चंदन तस्कराच्या मागावर

उदय हर्डीकर
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

पुस्तक परिचय

चोर-पोलिसांचा खेळ अनादी काळापासून सुरू आहे. भूतकाळात तो होता, वर्तमान काळात तो आहे आणि भविष्य काळातही तो चालू राहील. गुन्हेगारांना रोखण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस दलाची निर्मिती झाली. सर्वसामान्य माणसे पापभीरूच असतात, पण काही मात्र त्यापलीकडे असतात. तस्करी, खून, मारामाऱ्या वगैरे विघातक बाबींकडेच त्यांचा कल असतो. काही नामचिन गुन्हेगार स्वतःला कायद्याच्या वर समजू लागतात. अशा गुन्हेगारांना कधीच शिक्षा होणार नाही अशी भावनाही मनात येते. मात्र, गुन्हेगारांना केव्हा ना केव्हा शिक्षा मिळतेच.

हस्तिदंत आणि चंदनाच्या तस्करीमुळे कुख्यात झालेल्या वीरप्पनचे असेच झाले. तमिळनाडू, कर्नाटक आणि काही प्रमाणात केरळ या तीन राज्यांत धुमाकूळ घालणारा, पोलिस, वनखाते आणि राजकारण्यांनी त्राही भगवान करून सोडणार हा तस्कर कधी कायद्याच्या कचाट्यात सापडेल आणि त्याला गुन्हेगारी कृत्यांची किंमत चुकवावी लागेल असे वाटत नव्हते. पण तमिळनाडू पोलिस दलातील के. विजयकुमार या धाडसी अधिकाऱ्याने त्याच्या सहकाऱ्यांसह ते खरे करून दाखविले. याच अनुभवावर त्यांनी पुस्तक लिहिले आणि त्याचा मराठी अनुवाद ‘वीरप्पन विरुद्ध विजयकुमार’ या नावाने प्रसिद्ध झाला आहे. राजहंस प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या या पुस्तकाचा अनुवाद डॉ. सदानंद बोरसे यांनी सरस केला आहे.

पोलिस दलात अशी काही जिगरबाज माणसे असतात, की ती गुन्हेगारांचा; म्हणजे त्यांच्या लक्ष्याचा पाठलाग आणि माग सोडत नाहीत. ही माणसे अपयशाने खचत नाहीत आणि यशाने हुरळून जात नाहीत. के. विजयकुमार हे अशा अधिकाऱ्यांपैकी एक. पोलिस दलातील अत्यंत महत्त्वाची पदे त्यांनी सांभाळली, त्याचबरोबर सीमा सुरक्षा दलातही (बीएसएफ) त्यांनी काम केले. जम्मू-काश्‍मीरमध्ये हिंसाचार ऐन भरात असताना विजयकुमार तेथे कार्यरत होते आणि आपल्या जवानांपुढे राहून दहशतवाद्यांविरुद्ध मोहिमांचे नेतृत्व करत होते. त्याहीपेक्षा मोठी बाब म्हणजे पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या ‘क्‍लोज प्रोटेक्‍शन ग्रुप’मध्येही (सीपीजी) ते होते. त्यांच्याच भाषेत सांगायचे, तर ते तेव्हा अक्षरशः पंतप्रधानांची सावली होऊन वावरत होते.

