इतिहासाला उजाळा

योगेश बोराटे
गुरुवार, 7 जून 2018

पुस्तक परिचय
 

केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे, तर सबंध देशाच्या शैक्षणिक संस्कृतीसाठी महत्त्वाची मानली जाणारी संस्था म्हणून पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजकडे पाहिले जाते. या संस्थेच्या स्थापनेपासूनच्या इतिहासाला उजाळा देणारा दस्तऐवज म्हणून डॉ. वि. मा. बाचल यांनी लिहिलेल्या व डॉ. राजा दीक्षित यांनी संपादित केलेल्या ‘वाटचाल फर्ग्युसनची’ या ग्रंथाचा विचार करता येईल. केवळ शैक्षणिक संदर्भानेच नव्हे, तर ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भानेही ‘फर्ग्युसन’ आणि हा ग्रंथ आपल्याला आपल्याच भागाची एक वेगळी ओळख करून देऊ शकतो. ग्रंथाच्या उपशीर्षकामध्ये असणारे ‘फर्ग्युसन’च्या १२५ वर्षांच्या प्रदीर्घ वाटचालीचा अभ्यासपूर्ण मागोवा...’ हे शब्द या ग्रंथाची एक भारदस्त प्रतिमा वाचकांच्या मनात उभी करतात. संस्थेच्या स्थापनेपासून ते सद्यस्थितीपर्यंतच्या इतिहासाचा आपण पदोपदी अनुभव घेत आहोत, याची जाणीव हा ग्रंथ आपल्याला पानापानांमधून सातत्याने करून देत राहतो. ग्रंथाच्या मुखपृष्ठापासून मलपृष्ठापर्यंत पसरलेले ‘फर्ग्युसन’च्या मुख्य इमारतीचे रंगीत छायाचित्र आपल्याला नकळत इतिहासात घेऊन जाते. ग्रंथाच्या सुरवातीच्या पानांमध्येच असलेली विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महादेव बल्लाळ नामजोशी, कॉलेजचे पहिले प्राचार्य वामन शिवराम आपटे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे पहिले अध्यक्ष राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि सोसायटीचे पहिले आश्रयदाते सर जेम्स फर्ग्युसन यांची कृष्णधवल छायाचित्रे शैक्षणिक इतिहास अधिक रंजक बनविण्यासाठी पूरकच ठरतात.

तीन भागांमधून विभागलेली या ग्रंथाची मांडणी ‘फर्ग्युसन’ आणि त्याच्याशी निगडित असलेल्या व्यक्ती, संस्था आणि त्यांचे कार्य व्यवस्थितपणे जाणून घेण्यासाठी उपयुक्त ठरते. लेखकाने आपल्या मनोगतामधून संस्थेविषयीच्या भावना व्यक्त करतानाच संस्थेविषयीचे तीन खंड लिहिण्याची इच्छा दर्शविली होती. याच तीन खंडांचे प्रतिबिंब एकत्रितपणे आपण ग्रंथाच्या या तीन वेगवेगळ्या भागांमधून अनुभवू शकतो. स्थापना ते सुवर्णमहोत्सव,  सुवर्णमहोत्सव ते शताब्दी आणि शताब्दी ते शतकोत्तर रौप्यमहोत्सव अशा तीन कालखंडामध्ये विभागलेला इतिहास मांडत या ग्रंथाचे लेखन करण्यात आले आहे. संस्थेचा इतिहास, व्यक्तिगत अनुभवातून समोर आलेली संस्थेची वेगवेगळी रूपे, आठवणी आणि अहवालात्मक लिखाणाद्वारे लेखकाने संस्थेचे ऐतिहासिक अंतरंग उलगडून दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. विविध घटनांविषयी पूरक माहिती, संदर्भ देण्यासाठी पुस्तकात ठिकठिकाणी तळटीप देण्यात आल्या आहेत. संपादकीय मनोगतामधून डॉ. दीक्षित यांनी या ग्रंथाच्या निर्मितीप्रक्रियेबाबत सविस्तर भाष्य केले आहे.  भारतामधील खासगी शिक्षण संस्थांच्या उभारणीच्या प्रयोगामध्ये असणारा ‘फर्ग्युसन’चा वाटा या ग्रंथाच्या सुरवातीच्या काही पानांमध्येच आपल्याला जाणून घेता येतो. विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या प्रेरणेतून स्थापन झालेली न्यू इंग्लिश स्कूल, पुढच्या टप्प्यामध्ये कॉलेज सुरू करण्यासाठी म्हणून झालेली डेक्कन एज्युकेशन सोसायटीची निर्मिती आणि त्यानंतर २ जानेवारी,१८८५ रोजी शनिवार पेठेतील गद्रेवाड्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजची झालेली स्थापना हे ‘फर्ग्युसन’च्या सुरवातीच्या काळातील महत्त्वाचे टप्पे आपण अलगदच ओलांडून पुढे जातो. 

