प्रेरणेचा अखंड स्रोत... 

स्वाती कर्वे
सोमवार, 28 फेब्रुवारी 2022

पुस्तक परिचय

प्रतिभावान ज्येष्ठ नृत्यांगना रोहिणी भाटे यांचे वंदना बोकील-कुलकर्णी लिखित ‘रोहिणी निरंजनी’ हे उत्तम निर्मितीमूल्यांतील चरित्र प्रेरणादायी आहे. कृष्णरंगावर चंद्रमोहन कुलकर्णी यांनी रेखाटलेली नायिकेची समर्पण भावातील रंगीन नृत्यमग्न रेखाकृती आणि लयदार सु-वर्ण शीर्षक, यामुळे मुखपृष्ठ देखणे झाले आहे. तितक्याच नेमक्या शब्दांचा ब्लर्बही मागच्या बाजूला आहे.

वंदना बोकील-कुलकर्णी यांनी संगीताशी नाते असलेल्या आपल्या आई आणि आजोबांना ‘रोहिणी निरंजनी’ अर्पण केले आहे. आरंभीच खलील जिब्रानचे एक उद्धृतही चपखलपणे वापरलेले दिसते. हिंदी भाषिक कवी-कलासमीक्षक डॉ. अशोक वाजपेयी आपल्या प्रस्तावनेत ताईंच्या नृत्याविषयी थोडक्यात सर्व काही सांगतात; त्यांचा संघर्ष, जीवन, प्रवास, विस्तृत आणि प्रेरणादायी असल्याचे म्हणतात. हिंदीतील प्रस्तावना, हे चरित्र भाषेपलीकडे (उत्तर भारतातही) पोचावे, याचे सूचन असावे. ते अशक्य नाही. यातील पंधराही प्रकरणांच्या सुरुवातीला ताईंच्या लेखनातील उद्धृते त्यांच्या नृत्यमुद्रेसह वापरली आहेत! त्यानंतर रोहिणीताईंच्या पश्चात, उपसंहार, त्यांची मुलाखत, कालानुक्रम आणि संदर्भसाहित्य याने ग्रंथाचा परीघ विस्तारतो.

गणेश भाटे हे स्वतः उत्कृष्ट साहित्य समीक्षक, चिकित्सक रसिक! ते स्वतः जातपात, धर्म, भाषा, या भेदांपार गेले होते. कलाक्रीडेसह आसने, सूर्यनमस्कार, लाठी-जंबिया यांचे प्रशिक्षण त्यांनी मुलींना, क्वचित पत्नीलाही दिले. सर्व शिकवून मुलींना स्वयंसिद्ध करण्याचे त्यांचे स्वप्न त्यांनी अकालीच जगाचा निरोप घेतल्याने मात्र अधुरे राहिले. पुस्तकातील भाटे पती-पत्नी, त्यांची अपत्ये यांचा यथोचित परिचय पाहता हा ग्रंथ शतकाचा पट मांडतो.

‘दादांचे स्वप्न’ यामध्ये ही सगळी पार्श्वभूमी उभी राहिली आहे. लहानपणापासून संगीत-नृत्याकडे असलेला ताईंचा ओढा व त्यासाठीची वणवण सुरुवातीलाच दिसते. आपल्या जगावेगळ्या ध्यासासह लौकिकार्थाने टिकून राहायला त्यांना आई- लीलाताईंच्या संस्काराची भक्कम साथ मिळाली. त्यातून धाडस, निष्ठा, करारीपणा, निश्चय हे गुण अंगी बाणले. त्यांनी आपले जगावेगळे आयुष्य निष्ठेने घडवले. महाराष्ट्रात कथ्थकला स्वतंत्र शैली व प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. 

जुलै १९४७मध्ये ताईंनी नृत्यवर्ग सुरू केले. १९६०-६२पर्यंत सातत्याने स्वतःही शिकतही राहिल्या! ‘चरितार्थासाठीचे वर्ग नव्हे, तर जीवनशिक्षणच...’ हा त्यांचा मार्ग खडतर होता; त्यातील टप्पे उत्तमरीतीने प्रकटलेले दिसतात.

‘नृत्यदंश’ हा जन्मभर पुरेल असा ध्यास - प्राणछंद! त्यातूनच जमलेले ताईंचे पहिले लग्न आणि रंगविठ्ठल यांचा योग्य परिचयही पुस्तकात येतो. ‘रुजवण’मध्ये स्वतः गुरूचा शोध घेत शिक्षण घेणे, आपल्यातील नवे उन्मेष प्रकट करणे, विद्यार्थिनी घडवण्यातले वेगवेगळे टप्पे, रोजच्या जगण्याशी नृत्य जोडून घेणे या बाबी समोर येतात. नृत्य केंद्रस्थानी ठेवून केलेला हा प्रवास विविध प्रकरणांमध्ये वर्गीकृत केला आहे. ‘प्रारंभ’मध्ये नृत्यशिक्षणाचा, अध्यापनाचाही प्रारंभ, नृत्याच्या साथीसाठी साथीदार तयार करणे, रंगमंचीय कार्यक्रम, दौरा यांचे प्रारंभिक प्रसंग आणि प्रयोग यांची सविस्तर माहिती मिळते. नृत्यभारतीचा शुद्ध कथ्थककडे प्रवास, शिकवण्याच्या प्रक्रियेतील बारकावे, गुरुपौर्णिमा, यांचा परामर्शही घेतला आहे.

