केकच्या नावीन्यपूर्ण रेसिपीज

सुजाता नेरूरकर
सोमवार, 23 डिसेंबर 2019

केक स्पेशल
डिसेंबर महिन्यात ख्रिसमस आणि नवीन वर्षानिमित्त खवय्यांसाठी पर्वणीच असते. कारण या दोन्ही दिवसांचे सेलिब्रेशन हे आवडत्या केक शिवाय अपूर्णच... त्यामुळे सेलिब्रेशन घरी असो किंवा बाहेर, केक तर असायलाच हवा. मग तो अंड्याचा असो वा बिन अंड्याचा... अशाच काही कमीत कमी वेळात, झटपट होणाऱ्या केकच्या रेसिपीज...

सरप्राइज केक  
साहित्य : चार ताजे ब्रेड स्लाइस, १ कप व्हीप्ड क्रीम, मिक्स फ्रूट जॅम, १ टेबलस्पून साखर, ३ टेबलस्पून पाणी, ३-४ थेंब व्हॅनिला इसेन्स, २ टेबलस्पून डार्क चॉकलेट, सजावटीसाठी चेरी 
कृती : ब्रेड स्लाइसच्या कडा कापून घ्याव्या. चारी ब्रेड स्लाइस एकसारखे कापले गेले पाहिजेत. एका वाटीत साखर व पाणी थोडे गरम करून घालावे. साखर विरघळून पाणी थंड झाल्यावर व्हॅनिला इसेन्स घालून मिक्स करून घ्यावे. व्हीप्ड क्रीम एका बोलमध्ये काढून घ्यावे. जर घरी व्हीप्ड क्रीम नसेल, तर फ्रेश क्रीममध्ये थोडी पिठीसाखर घालून चांगले फेसून घ्यावे. डार्क चॉकलेट कंपाऊंड किसून घ्यावे. जर डार्क चॉकलेट कंपाऊंड घरी नसेल, तर आपले ५ स्टार चॉकलेट किसून घ्यावे. फ्रूट जॅम एका बोलमध्ये काढून घ्यावे. जॅम नसेल तर आपल्याला आवडेल ते मिक्श्चर करावे. (मी जॅमच्याऐवजी स्ट्रॉबेरी सिरप वापरले आहे.) ब्रेड स्लाइसला दोन्ही बाजूंनी शुगर सिरप लावून घ्यावे. एक ब्रेडची स्लाइस घेऊन त्यावर मिक्स फ्रूट जाम लावावा व त्यावर दुसरी ब्रेड स्लाइस ठेवून त्यावर क्रीम लावावी. त्यावर तिसरी ब्रेड स्लाइस ठेवून त्यावर परत मिक्स फ्रूट जॅम लावावा व चौथी ब्रेड स्लाइस ठेवून त्यावर व्हीप्ड क्रीम लावावे. आता चारही बाजूंनी व्हीप्ड क्रीम चांगले लावून घ्यावे. वरच्या बाजूला किसलेले डार्क चॉकलेट घालून चेरीने सजवून ५ मिनिटे फ्रीजमध्ये थंड करायला ठेवावे. स्ट्रॉबेरी केक पाच मिनिटांत तयार झाला, आता तो सर्व्ह करावा.


मग केक   
साहित्य : चार टेबलस्पून मैदा, ४ टेबलस्पून पिठीसाखर, १ अंडे, ३ टेबलस्पून तेल, ३ टेबलस्पून दूध, अर्धा टीस्पून बेकिंग पावडर, १ टेबलस्पून कोको पावडर, एक चिमूट मीठ, २ थेंब व्हॅनिला इसेन्स. 
कृती : एक मोठ्या आकाराचा मग घ्यावा, म्हणजे ओव्हनमध्ये केक बाहेर येणार नाही. त्या मगामध्ये अंडे फोडून त्यामध्ये तेल व दूध घालून फोर्कने चांगले फेटून घ्यावे. नंतर त्यामध्ये मैदा, पिठीसाखर, बेकिंग पावडर, कोको पावडर, मीठ व व्हॅनिला इसेन्स घालून फोर्कने चांगले फेटून घ्यावे. मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये मायक्रोवर हाय पॉवरवर २ मिनिटे सेट करून मधोमध मग ठेवून बेक करून घ्यावा. गरम गरम 'मग केक' मुलांना खायला द्यावा. कारण हा गरमच चांगला लागतो.


