चॉकलेटची मेजवानी 

मंजिरी कपडेकर, कोल्हापूर 
सोमवार, 23 डिसेंबर 2019

केक स्पेशल
चॉकलेट न आवडणारा माणूस विरळाच. चॉकलेटचे प्रकारही किती; मिल्क चाॅकलेट, डार्क चॉकलेट, व्हाइट चॉकलेट... त्यापासून तयार होणाऱ्या केक्स आणि पेस्ट्रीजमध्येही भरपूर वैविध्य आहे. अशाच काही निवडक चॉकलेट केक्स आणि पेस्ट्रीजच्या रेसिपीज...

स्पॉंज केक  
साहित्य : पाऊण कप मैदा, पाऊण कप साखर, पाव कप कोको पावडर, १ टीस्पून बेकिंग पावडर, चिमूटभर सोडा, २ अंडी, अर्धा टीस्पून व्हॅनिला इसेन्स, पाव टीस्पून चॉकलेट इसेन्स, अर्धा कप लोणी. 
कृती : मैदा, कोको पावडर, बेकिंग पावडर, सोडा सर्व एकत्र करून चाळून घ्यावे. एका मोठ्या बोलमध्ये लोणी फेटून घ्यावे. त्यात पिठीसाखर घालून पुन्हा फेटून घ्यावे. नंतर अंडी फेटून घालावीत. छान एकजीव करावे. दोन्ही इसेन्स घालावेत. मैद्याचे मिश्रण थोडे थोडे घालून छान एकजीव करावे. केकच्या मोल्डला ग्रीसिंग करून त्यात बटर पेपर लावावा. त्यावर हे मिश्रण ओतावे. १८० अंशाला २० मिनिटे बेक करावे. गरज पडल्यास वेळ वाढवावा. नंतर गार झाल्यावर केक सर्व्ह करावा.


ओरिओ पेस्ट्री 
साहित्य : एकशे तीस ग्रॅम मैदा, २० ग्रॅम कोको पावडर, २० ग्रॅम ओरिओ बिस्किटांचा चुरा, १५० ग्रॅम पिठीसाखर, २ टीस्पून बेकिंग पावडर, पाऊण कप सोडा वॉटर, पाऊण कप मिल्क पावडर, अर्धा कप तेल. 
सजावटीसाठी : व्हीप्ड क्रीम, चेरी, २ टेबलस्पून ओरिओ बिस्किटांचा चुरा, ओरिओ बिस्किटे.
कृती : मैदा, बेकिंग पावडर, कोको पावडर, मिल्क पावडर एकत्र करून चाळून घ्यावे. त्यातच पिठीसाखर घालावी. तेल, सोडा वॉटर एकत्र करून बीटरने बीट करून घ्यावे. त्यातच वरील मिश्रण सावकाश एकत्र करावे. नंतर ओरिओ बिस्किटांचा चुरा घालून मिक्‍स करावे. बेकिंगच्या भांड्याला तेल लावून त्यावर बटर पेपर ठेवावा. ओव्हनमध्ये १८० अंशाला १५ ते २० मिनिटे बेक करावे. गार झाल्यानंतर काढून घ्यावा. सजावटीसाठी व्हीप्ड क्रीम बीट करून घ्यावे. छान फुलून येईल. नंतर त्यामध्ये स्पॅच्युल्याच्या साहाय्याने ओरिओ बिस्किटांचा चुरा सावकाश घालावा व एकत्र करावा. केकचे बेसमधून कापून दोन भाग करावेत. त्यावर साखरेचे पाणी लावावे, व्यवस्थित क्रीम पसरावे. त्यावर दुसरा भाग ठेवावा. परत साखरेचे पाणी लावावे. सगळीकडे क्रीम लावून घ्यावे व एकसारखे करावे. चेरी, ओरिओ बिस्किटांनी सजवावे.


व्हाइट चॉकलेट पेस्ट्री  
साहित्य : दीडशे ग्रॅम मैदा, १५० ग्रॅम पिठीसाखर, २ टीस्पून बेकिंग पावडर, पाऊण कप मिल्क पावडर, पाऊण कप सोडा वॉटर, अर्धा कप तेल. 
सजावटीसाठी : व्हीप्ड क्रीम, व्हाइट चॉकलेट बार, चेरी. 
कृती : मैदा, बेकिंग पावडर, मिल्क पावडर एकत्र चाळून घ्यावे. त्यातच पिठीसाखर मिक्‍स करावी. एका मोठ्या बोलमध्ये तेल, सोडा वॉटर घ्यावे. बीटरने बीट करून घ्यावे. नंतर त्यात मैद्याचे मिश्रण एक-एक चमचा स्पॅच्युलाने मिक्‍स करावे. मायक्रोवेव्ह सेफ काचेच्या भांड्याला तेल लावावे. त्यात हे मिश्रण ओतून मायक्रोवेव्हला हाय पॉवरला चार मिनिटे ठेवावे. नंतर काढून घ्यावे. गार झाल्यावर मधून बेस कापून घ्यावा. व्हीप्ड क्रीम फेटून घ्यावे. बेसवर शुगर सिरप लावावे (अर्धा कप साखर, एक कप पाणी). त्यावर व्हीप्ड क्रीम पसरावे. वर व्हाइट चॉकलेट किसून घालावे. दुसरा बेस ठेवावा. परत शुगर सिरप लावावे. व्हीप्ड क्रीम घालून छान पसरावे. पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून वर डिझाईन करावे. केकला सगळ्या बाजूंना व्हाइट चॉकलेट किसून लावावे. वरून चेरी लावावी. दोन-तीन तास फ्रीजमध्ये ठेवून नंतर सर्व्ह करावे.


