समुपदेशनाच्या वेगळ्या वाटा...

अभय देशिंगकर, NLP Pracritionar
सोमवार, 3 जून 2019

करिअर विशेष
समुपदेशन हा मार्गदर्शन प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग असून, ती एक मुक्त प्रक्रिया आहे. समस्या निराकरणार्थ प्रत्येक व्यक्ती व्यावसायिक मदतीने स्वत:च्या एक वा अनेक समस्यांवर लक्ष केंद्रित करते व ती समस्या सोडविण्यास प्रारंभ करते. अमेरिकन मानसशास्त्रज्ञ कार्ल रॉजर्स आर यांच्या मते, समुपदेशन ही दोन व्यक्तींतील प्रत्यक्ष भेटींची मालिका असते. यामध्ये ग्राहकास स्वत:शी वा त्याच्या भोवतालच्या परिस्थितीशी परिणामकारक समायोजन करण्यास मदत केली जाते. समुपदेशांमध्ये स्वत:ची समस्या स्वत: सोडविण्याची कुवत निर्माण व्हावी, हा समुपदेशनाचा उद्देश असतो.

आज-काल आपल्या प्रत्येकाला या धकाधकीच्या आयुष्यात ताणतणाव, गोंधळलेली मनःस्थिती या व अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यातला त्यात दहावी व बारावी झाल्यावर पुढे काय हा करिअरविषयक प्रश्‍न सर्वांनाच भेडसावतो. 

सर्वप्रथम करिअर म्हणजे काय? याचा अर्थ प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने लावलेला असतो. आपल्याला किंवा आपल्या पाल्याला आर्थिक, सामाजिक गरजा पूर्ण करून आयुष्य सुखासमाधानाने जगता येईल अशा क्षेत्रात शिक्षण घेऊन काम करून भरभक्कम पगाराची नोकरी मिळवणे म्हणजे करिअर.

या व्यतिरिक्तही काही जण हटके म्हणजेच संगीत, क्रीडा असे विषय निवडून सेवा क्षेत्र निवडून वेगळे मार्ग चोखाळताना दिसतात. यापैकीच एक Counselling हे एक क्षेत्र जे आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला संधी मिळवून देते. Counsellor किंवा समुपदेश या क्षेत्राला एक वलय प्राप्त झाले आहे.

खऱ्या अर्थाने काउन्सेलिंग म्हणजे दोन व्यक्तींनी मिळून समस्या ओळखून त्यावरील उपाय शोधण्याच्या ध्येयाने केलेली संशोधन प्रक्रिया. सोप्या शब्दात सांगायचे असल्यास सूचनांद्वारे गरजू व्यक्तीला त्याच्या वर्तन समस्या सोडविण्याच्या दृष्टीने मदत करणे म्हणजेच काउन्सेलिंग. काउन्सेलिंग हा मानसशास्त्राचा अभ्यास विषय आहे. बी. ए. बॅचलर ऑफ आर्टस, एम. ए. मास्टर इन आर्टस करताना सायकॉलॉजी विषय घेऊन तुम्ही याकडे वळू शकता.

आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल, संगणक, इंटरनेट इत्यादी दृकश्राव्य साधनांद्वारा नको ते विषय विद्यार्थ्यांच्या दृष्टिक्षेपात पडतात. त्यामुळे त्यांच्यावर ज्या वयात योग्य संस्कार रुजायला पाहिजेत, तसे न होता ते बाह्य प्रलोभनांना बळी पडतात आणि कधी कधी गैर मार्गाकडे आकृष्ट होतात. सततच्या परीक्षा, खासगी वर्ग, खेळण्यावर मर्यादा, मित्र-मैत्रिणींत होणारी तुलना, पालकांचे दुर्लक्ष इत्यादी कारणांमुळेही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व वैयक्तिक जीवनात समस्या निर्माण होतात. त्यांचे निवारण होण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शनाची म्हणजेच समुपदेशनाची नितांत आवश्‍यकता असते. अन्यथा अशा परिस्थितीत विद्यार्थी निराश होण्याची शक्‍यता असते. हे काम समुपदेशक करतात. तसेच शिक्षकही समुपदेशकाची भूमिका बजावीत असतात. त्यांच्यावर विद्यार्थ्यांचा विश्वास असल्यामुळे त्याचा चांगला सकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांवर झाल्याचे दिसून येते.

सध्याच्या घाईगर्दीच्या युगात अत्यंत वेगाने बदलत असणाऱ्या परिस्थितीत व्यक्तीला परिस्थितीनुसार स्वतःत बदल घडवावे लागतात. त्या वेळी त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा वेळी Psychological Counselling (मानसिक समुपदेशन)ची मदत घेऊन तो त्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी स्वतःमध्ये धाडस निर्माण करून शकतो. अगदी लहानपणापासून ते वृद्धापर्यंत प्रत्येक क्षेत्रात काउन्सेलिंग काम करते. आपण ते एका उदाहरणाने बघूयात.

