सोशल मीडियाविषयी बरेच काही

तुषार रुपनवर
सोमवार, 1 जुलै 2019

पुस्तक परिचय
 

जगप्रसिद्ध न्यूयॉर्क टाईम्सपासून अमेरिकेतील आघाडीची सर्व वर्तमानपत्रे ‘न्यूज मीडिया अलायन्स’ या संघटनेचे सदस्य आहेत. या संघटनेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार गुगल व फेसबुकच्या आधारे वर्तमानपत्रांच्या वेबसाईटला ८० टक्के ऑनलाइन ट्रॅफिक अर्थात वाचक मिळतात. एकट्या गुगलने २०१८ मध्ये बातम्यांच्या आधाराने ४.७ अब्ज डॉलर कमविले. त्यासाठीचा आशय मात्र त्यांनी तयार केलेला नाही. फेसबुकसारख्या साईट्‌सचे फॉलोअर्स हे एखाद्या माध्यम संस्थेच्या वाचकांच्या तुलनेत कित्येक कोटींनी अधिक आहेत. त्यामुळे तेथील संसदेने कायदा करून या सोशल नेटवर्किंग साईट्‌सनी त्यांना बातमीच्या आधारे मिळणाऱ्या उत्पन्नातील काही हिस्सा मूळ आशय निर्माण करणाऱ्या माध्यम संस्थांना द्यावा, असा तगादा अमेरिकेतील माध्यम संस्थांनी लावला आहे. मात्र, सोशल नेटवर्किंग साईट्‌स असे प्रयत्न हाणून पाडत आहेत. सोशल मीडिया आता पारंपरिक माध्यमांवर भारी पडत असल्याची परिस्थिती या प्रकारामधून अगदी स्पष्टच होत आहे. सोशल मीडियाने माध्यमांचे लोकशाहीकरण केले, असेदेखील अलीकडे म्हटले जाते. मात्र, याच सोशल मीडियाबाबत मराठीमध्ये फार कमी लिहिले गेले आहे. ती कमतरता प्रा. योगेश बोराटे लिखित ‘सोशल मीडिया’ या पुस्तकाने भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे. 

मुळात या पुस्तकाचे मुखपृष्ठच खूप समर्पक आहे. सोशल मीडियाच्या जगात अगदी सहजच वापरल्या जाणाऱ्या हॅशटॅगचा वापर या पुस्तकाच्या विषयाला अगदीच समर्पक ठरतो. हॅशटॅगच्या भोवतीची चेहरा असणारी माणसे बिनचेहऱ्याच्या माणसांच्या गर्दीमध्ये सामावून जाण्याची प्रक्रिया हे मुखपृष्ठ वाचकांसमोर ठेवते. त्यासाठीचे कारण ठरणाऱ्या सोशल मीडियाचा हॅशटॅगसाठीचा पाया म्हणून झालेला उपयोग ते मुखपृष्ठाच्या वरच्या कडेला अगदी स्वच्छंद भासणारी गर्दी या विषयाचे वेगळेपण सहजच वाचकांना स्पष्ट करून दाखविते. या पुस्तकाला दैनिक ‘सकाळ’च्या पुणे आवृत्तीचे संपादक आणि डिजिटल पत्रकारितेविषयीचे तज्ज्ञ सम्राट फडणीस यांनी प्रस्तावना लिहिली आहे. या प्रस्तावनेमध्येच सोशल मीडिया कंपन्यांच्या आर्थिक गणितांविषयीचे संदर्भ स्पष्ट करण्यात आले आहेत. या साईट्‌सवर होणाऱ्या माहितीच्या आदान-प्रदानावर असणारे त्यांचे अवलंबित्वही त्या आधारे स्पष्ट होते. बहुमाध्यम पत्रकारिता आणि माध्यम समुच्चय या विषयाशी संबंधित संशोधक प्रा. डॉ. संजय तांबट यांनी ‘नवी दृष्टी, नवं भान’ या मथळ्याच्या आपल्या अभिप्रायामध्ये नवमाध्यम तंत्रज्ञानावर आधारित या पुस्तकाचे महत्त्व विशद केले आहे. 

सोशल मीडियाच्या सर्वसामान्य वापरकर्त्यांमध्ये सोशल मीडियाविषयीचे कमालीचे अज्ञान असल्याचे आढळून येते. त्यामुळे लेखकाने सोशल मीडिया म्हणजे काय, या मुद्द्यापासून, आंतराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांनी त्याविषयी दिलेल्या व्याख्यांपासून पुस्तकाची सुरुवात केली आहे. त्यामुळे सोशल मीडियाची नेमकी व्याप्ती काय, हे समजून घेणे सोयीचे झाले आहे. भारतातील इंटरनेट आणि त्यानंतर सोशल मीडियाचे झालेले आगमन, तंत्रज्ञानात होत गेलेले बदल आणि त्याचा परिणाम या मुद्द्यांचाही लेखकाने पुस्तकामध्ये सविस्तरपणे आढावा घेतला आहे. भारतातील सोशल मीडियाच्या वापराविषयीची रंजक आकडेवारी हे पुस्तक वाचकांसमोर मांडते. आपण सर्वच सोशल मीडियाचा वापर करत असतो, परंतु त्याची वैशिष्ट्ये आणि वर्गीकरण कसे केले जाते याची माहिती नसते. ती माहितीही या पुस्तकातून आपल्याला अगदी सोप्या भाषेत मिळते. सोशल मीडिया आणि पारंपरिक माध्यमे यांमध्ये असणारा फरक आपल्याला जाणून घेता येतो. 

