प्रेरणादायी...

 विजय पंडित
सोमवार, 20 जून 2022

जेआरडी टाटा हे गेल्या शतकातील भारतातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. केवळ औद्योगिक क्षेत्रातच नव्हे, तर देशातील समाजजीवनात त्यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यामुळेच त्यांना ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने विभूषित केले आहे. जेआरडी टाटा यांच्या चरित्राचा व कामगिरीचा, तसेच त्यांनी निर्माण केलेल्या टाटा संस्कृतीचा परिचय मराठी वाचकांसाठी लेखकाने अत्यंत सोप्या व ओघवत्या भाषेत ‘जे.आर.डी. टाटा - टाटा पर्वातील सुवर्णकाळ’ या पुस्तकाद्वारे करून दिला आहे.

‘जे.आर.डी. टाटा - टाटा पर्वातील सुवर्णकाळ’ या जयप्रकाश झेंडे यांच्या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे रूढ पद्धतीप्रमाणे जेआरडींचा जन्म, शिक्षण, कामगिरी असा परिचय करून न देता विविध अंगांनी त्यांच्या कामगिरीकडे पाहिले आहे. 

टाटांनी उत्तम नेतृत्व निर्माण करून, त्या नेतृत्वावर पूर्ण जबाबदारी सोपवून प्रत्येक क्षेत्रातील व्यवसाय कसा वाढवला याची उदाहरणे, त्यांच्या प्रमुख सहकाऱ्यांचा परिचय व त्यांनी टाटा समूहाच्या उभारणीसाठी दिलेले योगदान लेखकाने आपल्यासमोर आणले आहे. यामध्ये सुमंत मुळगावकर, दरबारी शेठ, रूसी मोदी, नानी पालखीवाला यांसह अनेकांची कामगिरी अधोरेखित केली आहे. या सर्व व्यक्ती आपापल्या क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरीमुळे दिग्गज म्हणून गणल्या जातात. त्यामुळे जेआरडी यांना ‘नेत्यांचा नेता’ असे म्हटले पाहिजे. जेआरडी टाटांनी मानवी मूल्यांना टाटा समूहात दिलेले महत्त्व किंवा त्यासाठी धरलेला आग्रह, मानवी संसाधनांच्या निर्मितीला दिलेले प्रोत्साहन, त्यासाठी केलेले प्रयत्न याचा खास उल्लेख उदाहरणांसह या पुस्तकात ‘माणसे ओळखणारा कुशल पारखी’ या प्रकरणात करून दिला आहे. 

नेतृत्वासाठी कोणते गुण आवश्यक आहेत, याचे चालते बोलते उदाहरण म्हणजे जेआरडी टाटा. त्यांचे चरित्र म्हणजे व्यवस्थापनाचे पाठ्यपुस्तकच म्हणता येईल. त्यांच्या नेतृत्वगुणांचे सांगोपांग विवेचन या पुस्तकात केले आहे. ज्यामध्ये प्रामाणिकपणा दूरदृष्टी, निःष्पक्षता, कल्पकता, सर्जनशीलता व सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रेरणा देण्याची क्षमता या गुणांचे अनेक उदाहरणे देऊन विवेचन केले आहे.

पुस्तकातील ‘‘पत्र’रूपी जेआरडी’ हे प्रकरण खास उल्लेखनीय आहे. त्यांना भाषण द्यायला विशेष आवडत नव्हते, तरी ते पत्र लेखन मनापासून करीत. भारतीय उद्योजकांत सर्वाधिक प्रतिभावान पत्र लेखक म्हणून त्यांची गणना करता येईल. त्यांची चाळीस हजारांहून अधिक पत्रे टाटा संग्रहालयात उपलब्ध आहेत. त्यात जशी कौटुंबिक पत्रे आहेत, तशीच आपल्या व्यवस्थापकांना लिहिलेली पत्रेही आहेत. यामध्ये एअर इंडियाचे अध्यक्षपद सोडताना कर्मचाऱ्यांना लिहिलेले पत्र आणि त्यामध्ये कोणताही कडवटपणा येऊ न देता केलेले मार्गदर्शन विशेष उल्लेखनीय म्हणायला हवे.

