अप्रतिम गुंफण!

उदय सुभेदार
शुक्रवार, 31 डिसेंबर 2021

पुस्तक परिचय

सर्वसाधारण व्यक्तीला सामान्यतः एका अंतरावरूनच परिचित असलेल्या शास्त्रीय संगीत या विषयावर एक नैसर्गिक, तरल, भावनिक तसेच सांगीतिक सांगड घालणारे नेहा लिमये लिखित ‘अनुनाद’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. 

जवळपास पंचेचाळीस राग, त्यांचे स्वर, स्वभाव, त्याचा आपल्या मनावर व बुद्धीवर होणारा परिणाम, निगडित आठवणी, प्रसंग, निसर्ग व अशा अनेक बाबी ‘अनुनाद’ या वेगळ्याच अशा पुस्तकात वाचकांसमोर येतात. दिवसाचे सगळे प्रहर, कामाच्या ठरलेल्या वेळा, दैनंदिन घटना, वैयक्तिक सवयी, अनुभव, व्यक्ती, ठिकाणे, प्रसंग, माणसे, मंदिरे, देव... एक ना अनेक अशा या सर्व बाबी आपल्या रोजच्या आयुष्यात असतातच. त्यांचा संगीताशी असलेला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध उलगडून दाखवण्याचे काम हे पुस्तक चोख करते. चीजा, ठुमरी, सिनेसंगीत, नाट्यसंगीत, वाद्यसंगीत, भावगीत, लोकसंगीत या सर्वांना स्पर्श करणारे आपले संगीतातले राग आपल्या मनात आपल्या नकळत कसे विहरत असतात याची अनेक सुंदर उदाहरणे या पुस्तकात जागोजागी दिलेली आहेत. 

वेगवेगळे राग मनाला कसे स्पर्श करतात याचा अनुभव हे पुस्तक वाचल्याशिवाय येणार नाही. विविध रागरूपे वाचून प्रत्येकाचे स्वरूप वाचकांच्या मनासमोर उभे राहते – जसे नीट ऐकूनही काहीतरी नक्कीच निसटले आहे, हे दाखवणारा व पहाटे पहाटे दोन अश्रू ओघळायला लावणारा आणि तरीही एखादे कोडे सहजरीत्या उकलणारा ‘ललत’. त्याग व भोग हे एकाच वेळी असणारा, विरक्तीतली आसक्ती दाखवून आत्मभान जागवणारा, प्रेमाचे दुसरे नाव समर्पण आहे हे सांगणारा ‘भैरव’. सूर्याच्या तेजाला सुरांचे दान देणारा, स्वरमंडलाच्या तारा कवचकुंडलांसारख्या वागवणारा गंभीर, धारदार, निर्मळ व मंगल असा ‘तोडी’. दुःख न विसरू देता आपल्याला स्वतःकडे त्रयस्थ वृत्तीने बघायला शिकवणारा, एका अंधाऱ्या गुहेसारखा भासणारा ‘जोगिया’. शृंगार, भक्ती, करुण हे रस तसेच लबाड, खट्याळ असा लाघवीपणा, असे सगळे भावविश्वच आपल्या मोठ्या पटलावर दाखवणारा, विस्तीर्ण महासागरासारखा, तळ न दिसू देणारा, थांग न लागू देणारा आरडींचा लाडका ‘खमाज’. ध्यान का ध्यान असलेला व प्रणय तसेच भक्तीव्यापी व कानसेनांना सदैव आपल्या ऋणात ठेवणारा ‘यमन’. एक प्रेमिक, कायम तहानलेला, विरहातही शांत राहणारा, जिथे नियतीने आणले आहे तेच सत्य समजणारा ‘पहाडी’. अधूरा, असीम, अस्फुट, पूर्णविरामच विसरायला लावणारा, जीवनाचे तत्त्वज्ञान समजावून सांगणारा ‘मारवा’. प्रेमभाविनी, दु:खरंजनी, शांतता व कारुण्यमयी ‘भैरवी’. 

आपले आयुष्य, त्यातील प्रसंग आणि त्यातून संगीत स्वर आपल्या मनात कसे रुंजी घालतात हे मुळातून वाचण्यातच खरी गंमत आहे. सकाळचा वारा, घराची खिडकी, धूपवलय, बाल्कनीच्या दारातून दिसणारा रस्ता, त्यावरील झाडे, आणि तो प्रकाश-सावलीचा खेळ जणू एखाद्या रागाचे स्वरच खेळत असावेत. फुले, रांगोळ्या, सुख, दुःख, खस्ता, आपल्या माणसाची आवड-निवड, आणि या सगळ्यात उमटत राहणारे सूर. गाभारा, समई, धूप, शिवलिंग, नंदीचे डोळे, निरांजनाचे ओवाळणे आणि सुरांची ऐकू येणारी सिद्ध आस, कातरवेळ, पक्ष्यांचे थवे, हुरहूर, शुक्राची चांदणी, नदीवरचा पूल- सोसणे, तुटणे आणि तशातच आपला एक वेगळाच सुगंध घेऊन येणारे ते दुःख, वेड्या मनाला पडणारी स्वरांची हूल!

