केक्स, पुडिंग्ज आणि पंच 

मृणाल तुळपुळे
सोमवार, 23 डिसेंबर 2019

केक स्पेशल
 

डिसेंबर महिना उजाडला, की सर्वांना नाताळचे वेध लागतात. नाताळ संपला की लगेचच नवीन वर्षाचे स्वागत करायचे असते, त्यामुळे सर्वजण नाताळ व नववर्ष साजरे करण्यासाठी सज्ज होतात. २५ डिसेंबर हा येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस व तो जगभर वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. नाताळचा सण म्हणजे नाचगाणी, आतषबाजी आणि खाण्याच्या पदार्थांची रेलचेल हे ओघाने आलेच; पण त्याच्या जोडीला काही चालीरीती आणि परंपरादेखील आहेत व त्या आजही पाळल्या जातात.  

नाताळच्या स्वागतासाठी सर्वत्र सजावट केलेली दिसून येते, तसेच दुकाने व मॉल्स कृत्रिम ख्रिसमस ट्री आणि सजावटीच्या असंख्य वस्तूंनी भरून गेलेले असतात. नाताळच्या सजावटीमध्ये पूर्वापार हिरवा, लाल आणि सोनेरी हे तीन रंग वापरतात. त्यात फर्न, होली आणि आयव्ही ही सदाहरित झाडे, लालचुटूक बेरीज, पॉन्सेटियाची लाल फुले व सफरचंद यांचा सामावेश असतो. सोनेरी रंग हा सूर्य व प्रकाशाचे प्रतीक आहे, तर लाल रंग अग्नीचे प्रतीक आहे. नाताळच्या दिवसातील बोचरी थंडी, पांढरा शुभ्र बर्फ आणि लांब अंधाऱ्‍या रात्रींसाठी या तीनही गोष्टी खूपच महत्त्वाच्या आहेत. 

त्यामुळेच नाताळच्या वेळी घरात हिरवागार ख्रिसमस ट्री ठेवला जातो व सजावटीसाठी लाल रंगाच्या वस्तू, फुले व सोनेरी घंटांचा वापर केला जातो. या दिवसात फुललेल्या लालचुटूक पॉन्सेटियाचे आणि घंटांचे नाताळशी घट्ट नाते जुळले आहे.

आदल्या दिवशी म्हणजे २४ डिसेंबरच्या संध्याकाळपासून, ‘ख्रिसमस इव्ह’पासून नाताळ साजरा करायला सुरुवात होते. त्या दिवशी घरात ख्रिसमस ट्री आणून तो सजवला जातो. त्यासाठी दिवे, रंगीबेरंगी चांदण्या, गोळे, फुले अशा असंख्य लहानलहान गोष्टी वापरल्या जातात. ख्रिसमस ट्री मुलांसाठी खूप महत्त्वाचा असतो, कारण त्या दिवशी या झाडाजवळ त्यांच्यासाठी रंगीत कागदात गुंडाळलेल्या भेटवस्तू ठेवल्या जातात. 

या सणाच्या वेळी घरातील सर्वजण एकमेकांना भेटवस्तू देतात. त्यामध्ये सुंदर फुलांचा गुच्छ, चॉकलेट्स, फळांची टोपली, वाईनची बाटली, मुलांसाठी खेळ वा एखादी महागडी वस्तू असे काहीही असू शकते. नाताळच्या आदल्या दिवशी मुले घराबाहेर मोज्याच्या आकाराची पिशवी टांगून ठेवतात. त्यांची अशी समजूत असते, की मध्यरात्री सांताक्लॉज त्यात त्यांच्यासाठी भेटवस्तू ठेवून जातो.

ख्रिसमस कॅरोल्स म्हणजे नाताळच्या वेळी म्हणायची आनंदगाणी. हीदेखील एक जुनी परंपरा असून त्याबद्दल असे म्हटले जाते, की कॅरोल्सशिवायचा नाताळ म्हणजे रंग नसलेल्या आयुष्यासारखे आहे.   