वीरपप्पनने तमिळनाडू आणि कर्नाटकात धुमाकूळ घातला होता. त्याला आवरण्याचे पोलिसांचे प्रयत्न अपुरे पडत होते. प्रसारमाध्यमांनी पोलिसांवर टीकास्त्र सोडले होते. या काळात विजयकुमार काश्‍मीर आणि नवी दिल्लीत काम करीत होते. मात्र तमिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांच्या एका फोनमुळे विजयकुमार यांना संधी चालून आली. वीरप्पनच्या बंदोबस्तासाठी विशेष कृती दल (स्पेशल टास्क फोर्स-एसटीएफ) स्थापण्याचा निर्णय जयललिता यांनी केला होता. या दलाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी विजयकुमार यांच्यावर सोपविण्यात आली. वीरप्पनबरोबरच्या सामन्याची माहिती म्हणजेच ‘वीरप्पन विरुद्ध विजयकुमार’ हे पुस्तक. एक खतरनाक, कसलीही दयामाया नसलेला गुन्हेगार आणि दुसरा कायद्याच्या चौकटीत राहून कार्यवाही करणारा अधिकारी असा हा सामना होता. या सामन्याचे मैदान होते घनदाट जंगले आणि खडतर भूप्रदेश. त्यात उंच डोंगर होते, जळवांनी भरलेली झाडी होती आणि पाण्याचे वेगवान प्रवाहही. शिवाय हे मैदान तीन राज्यांत पसरलेले. मात्र, कोणत्याही अडचणींची तमा न बाळगता, तक्रारी न करता विजयकुमार आणि त्यांचे तेवढेच जिगरबाज सहकारी वीरप्पनचा माग काढत राहिले आणि अखेर तब्बल वीस वर्षे चाललेला हा सामना वीरप्पनला ठार करूनच संपला.
कुसे मुनीस्वामी वीरप्पन. जन्म १८ जानेवारी १९५२. तो मारला गेला १८ ऑक्‍टोबर २००४ रोजी. जेमतेम ५२ वर्षांच्या आयुष्यात त्याने केली फक्त कुकर्मेच. घनदाट जंगलाने वेढलेल्या गोपीनत्तम नावाच्या गावचा तो रहिवासी. तेथील लोक शिक्षणवगैरेच्या फंदात न पडता जंगलात घुसून उपजीविका करीत. वीरप्पनही त्यातलाच. त्याने मात्र दातांसाठी हत्तींची कत्तल सुरू केली आणि सोबत चंदनाची तस्करी. चंदन आणि हस्तीदंतांतून भरपूर पैसा मिळायला लागल्यावर त्याची टोळी वाढू लागली आणि वन खात्याबरोबरच पोलिसांचेही त्याच्याकडे लक्ष गेले. तेथून वीरप्पनचा दहशतवादी प्रवास सुरू झाला. या सावजाला पकडण्यासाठी वेगवेगळे सापळे लावण्यात आले, आमिषे दाखविली गेली, पण वीरप्पन बधला नाही. अनेकदा ‘एसटीएफ’ आणि त्याच्या टोळीची थोडक्‍यात चुकामूक झाली, तर कधी आमनेसामने गोळागोळी. या सगळ्याची कहाणी विजयकुमार यांनी सांगितली आहे. त्यांच्यावर प्रभाव आहे तो वॉल्टर दावारम या त्यांच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचा. दावारम पुढे ‘एसटीएफ’चे पहिले प्रमुख झाले. ते स्वतः उत्कृष्ट नेमबाज होते आणि वीरप्पनला संपवायचेच असा त्यांचा निर्धार होता. हाताखालच्या जवानांची काळजी ते घेतच असत. अशा या अधिकाऱ्याबरोबर काम करताना विजयकुमार यांना खूप शिकायला मिळाले आणि अनुभवही आला.

