मेकअप मागचा चेहरा...

व्यंकटेश कल्याणकर
शुक्रवार, 11 मे 2018

पुस्तक परिचय    
 

‘सावरखेड एक गाव’ या चित्रपटात भिकाऱ्याच्या भूमिकेसाठी एक कलाकार निवडला होता. त्याने स्वच्छ, गुळगुळीत दाढी केली होती. त्याला पुढील दोन महिने दाढी करायची नाही आणि केस कापायचे नाही असे सांगण्यात आले. दोन महिन्यांनी चित्रपटाचं शुटिंग सुरु होतं. नाष्ट्याची वेळ होती. स्पॉट बॉय नाष्टा देत होता. सर्व टीम रांगेत उभे राहून नाष्टा घेत होती. एक भिका-याची वेशभूषा केलेली व्यक्ती तेथे आली. स्पॉट बॉयने त्याला ‘इथे शुटिंग चालू आहे, नंतर देऊ तुम्हाला’; असे सांगितले. त्यानंतर गोंधळ ऐकून दिग्दर्शक आणि इतर जण तेथे आले. तो आपला चित्रपटातीलच कलाकार आहे आणि ही मेकअपची कमाल आहे, असे सांगितले. हा मेकअप केला होता अतुल शिधये यांनी. गेल्या दोन दशकांपेक्षा अधिक काळ या क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत अाहेत. अतुल शिधये यांच्या ‘मेकअप... कॅमेरा... ॲक्‍शन...! या पुस्तकात सांगितलेला हा किस्सा.

