‘पुनर्नवा’ स्त्रीत्वाचा जागर 

योगिनी जोशी
शुक्रवार, 9 मार्च 2018

पुस्तक परिचय

रक्तचंदन
 लेखिका ः आश्‍लेषा महाजन
 प्रकाशन ः कविताघर प्रकाशन, पुणे
 किंमत ः १००,    पाने ः ११९
 

प्रगल्भ, संवेदनशील लेखिका-कवयित्री आश्‍लेषा महाजन यांचा "रक्तचंदन" हा चौथा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. मुखपृष्ठावरची रक्तचंदनाची ठकी (बाहुली) ही स्त्रीचं सामाजिक बांधलेपण व आत्मिक चंदनी जगणं सूचित करते. 

रक्तचंदन ही एक काष्ठौषधी. मुक्‍या मारामुळे शरीराच्या ठसठसणाऱ्या भागावर ती उगाळून लावली जाते. फार पूर्वीपासूनच तिला खेळण्यातल्या ठकीचा आकार दिला गेला. याच ठकीला सूचकपणे स्त्रीची प्रतिमा बहाल करून आश्‍लेषाने फार सूक्ष्मपणे स्त्रीत्वाचे अंतर्गत व बहिर्गतही प्रवाह काव्यसंग्रहात खुले केले आहेत. स्त्रीच्या शारीरिक, मानसिक, आत्मिक अशा सर्व स्तरांवरच प्रातिनिधिक, वास्तववादी व परखड भाष्य करणाऱ्या या कविता जीवन-प्रवाहाच्या बोथटपणाला धारदार करतात. 

आश्‍लेषाने सार्वदेशिक, सार्वकालिक स्त्रीत्वाच्या खुणांना रक्तचंदन या शीर्षक-कवितेत अतिशय स्पष्टपणे शब्दबद्ध केले आहे. प्रत्येक स्त्रीला आपलीच वाटणारी ही विलक्षण कविता अवाक्‌ करते- 

‘जेव्हा पहिल्यांदा वाहू लागतं रक्त 
संप्रेरकांच्या अनाकलनीय धुमश्‍चक्रीत 
तेव्हा भांबावतो कोवळा जीव 
कात टाकणाऱ्या नागिणीप्रमाणे...... 
नि मग सरसावते समाजपुरुषाची नजर..’ 

स्वतःमधल्या प्रवाहीपणाला प्रवाहापासून वंचित ठेवणे आवडत नाही कवयित्रीला. त्यामुळेच बहुधा ती या प्रवाहाला बांध घालणाऱ्या रूढी-परंपरा, रीती-रिवाजांविरुद्ध बंड करते- 

तुझे ओठ शिवले आहेत 
त्याला युगे झाली किती ? 
डोळ्यांवरती काळी कुट्ट 
अबलतेची जीर्ण पट्टी 
त्याज्य रुढींच्या जळमटांना निर्धारानं झाड ना 
कधीतरी जीवनाशी पोटभर भांड ना... 

स्त्रीमनावर लादलेले साचलेपण ती झुगारून देताना म्हणते- 

बरे झाले बोलले, वेळोवेळी मोकळी झाले, कोंडले नाही, कोंबले नाही, वाहू दिले 
बरे झाले उघडी ठेवली जखम ओली, झाकली असती तर ती नसती का उबली 
उगाळते मी रोज माझे रक्तचंदन असे, त्वचेवरल्या व्रणांच्याही पार माझे ठसे. 

समाज व परंपरांची मुस्कटदाबी सहन न करता या सगळ्या चिमण्या, लेकी, बाळी, सुना, आया, बाया तिला ‘माणूस’ झालेल्या पहायच्यात. ‘माणूस झालेल्या बाया’ पाहून ती समाधानाने म्हणते- 

‘‘किती थोड्या त्यातल्या ‘माणूस’ होतात बाया 
पुसू पाहतात सटवाईच्या रेषा 
दूरदूरचे पहात मोकळ्या करतात दिशा 
‘सावित्रीच्या लेकी’ या.. 
स्वतःसह इतरांच्याही उजळतात ज्योती 
स्वातंत्र्य, समतेची मोजून किंमत मोठी 
माणुसकीची पांघरतात केवढी आभाळमाया 
अशा या ‘माणूस’ झालेल्या बाया..’’ 

कवयित्री हे ध्येयच ठेवते आहे समस्त स्त्रीजाती समोर !! 
जीवनाच्या जैविक धारेला प्रवाहित ठेवणाऱ्या या "पुनर्नवा' स्त्रीत्वालाच हे काव्यलेणं समर्पित केलं आहे. जे लेणं प्राचीन व अर्वाचिनही खुणांना अंगभर मिरवतं आहे. 
‘मेकओव्हर’ सारख्या कवितेत जमिनीचे रूपक घेऊन खोलवर दडलेलं जुनाट दुःखंच व्यक्त झालंय- 

तथाकथित विकासासोबत 
सक्तीचा अभिसार करताना 
गर्भात गाडलेल्या नवांकुरांच्या 
अनावर बाळ-ढुश्‍यांची 
कशी काढतेस बायो , समजूत..? 