नातेवाईक वा मित्रमंडळींना घरी भोजनासाठी आमंत्रित करणे व घरातील सर्वांनी एकत्र वेळ घालवणे हा नाताळच्या सणातला एक महत्त्वपूर्ण भाग असतो. नाताळचे जेवण हे वर्षातले सर्वांत खास असे जेवण असल्यामुळे त्यावेळी गृहिणी अगदी निगुतीने सर्व पदार्थ तयार करतात. त्या जेवणाचा मेन्यूदेखील पूर्वापार ठरलेला असतो व आजही बहुतेक घरांतून या प्रथेनुसार सर्व पदार्थ केले जातात. 

‘स्टफ्ड रोस्ट टर्की’ हा नाताळच्या जेवणातला मुख्य पदार्थ असतो. त्याच्या जोडीने मॅश्ड पोटॅटो, क्रॅनबेरी सॉस, ब्राउन सॉस, तसेच लोण्यात परतलेल्या किंवा ग्रील केलेल्या गाजर, टर्निप, ब्रसेल्स स्प्राउट, ब्रोकोली अशा भाज्या असतात. कोणताच सण गोड पदार्थांशिवाय साजरा होऊ शकत नाही, त्यामुळे जेवणानंतर तोंड गोड करण्यासाठी ख्रिसमस पुडिंग, अ‍ॅपल पाय, यूल लॉग किंवा फ्रूट केक अशी डेझर्ट्स असतात. सर्वजण ख्रिसमस ड्रिंक, खास जेवण, संगीत व नृत्याचा आस्वाद घेत मजा करतात.   

‘ख्रिसमस पुडिंग’ हेदेखील नाताळच्या जेवणातला एक अविभाज्य भाग आहे. या पुडिंगचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात प्लम, प्रून्स, खजूर, टुटी फ्रूटी यांच्या जोडीने अल्कोहोलमध्ये मुरवलेला सुकामेवा व दालचिनी, जायफळ, सुंठ असे मसाले घातले जातात. हे पुडिंग करणे अतिशय जिकिरीचे व वेळखाऊ असल्यामुळे ते शक्यतो आदल्या दिवशीच केले जाते.  
आपण जसे दिवाळीच्या आधी फराळाचे पदार्थ करतो, तसे नाताळच्या आधी वेगवेगळ्या प्रकारची बिस्किटे व केक्स केले जातात. जिंजर ब्रेड, बनाना ब्रेड, रम बॉल्स, प्लम केक, चॉकलेट केक, कॉफी केक व कुकीज हे त्यातले काही प्रकार. त्यातल्याच काही चविष्ट आणि करायला सोप्या अशा केक, पुडिंग, कुकीज आणि त्याबरोबरच्या आगळ्या वेगळ्या चवीच्या सॉसेसची कृती बघूया -


जिंजर ब्रेड कुकीज
साहित्य : अर्धा कप लोणी, १ कप साखर, १ अंडे, २ कप मैदा, १ टीस्पून बेकिंग पावडर, १ टीस्पून सुंठ, चिमूटभर दालचिनी पूड, आवश्‍यकतेनुसार कोमट पाणी.
कृती : मैदा, बेकिंग पावडर, दालचिनी पूड व सुंठ एकत्र करून चाळून घ्यावा. एका बोलमध्ये लोणी आणि साखर हलके होईपर्यंत फेटून घ्यावे. अंडे फोडून त्यात चमचाभर कोमट पाणी घालावे व चांगले घुसळावे. घुसळलेले अंडे, लोणी व साखरेच्या मिश्रणात घालून ढवळावे. त्यात हळूहळू मैदा घालून लाटता येईल इतपत घट्ट भिजवावे. तयार पीठ १५ ते २० मिनिटे झाकून फ्रीजमध्ये ठेवावे. पिठाचा गोळा लाटण्याने जाडसर लाटावा व वेगवेगळ्या आकाराच्या कुकी कटरने कापावे. सिलिकॉन शीटवर ठेवून सहा ते सात मिनिटे बेक करावे.
    नाताळच्यावेळी जिंजर ब्रेड कुकीजना चांदणी, ख्रिसमस ट्री, सांताक्लॉज, घंटा असे वेगवेगळे आकार देऊन त्यावर आईसिंग करून त्या सजवल्या जातात. याच जिंजर ब्रेडचे मोठे तुकडे भाजून त्यापासून घर तयार केले जाते व तेदेखील आईसिंग करून त्यावर रंगीत गोळ्या लावून सजवले जाते.


