शब्दरंगांतून साकारलेले ‘आत्मचित्र’

प्रा. वैजयंती चिपणूळकर
सोमवार, 30 ऑगस्ट 2021

पुस्तक परिचय

सुप्रसिद्ध कवयित्री, शिक्षिका, लेखिका संजीवनी बोकील यांच्या प्रतिभासंपन्न लेखणीतून साकारलेले ‘आत्मचित्र’ वाचकांपुढे सादर झाले आहे. या पुस्तकाविषयी...

अनेकविध वाटा वळणांनी तयार झालेले आपले जीवन जेव्हा सर्वार्थाने परिपक्व होते, तेव्हा परिपक्वतेच्या परीघ विस्तारतो. जेव्हा परीघ विस्तारतो तेव्हा समाजातील लहान-मोठ्या व्यक्तींच्या प्रती हृदयात उमटलेल्या कृतज्ञतेच्या भावनांचे बहुआयामी पदर उलगडून बघताना आपल्या दृष्टिकोनात बदल होतो. अंतर्बाह्य सकारात्मक विचार आपल्यामध्ये निवासासाठी प्रवेश करत असल्याची सजग जाणीव होते, आणि आपल्या मधील ‘स्व’चे रूपांतर ‘आपण सगळे’ यामध्ये म्हणजेच समष्टीमध्ये होते. या कृतज्ञतेच्या हृदयंगम दर्शनातून सामाजिक संवेदनशील व्यक्तिमत्त्व असणाऱ्या शब्दांतून, कृतीतून समोरच्याला घडवू पाहणाऱ्या सिद्धहस्त लेखकांकडून अप्रतिम साहित्यकृती साकार होते. म्हणजेच चित्ताकर्षक शब्द रंगांतून आणि विविध अर्थछटांतून साकारलेले एक विस्तृत ‘आत्मचित्र’ तयार होते.

अशीच एक साहित्यकृती ‘आत्मचित्र’या नावाने सुप्रसिद्ध कवयित्री, शिक्षिका, लेखिका संजीवनी बोकील यांच्या प्रतिभासंपन्न लेखणीतून वाचकांपुढे सादर होत आहे. १६७ पानांमध्ये तीस लेख या साहित्यकृतीत अवतरले आहेत.

जन्मदात्या आई वडिलांना आणि विद्यार्थिनींना ज्ञानसंपन्न, तसेच सुसंस्कृत करणाऱ्या हुजूरपागा या शाळेला ही साहित्यकृती अर्पण केली आहे. पुस्तकातील अर्पणपत्रिकेची वेधक शब्दरचना मनाचा थेट वेध घेते. अनुक्रमणिकेतील समर्पक आणि अर्थपूर्ण शीर्षके वाचकाला पुस्तक पूर्ण वाचण्यास उद्युक्त करतात (देवाचा हात... गुरुजींचा हात, नाणे प्रेरणेचे, जाता जाता पाणी घातलेले झाड, त्याचे साक्षात्कारी कवडसे इत्यादी).

सामाजिक सार्वजनिक, शैक्षणिक, वैचारिक, साहित्यिक यांसारख्या क्षेत्रात वावरताना; सर्व भूमिका यशस्वीपणे पार पाडताना; व्यक्तींचे, घटनांचे, प्रसंगांचे जे सकारात्मक दर्शन लेखिकेला घडले, त्यांचे यथायोग्य चित्रण सर्वच लेखांमध्ये आढळते. प्रत्येक लेख छोट्या-छोट्या वाक्यरचनेतून आणि संवादरूपी कथन शैलीतून वाचकांपुढे येतो. या शैलीचा थाटच असा आहे की प्रत्येक लेख वाचताना वाचकाला, स्वतःच उत्कृष्ट अभिवाचन करत असल्याचा प्रत्यय यावा इतके बळ या कथनशैलीमध्ये आहे. सर्व लेखांमध्ये व्यक्ती, प्रसंग, घटना यांचे उत्कट दर्शन होते. या सर्व लेखांची सर्वात जमेची बाजू म्हणजे, प्रत्येक लेखाचा शेवटचा परिच्छेद, जो अतिशय सरस उतरला आहे. उपदेश करण्याचा हेतू नसतानाही अगदी सहजपणे ‘सकारात्मक जीवनशैली अंगीकारणे महत्त्वाचे आहे’ हा बोध प्रत्येक लेखाच्या शेवटच्या परिच्छेदात होतो. त्यामुळे हे ‘आत्मचित्र’ चढत्या क्रमाने अधिक गहिरे, अधिक गडद होत जाते.

यादृष्टीने ‘बकुळीचं फूल’ हा लेख वाचावा. समाजामध्ये वावरताना आपल्याला काही नीतिनियम पाळावे लागतात. सार्वजनिक ठिकाणी फलकांवर नियमावलीही दिसते, पण त्याचे आचरण सर्वांकडून व्हावे यासाठी कडक शब्दांपेक्षा ‘प्रश्नार्थक क्रियापदां’चा उपयोग संवादामध्ये केला, तर समोरची व्यक्ती सहजतेने आणि स्नेहपूर्ण रीतीने नियमांचे पालन करते, याविषयी लिहिले आहे. रिसेप्शनिस्टबरोबर झालेल्या संवादातून आणि स्वानुभवातून लेखिकेला हे कसे समजले हे या लेखातून उत्कटतेने मांडले आहे. अप्रत्यक्षपणे डोळ्यात अंजन घालणारा हा लेख फारच वाचनीय आहे. अर्थातच शेवटच्या परिच्छेदासह!