रोहन आता जवळ-जवळ तीन वर्षांचा होत आला होता. त्याच्या बाललीला, खोड्या पाहून आता त्याला शाळेत दाखल करायची वेळ जवळ येत चालली होती. काही दिवसांपासून त्याला त्यासंबंधी बोलून आई-बाबा आजी-आजोबा सगळे जण त्याची पूर्वतयारी करून घेत होते आणि अखेर तो दिवस उजाडला. रोहनने उत्साहाने शाळेत प्रवेश केला, परंतु काही दिवसांनी त्याला घरातील उबदार वातावरणातून सर्व मुलांच्यात मिसळणे अवघड जाऊ लागले. तो हट्टी, एकलकोंडा, घाबराघुबरा व्हायला लागला. सुदैवाने शाळेत Child Counselling केले जात होते, त्याची त्याच्या पालकांनाही मदत झाली.

काही दिवसांत तो रुळलाही. नवीन मित्र मिळाले. पालकही निर्धास्त झाले. अशाच वातावरणात काही वर्षे गेली. रोहन आता माध्यमिक शाळेत जायला लागला. त्यात शरीराबरोबर मनाचीही, भावनांचीही वाढ होत होती. परिचित अपरिचित स्पर्श भिन्नलिंगी आकर्षण म्हणजेच वयात येणं या सगळ्या गोष्टींनी तो भांबावून गेला होता. अभ्यासावर लक्ष केंद्रित होत नव्हते. खेळ, कलागुण यामध्ये तो स्वतःला रममाण करून घेत होता, परंतु पालकांना हे पटत नसल्यामुळे त्यांच्याद्वारे केलेली तुलना, दबाव यांना तो बळी पडू लागला. त्याच्या वागण्या-बोलण्यात फरक जाणवू लागला. इथे त्याला शाळेत असलेल्या Counselling of High School ची मदत झाली. परंतु इथेच थांबून चालणार नव्हते. दहावीत तर पूर्ण करावी लागणार होती. त्याला असलेली क्रीडा क्षेत्राची आवड त्याला स्वस्थ बसू देत नव्हती.

महाविद्यालयीन जीवनात प्रवेश करताना त्याला वेगवेगळी क्षेत्र खुणावत होती. आर्थिक आरोग्यविषयक, सामाजिक मनोरंजन, व्यवसायविषयक असे विविध पर्याय उपलब्ध होते. Counselling द्वारा विद्यार्थ्यांना माहितीचा पुरवठा करून स्वतःच स्वतःला तसेच इतरांना समजून घेऊन मुक्तपणे योग्य कार्य करावे यासाठी मदत केली जाते. तसेच रोजगारविषयक, शिक्षणविषयक सामाजिक जीवन, व्यक्तिगत समायोजन इत्यादी क्षेत्राविषयीही Counselling केले जाते.

रोहनने यासाठी Career Counsellor ची मदत घेतली. व्यवसाय, नोकरी हा प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात घेतलेला एक महत्त्वपूर्ण निर्णय असतो. रोहनला बॅडमिंटनची विशेष आवड होती, त्यामुळे त्याने बॅडमिंटन हा खेळ करिअरसाठी निवडला. त्याच्या आई-वडिलांनीही त्याला दुजोरा दिला, पूर्ण चौकशी केली व तिथे खेळाबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील मानसिक समस्या सोडवण्यासाठी खेळातील मानसशास्त्र याविषयी चर्चासत्रे आयोजित केली जातात अशा ठिकाणी त्याने प्रवेश निश्‍चित केला. आता त्याला आयुष्याच्या जोडीदाराची गरज भासत होती. आयुष्यातील जोडीदार कसा असावा, अपेक्षाची पूर्तता कशी करावी, यासाठी विवाहपूर्व समुपदेशन Premarital Counselling ची मदत झाली. त्यानंतर विवाह बंधनात अडकल्यावर वैवाहिक जीवनात एकमेकांना सांभाळून घेऊन आपापल्या क्षेत्रात कसे पुढे जाता येईल, यासाठी Marital Counselling ची मदत होऊ शकते.

थोडक्‍यात लहानपणापासून आबालवृद्धांपर्यंत counsellor ह्या क्षेत्रात काम करता येणं शक्‍य आहे. या व्यतिरिक्त रुग्णालये, कौटुंबिक न्यायालये, कारागृहे, अनाथ अपंग मुलांसाठीचे आधारगृह मोठमोठ्या कंपन्यांमध्ये Counselling हे वापरले जाते. यामध्ये पुढील शिक्षण घेऊन Personal Coach, Trainer हेही होता येते.

Consellor या शब्दाला व्यक्तिमत्त्वाला एक सामाजिक वलय आहे. प्रतिष्ठा आहे. ज्याला माणसांशी संवाद साधायला आवडतो, मदत करण्यात धन्यता वाटते, त्याबरोबरच पैसाही उपलब्ध होतो त्यांनी या क्षेत्राचा विचार करावा. पुण्यात याविषयी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन पातळीवर ज्ञानप्रबोधिनी, फर्ग्युसन महाविद्यालय, सर परशुरामभाऊ महाविद्यालय, गरवारे महाविद्यालय, पुणे विद्यापीठ इथे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.  

संबंधित बातम्या