बिबट्या का आला दारी?

उदय हर्डीकर
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

पुस्तक परिचय
 

संघर्ष ही नवी बाब नाही आणि तो माणसांतच असतो असेही नाही. माणूस आणि प्राणी यांच्यातही संघर्ष होतोच. पूर्वी तो होता, आजही आहे. भविष्यात प्राणी उरलेच, तर तो सुरू राहणार यात शंका नाही. सध्या देशात, विशेषतः महाराष्ट्रात माणूस-प्राणी हा वाद टोकाला जायच्या स्थितीत आला आहे. विदर्भ परिसरात वाघ आणि पश्चिम महाराष्ट्रात बिबट्यांच्या बातम्यांना वृत्तपत्रे आणि वाहिन्यांवर स्थान मिळताना दिसते. ऊसतोडणीचा हंगाम सुरू झाला, की बिबट्यांचे हल्ले, त्यांचे बछडे सापडणे या बातम्या जणू! पण का अशी वेळ येतीये, याचा विचार करायला हवा. निवृत्त साहाय्यक वनसंरक्षक प्रभाकर कुकडोलकर यांचे ‘बिबट्या आणि माणूस ः वन्य प्राण्यांचा जीवनसंघर्ष’ हे पुस्तक त्याचा विचार करण्यास उद्युक्त करते. ज्योत्स्ना प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

वनाधिकारी म्हणजे कायम वाघ-बिबट्यांबरोबर सामना आणि धाडसाची कामे असा सर्वसामान्यांचा समज असतो. काही अंशी तो खराही आहे. पण जंगल म्हणजे केवळ वाघ-बिबटे नाही. सूक्ष्म कीटकापासून सगळे त्यात येतात. 

निसर्गविषयक किंवा जुन्या शिकारकथांचे वाचन केल्यावर एक गोष्ट सहज लक्षात येते. ती म्हणजे सगळीकडे खलनायकाची भूमिका बिबट्या निभावतो, किंबहुना त्याला ती बहाल केली जातेच! त्याला कारण आहे बिबट्याचा धूर्त, काहीसा उग्र स्वभाव. खरे तर आजच्या जगात जगायला बिबट्याएवढा लायक प्राणी आढळणार नाही. वाघाच्या तुलनेत दुय्यम असलेला बिबट्या निर्विवाद विजेता होण्याच्या मार्गावर आहे. तो आघाडीवर आहे तो त्याच्या या हुशारीमुळेच.

अर्थात, मिळेल ते, मिळेल तेव्हा घेणे आणि कसलेही यम-नियम न बाळगता स्वतःचा फायदा पाहणे हे बिबट्याचे फार अनमोल गुण आहेत. जंगले कमी होत आहेत तसे भक्ष्य असलेले प्राणी घटत चालले आहेत. हुशार बिबट्याने गावांचा शेजार निवडला आणि शेळ्या, बकऱ्या, मेंढ्या, कुत्र्यांपासून कोंबड्यांपर्यंत मिळेल त्या प्राण्याचा आहारात समावेश केला. सध्याच्या स्थितीत उसाचे वाढते क्षेत्र तर बिबट्यांच्या पथ्यावरच पडले. भरपूर गचपण, भरपूर पाणी आणि खाद्याची तशी कमतरता नाही म्हटल्यावर बिबट्यांनी उसातच घर मांडून संसार सुरू केले. ऊस उभा असतो, तोवर बिबट्याचे अस्तित्व लक्षात येत नाही. तोडणीची वेळ आली, ती सुरू झाली की माणसांची हालचाल सुरू होते आणि तोडणी कामगार बिबट्याच्या घरापाशीच आल्यावर संघर्षाची ठिणगी पडते. मग कोणी जखमी होतो, तर क्वचित कोणी प्राण गमावतो. मग ओरडा सुरू होतो तो बिबट्याने निर्माण केलेल्या दहशतीचा.

कुकडोलकर यांचे हे पुस्तक या परिस्थितीचा पाठपुरावा करते आणि केवळ प्रश्न न मांडता त्यावरचे उपायही सुचविते. स्वतः कुकडोलकर हे अनुभवी वनाधिकारी आहेत. पुण्यात कर्वे रोडवर आलेल्या बिबट्याला आणि भारती विद्यापीठाच्या परिसरात घुसलेल्या गव्याला पकडण्याचा मोठा अनुभव त्यांच्याकडे आहे. भारती विद्यापीठाच्या आवारात आलेल्या गव्याला पकडण्याचा अनुभवही थरारक होता आणि त्याला पुन्हा त्याच्या अधिवासात सुखरूप सोडण्याचा आनंदही होता. तेव्हाच्या टेल्को कंपनीत मुक्कामाला आलेल्या बिबट्यानेही एक वेगळाच अनुभव दिला होता.

या पुस्तकात केवळ बिबट्याच नव्हे, तर रानडुकरांच्या, कृष्णा नदीतील मगरींच्या प्रश्नांचाही उल्लेख आहे. तृणभक्षी प्राण्यांवर नियंत्रण ठेवून जंगलाचे पर्यावरण अबाधित ठेवण्याची महत्त्वाची भूमिका शिकारी प्राणी बजावतात. पण हिंस्र या नावाखाली त्यांचा संहार केला, तर तृणभक्षी प्राण्यांचे नैसर्गिक नियंत्रक संपतात आणि त्यांची संख्या वाढून शेतीला उपद्रव वाढतो. हरणे गोंडस, देखणी वगैरे असली, तरी त्यांची शेतावर धाड पडल्यावर शेतकरी रडकुंडीलाच येतो. तेच रानडुकरांबाबत. थोडक्यात काय, तर निसर्गाने कोणत्याही प्रजातीला बलिष्ठ होऊ दिलेले नाही. प्रत्येकावर एक नियंत्रक आहेच. या पुस्तकात अशा मुद्द्यांवर चर्चा आहे आणि ती महत्त्वाची वाटते. बिबट्याचा उपद्रव, वावर वाढल्यावर त्याला पिंजऱ्यात टाका किंवा सरळ ठार करा अशी मागणी जोर धरते. पण हे एवढे सोपे नाही. त्यासाठीही नियम-अटींच्या अधीन राहून कार्यवाही करावी लागते. गेल्या काही वर्षांत वन खात्याने बिबट्यांवर विशेष लक्ष केंद्रित करून त्यांना वाचविले आहे. जुन्नरजवळचे माणिकडोह येथील ‘बिबट निवारा केंद्र’ हे त्याचे उदाहरण आहे. वनाधिकारी-कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नांतून हे केंद्र आज उत्तमरीत्या कार्यरत आहे. त्याचा परिचयही या पुस्तकात करून देण्यात आला आहे.

पुस्तकाची निर्मिती उत्तम आहे. आकर्षक मुखपृष्ठ आणि गोपाळ नांदुरकर यांनी आतील पानांत काढलेली चित्रे या पुस्तकाला उठाव देतात. वन्य प्राणीही आपल्याच सृष्टीचे भाग आहेत आणि मानव-प्राणी सहजीवन शक्य आहे, हेच हे पुस्तक सांगते.

संबंधित बातम्या