीबाईंची संसारात साथ देण्याची वृत्ती, अत्यंत कष्टाळूपणा कौतुकास्पद वाटत राहतो. बाळंतपणासंबंधी केलेले नियोजनाचे विचार, इलाज-नाइलाज यामुळे कणवही दाटून येते. पण त्यावर परशुरामपंतांनी केलेले वाचन, विचार, अभ्यास कौतुकास्पद ठरतो.

अलक्ष्यरूप

  • लेखक : परशुराम हरी थत्ते
  • संपादक : डॉ. प्रदीप कर्णिक
  • प्रकाशन : मराठी संशोधन मंडळ, मुंबई
  • किंमत : ₹ ५००
  • पाने : ४४८

संबंधित बातम्या