अतुल शिधये हे अभिनय, मॉडेलिंग, सिनेमा, फॅशन, ग्लॅमर इंडस्ट्री या क्षेत्रात १९९६ पासून कार्यरत आहेत. मेकअप आर्टिस्ट, फोटोग्राफर, लुक डिझायनर आणि मिडिया काऊन्सेलर अशा विविध भूमिका ते समर्थपणे हाताळत आहेत. मेकअप आणि कॅमेऱ्याशी जवळचा संबंध असलेल्या तनुजा राहणे यांनी या पुस्तकाचे शब्दांकन केले आहे. पुस्तकाची भाषा अत्यंत साधी, सोपी, सुलभ आणि वाचनीय असल्याने जवळपास एका बैठकीतच पुस्तक वाचावेसे वाटते. मेकअप, अभिनय, ग्लॅमर, फोटोग्राफी, मिडिया या प्रकारच्या क्षेत्रात नव्याने येणाऱ्यांसाठी हे पुस्तक खरोखर मूलभूत गोष्टी सांगणारे, उपयुक्त आणि अत्यंत महत्त्वाचं ठरेल. पुस्तक प्रामुख्याने तीन भागात विभागलेले आहे. त्यामध्ये रंगभूषा, छायाचित्रण आणि अभिनय अशा तीन घटकांमध्ये सविस्तर माहिती दिली आहे. पुस्तक वाचनीय करण्याचे पानोपानी प्रयत्न करण्यात आला आहे. प्रत्येक उपघटकाचे नाव देतानाही वाचकांच्या भूमिकेतून विचार करण्यात आला आहे. त्यामुळेच घटकाशी संबंधित सुरेख आणि रंगीत छायाचित्रे तसेच ‘सावरखेड एक गाव’ सारखे किस्से, इंग्रजी भाषेतील या क्षेत्रांशी संबंधित वेगवेगळ्या बाबींच्या साध्या, सोप्या आणि विविध प्रकारच्या व्याख्या पुस्तकात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. मेकअप अर्थात रंगभूषा म्हणजे सौंदर्य खुलविण्याचे एक तंत्र असून ते आत्मसात करणे हीच या क्षेत्रात यशस्वी होण्याची गुरुकिल्ली असल्याचे लेखकाने म्हटलं आहे. मेकअपचे वेगवेगळे प्रकार विशद करून त्याची ओळख करून देण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. मेकअप चढविण्याबरोबरच लावलेला मेकअप योग्य प्रकारे काढणे हे त्याहूनही मोठे कसब आहे असे सांगत लेखकाने या क्षेत्रातील बारकावे समजावून सांगितले आहेत. रंगभूषेची ओळख, साधने, अभ्यास, प्रकार अशा उपघटकात या क्षेत्राबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. स्मार्टफोनच्या जमान्यात फोटोक्‍लिक आणि सेल्फीजची चलती असली तरीही फोटो क्‍लिक करणं हे एक मोठं शास्त्र आहे. हे शास्त्र आजच्या पिढीला या पुस्तकातील छायाचित्रण हा भाग वाचल्यावर समजू शकेल. ‘श्वासाची गती सांभाळत, भिंगातून समोरचं दृश्‍य, व्यक्ती, कृती न्याहाळत खरं तर छायाचित्रकार एखाद्या योग्याप्रमाणे योगसाधना करत असतो.. अशा शब्दांत छायाचित्रण कलेचं महत्त्व सांगितला आहे. फोटो मागचा विचार, क्‍लिक करण्यापूर्वी, फोटोग्राफीतील विविध प्रकार, ग्लॅमरच्या पलिकडे, पोर्टफोलिओ फोटोग्राफी अशा विविध प्रकरणातून छायाचित्रणाबद्दलची वाचकांची जिज्ञासा पूर्ण करण्यात आली आहे. अभिनयाबाबत लिहिताना लेखकाने आपण या क्षेत्रातील तज्ज्ञ नसल्याचं प्रामाणिकपणे मान्य केलं आहे. मात्र अभिनय क्षेत्रात टिकून राहण्यासाठी कलाकरांचा होणारा संघर्ष आणि प्रवास जवळून पाहिला असल्यानं एकूणच अभिनय क्षेत्र व त्यातील खाचखळग्यांविषयी लेखकाने अधिकारवाणीने भाष्य करण्याचे स्वातंत्र्य घेतले आहे. पुस्तकातून केवळ मजकूर देण्याच्या परंपरेमध्ये उत्क्रांती आणत संबंधित क्षेत्रातील मान्यवरांचे अनुभव देण्याचा अभिनव प्रयोग प्रस्तूत पुस्तकात करण्यात आला आहे. त्यामध्ये मुक्ता बर्वे, संजय जाधव, सुमित राघवन, प्रशांत दामले, दिपाली विचारे, विद्याधर जोशी आदी मान्यवरांचे त्यांच्या क्षेत्रातील अनुभव सहज-सुलभ पद्धतीने पुस्तकात मांडण्यात आले आहेत. ज्येष्ठ अभिनेते-लेखक संजय मोने, विद्याधर जोशी यांनीही पुस्तकाबद्दल प्रस्तावनावजा लिहिले आहे. नवी पिढी नऊ ते पाचची नोकरी किंवा एकच व्यवसाय करून आयुष्य जगण्याच्या विरोधात असल्याचे दिसते. शिवाय तंत्रज्ञानासारखा दोस्त मिळाल्याने ही पिढी जगण्यात आणि उदरनिर्वाहाच्या प्रक्रियेत कल्पकता, नाविन्य आणण्याचा प्रयत्न करत आहे. उत्कट अंतरंग प्रगट करण्याचं उन्नत माध्यम म्हणून अभिनय, फोटोग्राफी आणि व्हिडिओ अशा क्षेत्राला पसंती मिळत आहे. युट्युब, फेसबुक, ट्विटरसारखी समाजमाध्यमे त्यासाठी व्यासपीठ निर्माण करत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘मेकअप, कॅमेरा, ॲक्‍शन...! हे पुस्तक नव्या पिढीला रंजक पद्धतीने व्यवसायाच्या नव्या साधनाविषयी विचार करण्यास आणि काही अंशी मार्गदर्शन करण्यास उपयुक्त ठरते. पुस्तकाची निर्मिती अत्यंत देखणी आणि सुबक आहे.

संबंधित बातम्या