समर्पणाची कहाणी 

यशश्री रहाळकर
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

पुस्तक परिचय
 

स्मिता दोडमिसे यांच्या ‘स्त्रीशा’ या पुस्तकाविषयी कुठेसे वाचले अन्‌ त्यातील सगळ्या ‘स्त्रीशां’नी मला जणू झपाटून टाकले. हे पुस्तक वाचलेच पाहिजे, अशी प्रबळ इच्छा निर्माण झाली आणि मी पुस्तक मागवले. पहिल्या पानापासून सुरू केलेले पुस्तक शेवटपर्यंत मुळीच खाली ठेववत नाही. एम्पायर प्रकाशनाचा ‘स्त्रीशा’ हा पुराणकालीन, रामायण व महाभारतकालीन स्त्रियांच्या अनोख्या कहाण्या घेऊन सुरेख गुंफलेला कथासंग्रह आहे. कथा आणि शैली अजिबात पाल्हाळिक नाही. भाषा चपखल आहे.. आणि आवर्जून उल्लेख करावा अशी संतोष धोंगडे यांची सुरेख समर्पक रेखाचित्रे आहेत. 

या ‘स्त्रीशा’ खूप उभारी, आत्मविश्‍वास देतात. पात्रे पौराणिक असली तरी ती आजच्या जगण्याशी जोडत जातात. स्वतःचा दोष नसताना भरडली गेलेली तरीही जिद्दीने पाय रोवून उभी असलेली स्त्रीशा अतिशय आवडली. या स्त्रीशा आत्मतेजाच्या जागत्या ज्योती आहेत. आपल्या कर्तृत्वाच्या तेजाने त्या अधिकाधिक उजळून निघाल्या आहेत. लेखिकेच्या शैलीचाही मी आवर्जून उल्लेख करू इच्छिते. लेखनात कुठेही कृत्रिमपणाचा अंश नाही, ओघवती नियंत्रित शैली, आवश्‍यक तेवढाच कथाभाग, त्या काळाची नाळ तुटेल, असे वावगे काहीच नाही. 

या कथासंग्रहात एकुणात दहा स्त्रियांची कहाणी चितारलेली आहे. काही कथानायिका पूर्वी वाचल्या आहेत; जसे ययातीकन्या माधवी पण त्या वेगळ्या रंगात स्मिताताईंनी चितारल्या आहेत. लोपामुद्रा आणि गार्गीच्या कथा नव्याने कळाल्या. सगळ्याच स्रीशांमध्ये गार्गी अत्यंत खंबीर आणि ताकदीने चितारली आहे. तेही अत्यंत स्वाभाविकता जपत. तिचेच ब्रह्मात विलीन होणे अद्वैत डोळ्यांना िीपवणारे आहे. 

रामायणाच्या स्त्रिया नायिका नसल्या, तरी त्यांचे अलौकिक कर्तृत्व वाचून भारावून जायला होते. मंदोदरी, ऊर्मिला आणि अहिल्या हलवून टाकतात. सगळ्या कथा उत्तम, भारावून टाकणाऱ्या, त्या काळात घेऊन जाणाऱ्या आहेत. कैकेयीची बाजूही उत्तम मांडलेली आहे. कुठेतरी पटत नाही मनाला, तरीही. त्रिवक्रा माहिती नव्हती पण खूप खूप भावली. कंसाला गंधविलेपन करणारी ही कुरूप दासी कृष्णसेवेसाठी आसुसलेली असते. देहाची आसक्ती आणि देहातीत कृष्णभक्ती यांच्या अल्याड पल्याड नेणारी ही मोहक सुगंधी कथा. साम्राज्ञी असूनही आधी वालीची आणि नंतर त्याचाच वध करणाऱ्या त्याच्या भावाची सुग्रीवाची पत्नी व्हावे लागले, अशा ‘तारा’ची घुसमट तिची वेदना जाणवल्याविना राहात नाही. 
लेखिकेने मीरा जिवंत केली. चांगल्या लेखनशैलीची खूणगाठ या मीरेच्या कथेने बांधली आहे. कथेमध्ये मीराबाईंच्या काही कवनांनी एक आगळे चैतन्य ओतले आहे. स्त्री रूपात वावरणारी ईश्‍वरी शक्तीची स्त्री. या साऱ्या स्त्रीशा अशाच अर्थानं असाव्यात. हे पुस्तक अशाच काही मान्यताप्राप्त स्त्रियांचे वर्णन करणारे, त्यांच्या असीम त्यागाची समर्पणाची कहाणी सांगणारे आहे.
 

संबंधित बातम्या