गव्हाच्या पिठाचा केक  
साहित्य : एक मोठी वाटी गव्हाचे पीठ (आटा), १ वाटी गूळ, १ वाटी दही, अर्धा कप दूध, दीड चमचा बेकिंग सोडा, अर्धा चमचा बेकिंग पावडर, १ टेबलस्पून चॉकलेट सॉस, ड्रायफ्रूट्स 
कृती : एका भांड्यात गूळ विरघळून घ्यावा. एका बोलमध्ये गव्हाचे पीठ, गूळ, दही, दूध, बेकिंग सोडा व बेकिंग पावडर घालून चांगले मिक्स करावे. एका अॅल्युमिनियमच्या भांड्याला तेल लावून त्यामध्ये केलेले मिश्रण व ड्राय फ्रूट्स घालावे व वरून चॉकलेट सॉस घालावा. विस्तवावर नॉनस्टिक भांडे (पॅन) ठेवावा व त्यामध्ये २ वाट्या मीठ घालून १० मिनिटे गरम करायला ठेवावे. भांडे चांगले गरम झाले, की त्यावर एक स्टँड ठेवावे. स्टँड (म्हणजे आपण गरम भांडे ठेवतो ती चाकी) ठेवून त्यावर केकचे भांडे ठेवावे. भांड्यावर पॅनवर झाकण ठेवून मंद विस्तवावर ४० मिनिटे केक भाजून घ्यावा. ४० मिनिटे झाल्यावर सुरीने केक बेक झाला आहे का ते बघावे. नसेल झाला तर अजून १० मिनिटे ठेवावे. मग विस्तव बंद करून १५ मिनिटे तसाच थंड करायला ठेवावा. पौष्टिक गव्हाच्या पिठाचा केक थंड झाल्यावर कापून सर्व्ह करावा.
टीप : केक करताना कुकर किंवा कढई वापरावी.


मिल्क पावडर केक 
साहित्य : दोन कप मैदा, १ कप मिल्क पावडर, १ कप दूध, १ कप साखर, २ टीस्पून व्हॅनिला इसेन्स, २ चिमूट मीठ, १ टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा, अर्धा कप चेरी किंवा टूटीफ्रूटी. 
कृती : मिक्सरमध्ये साखर बारीक करून घ्यावी. मैदा, मिल्क पावडर, पिठीसाखर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा व मीठ चाळणीने २ वेळा चाळून घ्यावे. चाळलेल्या मैद्यामध्ये व्हॅनिला इसेन्स, दूध घालून चांगले फेसून घ्यावे. मिश्रण फेसण्यासाठी हँड मिक्सर वापरला तरी चालेल. मग त्यामध्ये चेरी घालावी. खोलगट भांड्याला तुपाचा हात लावून त्यामध्ये मिश्रण ओतावे. प्रेशर कुकर गरम करायला ठेवावा. कुकर गरम झाला की त्यामध्ये स्टँड ठेवून त्यावर मिश्रणाचे भांडे ठेवावे. कुकरच्या झाकणाची शिटी व रिंग काढून कुकरचे झाकण लावावे. मग मंद विस्तवावर ४० मिनिटे केक बेक करून घ्यावा. गरम गरम किंवा थंड झाल्यावर सर्व्ह करावा. 


वॉलनट चॉकलेट केक 
साहित्य : एक कप मैदा, २ टेबलस्पून कोको पावडर, पाऊण कप लोणी किंवा बटर, पाऊण कप साखर, १ टीस्पून बेकिंग पावडर, पाव कप दूध, पाव कप अक्रोड तुकडे, १ टीस्पून बेकिंग बटर.
कृती : प्रथम मैदा, कोको पावडर व बेकिंग पावडर चाळून बाजूला ठेवावी. अंडे चांगले फेटून बाजूला ठेवावे. एका बोलमध्ये बटर व साखर विरघळून जाईल इतपत फेटून घ्यावे. मग त्यामध्ये अंडे घालून परत मिश्रण हलके होईपर्यंत फेटून घ्यावे. नंतर त्यामध्ये चाळलेला मैदा घालून मिश्रण एकसारखे करून त्यामध्ये दूध व वॉलनटचे तुकडे घालून परत हालवून घ्यावे. बेकिंग ट्रेला आतून बटर लावून घ्यावे आणि त्या ट्रेमध्ये मिश्रण ओतून एकसारखे करून घ्यावे. मायक्रोवेव्ह कन्व्हेक्शन मोडवर १८० अंशावर प्रीहीट करून घ्यावा. ओव्हन प्रिहिट झाल्यावर ट्रे ओव्हनमध्ये ठेवून कन्व्हेक्शन मोडवर ३५-४० मिनिटे बेक करायला ठेवावा. केक बेक झाल्यावर ओव्हन बंद करून २० मिनिटे ओव्हनमध्येच ठेवावा. नंतर छान सर्व्ह करावा.