कॉफी केक
साहित्य : एक कप लोणी, २ कप मैदा, १ टीस्पून बेकिंग पावडर, ३ अंडी, १ कप साखर, अर्धा कप अक्रोडाचे तुकडे, १ मोठा चमचा इन्स्टंट कॉफी, चिमूटभर वेलची पूड, १ लहान चमचा व्हॅनिला इसेन्स, आवश्‍यकतेनुसार दूध.
कृती : मैदा, बेकिंग पावडर आणि वेलची पूड एकत्र करून चाळून घ्यावे. लोणी आणि साखर इलेक्ट्रिक मिक्सरने किंवा एग बिटरने फेसावे. त्यात एक एक करून अंडे घालावे व फेसावे. हे मिश्रण फेसता फेसता त्यात थोडा थोडा चाळलेला मैदा घालावा. एक चमचा दूध कोमट करून त्यात कॉफी पावडर विरघळवून घ्यावी. केकच्या मिश्रणात अक्रोडाचे तुकडे व व्हॅनिला इसेन्स घालावे आणि त्यात हलक्या हाताने ही कॉफी मिसळावी. केकचे मिश्रण फार घट्ट वाटल्यास त्यात थोडे दूध घालावे. मिश्रण सिलिकॉनच्या भांड्यात घालून साधारणपणे ४० मिनिटे बेक करावे.


रम बॉल्स
साहित्य :
दोन कप कुसकरलेला चॉकलेट केक, १ मोठा चमचा कंडेन्स्ड मिल्क, अर्धा कप काजू, बदाम आणि अक्रोड यांचे बारीक तुकडे, १ लहान चमचा बेदाणे, २ मोठे चमचे रम, अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट.
कृती : एका बोलमध्ये रम घालून त्यात बेदाणे व ड्रायफ्रूटचे तुकडे साधारणपणे १५ मिनिटे भिजवून ठेवावे. त्यात कुसकरलेला चॉकलेट केक व कंडेन्स्ड मिल्क घालून मिश्रण कालवावे. त्याचे लिंबाच्या आकाराचे गोळे वळावे व डेसिकेटेड कोकोनटमध्ये घोळवावेत. तयार रम बॉल्स पेपर कपमध्ये घालावे व झाकून फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवावेत.


क्रॅनबेरी सॉस
साहित्य : एक कप साखर, १ कप ऑरेंज ज्यूस, २५० ग्रॅम फ्रोझन किंवा ताज्या क्रॅनबेरीज, १ चहाचा चमचा लेमन झेस्ट. 
कृती : एका पॅनमध्ये साखर आणि ऑरेंज ज्यूस एकत्र करावा आणि उकळी आणावी. त्यात क्रॅनबेरीज आणि  झेस्ट घालून मंद आचेवर शिजवावे. आवश्‍यकता असेल तर थोडे पाणी घालावे. क्रॅनबेरीज न मोडता छान मऊ शिजल्या म्हणजे सॉस तयार झाला. गार झाल्यावर सॉस घट्ट होतो.   
अशा पद्धतीने केलेला क्रॅनबेरी सॉस रोस्ट टर्कीबरोबर खाल्ला जातो. 


ख्रिसमस ब्रेड पुडिंग
साहित्य : तीन कप ब्रेडचे तुकडे, अर्धा कप क्रॅनबेरीज किंवा मनुका, १ सफरचंद, १ कप दूध, २ अंडी, २ मोठे चमचे लोणी, पाऊण कप साखर, १ लहान चमचा व्हॅनिला इसेन्स, वरून घालण्यासाठी बदाम व अक्रोडाचे काप.
कृती : चपट्या बेकिंग डिशला थोडे लोणी लावावे. सफरचंदाचे साल व बिया काढून बारीक तुकडे करावेत. ब्रेडचे तुकडे, सफरचंद आणि मनुका एकत्र करून ते बेकिंग डिशमध्ये घालावे. एका बोलमध्ये अंडी, उरलेले लोणी, कोमट दूध व साखर घालून फेटावे. हे मिश्रण ब्रेडवर ओतावे व १० मिनिटे बेक करावे. बेकिंग डिश बाहेर काढून पुडिंगवर बदाम व अक्रोडाचे काप पसरावेत. बेकिंग डिश परत ओव्हनमध्ये ठेवून ५ ते ७ मिनिटे बेक करावे.