‘जाणिजे यज्ञकर्म’, ‘अक्षरसमिधा’, ‘चैतन्यवेल’ अशा विभागणीतून त्यांचे समर्पित जीवन, ज्ञानाची आस, ध्यास, कार्यमग्नता, नृत्यासाठीचे काव्य, निवेदन, त्यांचे स्वानिर्मित साहित्य, वयाच्या सर्व टप्प्यांवर त्यांचा रसरशीतपणा याची ओळख पटते. ‘अयि नर्तनशीले’मध्ये रोहिणीताईंच्या जुन्या-नव्या नृत्य रचनांची सांगोपांग माहिती, तर ‘संरचनांचे नवोन्मेष’मध्ये त्यांच्या स्वरचित, तसेच स्वतः कोरिओग्राफ केलेल्या रचनांचा ऊहापोह सर्व अंगांनी केलेला आढळतो. रचनांची परंपरेशी जवळीक, कधी नवतेशी नाते; ‘व्योम’, ‘तन्मात्र’, ‘कठपुतली’, ‘ऋतुसंहार’ आणि अशा कितीतरी रचनांमधील वैविध्य, त्याचा समीक्षकांनी केलेला तत्कालीन उल्लेख, याबद्दल या चरित्रामध्ये विस्ताराने लिहिले आहे, ते अभ्यासकांना मार्गदर्शक ठरेल. आपले माध्यम लवचिक करणे, त्याच्या चौकटी रुंदावताना त्याच्या क्षमता विस्तारणे म्हणजे काय याचा त्यांच्या रचना या वस्तुपाठच असत.  

नृत्यातील सर्व संकल्पना, मांडणीतील बारकावे, ताल - पढंत, अंगहस्तक्षेप, पदलालित्य, अभिनय याबद्दल सर्वसामान्य वाचकांसाठी बारकाईने लिहिताना लेखिकेचा त्यामागील सखोल अभ्यास आणि लेखनातील नेमकेपणा वाखाणण्याजोगा आहे. समग्रलक्षी कलावती, संकेतनिष्ठ अभिरुची, साहित्याची अक्षुण्ण परंपरा... असे नित्य न आढळणारे शब्द व नृत्यासंदर्भातलेही क्वचित वापरले जाणारे काही शब्द पुस्तकात गरजेनुसार वापरलेले आढळतात. विभागांची लक्षवेधी शीर्षके चरित्राच्या भाषिक सौंदर्यात भर घालतात. रोहिणीताईंच्या भाषेची श्रीमंती, संयम, उच्च मूल्ये ही जणू चरित्र लेखिकेने आपल्या लेखनात आणून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी हे लेखन छान जोडले आहे, असे वाटते.

एकीकडे आधुनिकतेकडे जाणारे पुणे, तर दुसरीकडे संस्कृतीरक्षकांचे पुणे; लखनौ, भुलाबाई देसाई मेमोरियल ट्रस्ट, मुंबई इथल्या क्लासचे दिवस, ठिकठिकाणचे नृत्यमहोत्सव... तेथील सांगीतिक माहोल, वातावरण चोख उभे केल्याने तो तो काळ स्पष्ट होतो. लेखन सर्वांगिण तसेच लालित्यपूर्ण झालेले दिसते.

कलाकाराच्या जीवनाला असलेला शाप म्हणजे एकूणच मतभेद, मानापमान... याचा संयमाने आलेला उल्लेख लेखनाला परिपूर्णता देतो. अशा कुठल्याच गोष्टी या चरित्रातून वगळल्यासारख्या दिसत नाहीत. चरित्रलेखन ही शेवटी आठवणींची तुकडे-जोड असते, ती उत्तम तऱ्हेने साधली आहे; त्यातून अभ्यासपूर्ण, सुंदर, सलग पट उभा राहिला आहे, असेही दिसते.

शेवटी संस्थेचे अस्तित्व - कर्तव्य - कार्य, अभ्यासूंना साहित्य उपलब्ध करून देणे.. चरित्रलेखकाची कर्तव्ये समाविष्ट केल्याने हे चरित्र वेगळे ठरते.

रोहिणी निरंजनी

  • लेखक :  वंदना बोकील-कुलकर्णी
  • प्रकाशन : राजहंस प्रकाशन, पुणे
  • किंमत : ₹    ४००
  • पाने :  ३१०

संबंधित बातम्या