वेध वादळी व्यक्तिमत्त्वाचा!

उदय हर्डीकर
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

पुस्तक परिचय
इंदिरा गांधी एक वादळी पर्व 
लेखक ः माधव गोडबोले 
प्रकाशक ः राजहंस प्रकाशन, पुणे
किंमत ः ३५० रुपये    
पाने ः २८५ 
 

भारतीय राजकारणात इंदिरा गांधी यांचे नाव अटळ आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू हे त्यांचे वडील. स्वतः नेहरू देशात विलक्षण लोकप्रिय आणि जगभरात त्यांना मान होता. त्यांचे सहकारीही त्याच तोलामोलाचे. अशा वातावरणात इंदिरा गांधी वाढल्या आणि राजकारणात आल्या. पंडित नेहरू यांची पंतप्रधानपदाची कारकीर्द १७ वर्षांची, तर इंदिरा गांधी यांची कारकीर्द दोन टप्प्यांत १६ वर्षांची होती. 

राजकारणात काही नेते, व्यक्तींबद्दल कुतूहल कायम असते. मग त्या व्यक्ती हयात असोत, वा नसोत. अशा व्यक्तींमध्ये इंदिरा गांधी यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. सत्तेच्या सर्वोच्च, म्हणजे पंतप्रधान पदावर सोळा वर्षे राहिलेल्या इंदिरा गांधी यांचे आयुष्य विलक्षणच म्हणावे लागेल. तत्कालीन पश्‍चिम पाकिस्तानच्या जोखडातून पूर्व पाकिस्तानची मुक्तता करून आताचा बांगलादेश जगाच्या नकाशावर आणणे, अन्नधान्योत्पादनात स्वयंपूर्णता मिळवणे, पहिला अणुस्फोट घडवणे आदी सकारात्मक घटना त्यांच्याच कारकिर्दीत घडल्या. पण त्याच वेळी देशावर लादलेली आणीबाणी, स्वतःच्या फायद्यासाठी केलेले कायदे आदी नकारात्मक बाबीही त्यांच्याच खात्यावर जमा आहेत. इंदिरा गांधी नेमक्‍या होत्या तरी कशा ? याची उत्सुकता शमवणारे ‘इंदिरा गांधी- एक वादळी पर्व’ हे पुस्तक आता वाचकांचे कुतूहल शमविण्यास आले आहे. केंद्र सरकारचे माजी गृह आणि न्यायसचिव माधव गोडबोले यांनी हे पुस्तक लिहिले असून, पुण्याच्या राजहंस प्रकाशनाने ते प्रकाशित केले आहे. इंदिरा गांधी यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांचा वेध माधव गोडबोले यांनी या पुस्तकात घेतला आहे. 

पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांची कारकीर्द दोन टप्प्यांत झाली. १९ जानेवारी १९६६ ते २३ मार्च १९७७ आणि १४ जानेवारी १९८० ते ३१ ऑक्‍टोबर १९८४ असे हे दोन टप्पे आहेत. पुस्तकाचा प्रारंभ होतो तो सुवर्ण मंदिरात झालेल्या ‘ब्ल्यू स्टार’ कारवाईच्या माहितीपासून. जर्नेलसिंग भिंद्रनवालेच्या उदयापासून ‘ब्ल्यू स्टार’ मोहिमेपर्यंतची माहिती या प्रकरणात येते. पंजाबात खलिस्तान चळवळ मूळ धरू लागली आणि त्याचे हिंसक परिणाम दिसू लागले. केंद्र सरकारने तेव्हाच सावध होऊन बंदोबस्त करणे आवश्‍यक होते. पण तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री झैलसिंग आणि पंजाबचे तेव्हाचे मुख्यमंत्री दरबारसिंग यांच्यातील शह-काटशहाच्या राजकारणात ते झाले नाही. मात्र, डोक्‍यावरून पाणी जायची वेळ आल्यावर ‘ब्ल्यू स्टार’ कारवाईला तीन जून १९८४ रोजी प्रारंभ करण्यात आला आणि आठ जूनला ती संपली. ३१ ऑक्‍टोबर १९८४ रोजी पंतप्रधानपदी असतानाच इंदिरा गांधी यांची हत्या झाली. या संदर्भातील सगळ्या घडामोडींचा परिचय या प्रकरणात होते. 