टाटांना सामाजिक जाणीव किती होती याची कल्पना त्यांच्या जीवनाच्या उत्तरार्धातील भागात दिसून येते. मुंबईवर त्यांचे खास प्रेम होते, त्यामुळेच मुंबईतील अतिक्रमणे, गजबजाट यामुळे ते चिंतित होत असत. त्याकरिता त्यांनी तेव्हाच्या सरकारला अनेक सूचना केल्या आहेत, ज्या आजसुद्धा मार्गदर्शक ठरू शकतात. अमर्याद लोकसंख्या वाढ, भारताने स्वीकारलेली ब्रिटिश संसदीय पद्धत व त्यातील त्रुटी, यावर त्यांनी आपली मते विरोधास न जुमानता आग्रहाने मांडलेली आहेत. ‘जेआरडी म्हणतात...’ या प्रकरणामध्ये आपल्याला ती वाचायला मिळतात.

उद्योगात स्वच्छ व पारदर्शी कारभार, नैतिक मूल्यांची कोणतीही तडजोड न करणे व मानवी मूल्यांना दिलेले महत्त्व यातूनच ‘टाटा संस्कृती’ची निर्मिती त्यांनी केली. तीच संस्कृती आज आपण टाटा समूहातील अगदी छोट्यातल्या छोट्या घटकापर्यंत पोहोचलेली पाहतो. अशी संस्कृती निर्माण करणे हे कोणताही उद्योग समूह स्थापन करण्यापेक्षा खूप मोठे व विशेष आहे. 

 प्रगती साधताना मानवी मूल्यांकडे दुर्लक्ष होणार नाही, यासाठी टाटा इतर कोणत्याही गोष्टींचा त्याग करायला तयार असत. तो त्यांनी केलासुद्धा! देशासाठी पोलाद, वाहने, रसायने इत्यादी आवश्यक आहेत तसेच विमान वाहतूकसुद्धा आवश्यक आहे, याचा पूर्ण विचार करून या सर्व व्यवसायांची त्यांनी पायाभरणी केलीच व त्यांची भरभराटही घडवून आणली. हे सर्व करत असताना मूलभूत विज्ञान व अभिजात कला यांच्या वृद्धीसाठीसुद्धा त्यांनी फार मोठे योगदान दिले. हे सर्वकाही करताना त्यांचा विचार देशहिताचाच असायचा. वेळप्रसंगी वैयक्तिक लौकिकाचा, अपमानाचा विचार त्यांनी बाजूला ठेवला. 

या शतकातील अशा चतुरस्र व्यक्तीच्या चरित्राचे आरेखन करणे म्हणजे शिवधनुष्य उचलण्यासारखेच आहे. त्याकरिता एवढ्या मोठ्या कालखंडातील औद्योगिक व राजकीय घटनांचा मागोवा घेऊन त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आलेख उभा करणे, ही अत्यंत अवघड गोष्ट होती. त्याकरिता परिश्रम तर हवेच होते पण समकालीन सामाजिक, राजकीय व औद्योगिक परिस्थितीचे आकलन असणेही गरजेचे होते. टाटा संस्कृतीतच समरस झाल्याने लेखक जयप्रकाश झेंडे यांना ते उपयोगी पडले असावे. टाटा यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला या चरित्राने न्याय दिला आहे. भारतातील नवीन पिढीला टाटा यांचा हा जीवन आलेख वाचून निश्चितच प्रेरणा व स्फूर्ती मिळेल हीच या प्रयत्नांची फलश्रुती! 

(लेखक टाटा मोटर्समधील निवृत्त प्रमुख उत्पादन अभियंते आहेत.)
           

जे.आर.डी. टाटा - टाटा पर्वातील एक सुवर्णकाळ
प्रकाशन : साकेत प्रकाशन, औरंगाबाद
किंमत : ₹    ३५०/-
पाने ः २८७

संबंधित बातम्या