ब्राउनी 
साहित्य : दीड कप मैदा, सव्वा कप साखर, २ अंडी, ३ टेबलस्पून कोको पावडर, १ टीस्पून कॉफी पावडर, पाऊण कप लोणी, पाव टीस्पून व्हॅनिला इसेन्स, १ टीस्पून बेकिंग पावडर, १ टीस्पून रम, पाव टीस्पून मीठ, थोडे अक्रोड तुकडे. 
कृती : प्रथम साखर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावी. नंतर मैदा, कोको पावडर, कॉफी पावडर व मीठ चाळणीने चाळून घ्यावे. लोणी व पिठीसाखर चांगली फेसून घ्यावे. अंडी फोडून फोर्कने फेटून घ्यावे. फेटलेल्या लोणी, साखरेत अंडी व चाळलेला मैदा घालून परत चांगले फेसून घ्यावे. फेसलेल्या मिश्रणात व्हॅनिला इसेन्स, रम, बेकिंग पावडर घालून एकसारखे मिश्रण करून घेऊन अक्रोडाचे तुकडे घालावे. केकच्या भांड्याला तुपाचा हात लावून त्यामध्ये तयार मिश्रण ओतावे व एकसारखे करून घ्यावे. मायक्रोवेव्ह किंवा साधा ओव्हन प्रीहीट करून घ्यावा. त्यामध्ये केकचे भांडे ठेवून ४० मिनिटे बेक करावा. (मायक्रोवेव्हमध्ये केक बेक करताना १८० डिग्रीवर सेट करून ४० मिनिटे ठेवावा. केक झाल्यावर लगेच बाहेर न काढता १५ मिनिटे तसाच ठेवावा. ब्राउनी थंड झाल्यावर कापून मग चहाबरोबर सर्व्ह करावी.


झटपट मिल्क केक 
साहित्य : दोन लीटर दूध, २ चिमटी तुरटी, २ कप साखर, २ टेबलस्पून तूप.
कृती : दूध गरम करून घ्यावे. त्यामध्ये दोन चिमूट तुरटी पावडर घालून मिक्स करून घ्यावे. दूध फाटेल व दाणेदार होईल. दूध तसेच आटवत ठेवावे. मधूनमधून हालवत राहावे. दूध घट्ट झाले की त्यामध्ये साखर घालावी व परत आटवत ठेवावे. ८-१० मिनिटांनंतर त्यामध्ये तूप घालावे. मिश्रण घट्ट होईपर्यंत आटवत ठेवावे. नंतर एका खोलगट भांड्याला तुपाचा हात लावून त्यामध्ये मिश्रण ओतून एकसारखे करावे. साधारणपणे मिश्रण थंड व्हायला ३-४ तास लागतील. थंड झाल्यावर त्याच्या वड्या कापून घ्याव्या.


चॉकलेट रम बॉल
साहित्य : पाचशे ग्रॅम चॉकलेट डार्क बेस, अर्धा कप डेसिकेटेड कोकनट, १० ओरिओ बिस्किटे (चुरा), २ टीस्पून रम किंवा वाईन ( रम, वाईनचे प्रमाण हे ५०० ग्रॅम बेससाठी आहे), चॉकलेट सॉस.
कृती : चॉकलेट बेस घेऊन डबल बॉयलिंग पद्धतीने विरघळवून घ्यावा. मग एका चमच्याने हालवून घेऊन ५ मिनिटे थंड करायला ठेवावा. नंतर त्यामध्ये डेसिकेटेड कोकनट, ओरिओ बिस्कीट, रम किंवा वाईन घालून मिक्स करून त्याचे गोल गोळे करून त्यावर थोडा चॉकलेट सॉस घालून फ्रीजमध्ये ५ मिनिटे ठेवावे.


