डिलिशियस एगलेस केक्स 

उषा लोकरे 
सोमवार, 23 डिसेंबर 2019

केक स्पेशल
केक, पेस्ट्रीज तसे सर्वांचे आवडीचे पदार्थ... पण त्यात अंडे घातल्यामुळे बरेचजण ते खाणे टाळतात. पण अंड्याशिवायदेखील अतिशय डिलिशियस, स्पाँजी असे केक आणि पेस्ट्रीज घरच्या घरी करता येऊ शकतात... अशा काही एगलेस केक रेसिपीज.

स्पाँज केक  
साहित्य : दोनशे ग्रॅम कंडेन्स्ड‌ मिल्कमेड, १४० ग्रॅम मैदा, १ चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा खायचा सोडा, अर्धा चमचा व्हॅनिला फ्लेवर, वेलदोडा-जायफळपूड, ४ टेबलस्पून वितळलेले लोणी, काजू तुकडे ऐच्छिक. 
कृती : ओव्हन केक तयारीच्या आधीच प्रीहीट करावा. मैदा, बेकिंग पावडर, सोडा एकत्र करून दोन वेळा चाळून घ्यावे. त्यात दूध, लोणी व फ्लेवर मिसळावा. मिश्रणात ५ टेबलस्पून पाणी घालून मिश्रण फेटून एकजीव करून घ्यावे. त्यात काजू मिसळावेत. केक पात्राला तुपाचा हात चोळून घ्यावा. त्यावर मैदा शिंपडावा व त्यावर वरील मिश्रण ४०० अंश फॅऱ्हनाइटला दहा मिनिटे बेक करावे. नंतर तापमान ३०० अंश फॅऱ्हनाइट करून केक तांबूस रंगावर खमंग भाजावा.


ऑरेंज केक  
साहित्य : पन्नास ग्रॅम मार्गारिन, १२० मिली मिल्कमेड, १ टेबलस्पून बेकिंग पावडर, पाव चमचा खायचा सोडा, १०० ग्रॅम मैदा, ५० मिली दूध, २५ मिली ऑरेंज ज्यूस, अर्धा चमचा ऑरेंज फ्लेवर. 
कृती : प्रथम मार्गारिन छान फेटून फ्लफी करावे. त्यात मिल्कमेड मिसळून ते एकजीव करून गुळगुळीत करावे. बेकिंग पावडर, मैदा, खायचा सोडा नीट मिक्‍स करून चाळून घ्यावा. ऑरेंज ज्यूस आणि फ्लेवर मिसळून मिश्रण फेटून एकजीव करावे. मार्गारिन मिल्कमेड मिश्रणात चांगले मिसळून घ्यावे. आता त्यात मैदा मिश्रण हलकेच घालत मिश्रण कालवून घ्यावे. घट्ट वाटल्यास २ चमचे दूध मिसळावे. आधीच गरम केलेल्या ओव्हनमध्ये १८० अंश सेल्सिअसला ३५-४० मिनिटे खमंग बेक करावा. 


रवा केक  
साहित्य : दीड कप रवा, १ वाटी साखर, अर्धी वाटी दही, अर्धी वाटी दूध, पाऊण चमचा खायचा सोडा, २ टेबलस्पून तूप, अर्धा चमचा वेलदोडा पूड, २-३ चमचे काजू तुकडे. 
कृती : दही फेटून घ्यावे. त्यात साखर घालून परत फेटावे. वितळलेले तूप व दूध वरील मिश्रणात घालावे. त्यात रवा घालून मिश्रण कालवून घ्यावे. वेलदोडा पूड व सोडा मिसळावा व सरसरीत मिश्रण करावे. मिश्रणात थोडे काजू घालावेत. तुपाचा हात फिरवलेल्या केक पात्रात मिश्रण घालावे. वरून उरलेले काजू पेरून १८० अंश सेल्सिअसला सोनेरी रंगावर केक खमंग बेक करावा.