‘स्थापना ते सुवर्णमहोत्सव’ या पहिल्या भागामध्ये ‘फर्ग्युसन’च्या स्थापनेची पूर्वपीठिका, कॉलेजचा शुभारंभ, प्लेगच्या साथीदरम्यानची ‘फर्ग्युसन’ची वाटचाल, रॅंग्लर परांजपेंच्या कालखंडातील फर्ग्युसन कॉलेज आपण जाणून घेऊ शकतो. सुवर्णमहोत्सवापर्यंतच्या वाटचालीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे संस्थेचे सेवक आणि त्या दरम्यानच्या काळातील माजी विद्यार्थ्यांच्या आठवणींचाही या भागामध्ये समावेश करण्यात आला आहे. 

देशसेवेच्या प्रेरणेतून शैक्षणिक संस्था स्थापन करण्यापासून ते राजकीय हितासाठी म्हणून शैक्षणिक संस्थांचा आसरा घेण्यापर्यंतचा प्रवास आपल्याकडील शैक्षणिक संस्थाचालकांनी केला आहे. त्यातील अलीकडच्या काही दशकांचा काळ सोडला, तर त्यापूर्वीचा काळ हा प्राचार्यांच्या आणि शिक्षकांच्याच नावाने ओळखल्या जाणाऱ्या शिक्षणसंस्थांचा होता. या कालखंडाचे प्रतिबिंबही आपण या ग्रंथामधून अनुभवू शकतो. ‘सुवर्णमहोत्सव ते शताब्दी’ आणि ‘शताब्दी ते शतकोत्तर रौप्यमहोत्सव’ या दोन भागांमधून आपण फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य आणि संबंधित प्राचार्यांच्या कार्यकाळादरम्यानची फर्ग्युसन कॉलेजची वाटचाल हा ग्रंथ उलगडून सांगतो. ‘फर्ग्युसन’मधील वेगवेगळ्या इमारती, त्यांची निर्मिती आणि वैशिष्ट्ये, विद्यार्थी- विद्यार्थिनींसाठीची वसतिगृहे, प्रयोगशाळा, वाडिया अम्फिथिएटर, प्राध्यापकांनी बांधलेले ‘फर्ग्युसन’मधील निवासी बंगले, सुरवातीच्या काळामध्ये डेक्कन कॉलेजसोबत होणारी ‘फर्ग्युसन’ची तुलना, संस्थेमधील पदाधिकाऱ्यांच्या राजकीय भूमिका आणि तत्कालीन इंग्रज सरकार, विद्यार्थी आणि राजकारणाशी निगडित तत्कालीन परिस्थिती अशा वेगवेगळ्या मुद्द्यांचा आढावा या ग्रंथामधून घेण्यात आला आहे. कॉलेजमधून निघणाऱ्या मॅगेझीनविषयीची सखोल माहितीही या ग्रंथामधून मांडण्यात आली आहे. माजी विद्यार्थ्यांच्या आठवणींमधून विठ्ठल रामजी शिंदे, कॉलेजची पहिली विद्यार्थिनी असलेल्या डॉ. कृष्णाबाई केळवकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे आदींनी ‘फर्ग्युसन’विषयी केलेले गौरवोल्लेख आणि त्यांच्या विद्यार्थीदशेतील फर्ग्युसन कॉलेज आपल्यासमोर उभे राहते. एकुणात हा ग्रंथ राज्याच्या आणि देशाच्या शैक्षणिक इतिहासामध्ये एक मैलाचा दगड असलेल्या फर्ग्युसन कॉलेजची ऐतिहासिक घोडदौडच वाचकांपुढे मांडण्यात यशस्वी ठरत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

संबंधित बातम्या