‘बांगलादेशाचा मुक्तिसंग्राम’ हा इंदिरा गांधी यांच्या कारकिर्दीतील एक शिरपेच मानावा लागेल. ‘बांगलादेश निर्मिती-रणचंडी दुर्गा’ या प्रकरणात या संदर्भातील घटना आणि घडामोडी वाचायला मिळतात. भारताची फाळणी होऊन पाकिस्तान जन्माला आला, पण त्याचे पश्‍चिम आणि पूर्व असे दोन भाग होते. पश्‍चिम म्हणजे आजचा पाकिस्तान आणि आजचा बांगलादेश म्हणजे तत्कालीन पूर्व पाकिस्तान. पाकिस्तानच्या जन्मापासूनच पश्‍चिमेचे पूर्वेवर वर्चस्व होते. १९७१ च्या निवडणुकीत पूर्व पाकिस्तानात मुजिबूर रेहमान यांच्या अवामी लीगला बहुमत मिळाले होते, तर पश्‍चिमेत झुल्फिकार अली भुट्टो यांच्या ‘पाकिस्तान पीपल्स पार्टी’ला (पीपीपी). पश्‍चिमेचे सत्ताधीश याह्या खान यांनी मुजिबूर यांनाच अटकेत टाकले आणि सैन्याचा वापर सुरू केला. त्यातून पश्‍चिम-पूर्व संघर्ष पेटला. सैन्याच्या अत्याचारांमुळे बांगलादेशी निर्वासित भारतात आश्रयाला येऊ लागले. एवढ्या लोकांना पोसणे भारताला शक्‍य नव्हते. या संदर्भात इंदिरा गांधी यांनी जगभरात जनजागृती केली. पण तेव्हा अमेरिकेत भारतद्वेष्टे रिचर्ड निक्‍सन अध्यक्ष होते आणि त्यांचा भारतावरच नव्हे, तर इंदिरा गांधी यांच्यावरही राग होता. त्यामुळे भारताच्या आवाहनाला त्यांच्याकडून प्रतिसाद मिळण्याची शक्‍यता नव्हती. अखेर पाकिस्ताननेच भारतावर हल्ले करून युद्धाला तोंड फोडले आणि जगाला इंदिरा गांधी यांचे रणचंडी दुर्गा रूप दिसले. भारतीय लष्कराने सगळ्याच आघाड्यांवर पाकिस्तानला नामोहरम केले आणि अखेर १६ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानला शरणागती पत्करावी लागली. जगाच्या नकाशावर बांगलादेश हे स्वतंत्र राष्ट्र अस्तित्वात आले. भारताने लष्करी विजय मिळवला, पण राजनैतिक पातळीवर मात्र आपण हरलो असेच म्हणावे लागेल, असे या प्रकरणातील घडामोडी वाचताना वाटते. युद्धानंतर दोन जून १९७२ रोजी सिमला करार झाला. त्यानुसार, भारताने जिंकलेला पश्‍चिम पाकिस्तानचा सुमारे पाच हजार चौरस मैल (१२ हजार ८०० चौरस किलोमीटर) पाकिस्तानला परत करण्यात आला. जेमतेम ४०० चौरस मैल (१०२४ चौरस किलोमीटर) भूभाग भारताने स्वतःकडे ठेवला. या सगळ्या घडामोडी व त्याचे अन्वयार्थ समजून घ्यायला हे सगळे प्रकरण वाचायलाच हवे. 

‘आणीबाणी- भय इथले संपत नाही!..’ हे सर्वांत महत्त्वाचे प्रकरण वाटते. देशात अत्यंत अस्थैर्य निर्माण होणे किंवा परकीय आक्रमण होण्यासारख्या स्थितीत आणीबाणी लागू होऊ शकते. पण तसे काही नसताना इंदिरा गांधी यांनी देशात २५ जून १९७५ रोजी एकदम आणीबाणी जाहीर केली आणि नंतर देश भयाच्या सावटाखालीच गेला. काही बोलायची चोरी होती आणि वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य लयास गेले होते. या प्रकरणात त्या काळ्या कालखंडाची माहिती मिळते. आणीबाणी लागू करण्यामागे अलाहाबाद उच्च न्यायालयाचा १२ जून १९७५ चा निकाल कारणीभूत असावा. या निकालानुसार, न्यायालयाने इंदिरा गांधी यांची रायबरेली लोकसभा मतदारसंघातील निवडणूक रद्द ठरविली होती. एवढेच नव्हे, तर त्यांना निवडणूक लढविण्यास सहा वर्षे बंदीही घातली होती. इंदिरा गांधींव्यतिरिक्त त्यांचे पुत्र संजय आणि अन्य काही सल्लागारांचे एक वर्तुळच देशावर राज्य करत होते. विद्याचरण (व्ही. सी.) शुक्‍ला आणि बन्सीलाल हे नेते त्याच काळात प्रसिद्धीला आले. मात्र, या प्रकरणाच्या समारोपात ज्येष्ठ विधिज्ञ फली नरिमन यांनी म्हटल्याप्रमाणे, आणीबाणीच्या काळात सर्व घटनात्मक अधिकारी संस्थांनी व ती पदे भूषविणाऱ्या व्यक्तींनी देशाची निराशा केली. 

इंदिरा गांधी यांची प्रवृत्तीवर भाष्य करणारे ‘स्वतःच्या सोयीचे कायदे व राज्यघटनेत मूलभूत बदल’ हे प्रकरण आहे. या सगळ्या कायद्यांपैकी अंतर्गत सुरक्षा कायदा (मेंटेनन्स ऑफ इंटर्नल सिक्‍युरिटी ॲक्‍ट-मिसा) हा सर्वांत धोकादायक होता. आणीबाणीच्या काळात याच कायद्याखाली हजारो लोकांना अटक करून कैदेत ठेवण्यात आले होते. या शिवाय अंतर्गत सुरक्षा कायदा (दुसरी दुरुस्ती), भारत संरक्षण विधेयक, निवडणूक कायदे (सुधारणा विधेयक) आदी काही महत्त्वाच्या कायद्यांचा ऊहापोह आणि माहिती या प्रकरणात आहे. 

एका मोठ्या राजकीय व्यक्तिमत्त्वाचा आढावा घेणारे हे पुस्तक अत्यंत वाचनीय आहे. माधव गोडबोले यांनी काही ठिकाणी तळटीपा देऊन शंकानिरसनही केले आहे. मात्र, पुस्तकात एकही छायाचित्र नाही. काही महत्त्वाच्या प्रसंगांची छायाचित्रे असती, तर ते आणखी चांगले ठरले असते. इंदिरा गांधी यांच्याबाबतच कुतूहल अजून कायम आहे. ते पूर्ण करण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल, हे निश्‍चित. 

संबंधित बातम्या