गाजर-अक्रोड केक 
साहित्य : एक वाटी कणीक, अर्धी वाटी पिठीसाखर, १ वाटी गाजराचा कीस, १ चमचा बेकिंग पावडर, २ टेबलस्पून रिफाइंड तेल, १ चिमूट खायचा सोडा, १ चिमूट मीठ, अर्धी वाटी संत्र्याचा रस, अर्धा चमचा व्हॅनिला फ्लेवर, १ चमचा संत्र्याची साल, ३ टेबलस्पून अक्रोडचे तुकडे. 
कृती : कणीक, मीठ, बेकिंग पावडर व सोडा एकत्र मिसळून चाळून घ्यावे. अक्रोडचे तुकडे कणकेच्या १ चमचा पिठात थोडे चोळून घ्यावे. संत्र्याची साल, साखर, संत्र्याचा रस मिक्‍सरमध्ये एकजीव करून घ्यावा. त्यात गाजराचा कीस मिसळून मिश्रण एकदा फिरवून घ्यावे. (गाजराचा लगदा नको) यात कणकेचे मिश्रण थोडे थोडे घालत मिश्रण एकत्र एकजीव करून घ्यावे. केकपात्राला तुपाचा हात फिरवून त्यात केकचे मिश्रण घालावे. वरून अक्रोडचे तुकडे पेरावे. आधीच गरम केलेल्या ओव्हनमध्ये १८० अंश सेल्सिअसला २५-३० मिनिटे खमंग बेक करावा.


कॉफी केक 
साहित्य : एक कप मैदा, अर्धा कप कॉर्नफ्लोअर, १ टेबलस्पून इन्स्टंट कॉफी, १ चमचा बेकिंग पावडर, १ कप पिठीसाखर, पाव चमचा मीठ, ३ टेबलस्पून ड्रायफ्रूट्‌स, १ कप निरसे (म्हशीचे) दूध, अर्धा कप लोणी, अर्धा चमचा व्हॅनिला फ्लेवर, १ चमचा इनोज फ्रूट सॉल्ट. 
कृती : मैदा, कॉर्नफ्लोअर, बेकिंग पावडर, मीठ एकत्र करून मिक्‍स करावे. त्यात कॉफी व ड्रायफ्रूट्स घालून मिश्रण कालवावे. प्रथम लोणी व साखर चांगले फेटून हलके, फ्लफी मिश्रण करावे व त्यात दूध घालून मिश्रण फेटावे. त्यात फ्लेवर मिक्सकरून इनोज घालून मिश्रण फेटावे. या मिश्रणात हलकेच मैदा, कॉफी मिश्रण एकत्र करावे व नीट कालवून घ्यावे. तुपाचा हात फिरवलेल्या केक टीनमध्ये मिश्रण घालावे. आधीच गरम केलेल्या ओव्हनमध्ये २०० अंश सेल्सिअसला २०-२५ मिनिटे केक बेक करावा.  


डेट्‌स वॉलनट केक 
साहित्य : एक कप सिडलेस खजुराचे बारीक तुकडे, २ कप कोमट दूध, १ चमचा इन्स्टंट कॉफी, २ कप मैदा, १ चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा खायचा सोडा, चिमूटभर मीठ, १ कप वितळलेले लोणी/तूप, पाऊण कप साखर, पाऊण कप भाजलेले अक्रोड, १ चमचा व्हॅनिला फ्लेवेर, पाऊण कप ताक. 
कृती : दुधात खजुराचे तुकडे व कॉफी घालून मिश्रण झाकून ठेवावे. एका बोलमध्ये मैदा, बेकिंग पावडर, सोडा चाळून घ्यावा. त्यात मीठ, वितळलेले लोणी, साखर चांगली मिक्‍स करून घ्यावी. व्हॅनिला फ्लेवर, अक्रोड मिसळावे. वरील मिश्रणात खजूर, कॉफी मिश्रित दूध हळूहळू घालत मिश्रण कालवत नीट मिसळून घ्यावे. शेवटी ताक मिसळावे व मिश्रण चांगले मिक्‍स करून घ्यावे. केक मोल्डला तुपाचा हात फिरवून त्यावर मैदा शिंपडून घ्यावा. वरील मिश्रण मोल्डमध्ये घालून प्रीहीटेड ओव्हनमध्ये १८० अंश सेल्सिअसला ३० मिनिटे खमंग बेक करावा (टुथपीक/सुरीने नीट बेक झाल्याची खात्री करून घ्यावी). केकवर शुगर पावडर शिंपडावी.


