पुस्तक संस्कृतीचे दर्शन

योगिराज करे
गुरुवार, 3 मे 2018

पुस्तक परिचय

लीळा पुस्तकांच्या
लेखक ः नितीन रिंढे
प्रकाशक ः लोकवाङ्‌मय गृह, पुणे
किंमत ः २५० रुपये  
पाने ः १८९

ग्रंथ हेच गुरू’ मानणाऱ्या आपल्या संस्कृतीमध्ये पुस्तकांविषयी प्रचंड आस्था आहे. कदाचित त्यामुळेच पुस्तकांकडे एकाच चष्म्यातून पाहण्याची सवय आपल्या मनावर लहानपणापासून बिंबते. या उलट नेमकी स्थिती पाश्‍चात्त्य देशांमध्ये अनुभवायला मिळते. पाश्‍चात्यांमध्ये पुस्तकांकडे आस्थेने पाहिले तर जातेच; तसेच त्यांच्या बहुआयामी पैलूंकडेही तितकेच लक्ष दिले जाते. नितीन रिंढे यांच्या ‘लीळा पुस्तकांच्या’मधून आपल्याला या अनोख्या पुस्तक संस्कृतीच्या सफरीचे दर्शन घडते. सोप्या व प्रभावी लेखनशैलीतील २३ प्रकरणांतून वाचकांपुढे पुस्तक या ‘वस्तू’चे बहुरंगी उलगडत जातात. पाश्‍चात्त्य पुस्तक संस्कृती वाचकांसमोर उलगडत असताना, मराठी पुस्तक संस्कृतीचे प्रतिबिंबही अप्रत्यक्षपणे उभे राहते. त्यातून त्याला येणारी अंतर्मुखता हाच या पुस्तकांविषयाच्या पुस्तकाचा परमोच्च बिंदू आहे. 

लेखकांचा परिचय, तत्कालीन अनुकूल किंवा प्रतिकूल राजकीय-सामाजिक परिस्थिती लेखकांनी जपलेले पुस्तकांचे वेड, पुस्तकांशी असलेले त्यांचे घट्ट नाते आपण वाचत जातो आणि अवाक्‌ होतो. पुस्तकांविषयीच बोलणाऱ्या, लिहिणाऱ्या आणि जगणाऱ्या वॉल्टर बेंजामिनपासून आपला प्रवास सुरू होतो. बेंजामिनने पुस्तक संग्रहाविषयी केलेले सखोल चिंतन आपल्यासमोर येते. अस्सल संग्राहक हा पट्टीचा वाचक असतो, हे मनोमन पटते. ‘पुस्तकाच्या शाश्‍वत रूपाचा शोध सुरूच राहणार आहे’ या स्टुअर्ट केली याच्या म्हणण्याचा अर्थ आपल्याला ‘द बुक ऑफ लॉस्ट बुक्‍स’विषयी वाचताना कळतो. मानवी इतिहासातून नाहीशा झालेल्या पुस्तकांचा इतिहास आपल्यासमोर येतो. ‘कॅसानोव्हा वॉज अ बुकलव्हर’ या पुस्तकात अमेरिकन पत्रकार-प्राध्यापक जॉन हॅमिल्टनने टिपलेल्या गैरसमजुती, विसंगती आणि वैचित्र्यपूर्णता ‘कॅसानोव्हाच्या निमित्ताने ग्रंथांचा इतिहास’ या प्रकरणामध्ये वाचायला मिळतात. 