सध्या आजूबाजूला दिसते तसे, नियम-अटी घेऊन येणारे सापेक्ष प्रेम आठवण करून देते एक निरपेक्ष अशा प्रेमाची आणि मग विहरत येतात स्वर.  गृहिणीची सकाळच्या स्वयंपाक-डब्याची धावपळ, मग कामावर जायची तयारी, गाडी चालवताना सहप्रवासी होणारे स्वर. गर्दी, सिग्नल, हॉर्न यांची तमा न बाळगता पाझरणारे स्वर. आपली स्वप्ने, आसक्ती, मनोव्यापार, नात्यांचा गुंता, स्वतःशीच असलेले पण विसरलेले नाते, यातून जास्तच आवडणारे व जवळचे वाटणारे स्वर. 

विठ्ठलाची वारी, टाळ, मृदंग, चिपळ्या, यातून समाधान घेऊन येणारे स्वर. एखाद्या रागावरून आठवणारी आजी, तिचे गुण, सौंदर्य, माया हे सगळे मनाला वेढून जाते. आजी-आजोबांचे  एव्हरग्रीन प्रेम आणि त्यांची शिकवणूक! जुन्या वेगवेगळ्या आठवणी जशा भावना मनात जगवतात तसेच स्वरांचे  असते. कॉलेज, कॅंटीन, गुलमोहर, प्रेमीजीव, त्यांचा रुसवा-फुगवा, भेटी, उसासे आणि मग येणारा विरह-शीण आणि थकवा यातून प्रतीत होणारी विरहिणी बागेश्री! रेडियो, पोळपाट, आंघोळीच्या पाण्याचा आवाज, कुकरची शिट्टी, घरातले संवाद आणि त्यातच कानात उभा राहणारा तोडी!

पुस्तकामध्ये अशा अगणित असंख्य, छोट्या-मोठ्या, नव्या-जुन्या, आवडत्या-नावडत्या प्रसंग-आठवणीतून उलगडणारे नातेसंबंध, नव्या-जुन्या व्यक्ती, त्यांचे आपल्याला सापडणारे नवे आयाम व संदर्भ आणि वेगवेगळ्या स्वभावांचे आपल्या भावविश्वाला नेहमीच समृद्ध करणारे रागस्वर यांची आपल्या आयुष्याशी गोफलेली गुंफण केवळ अप्रतिम अशीच आहे. डमरू, सतार, सरोद, सनई, व्हायोलिन, सारंगी, बालगंधर्वांची छबी, हरिप्रसदांचा भास, दिलरुबा, तंबोरा, पेटी, गिटार, यांची सुंदर रेखचित्रेही मनमोहक आहेत. रागसंगीत व आयुष्य यांची थेट सांगड घालणारा हा resonance -अनुनाद. राग हा एक विविध मूड असलेल्या व्यक्तीसारखा आहे, ही कल्पनाच किती पटणारी आहे. जशी व्यक्ती समजून घ्यावी लागते तसेच कुठलाही रागही. तसेच एखादा राग समजून घ्यायच्या पूर्वी त्यातले माणूसपणही! सरलता व गूढत्व असा लपंडाव सहजी साध्य असलेली लेखिकेची भाषा, सर्व लेखांतील शोधक व तरीही सौंदर्यदर्शक हाताळणी या प्रमुख बाबींमुळे हे पुस्तक शानदार व वाचनीय झाले आहे. रागांतील माणूसपण समजावून सांगण्यात लेखिका पूर्णपणे यशस्वी झाली आहे. तसेच शास्त्राचा भाग जरी ऑप्शनला टाकला, तरीही रागांची मोहिनी आपल्या मनावर गारूड करतेच. ते गारूड म्हणजेच हा ‘अनुनाद’. संगीत, मानवी मन व आयुष्य यातील resonance! रागस्वरातील काय, पण मानवी मनातील गुपितेही उघडी करण्याची क्षमता या लिखाणात आहे. या पुस्तकाचे एक खास आकर्षण म्हणजे क्यूआर कोड - QR Code. अवगुंठित रागांची माहिती या पुस्तकात विखुरली आहे आणि हादेखील कानसेनांना मिळणारा बोनसच म्हणायला हवा. यापुढे जाऊन आपल्याला अखेरीस मिळतात जवळपास ५०० परिचित गाण्यांचे संदर्भही. 

सर्व वाचकांच्या मनात हा मनभावन खजिना अनुभवून झाला, की नेहा व त्यांचे हे पुस्तक अनुनादित होत राहील यात काहीच शंका नाही. 

  • अनुनाद
  • लेखक- प्रकाशन : नेहा लिमये, पुणे
  • किंमत : ₹    ३००
  • पाने : १८४

संबंधित बातम्या