टूटीफ्रुटी केक 
साहित्य : एकशेवीस ग्रॅम मैदा, १०० ग्रॅम पिठीसाखर, ४० ग्रॅम रिफाइंड तेल, १ चमचा व्हॅनिला फ्लेवर, ४-५ चमचे टूटीफ्रुटी, अर्धा कप दूध. 
कृती : प्रथम ओव्हन १८० अंश सेल्सिअसला गरम करून ठेवावे. मैदा व बेकिंग पावडर एकत्र मिसळून चाळून घ्यावे. टूटीफ्रुटीला १ चमचा मैदा चोळून घ्यावा. बोलमध्ये साखर, तेल व व्हॅनिला फ्लेवर एकत्र करून घ्यावे. त्यात निम्मा मैदा घालून मिश्रण एकजीव करावे. त्यात निम्मे दूध घालून मिश्रण नीट मिसळून घ्यावे. नंतर उरलेला मैदा व दूध मिसळावे व सर्व मिश्रण एकजीव करावे. नंतर निम्मी टूटीफ्रुटी घालावी व हलकेच मिश्रण मिसळून घ्यावे. उरलेली टूटीफ्रुटी वरून पेरावी. मिश्रण ३० मिनिटे बेक करावे. झाला खमंग केक तयार.


पायनॅपल पेस्ट्री  
केकसाठी साहित्य : दोन कप मैदा, अडीच चमचे बेकिंग पावडर, अर्धा कप लोणी, दीड कप पिठीसाखर, अर्धा कप पाणी, पाऊण कप दही, १ चमचा व्हॅनिला फ्लेवर, पाव चमचा मीठ. 
पेस्ट्रीसाठी : एक कप पायनॅपलचे (डब्यातील पाकवलेले) बारीक तुकडे, ३ टेबलस्पून पाइनॅपलच सिरप, ३ कप क्रीम, पाव कप पिठीसाखर, सजावटीसाठी चेरिज व पायनॅपलचे मोठे तुकडे. 
कृती : एका बोलमध्ये मैदा व बेकिंग पावडर चाळून घ्यावी. त्यात मीठ, साखर, लोणी, पाणी व व्हॅनिला फ्लेवर मिसळून मिश्रण बीटरने किंवा चमच्याने चांगले फेटून घ्यावे. त्यात दही मिसळून मिश्रण परत चांगले फेटावे. त्यात मैदा मिसळून गुळगुळीत/चकचकीत करावा. 
शक्‍यतो चौकोनी केक टीन वापरावे. त्यात तळाला तुपाचा हात फिरवावा. वर मैदा शिंपडून घ्यावा. तयार केलेल्या मोल्डमध्ये केक मिश्रण ओतून १८० अंश सेल्सिअसला २०-२५ मिनिटे बेक करावा व गार करावा. पेस्ट्रीसाठी साखर व क्रीम फेटून घट्टसर मिश्रण करावे. केकला आडवे दोन भागात कापावे. एका भागावर पायनॅपलचे बारीक तुकडे व थोडे पायनॅपल सिरप पसरावे. त्यावर क्रीम पसरून थर झाकून घ्यावा. त्यावर दुसरा केकचा भाग नीट व्यवस्थित बसवावा. त्यावर उरलेले क्रीम पसरून तो पूर्ण झाकून घ्यावा. त्यावर पायनॅपलचे तुकडे व चेरिज ठेवून सजवावे.


