शोध जॉर्ज यांच्या अंतरंगाचा..

विनायक लिमये
सोमवार, 28 डिसेंबर 2020

पुस्तक परिचय 

बंडखोरी ही ज्यांच्या रक्तात होती, प्रचलित राजकारण्यापेक्षा ज्यांनी वेगळे राजकारण केले त्यामधले प्रमुख नाव म्हणजे जॉर्ज फर्नांडिस. राजकारणात प्रत्येकजण आपला मतदारसंघ किंवा एखादे राज्य हे आपल्या कामाचे केंद्र मानत असतो, त्या उद्देशातून आपल्या राजकीय जीवनात वेगवेगळे निर्णय घेत असतो. पण काही नेते याला अपवाद असतात. अशा अपवाद असलेल्या नेत्यांमधला अग्रभागी असलेला नेता म्हणजे जॉर्ज फर्नांडिस. त्यांचे नाव घेतले की अशा अनेक गोष्टी समोर येतात. भारतीय राजकारणातले अत्यंत वादळी व्यक्तिमत्त्व. काँग्रेसविरोध हा ज्यांच्या राजकारणाचा पाया होता, त्या जॉर्ज यांची जडणघडण कशी झाली, त्यांनी विविध निर्णय घेताना कसा विचार केला, त्यांच्यावर जे आरोप झाले, त्यांत तथ्य किती होते आणि अफवा किती होत्या, याचा तपशीलवार शोध घेणारे पुस्तक म्हणजे ‘सुसाट जॉर्ज’. 

निळू दामले यांनी लिहिलेल्या या पुस्तकात जॉर्ज फर्नांडिस यांच्या सहा दशकांच्या वाटचालीचा आढावा घेण्यात आला आहे. निळू दामले यांनी काही काळ जॉर्ज यांच्याबरोबर घालवला आहे. त्यांचे व्यक्तिगत सचिव अशा स्वरूपाचे कामही त्यांनी काही काळ केले. त्याकाळात त्यांनी जॉर्ज यांची कार्यपद्धती जवळून पाहिली आणि त्यांच्या संपर्कात येणाऱ्या मंडळींचे त्यांनी सखोल निरीक्षणही केले. हे पुस्तक जॉर्ज यांचे चरित्र नाही किंवा त्यांच्‍या कार्याची माहिती देणारा गौरवग्रंथदेखील नाही.

मित्रांच्या मदतीने जॉर्ज १९५० मध्ये ते मुंबईत आले. संघर्ष आणि चिकाटी हे स्थायिभाव असलेल्या जॉर्ज यांनी हार न मानता छोट्या-छोट्या नोकऱ्या करत आपला मुंबईत जम बसवायला सुरुवात केली. पुढे गोदी कामगारांची युनियन बांधणारे डिमेलो आणि समाजवादी पक्षाचे चिटणीस मधू दंडवते यांच्याशी त्यांचा संपर्क आला. जॉर्ज यांचे आयुष्य त्यानंतर बदलले. मात्र, हे बदलणे इतके सहज आणि सोपे नव्हते. नगरसेवक, ते मुंबईचे प्रख्यात नेते  स. का. पाटील यांना पराभूत करणारे जॉर्ज, हा प्रवास साधासुधा नव्हता. अतोनात मेहनत आणि सातत्यपूर्ण अभ्यास यांतून जॉर्ज यांनी आपले स्थान निर्माण केले होते. मुंबईत स्वतःचे स्थान निर्माण करणारे, अख्खी मुंबई बंद करू शकणाऱ्या जॉर्ज यांची ही वाटचाल खरोखर थक्क करून टाकणारी आहे.

आणीबाणीच्या कालखंडात त्यांनी दिलेला लढा, त्यातला त्यांचा रोमहर्षक संघर्ष हे सारे निळू दामले यांनी अत्यंत नेमक्या शब्दांत आणि जॉर्ज यांचे कुठल्याही प्रकारे दैवतीकरण न करता मांडले आहे. पुस्तकाची सर्वांत मोठी जमेची बाजू तीच आहे. जनता पक्षाचा प्रवास, त्याचबरोबर त्याकाळातली त्यांची भूमिका, याबद्दलची स्पष्टीकरणे इथे नाहीत. मात्र, जॉर्ज यांनी आदल्या दिवशी जनता सरकारच्या समर्थनार्थ भाषण केले आणि दुसऱ्या दिवशी मधू लिमये यांच्या सांगण्यावरून राजीनामा का दिला ते मात्र कळते. राजकारणात काही मूल्ये घेऊन वावरणाऱ्या जॉर्ज यांनी ‘कोकाकोला’ कंपनीला का हद्दपार केले, हे या पुस्तकातून समजते. त्याचबरोबर पक्षनिरपेक्ष आणि धर्मनिरपेक्ष भूमिका घेऊन त्या पद्धतीने ते कसा कारभार करत, त्याची उदाहरणेही दिसून येतात. सिमेंट उत्पादन आणि मालमोटारींचे उत्पादन वाढवण्यास प्रोत्साहन देणारे आणि गीतेच्या प्रती छापण्यासाठी कागदाचा कोटा मंजूर करणारे... अशी जॉर्ज यांची विविध रूपे यातून समोर येतात.