चाॅको चिप्स केक  
साहित्य : दोन वाटी मैदा, ३ अंडी, १ कप पिठीसाखर, १ कप लोणी, दीड टीस्पून बेकिंग पावडर, पाव टीस्पून खाण्याचा सोडा, पाव कप चॉकलेट चिप्स, अर्धा टीस्पून व्हॅनिला इसेन्स. 
कृती : मैदा, बेकिंग पावडर, सोडा एकत्र करून चाळून घ्यावा. लोणी फेटून घ्यावे. त्यातच पिठीसाखर घालून फेटावे. अंडी, इसेन्स घालून पुन्हा छान फेटून घ्यावे. थोडा थोडा मैदा घालून एकजीव करावे. त्यातच चाॅको चिप्स घालून हलक्‍या हातांनी एकत्र करावे. मायक्रोवेव्ह सेफ काचेच्या भांड्यात मिश्रण ओतून मायक्रोवेव्हला ८ मिनिटे हाय पॉवरला ठेवावे. गरज पडल्यास वेळ वाढवावा. केक गार झाल्यावर चौकोनी तुकडे करून सर्व्ह करावा.


रम बॉल
साहित्य : एक वाटी केकचा चुरा, १ टीस्पून डार्क चॉकलेट रम, सजावटीसाठी रंगीत बॉल्स, चांदण्या, मिल्कमेड आवश्‍यकतेनुसार. 
कृती : केकच्या चुऱ्यामध्ये रम घालावी. त्यात गरजेनुसार मिल्कमेड घालून छान एकजीव करावे. या मिश्रणाचे बॉल करून घ्यावेत. डार्क चॉकलेट बारचे तुकडे करून ओव्हनमध्ये ठेवून वितळवून घ्यावेत. वरील बॉल चॉकलेटमध्ये बुडवून बटर पेपरवर ठेवावेत. वरून रंगीत बॉल्स, चांदण्या लावाव्यात. फ्रीजमध्ये ठेवून सेट करून घ्यावे.


स्लाइस केक  
साहित्य : दीड कप मैदा, अर्धा कप कोको पावडर, अर्धा कप किसलेले चॉकलेट, दीड टीस्पून बेकिंग पावडर,  १ कप बटर किंवा लोणी, सव्वा कप पिठीसाखर, २ टीस्पून टूटीफ्रुटी, पाव टीस्पून सोडा, ३ अंडी. 
कृती : मैदा, बेकिंग पावडर, कोको पावडर, सोडा एकत्र करून चाळून घ्यावा. लोणी किंवा बटर भांड्यात घेऊन फेटून घ्यावे. त्यात पिठीसाखर, अंडी घालून परत छान फेटून घ्यावे. व्हॅनिला इसेन्स घालावा. मैद्याचे मिश्रण थोडे थोडे घालून छान एकत्र करावे. नंतर त्यात किसलेले चॉकलेट, टूटीफ्रुटी घालावी. स्पॅच्युल्याने सावकाश मिक्‍स करावे. स्लाइसच्या आकाराच्या ट्रेमध्ये बटर पेपर घालावा. त्यावर केकचे मिश्रण ओतावे. मायक्रोवेव्हला मायक्रोवेव्ह + कन्व्हेक्शन या मोडवर १० मिनिटे बेक करावे किंवा १८० अंशाला ओव्हनमध्ये १५ मिनिटे बेक करावे. नंतर गार झाल्यानंतर काढून केकच्या स्लाइस कराव्यात.


चॉकलेट ट्रफल  
साहित्य : अर्धा कप फ्रेश क्रीम. ओरिओ पेस्ट्रीप्रमाणे बेस करून घ्यावा. फक्त त्यात ओरिओचा चुरा घालू नये. 
कृती : चॉकलेट ट्रफल करण्यासाठी भांड्यात क्रीम विरघळवून घ्यावे. त्यात डार्क चॉकलेट घालावे. छान एकजीव करावे. केकच्या बेसचे दोन भाग करावेत. त्यावर साखरेचे पाणी लावावे. नंतर व्हीप्ड क्रीम पसरवून घ्यावे. त्यावर परत दुसरी स्लाइस ठेवावी. त्यावर साखरेचे पाणी लालावे. परत क्रीम लावून घ्यावे. त्यावर चॉकलेट ट्रफल छान पसरवून घ्यावे. फ्रीजमध्ये ठेवून थंडगार करावे व नंतर सर्व्ह करावे.


