ग्रीकपुराण (आणि ‘साम्यवाद’)

विजय तरवडे 
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

पुस्तक परिचय
ग्रीकपुराण
प्रकाशक : रोहन प्रकाशन, पुणे
लेखक ः  सुप्रिया सहस्रबुद्धे
किंमत ः २७५ रुपये.
पाने : २६०

‘हेलन ऑफ ट्रॉय’ हा सिनेमा किंवा त्या युद्धाची कथा अतिपरिचित आहे. काही दशकांपूर्वी इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकात ती समाविष्ट होती. चांदोबा मासिकातदेखील ती क्रमशः येऊन गेली आहे. श्‍यामराव ओक यांनी होमरच्या इलियड आणि ओदिसीचे केलेले अनुवाद देखील (प्रकाशक - महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ) उपलब्ध आहेत. ही कथा आणि या कथेतील पात्रांविषयी सर्वांच्या मनात कुतूहल आणि आकर्षण असते. होमरची महाकाव्ये थोडीबहुत परिचित असली तरी आणि ग्रीक शोकांतिकांची कथानके फार कोणाच्या वाचनात नाहीत. या कथानकांमधल्या पात्रांचे आणि त्यांच्याशी संबंधित घटनांचे तपशील फक्त श्‍यामराव ओकांनी अनुवादित केलेल्या इलियड आणि ओदिसीमध्ये तळटीपा वगैरेच्या रूपात उपलब्ध आहेत. सुप्रिया सहस्रबुद्धे यांच्या ग्रीकपुराण या पुस्तकाने उपरोक्त माहिती तपशीलवार देण्याचे मोठे काम केले आहे. ग्रीक देवतांच्या कथा,अन्य पुराणकथा, इलियड, ओदिसी, ग्रीक शोकात्मिका अशा पाच भागात ही माहिती येते. ग्रीक साहित्याशी संबंधित संदर्भ शोधताना या पुस्तकाचा चांगला उपयोग होऊ शकेल. पण ग्रीकपुराण वाचायला घेताना आपले मन नकळत समांतर भारतीय महाकाव्यांशी तुलना करते. त्यात अनुचित काही नाही. मात्र वाचक ग्रीकपुराण वाचायला घेतो तेव्हा प्रामुख्याने ग्रीक महाकाव्ये, देवता, लोककथा, शोकांतिका आणि शोकात्मिकांबद्दल वाचायला मिळावे अशी अपेक्षा बाळगतो. ही अपेक्षा पूर्ण होत नाही. होमरची महाकाव्ये आणि रामायण-महाभारताचे कालखंड समान होते, की मागेपुढे होते हे नेमके ठाऊक नाही. पण या चारही कलाकृती या ना त्या कोणत्याही स्वरूपात वाचल्या, तरी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, की रामायण-महाभारताची कथानके अधिक बांधेसूद आणि सरळसोट आहेत. त्यात कोठेही विस्कळितपणा नाही. ग्रीक आणि भारतीय लोकमानस एकमेकांहून भिन्न आहेत. त्यांच्या दैवतविषयक कल्पना एकमेकींशी जुळत नाहीत. तस्मात ही महाकाव्येदेखील एकमेकांसारखी असणे अगदीच अशक्‍य. मात्र ग्रीस आणि भारत यांनाच जणू जळी भावंडे ठरवण्याचा विडा घेतल्याप्रमाणे हे पुस्तक सतत त्यांची आणि आपली तुलना करीत राहते. साम्यस्थळे सतत दाखवण्याचा अट्टहास रसभंग करतो.

