किशोरांना भावणारी पुस्तके

वसंत वसंत लिमये
गुरुवार, 23 जानेवारी 2020

पुस्तक परिचय
 

स्वाती राजे यांनी मुलांसाठी लिहिलेली ‘शोध’, ‘पूल’ आणि ‘अंधाराचं गाव’ अशी तीनही पुस्तके अधाशीपणे वाचली. ‘शोध’मधील ‘धुळोबा’च्या रूपाने ‘लायन किंग’ची आठवण झाली. सूक्ष्म धुलीकण आणि पृथ्वीसकट पसरलेले खगोलमंडळ यांचे नाते एका निर्व्याज प्रतीकात्मकतेतून उलगडत होते आणि तरीही बोजड न होता किशोरांना भिडणारे होते. ‘पूल’मुळे माझे मन ईशान्येकडील प्रतिमांचा वेध घेऊ लागले. ‘अंधाराच्या गावा’तल्या अंधाराच्या राक्षसाची भीती आणि निळ्या पक्ष्याचे गाणे मला बालपणात घेऊन गेले! 

लहानपणी इसापनीती, चांदोबा, इंद्रजाल कॉमिक्समधील वेताळ, मँड्रेक आणि फास्टर फेणे हे माझे बाळकडू होते. तेव्हा या प्रकाराला ‘बालसाहित्य’ नावाच्या कप्प्यात टाकले नसावे! माहितीच्या विस्फोटात गोंधळलेले आपले मन कुठलीही गोष्ट पटकन एखाद्या कप्प्यात टाकते आणि मग आपण त्याला विशिष्ट लेबल लावून गोंधळ आवरायचा निष्फळ प्रयत्न करतो. स्वाती राजे यांची ही तीनही पुस्तके मी फक्त ‘बालसाहित्य’ म्हणून मानायलाच तयार नाही! अर्थात किशोरवयीन मुलांसाठी ती खूप गोड पुस्तके आहेत. पण स्वाती राजे यांनी बहारदार शैलीत सोप्या भाषेत रंगवलेली त्यातील प्रतीकात्मकता आणि साध्या पण प्रभावी प्रतिमा, त्या साऱ्याला न्याय देणारी चंद्रमोहन कुलकर्णी यांची अफलातून चित्रे आणि ‘रोहन’ प्रकाशनाने प्रकाशित केलेले देखणेपण, सारेच लाजवाब! स्वाती राजे यांच्या प्रतिभेचे विशेष कौतुक करावसे वाटते.

अंधाराच्या गावातला निराशेचा अंधार, अज्ञानाचा राक्षस आणि साक्षरतेचा, ज्ञानाचा निळा पक्षी या साऱ्या प्रतिमा आणि प्रतीके हृदयस्पर्शी आहेत. संकटांना न घाबरता मोठ्या जिद्दीने आशावादी शेवटाकडे खेचून नेणारी ‘साऊ’, निसर्गाच्या तांडवात त्यातील अफाट निसर्गाला सामोरी जाणारी ‘पूल’मधील ‘मिरी’ आणि आपल्या चिटुकलेपणाच्या मर्यादेला आव्हान देणारा ‘धुळोबा’ हे ऐकीकडे बाळगोपाळांना जवळचे वाटत संस्काराची बीजे रोवतील, तर दुसरीकडे मोठ्यांना तीच सारी प्रतीके अनेक प्रश्‍न विचारतील.

‘संस्कारक्षम वयात आपल्या जमिनीशी नाते, नाळ जोडणारा संस्कार आज हरवत चालला आहे!’ वाक्य बोजड वाटले, तरी मला खरोखरच खोलवर आतून तसे वाटते. एकीकडे सारे जवळ येत आहे, विश्‍व आक्रसत चालले आहे. कसलीही, कुठलीही माहिती आज ‘ओम गुगलाय नमः’ म्हणताच आपल्या समोर हात जोडून उभी असते. पण इतरांशी, आपल्या जमिनीशी असलेली आपली नाळ तुटत चालली आहे. परक्या, परदेशी प्रतिमांना माझा बुरसटलेला विरोध नाही, पण आपल्या घरच्या, ‘देशी’ प्रतिमा परक्या होत चालल्या आहेत. या साऱ्यात आपले, आपल्या मुलांचे होऊ घातलेले ‘त्रिशंकू’पण मला भेडसावते. औद्योगिक क्रांतीनंतर आलेल्या ‘माहिती’च्या क्रांतीने आपल्या संस्कारांची वीण उसवत जीर्ण होत चालली आहे. ‘ग्लोबल’ नावाचा राक्षस मला ‘अंधाराच्या गावातील’ राक्षसासारखा भासतो. असंख्य नवीन गोष्टींचा आपल्यावर भडिमार होत आहे, पण त्यातले किती रुजते याबद्दल साशंकता आहे. नुकतेच माझे एक वयस्कर स्नेही भेटले होते. मुलगा अमेरिकेत सेटल झालेला, पण अचानक एका वळणावर व्यसनाच्या आधीन होऊन सैरभैर झालेला. माझ्या स्नेह्याच्या डोळ्यातील हताशपण पाहवत नव्हते. तरुणपणातच झपाटणारे मनोविकार, व्यसनाधीनता आणि भरकटलेपण असे अनेक कॅन्सर आज आपल्याला भेडसावतात. मी कुठेतरी वाचले होते की कॅन्सर म्हणजे आपल्या मनाचा, बुद्धीचा शरीराशी तुटलेला संवाद! मला शास्त्रीय कारणे ठाऊक नाहीत किंवा माझा त्याचा अभ्यास, व्यासंग नाही. पण काहीतरी बिनसते आहे, हे जाणवत राहते. अशा वाळवंटातील दिशाहीन भरकटलेल्या वातावरणात स्वाती राजे यांची पुस्तके म्हणजे एक थंडगार झुळूक! तीनही पुस्तके वाचताना माझ्यातील ढोंगी मोठ्ठा दीडशहाणा कुठे पळून गेला ते कळलेच नाही. स्वाती राजे पुनश्‍च तुमचे अभिनंदन! ‘रोहन’ प्रकाशन आणि चंद्रमोहन यांची समर्पकता याला सलाम! रोहन प्रकाशनाने अशी मालिका सुरू करावी असा फुकटचा सल्ला! स्वाती राजे यांनी अप्रतिम कलाकृती दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! साऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!

संबंधित बातम्या