सुपर लेमोनेड केक 
साहित्य : आठ टेबलस्पून मैदा, ७ टेबलस्पून पिठीसाखर, ६ टेबलस्पून लोणी किंवा वनस्पती तूप, १ टीस्पून बेकिंग पावडर, १ मोठे लिंबू (लिंबू किसून त्याची साल काढून), २ टेबलस्पून दूध, ३ अंडी, लेमन इसेन्स. 
कृती : मैदा व बेकिंग पावडर तीन वेळा चाळून घ्यावी. साखर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावी. लिंबू किसून त्याची साले बाजूला ठेवावी. लिंबूरस काढून बाजूला ठेवावा. अंडी फोडून फोर्कने फेटून घ्यावे. एका बोलमध्ये लोणी व पिठीसाखर चांगली फेसून घ्यावी. त्यामध्ये फेसलेले अंडे घालून मिक्स करून घ्यावे. अंडे घातल्यावर मिश्रण नासल्यासारखे दिसेल, त्यामध्ये मैदा घालून परत हलक्या हातांनी फेसून घ्यावे. नंतर त्यामध्ये लिंबाची साले, लिंबूरस, लेमन इसेन्स घालून हलक्या हातांनी मिक्स करून घ्यावे. केकच्या भांड्याला आतून बटर पेपर लावावा व त्यावर केकचे मिश्रण ओतावे. प्रथम ओव्हन गरम करून घ्यावा. त्यावर केकचे भांडे ठेवून ३०-३५ मिनिटे केक बेक करून घ्यावा.


स्ट्रॉबेरी मार्बल केक
साहित्य : दोन कप मैदा, २ कप साखर, २ कप लोणी, ३ अंडी, दीड चमचा बेकिंग पावडर, २ टेबलस्पून स्ट्रॉबेरी सॉस, १ टीस्पून व्हॅनिला इसेन्स, १-२ थेंब पिवळा रंग 
कृती : एका बोलमध्ये अंडी फोडून फोर्कने फेटून घ्यावे. साखर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावी. मैदा व बेकिंग पावडर चाळणीने चाळून घ्यावी. एका बोलमध्ये लोणी हलक्या हातांनी फेटून घ्यावे. त्यामध्ये पिठीसाखर घालून परत चांगले फेटून घ्यावे. त्यामध्ये फेटलेले अंडे व मैदा घालून चांगले मिक्स करून घ्यावे. व्हॅनिला इसेन्स व पिवळा रंग घालून मिक्स करून घ्यावे. जर मिश्रण घट्ट वाटले तर थोडेसे दूध वापरावे. केकच्या भांड्याला लोणी लावून वरून मैदा भुरभुरावा व त्यामध्ये केकचे मिश्रण घालून स्ट्रॉबेरी सॉस घालून फोर्कने सॉस हळुवारपणे एकदा फिरवावा. मायक्रोवेव्ह १८० डिग्रीवर ३०-३५ मिनिटांवर सेट करून केकचे भांडे ठेवून बेक करून घ्यावे. केक झाल्यावर १०-१५ मिनिटे तसाच ओव्हनमध्ये ठेवावा. थोडा थंड झाल्यावर बाहेर काढावा.


हेल्दी एगलेस बनाना ओट्स मफिन्स
साहित्य : तीन मध्यम आकाराची पिकलेली केळी, अर्धा कप दूध, पाव कप तेल, टीस्पून व्हॅनिला इसेन्स, पाव कप ब्राऊन शुगर, सव्वा कप मैदा, अर्धा कप ओट्स, १ टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा, अर्धा टीस्पून दालचिनी पावडर, चिमूटभर मीठ, १ टेबलस्पून व्हिनेगर किंवा लिंबूरस  
कृती : ओव्हन प्रीहीट करून घ्यावे. ओट्स मिक्सरमध्ये थोडे जाडसर वाटून घ्यावे. एका मध्यम आकाराच्या बोलमध्ये केळी कुस्करून घ्यावी. त्यामध्ये दूध, तेल, व्हॅनिला इसेन्स, साखर, चांगली मिक्स करून घ्यावी. पाहिजे असेल तर हँड मिक्सर वापरावा. पण अगदी कमी स्पीडवर. दुसऱ्या एका मोठ्या बोलमध्ये मैदा, ओट्स, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, दालचिनी पावडर, मीठ घालून मिक्स करून त्यामध्ये दूध तेलरचे मिश्रण घालून चांगले मिक्स करून घेऊन त्यामध्ये व्हिनेगर किंवा लिंबूरस घालून परत हलक्या हातांनी मिक्स करून घ्यावे. ओव्हन प्रीहीट करून घ्यावा व छोट्या छोट्या केकच्या साचात एक चमचा मिश्रण घालून वरून ओट्स व ड्राय फ्रूट्स घालून सजवावे. मफिन्सचे साचे ओव्हनमध्ये ३०-३५ मिनिटे बेक करून घ्यावे. गरम गरम हेल्दी एगलेस बनाना ओट्स मफिन्स चहाबरोबर, कॉफीबरोबर सर्व्ह करावे.

संबंधित बातम्या