‘पूर्वसूत्र’ या प्रकरणात म्हटले आहे, की श्रीरामचंद्र, पांडव, अर्जुन, भीम व ओदिसिअस दीर्घ प्रवास करतात. वस्तुतः ओदिसिअस युद्धासाठी मोठे समुद्रपर्यटन करतो. भारतीय महानायकांचे प्रवास जमिनीवरचेच आहेत. रामायणात वनवासाला जाताना बोटीने नदी ओलांडली जाते आणि रावणाशी युद्ध होते, तेव्हा रामसेतू बांधून समुद्र ओलांडला जातो. आपले देव मानवी व्यवहारात फार ढवळाढवळ करीत नाहीत असे लेखिकेचे मत. (पान १९ ). मात्र विद्यार्थी दशेत असताना राम विश्वामित्रांच्या आज्ञेवरून त्राटिकेचा वध करतो. महाभारतात तर इंद्र, सूर्य आपापल्या मुलांच्या काळजीने मर्त्यलोकात येऊन लक्ष घालतात. मेडुसा नावाच्या शापित देवतेला पर्सिअस ठार करतो आणि तिचे मुंडके अथीनाला देतो. अथीना ते मुंडके आपल्या ढालीवर बांधते. ही कथा सांगताना लेखिकेला गणेशजन्म स्मरतो. (पान ८४) प्रॉमिथिअसने मानवजातीसाठी स्वर्गातून अग्नी चोरून आणला म्हणून झ्यूसने त्याला अमरत्वाची वगैरे शिक्षा दिली. हे सांगताना लेखिकेने अश्वत्थाम्याशी तुलना केली आहे. (पान ९३) कितीही प्रयत्न केला तरी टायरेसिअसची कथा आणि भंगाश्वनाची कथा यांच्यातले लेखिकेला अभिप्रेत असलेले साम्य पटत नाहीच. (पान ९७) स्वयंचलित यंत्रे बनविणारा हेफेस्टस आणि प्रतिसृष्टी निर्माण करू बघणारा विश्वामित्र यांची तुलना करताना त्रिशंकूची कथा थोडी चुकली आहे. (पान १०९) कसांड्रा या प्रेयसीने फसवल्यावर अपोलो तिला शाप देतो, की लोक तिच्या भविष्यकथनावर विश्वास ठेवणार नाहीत. या कथेचा कर्ण-परशुराम कथेशी संबंध जोडलेला आहे. (पान १२३) हेफेस्टसने एक अद्भुत रत्नहार बनवल्याची आणि तो रत्नहार अपशकुनी असल्याची कथा सांगताना अर्थातच स्यमंतक मणी आणि त्याची कथा आपल्याला वाचावी लागतेच! (पान १३३) अल्कमेऑन नावाचा योद्धा वडिलांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या आईचा वध करतो. ही कथा सांगितल्यावर लगेच लेखिका परशुरामाने केलेल्या रेणुकावधाची आठवण करून देते. (पान १३५) टाचेमध्ये प्राण असलेला धीरोदात्त अकिलिस आणि भीमाने मांडीवर गदाप्रहार करून मारलेला दुष्ट दुर्योधन यांच्या कथांतही लेखिका साम्य सुचविते. (पान १६०)

ग्रीक आणि भारतीय महाकाव्यातल्या साम्यस्थळांचे उपरोक्त उल्लेख केवळ उदाहरणादाखल म्हणून इथे नमूद केले आहेत. खरे तर ही साम्यस्थळे नाहीत. योगायोगाने तपशिलात आलेले साम्य आहे. ग्रीक आणि भारतीय महाकाव्यातील घटनांमध्ये कुठेकुठे चिमूटभर साम्य आढळले, तरी सांस्कृतिक फरक प्रचंड आहे.

त्यांच्याकडे जलप्रवास अनिवार्य होता. त्यामुळे समुद्राची देवता (पॉसिडॉन) आहे. आपल्याकडे समुद्रपर्यटन निषिद्ध असल्याने त्याचा देवबिव नाही. त्यांच्या आपल्या नरकविषयक कल्पना अगदी भिन्न आहेत. ग्रीक संस्कृतीत एखादी देवी आणि मर्त्य मानव एकमेकांच्या प्रेमात पडू शकतात. व्हीनस ही देवी चक्क व्यभिचारी आहे. आपल्याकडे अशी कल्पना करणेदेखील अशक्‍य! रामायण-महाभारताशी तुलना न करता थेट ग्रीक पुराणकथा दिल्या असत्या तर वाचक त्या वातावरणात आणि कालखंडात छान सफर करून आला असता.

संबंधित बातम्या