रम सॉस
साहित्य : एक कप कडक कॉफी, अर्धा कप साखर, १ कप ड्रायफ्रूट्सचे बारीक तुकडे, अर्धा टीस्पून कॉर्न स्टार्च, २ मोठे चमचे रम.
कृती : ड्रायफ्रूट्स रममध्ये भिजवून ठेवावेत. एका भांड्यात कॉफी, साखर व कॉर्न स्टार्च एकत्र करावे. मंद आचेवर शिजायला ठेवावे. मिश्रण हलवत रहावे म्हणजे त्यात गुठळ्या होणार नाहीत. मिश्रण घट्ट व्हायला लागले, की गॅस बंद करावा. सॉस गार झाल्यावर त्यात रम आणि ड्रायफ्रूट्स मिसळावेत. सॉस फार घट्ट वाटल्यास कोमट पाणी घालून सैल करावा. अशा पद्धतीने केलेला रम सॉस कॉफी केकवर किंवा ख्रिसमस ब्रेड पुडिंगवर घालून खाल्ला जातो. 
खास नाताळच्यावेळी केले जाणारे हे सॉस आपण व्हॅनिला आइस्क्रीम, प्लेन किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या केकवर घालून खाऊ शकतो.


ख्रिसमस सांग्रिया
नाताळची अशीच अजून एक परंपरा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पंच तयार करण्याची परंपरा. सांग्रिया हे स्पॅनिश लोकांचे अतिशय आवडते असे फ्रूट पंच असून पारंपरिक पद्धतीने केलेल्या सांग्रियामध्ये रेड वाईन आणि सफरचंदाचे तुकडे हे दोन मुख्य घटक असतात. हे पेय जगभर लोकप्रिय असून त्यात देशोदेशी थोडेफार बदल केले जातात. त्यातलीच एक रेसिपी नाताळच्यावेळी केल्या जाणाऱ्या सांग्रियाची. 

साहित्य : एक सफरचंद, १ पेअर, एका लिंबाचा रस, १५-२० चेरीज किंवा क्रॅनबेरीज, १ कप ऑरेंज ज्यूस, २ कप जिंजरेल आणि ५०० मिली सोडा, सजावटीसाठी रोझमेरी व एका लिंबाच्या चकत्या, बर्फाचा चुरा. (अल्कोहोल सांग्रिया करायचा असल्यास एक मध्यम आकाराची बाटली व्हाईट वाईन.)
कृती : सफरचंद आणि पेअरचे बारीक तुकडे करून पंच बोलमध्ये घालावे. त्यात लिंबाचा रस, ऑरेंज ज्यूस, जिंजरेल आणि क्रॅनबेरीज घालाव्यात. सोडा व बर्फाचा चुरा घालून पंच किमान ३ तास गार करावे. अल्कोहोल घालून पंच करायचा असेल, तर त्यात सोड्याऐवजी वाईन घालावी. पंच सर्व्ह करताना प्रत्येक ग्लासमध्ये रोझमेरी व २-३ चेरीज घालाव्यात व ग्लासच्या कडेला लिंबाची चकती खोचावी. लाल, हिरव्या व सोनेरी या तीन रंगांचा ख्रिसमस सांग्रिया अतिशय आकर्षक दिसतो आणि चवीलाही छान लागतो.
असे वेगवेगळ्या प्रकारचे पंच नाताळच्या पार्टीला करण्याची पाश्‍चात्त्य देशांत पद्धत आहे. पंच पार्टीला जाताना वाईनची बाटली भेट म्हणून नेली जाते. बऱ्याचवेळा हे पाहुणे बरोबर आणलेली वाईनची बाटली फोडून पंचमध्ये घालतात. हळूहळू तो पंच स्ट्राँग होत जातो, पार्टी रंगत जाते व वातावरणात एक प्रकारची वेगळीच झिंग येते.

अशा तऱ्‍हेने नाताळचा आनंद पुरेपूर लुटून होतो ना होतो, तोपर्यंत नव्या आशा आणि नवी स्वप्ने घेऊन नवीन वर्ष येते. नवीन वर्षाचा सूर्य जसा वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या वेळी उगवतो, तसेच तिथे त्याचे स्वागतदेखील आगळ्या वेगळ्या पद्धतीने आणि अगदी दणक्यात केले जाते.
 

संबंधित बातम्या