सिझलिंग ब्राउनी  
साहित्य : दोनशे ग्रॅम ओरिओ बिस्किटांचा चुरा, ४ टेबलस्पून पिठीसाखर, १ टीस्पून पातळ बटर, व्हॅनिला इसेन्स, १ टीस्पून बेकिंग पावडर, पाव कप अक्रोडचे तुकडे, अर्धा कप दूध. 
सर्व्हिंगसाठी : व्हॅनिला आइस्क्रीम, चॉकलेट सॉस. 
कृती : एका बोलमध्ये ओरिओ बिस्किटांचा चुरा घ्यावा. त्यामध्ये पिठीसाखर, बटर, इसेन्स घालावा. छान एकजीव करावे. नंतर त्यात दूध घालून परत एकजीव करावे. अक्रोडाचे तुकडे, बेकिंग पावडर घालून मिक्‍स करावे. लगेच बटरपेपर लावलेल्या मोल्डमध्ये घालावे आणि १८० अंशाला प्री-हीट केलेल्या ओव्हनमध्ये ठेवून दहा ते पंधरा मिनिटे बेक करावे. गार झाल्यानंतर काढून घ्यावे आणि चौकोनी तुकडे करावेत. सिझलर प्लेट पाच मिनिटे मध्यम गॅसवर तापवून घ्यावी. नंतर लाकडी डीशवर ठेवावी. त्यावर तयार ब्राउनीचा एक तुकडा ठेवावा. त्यावर व्हॅनिला आइस्क्रीमचे २ स्कूप घालावेत. वर चॉकलेट सॉस आवडीनुसार घालावा आणि लगेचच सर्व्ह करावे. डीशमध्ये कडेलापण चॉकलेट सॉस घालावा म्हणजे त्याची वाफ छान येते, सुंदर दिसते.


ब्लॅक फॉरेस्ट पेस्ट्री 
साहित्य : चार टेबलस्पून मैदा, २ टेबलस्पून कोको पावडर, २ अंडी, पाव कप तेल, १ टीस्पून बेकिंग पावडर, पाव टी-स्पून चॉकलेट इसेन्स, ४ टेबलस्पून पिठीसाखर.
सजावटीसाठी : व्हीप्ड क्रीम, किसलेले डार्क चॉकलेट, चोको चिप्स, चेरी. 
कृती : मैदा, बेकिंग पावडर एकत्र करून चाळून घ्यावी. एका मोठ्या बोलमध्ये अंडी, पिठीसाखर, तेल घ्यावे. बीटरने बीट करावे. नंतर इसेन्स घालावा. मैदा स्पॅच्युल्याच्या साहाय्याने मिक्‍स करावा. तेल लावलेल्या मायक्रोवेव्ह सेफ काचेच्या भांड्यात मिश्रण ओतून मायक्रोवेव्हला हाय पॉवरला ३ मिनिटे ठेवावे. नंतर गार झाल्यावर काढून घ्यावे. तयार केक मधून कापून घ्यावा. एका भागावर शुगर सिरप लावावे. त्यावर फेटलेले व्हीप्ड क्रीम पसरावे. त्यावर चॉकलेटचा चुरा, चॉकलेट चिप्स घालावेत. परत दुसरा भाग ठेवावा. त्यावर शुगर सिरप लावावे. परत व्हीप्ड क्रीम सर्व बाजूंनी लावून घ्यावे. पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून डिझाईन करावे. किसलेले चॉकलेट घालावे. चेरी लावावी. दोन-तीन तास फ्रीजमध्ये ठेवून नंतर कापून सर्व्ह करावे.


चॉकलेट ट्रफल बॉल्स
साहित्य : शंभर ग्रॅम डार्क चॉकलेट, २ टेबलस्पून मिल्कमेड, अर्धा टीस्पून फ्रेश क्रीम इसेन्स आवडीनुसार, सुकी फळे तुकडे करून. 
कृती : डार्क चॉकलेट कापून मायक्रोवेव्ह सेफ भांड्यात घालून मायक्रोवेव्हला एक मिनिट वितळवावे. नंतर त्यात इसेन्स, सुक्‍या फळांचे तुकडे, मिल्कमेड घालून छान एकत्र करावे. फ्रेश क्रीम घालावे. मिश्रण कोरडे होईल. त्याचे बॉल करावेत आणि रंगीत शेवेत घोळवून सर्व्ह करावे. याच पद्धतीने व्हाईट चॉकलेट ट्रफलपण करू शकता.

संबंधित बातम्या