सोशल मीडियाची व्यासपीठे आणि त्यांचा भारतातील प्रवास, तसेच सोशल नेटवर्किंग साईट्‌सचा झालेला प्रसार या विषयीची सविस्तर माहिती लेखकाने पुस्तकातून दिली आहे. आपण अनेकदा फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, ब्लॉग आणि यू-ट्यूब अशा सोशल नेटवर्किंग साईट्‌सचा वापर करत असतो. परंतु, त्यामधील उपलब्ध सर्वच तांत्रिक बाबींची माहिती आपल्याला असतेच असे नाही. त्यामुळे अशा व्यासपीठांवरील आशय निर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या सर्व तांत्रिक बाबींची माहिती लेखकाने अत्यंत सविस्तरपणे पुस्तकात मांडली आहे. त्यामुळे अशा तांत्रिक बाबी आणि त्यांचा वापर करण्याची पद्धत मराठी वाचकांसाठी या निमित्त उपलब्ध झाली आहे. हे पुस्तक मराठीमध्ये असले, तरी लेखकाने प्रचलित इंग्रजी संज्ञा वा शब्दांना पर्यायी मराठी शब्द वापरण्याचा अट्टाहास टाळला आहे. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, ब्लॉग, यू-ट्यूब आदी साईट्‌सचा वापर अगदी व्यावसायिक पद्धतीनेही करायचा झाल्यास काय करावे, याचे उत्तर हे पुस्तक आपल्याला देते. सोशल मीडियाच्या प्रत्येक व्यासपीठाचे एक वेगळेपण आहे. त्यामुळे त्या-त्या व्यासपीठावर खाते उघडण्यापासून ते त्या व्यासपीठावर उपलब्ध वैशिष्ट्यांपर्यंत आणि ती वापरण्याच्या पद्धतींपर्यंतची प्रक्रिया या पुस्तकामध्ये समाविष्ट आहे. त्यासाठीच्या आशयाची निर्मिती करताना काय काळजी घ्यावी, छायाचित्रे व व्हिडिओ कसे वापरावेत आदींची सविस्तर माहिती लेखकाने या पुस्तकाद्वारे वाचकांसमोर उपलब्ध करून दिली आहे. 

कार चालविणाऱ्या चालकाने जर त्याच वेगाने ट्रॅक्‍टर चालविला तर नक्कीच अपघात होणार. तसेच सोशल मीडियाचेदेखील आहे. प्रत्येक सोशल नेटवर्किंग साईट्‌सची आपली-आपली वेगळी बलस्थाने आणि फायदे-तोटे आहेत. त्यामुळे या प्रत्येक सोशल नेटवर्किंग साईट्‌समध्ये काय फरक आहे, त्याचा वापर कशासाठी करायचा असतो, आशय असावा-नसावा, फोटो, व्हिडिओ, हॅशटॅग, की-वर्डसचा वापर आदींचा प्रत्येक सोशल नेटवर्किंग साईट्‌सच्या बलस्थांनानुसार कसा वापर करावा याची समर्पक माहिती लेखकाने पुस्तकात सविस्तर स्वरूपात दिलेली आहे. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनसारख्या तांत्रिक गोष्टी, त्याचा सोशल मीडिया वापरकर्त्याला होणारा उपयोगही लेखकाने अगदी सोप्या भाषेत मांडला आहे. मुळात आपण सोशल मीडियाचा वापर का करतो याचा शोध घेण्यापासून ते अपेक्षित लक्ष्यगट काय असावा, त्यासाठी म्हणून कोणता सोशल मीडिया निवडावा, प्रभावी आशय निर्मिती कशी करावी, प्रतिसादावर कसे लक्ष ठेवावे आणि शेवटी सोशल मीडिया वापर करण्याच्या ठरविलेल्या धोरणाचा फेरआढावा कसा घ्यावा याचा सविस्तर आढावा हे पुस्तक आपल्यासमोर मांडते. सोशल मीडिया वापरासाठीचे धोरण समजावून सांगताना त्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या टप्प्यांचे हे संपूर्ण चक्र लेखकाने पुस्तकात सविस्तरपणे दिलेले आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या प्रत्येकासाठी, त्या विषयीची जिज्ञासा असणाऱ्यांसाठी आणि अंतिमतः माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठीही हे पुस्तक एक उपयुक्त दस्तऐवज ठरणार आहे. 

संबंधित बातम्या