पुरुषकेंद्री स्त्रीत्वाच्या हतबल उद्गारातून आलेला तीव्र उपहासही विलक्षण आहे. हा उपहास त्यांचा- 

ज्यांनी स्त्रीला केले निष्क्रिय व निर्बुद्ध. 
घरचे निर्णय घेती पुरुष 
बुजुर्ग त्यानेच होती खूष 
विरोध नाही ना धुसफुस 
करायचे नाही हाय नि हुश 
बोलायला बंदी सांगायचे कुणा ? 
खानदानी सुना आम्ही खानदानी सुना 
किंवा ... 
माझे प्यादे तुझा वजीर 
सेवेला मी तुझ्या हाजीर... 
माझे जगणे विरून जाणे 
त्याची नाही तुला फिकीर... 

किंवा अगदी स्वतःचा मुलगा जेव्हा ‘पुरुष’ होतो तेव्हाची भावना शब्दांकित करतानाची कवयित्रीची तटस्थता विस्मित करते- 

अवाक्‌ होऊन पहातच राहते 
संस्कृतीच्या भरभक्कम दगडी गोपूरामध्ये 
दिसामासी वाढत जाणारा चिरंजीवाचा 
हाडामासाचा पुल्लिंगी पुतळा....! 

आणि आत्मनिष्ठ स्त्रीचे उद्गारही ही मनस्वी कवयित्री समर्थपणे बोलते !! 
कळीकाळाच्या कुठल्या आवर्तनातून वर, आली पितृसत्ता नि पुरुषप्रधान संस्कृती? 

कधी दगडी चिरेबंदी झाली मनुप्रणीत, प्रजापती संस्था? 
कुठल्या अभ्युदयाच्या आशेवर उगवली , लग्नसंस्था? 

स्त्रीला ओलांडून गेलेली लेखिका-कवयित्रीही भेटते इथे. ‘काच-कमळ’ कवितेत अस्वस्थ लेखिका स्वतःला आत-बाहेर शोधतोय. स्त्रीत्वाला ओलांडलेली लेखिका नंतर लेखिकेलाही ओलांडते व स्वतःच्याच आत्मशक्तीचे दर्शन घडवते. स्थूल-सूक्ष्माचा विचार करते .त्याचा शोध घेत स्वतःला प्रगल्भ करते. ‘आपलं फक्त तप’, असं म्हणते. अलिप्त होते. 

योग म्हणावं तर त्याला नसते संगती, 
भोग म्हणावं तर त्यातही विसंगती .. 

असं म्हणून स्वतःलाच खणते. ‘कर्मण्येवाधिकारस्ते’ ही आज्ञा भिनवू पहाते स्वतःत. 
‘कातळमाया’ कवितेमधून सांगू पहाते- देवत्वाचे नवे संदर्भ. जैविकतेची उगमस्थान असलेली ही स्त्री 

‘जीवंतिका’ कवितेतून निर्भयतेसाठी सटवाईला पुजते! ‘बाई जगणे.’ लौकिकातूनच अलौकिकाला जाणायचे आहे, हे शिकवते. सर्व कविता स्पष्ट व परखड असल्या तरी अत्यंत संयमित आहेत. त्या कुठेही काठ सोडून आक्रस्ताळ्या होत नाहीत. 
कवयित्रीने भुजंगप्रयात, सुमंदारमाला, भूपतिवैभव, अष्टाक्षरी इ. वृत्ते समर्थपणे हाताळली आहेत . 

पुस्तकाचा आकार , टंकलेखन , सर्व काही आकर्षक, स्वच्छ आहे . मुद्रण चुकांचे अडथळे नाहीत. मलपृष्ठावर मा. डॉ. वसंत आबाजी डहाके यांनी संग्रहाविषयीचे मत अतिशय आत्मीयतेने मांडले आहे. ‘‘स्त्रीला स्त्रीत्व प्राप्त होण्याचा क्षण हा ‘पुनर्नवा’ या शब्दाच्या मुळाशी जाण्याचा क्षण असतो आणि तिच्याकडे एक सामाजिक रचित म्हणून पाहण्याचाही क्षण असतो,’’ हा त्यांचा मुद्दा खरोखर चिंतनीय आहे. स्वतःच्याच शब्दांनी समाधी अवस्था भोगणारी ही कवयित्री भावी काळातही नवे काही शोधेल, रसिकांच्या हाती चंद्र देईल. कारण कवी-मनाची कोजागरी कधीच संपत नाही...!!

संबंधित बातम्या