ब्लॅक फॉरेस्ट पेस्ट्री  
केकसाठी साहित्य : एक कप मैदा, १ कप पिठीसाखर, अर्धा कप कोको, १ चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा सोडा, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा रिफाइंड तेल, अर्धा कप कोमट पाणी, अर्धा कप दूध, १ चमचा व्हॅनिला फ्लेवर, २ टेबलस्पून दही. 
पेस्ट्रीसाठी साहित्य : दोनशे ग्रॅम फ्रेश क्रीम, ४ टेबलस्पून पिठीसाखर, ४ चमचे कॉफी अर्क, २ टेबलस्पून जॅम, १ चॉकलेट बार किसून व चेरिज. 
कृती : मैदा व इतर कोरडे साहित्य एकत्र करून चाळून घ्यावे. दुसऱ्या भांड्यात पाणी व तेल चांगले फेटून एकजीव करावे. थोडे गार करून त्यात दूध व व्हॅनिला फ्लेवर मिसळावा व दही घालून हलकेच फेटून एकजीव करावे. आता हे मिश्रण व मैदा कोको मिश्रण अलगद ढवळत एकत्र मिसळून (रसरशीत) घ्यावे. १६० अंश सेल्सिअसला ३५-४० मिनिटे प्रीहीटेड ओव्हनला केक बेक करावा. केक रॅकवर गार करून त्याचे दोन आडवे तुकडे करावे. एका भागावर प्रथम थोडे टोचे मारून कॉफी अर्क लावावा. त्यावर हलका जॅमचा थर लावावा. फ्रेश क्रीम व साखर फेटून हलके मिश्रण करावे व ते या थरावर लावावे. त्यावर केकचा दुसरा भाग ठेवून कॉफी अर्क व उरलेल्या फेटलेल्या क्रीमने झाकावे. नंतर चेरिज ठेवून सजवावे आणि फ्रीजमध्ये गार करावे. 

खास टीप्स 

  • ओव्हन प्रीहीट करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच केक मोल्ड शक्‍यतो ओव्हनच्या मध्यभागी ठेवावा. 
  • ओव्हनचे टेंपरेचर अगदी योग्य असावे. 
  • यात बेकिंग सोडा, सोडा, दही किंवा व्हिनेगर हे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. 
  • केकचे मिश्रण खूप फेटू नये. नाहीतर केक मध्यभागी बसका (sink) होऊ शकतो. तेल/तूप व साखर हे मिश्रण फेटून हलके केले जावे. 
  • केकमध्ये दही/ताक वापरल्याने केकमध्ये आर्द्रता चांगली राहते व केक छान होतो. 
  • केक अधूनमधून बाहेर काढल्यावर मोल्डमधून शक्‍यतो लवकर बाहेर काढावा. जास्त गार केल्यास केक घट्ट होतो व बसका होऊ शकतो. यासाठी शक्‍यतो जाळीचा स्टॅंड गार करायला वापरावा. 
  • केकचे कोरडे घटक एकदम केकच्या मिश्रणात न घालता दोन वेगवेगळ्या भांड्यात तयार करून हळूहळू पातळ घटक कोरड्या मिश्रणात मिसळावे. त्यामुळे केक चांगला फुलून येतो. कारण वरून अलगद घातल्याने त्यात हवामिश्रित होते. 
  • केक करताना सर्व घटक रूम टेंपरेचरला असावे. पण त्यातील तूप मात्र कोमट असावे. केकसाठी वापरल्या जाणाऱ्या 'all purpose' मध्ये कॉर्नफ्लोअर असल्याने केक जास्त हलका होतो. कोरडे घटक चाळल्याने त्यात हवा मिश्रित होऊन केक हलका होण्यास मदत होते. केक हलका करण्यासाठी सोया मिल्क/टोफूचाही वापर केला जातो. ज्यामुळे 'लेसिथिन' हे रसायन मिसळले जाते.

संबंधित बातम्या