‘बहुभाषिक-बहुसांस्कृतिकता’ हे आधुनिक समाजाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे आणि ते जपण्याचे कार्य ग्रंथालये करीत आहेत,’ असे निरीक्षण अल्बेर्तो मॅंग्वेलने मांडले आहे. ‘मॅंग्वेलच्या ग्रंथालयातील मंतरलेली रात्र’मधून आपण मॅंग्वेलने ग्रंथालयासाठी घेतलेल्या कष्टाविषयी वाचतो आणि त्यांचे निरीक्षण आपल्या मनात कुठेतरी झिरपत जाते. त्यामुळेच मॅंग्वेलचे ‘लायब्ररी ॲट नाइट’ जगभरातल्या ग्रंथालयांचे चरित्र होऊन जाते. झोरान झिवकोविच याने शब्दबद्ध केलेल्या ‘द लायब्ररी’ यातील सर्व कथांचा नायक ‘पुस्तक’ आहे. पुस्तक-वाचक-लेखक याच गोष्टी कथांच्या केंद्रस्थानी आहेत. पाश्‍चिमात्य वाङ्‌मयीन पर्यावरणातील दुर्मिळ पुस्तक व्यवहाराचे अनेक पैलू आपल्याला रिक गेकोस्कीविषयी असलेल्या ‘प्राध्यापकाचा बनला पुस्तकविक्‍या’ या प्रकरणात वाचायला मिळतात. ‘वाचक जेव्हा कादंबरीचं पात्र बनतो’मधून वाचक ही मध्यवर्ती कल्पना घेऊन लिहिलेल्या पुस्तकांविषयी आपण वाचतो. 

इटालियन कादंबरीकार उम्बर्तो इकोच्या पुस्तकांतून कादंबरीकारांच्या लेखनप्रक्रियेची आपल्याला ओळख होते. ‘एका ‘तरण्या’ कादंबरीकाराचा कबुलीजबाब’मध्ये आपल्याला कादंबरीकाराची लेखनाची पूर्वतयारी, लेखन व निर्मिती प्रक्रिया आणि लेखनाबद्दलच्या कल्पनांविषयी वाचायला मिळते. वाचनाचे आपल्या आयुष्यातले स्थान काय, याविषयीचे हे प्रगल्भ चिंतन आहे. अत्तर विकणाऱ्या झॅक ग्युरिन याने त्याचा आवडता लेखक मार्सेल प्रूस्त याच्या मिळेल तेवढ्या वस्तू जमविल्या आणि त्याचा संग्रह केला. आवडणाऱ्या लेखकाविषयी वाटेल ते करण्याची तयारी असलेल्या ग्युरिनबद्दल ‘अत्तरविक्‍याचं पुस्तकप्रेम’ वाचताना आपल्यासमोर प्रूस्तच्या आयुष्याचाही उलगडा होत जातो. पुस्तकांपासून दुरावा सहन न होणाऱ्यांविषयी आपण ‘पुस्तकांच्या सहवासात’मध्ये वाचतो. ‘न वाचलेली पुस्तकं’ हा विषय घेऊन ‘न वाचना’चं संकीर्तन’ आपल्यापुढे येते. ‘द ग्रोनिंग शेल्फ ः ग्रंथप्रेमाचे विविध रंग’ या प्रकरणातून प्रदीप सेबॅस्टियन या भारतीय लेखकाच्या पुस्तके जमविण्याच्या कष्टाबद्दल वाचून आपण थक्क होतो. ‘फिक्‍शनमधील पुस्तकं’, ‘द्युमा क्‍लब ः पुस्तकाविषयीची रहस्यकथा’, ‘पुस्तकचोराच्या मागावर गुप्तहेर’, ‘बुकशेल्फ’चा इतिहास’, ‘समासातल्या नोंदी केवळ...’, ‘मुखपृष्ठांच्या रेखीव गोष्टी’, ‘एका शब्दकोशाची जन्मकथा’, ‘ग्रंथसुखाविषयी सुखसंवाद’, ‘पुस्तकांची असोशी’, ‘पुस्तकांनी रचलेली चरित्रं’, ‘हिटलर ः पुस्तकं जपणारा आणि जाळणारा’ यांतून पुस्तकांचे वेगळे विश्‍व आपण अनुभवतो. 

इंग्रजी पुस्तकांविषयीच्या पुस्तकांबद्दल लिहिताना रिंढे यांनी मराठी पुस्तक संस्कृतीविषयी केलेले अभ्यासपूर्ण विवेचन मुळातूनच वाचण्यासारखे आहे. ‘मराठी ग्रंथव्यवहाराची दशा आणि दिशा’च त्यातून आपल्याला कळते. मराठी पुस्तक संस्कृतीच्या दुष्काळाची लेखकाने केलेली कारणमीमांसा मनोमन पटते. पुस्तकांच्या विविध पैलूंविषयी केलेले हे चिंतन अनुभवण्यासाठी ‘लीळा पुस्तकांच्या’ हाती धरायलाच हवे.

संबंधित बातम्या