वीरप्पनविरुद्धची मोहीम साधी नव्हती. एका पाताळयंत्री, निष्ठुर आणि जंगलप्रदेशाची पुरेपूर जाण असलेल्या एका माणसाबरोबरचा तो सामना होता. वीरप्पनच्या निर्दयीपणाचे एक उदाहरण पुस्तकात आहे. स्वतःच्या तान्ह्या मुलीला त्याने विष देऊन मारण्याची आज्ञा तिच्या दाईला दिली होती. कारण काय, तर पोलिस त्याच्या मागावर असताना बाळ रडल्यास दडण्याच्या जागेचा पत्ता पोलिसांना समजेल! अशा या क्रूरकर्म्याबरोबर पोलिसांचा सामना होता. कौतुकाची गोष्ट अशी, की ‘एसटीएफ’मध्ये येण्यासाठी तरुणांबरोबरच अनुभवी अधिकारीही उत्सुक होते. मात्र, या मोहिमेत ‘एसटीएफ’ला काही महत्त्वाचे मोहरे गमवावेही लागले. पोलिस अधीक्षक हरिकृष्ण, त्यांचा सहकारी शकील अहमद ही नावे प्रथम येतात. पण ९ एप्रिल १९९३ रोजी वीरप्पनने दिलेला तडाखा पोलिसांच्या जिव्हारी लागला. त्याचदिवशी वीरप्पनने तमिळनाडू पोलिस दलातील अधीक्षक के. गोपालकृष्णन ऊर्फ रॅम्बो यांच्यासह २२ पोलिसांना भीषण स्फोटात ठार केले. त्यानंतर लगेच ‘एसटीएफ’ स्थापण्याचा निर्णय झाला आणि वॉल्टर दावारम त्याचे पहिले प्रमुख म्हणून नियुक्त झाले. त्यांनी वीरप्पनविरुद्ध धडाक्‍याने कारवाई सुरू केली, पण यश मिळत नव्हते.

ज्येष्ठ कन्नड अभिनेते डॉ. राजकुमार यांचे अपहरण हा वीरप्पनच्या दहशती कारवाईचा कळस म्हणावा लागेल. वृद्ध डॉ. राजकुमार यांच्या अपहरणामुळे कर्नाटकात खळबळ उडाली. डॉ. राजकुमार यांच्या सुटकेसाठी वीरप्पनने केलेल्या मागण्या ऐकून सगळेच अचंबित झाले. त्यांच्या सुटकेसाठी ‘नक्कीरन’ गोपाल या पत्रकाराची नियुक्ती करण्यात आली. पुढे डॉ. राजकुमार यांचीही सुटका झाली. हे सगळे मुळातून वाचणे जास्त श्रेयस्कर.

विजयकुमार आणि वीरप्पन यांचा अखेरचा सामना झाला १८ ऑक्‍टोबर २००४ रोजी. ‘ककून’ या वाहनाने त्यात मोलाची कामगिरी बजावली. ‘ककून’ म्हणजे एक पोलिसांच्याच वाहनाचे रूपांतर केलेली एक रुग्णवाहिका होती. डोळ्यांच्या दुखण्यामुळे वैतागलेल्या वीरप्पनला ‘एसटीएफ’ने बरोबर सापळ्यात घेतला आणि जंगलाबाहेर तो येईल अशी व्यवस्था केली. सापळ्यात येताच, त्याला प्रथम शरण येण्याचे आवाहन करण्यात आले. पण वीरप्पन आणि त्याचा सर्वांत विश्वासू साथीदार गोविंदन यांनी ‘एके-४७’मधून थेट गोळीबार सुरू केला, मग पोलिसांनी त्यांना सोडले नाही. हत्तींचा आणि चंदनाचा कर्दनकाळ वीरप्पन अखेर संपला.

हे थरारक प्रकरण पुस्तकातच वाचावे असे.
डॉ. सदानंद बोरसे यांनी अतिशय सरस अनुवाद केला आहे. सतीश भावसार यांनी केलेले पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि आतील मांडणी ‘राजहंस’च्या दर्जेदार परंपरेला साजेशी. आतील छायाचित्रेही छान. सोबत अखेरच्या चकमकीचा ढोबळमानाने नकाशाही असल्यामुळे तो थरारक प्रसंग कसा घडला असावा, याची कल्पना येते. वीरप्पन नामक सैतानाने काय कारवाया केल्या आणि एका जिगरबाज अधिकाऱ्याने त्याचा कसा खात्मा केला हे समजून घेण्याचे कुतूहल असेल, तर हे पुस्तक नक्कीच संग्रही हवे.

  • वीरप्पन विरुद्ध विजयकुमार
  •  लेखक ः के. विजयकुमार
  •  अनुवाद ः डॉ. सदानंद बोरसे
  •  प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे 
  •  किंमत ः ३३० रुपये.
  •  पाने : २८७ 

संबंधित बातम्या