जात, धर्म, भाषा यावर कुठल्याही प्रकारचे राजकारण न करणारे जॉर्ज पारंपरिक आणि चाकोरीतून जाणाऱ्या राजकारण्यांपेक्षा वेगळेच होते, हा वेगळेपणाच निळू दामले यांनी या पुस्तकातून शोधला आहे. जॉर्ज यांनी अनेकवेळा धक्कादायक निर्णय घेतले, ते निर्णय का घेतले असतील, असा प्रश्‍न अनेकांना त्या वेळी पडलेला होता. त्या सगळ्या प्रश्‍नांची उत्तरे काही प्रमाणात तरी या पुस्तकातून मिळू शकतील.

दामले यांनी हे पुस्तक लिहिताना अनेक कागदपत्रांचा, तसेच फर्नांडिस यांच्या अगदी निकटच्या मंडळींना भेटून, त्यांच्याबद्दल माहिती घेऊन हे पुस्तक लिहिले आहे. त्यांनी जॉर्ज यांची बाजू मांडण्याचा कुठेही प्रयत्न केलेला नाही. मात्र, त्याकाळात ते असे का वागले असतील, याची कल्पना येऊ शकेल, असे प्रसंग इथे नक्कीच आहेत. जॉर्ज भाजपकडे का झुकले, त्यामुळे त्यांना समाजवादी मंडळींचाच राग कसा सहन करावा लागला, याचाही तपशील  कळतो. आणीबाणीच्या काळात त्यांना आणि त्यांचा भाऊ लॉरेन्स, तसेच जॉर्ज यांच्या त्या काळातल्या अनेक सहकाऱ्यांना पोलिसांचा किती त्रास झाला तेही समजते. 

राजकारणात मूल्ये ठेवून ते वावरले. मिळेल ती जबाबदारी समर्थपणाने पेलली, त्याचबरोबर त्या पदाला न्याय देताना जनहित कसे साधले जाईल याकडे कायम लक्ष दिले. कोकण रेल्वे कशी प्रत्यक्षात येईल, यासाठी त्यांनी तशी व्यूहरचना केली. जॉर्ज यांच्या अनेक चांगल्या गोष्टी जशा समोर येतात, तशा त्यांच्या चुकाही या पुस्तकातला तपशील वाचून कळतात.

लोकप्रबोधन करण्याचा वसा त्यांनी आयुष्यभर पाळला त्यासाठी प्रसंगी स्वतःची ओढाताण झाली तरी सहन केली. त्यामुळे जॉर्ज अचानक रात्री येऊन बेस्टच्या कामगारांशी बोलवतात किंवा ‘दिनांक’ या नियतकालिकांच्या कार्यालयात जाऊन अंक वाचतात हे सगळे लेखक दामले इथे सांगतात ते जॉर्ज यांची थोरवी सांगण्यासाठी नाही, तर हा माणूस किती साधेपणाने आणि कुठलाही आव न आणता काम करत असे, याची माहिती व्हावी यासाठी तपशिलाने ही माहिती ते देतात. 

जॉर्ज यांच्यावर डायनामाइट स्फोटाचा खटला बरेच दिवस सुरू होता. त्या खटल्याची माहिती दामले येथे सविस्तरपणे देतात त्यातून जॉर्ज यांचा पीळ आणि त्या काळात त्यांना किती हाल काढावे लागले ते कळते. जनता पक्षाचा प्रयोग आणि जॉर्ज यांची त्यातली भूमिका या गोष्टीपण या पुस्तकातून लख्खपणे जाणवतात. जॉर्ज जेव्हा उद्योगमंत्री झाले तेव्हा मालमोटारींची टंचाई होती. काळ्या बाजारात मालमोटार विकली जात होती, त्यातून काळा पैसा मोठ्या प्रमाणात तयार होत होता. अनेकांच्या हितसंबंधांची साखळी अर्थातच एक विषचक्र तयार झाले होते. जॉर्ज यांनी हे सगळे अत्यंत नेटकेपणाने कुठलीही जाहिरातबाजी न करता संपुष्टात आणले. उद्योगमंत्री म्हणून काम करताना कुठल्या कंपनीला किंवा उद्योगसमूहाला फायदेशीर ठरेल अशी भूमिका त्यांनी कधी घेतली नाही. जितकी लोकहिताची कामे मार्गी लागतील तेवढी करायची यासाठी त्यांनी आपल्या खात्याचा वापर केला. नोकरशाही कसे प्रकल्प अडवून ठेवते, फाइली कशा फिरत राहतात याबद्दल त्यांना पुरेपूर कल्पना होती, त्याबद्दल प्रसंग पाहून ते नाराजीही व्यक्त करायचे. 

जॉर्ज यांनी कायम संघर्ष केला. त्यांच्या आयुष्यातल्या अनेक घटना व त्यामागचे किस्से या पुस्तकातून समजतात. त्यासाठी हे पुस्तक खूप महत्त्वाचे आहे. जॉर्ज यांनी प्रत्येक ठिकाणी आपल्या कामाचा ठसा उमटवला. जॉर्ज यांचा हा प्रचंड घडामोडींनी भरलेला जीवनप्रवास, त्यातल्या थरारकतेसह आपल्यापर्यंत या पुस्तकातून पोहोचतो. निळू दामले हा प्रवास आपल्यापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने पोहोचवतात. 
..................
सुसाट जॉर्ज
प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे 
लेखक - निळू दामले
किंमत : २५० रुपये
पाने : २०८ 

संबंधित बातम्या