जीवनातील कठीण प्रसंगांमध्ये निराश न होता, सकारात्मक विवेकी बुद्धीने सामोरे जाण्याचे धाडस दाखवून, शेवटी यश प्राप्त केल्याचे अनेक दाखले या साहित्यकृतीमध्ये आढळतात. मात्र या यशाचे श्रेय स्वतःकडे न घेता, लेखिकेने हे सगळे श्रेय त्या त्या प्रसंगांनाच दिले आहे. निराशेच्या, अपेक्षाभंगाच्या लाव्ह्यातूनही कमळ कसे फुलते याची समज वाचकापर्यंत सकारात्मक भावनेतून पोचते. ज्या लहान-मोठ्या तसेच महान व्यक्तींमुळे लेखिकेच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाली, त्यांच्याबद्दल ओतप्रोत कृतज्ञता व्यक्त झालेली दिसते. त्यात कुठेही अहंकाराचा लवलेश आढळत नाही. हे या साहित्यकृतीचे फार मोठे यश मानावे लागेल.

ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांना एका कार्यक्रमात निवेदक या नात्याने उपस्थित राहण्यामध्ये काही महत्त्वाची अडचण आल्याने ऐनवेळी ही भूमिका पार पाडण्याची विनंती त्यांनी संजीवनीताईंना केली. संजीवनीताईंनी मोठ्या धीराने ही विनंती स्वीकारली आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच अनोख्या शब्द-रत्‍नांचे भांडार स्व-प्रतिभेचे दर्शन घडवीत खुले केले. सूत्रसंचालकाच्या भूमिकेतून निवेदनात रंग भरला. या सगळ्या प्रसंगाचे चित्रण लेखिकेने ‘पावनखिंड’ या लेखातून केले आहे. ते पुन्हा पुन्हा आवर्जून वाचावे असेच आहे. वनराईच्या खिंडीत लेखिका धारातीर्थी न पडता संजीवनीताईंनी या खिंडीचेच पावन तीर्थात रूपांतर कसे केले याची आत्मानुभूती वाचकाला येऊ शकते इतकी जबरदस्त ताकद या लेखामध्ये आहे.

या साहित्यकृतीमध्ये लेखिकेने सर्वांमधले भरजरी गुण वेचून ते स्वतःच्या काळजाच्या धाग्यांमध्ये घट्ट विणले आहेत. हृदयाच्या प्रत्येक स्पंदनाबरोबर विणलेल्या धाग्यांचेही शब्दरूपातून स्पंदन होते. ती स्पंदने आपल्याला प्रत्येक लेखात जाणवतात. लेखिकेमधील ‘मी’ संवादापुरताच डोकावतो. सगळा प्रकाश झोत आहे तो ‘समष्टी’वर. हे या साहित्यकृतीचे फार मोठे आणि दुर्मीळ असे बलस्थान आहे. ‘अल्पाक्षर रमणीयत्व’ हा या साहित्यकृतीचा आत्मा आहे. व्यक्ती, घटना, प्रसंग यांची प्रकाश गर्भित सकारात्मक किरणे लेखिकेने उलगडून दाखवली आहेत. हे त्यांचे कसब साहित्यिक, सामाजिक, वैचारिक पातळीवर वाखाणण्याजोगे आहे हे निःसंशय!

कुठलाही लेख पाल्हाळीक, शब्दबंबाळ न करता स्फटिकासारख्या सोप्या पारदर्शक शब्दांमध्ये, आटोपशीर चौकटीत अर्थपूर्णरीतीने मांडणी, यासाठी प्रतिभेची जोड आणि शारदेची कृपाच असावी लागते. या दोन्ही गोष्टींचे प्रतिबिंब सर्व लेखांमध्ये ठायी ठायी जाणवते. चित्तवेधक आशय, तरल आविष्कार, डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांची मार्मिक प्रस्तावना, लेखिकेचे उत्तम मनोगत, अली सरदार जाफरी यांच्या चार ओळी यामुळे पुस्तकाच्या अंतरंगाचे सौंदर्य अधिक दुणावले आहे. पुस्तकाला लाभलेली चित्ताकर्षक सजावट, नेत्रसुखद आणि निर्दोष छपाई, अप्रतिम मुखपृष्ठ, लेखानुरूप मार्मिक चित्रे यामुळे या साहित्यकृतीच्या अंतरंगाच्या आशय मूल्यामध्ये आणि बहिरंगाच्या सौंदर्य मूल्यामध्ये भर पडली आहे. ही ललित साहित्यकृती सर्वांसाठीच ‘पाथेय’ ठरेल असा विश्वास वाटतो.

आत्मचित्र

  • लेखक : संजीवनी बोकील
  • प्रकाशन : सौर प्रकाशन, पुणे
  • किंमत : ₹   २५०
  • पाने : १६८

संबंधित बातम्या